फिओरेल्ली, जुझेप्पे : (८ जून १८२३–२८ जानेवारी १८९६). जुझेप्पे फ्योरेल्ली. पुरातत्त्वविद्येला आधुनिक बनवण्यात महत्त्वाची भूमिका बजावणारे एकोणिसाव्या शतकातील इटालियन पुरातत्त्वज्ञ. त्यांचा जन्म नेपल्स (नापोली) येथे झाला. त्यांच्या बालपणाविषयी व शिक्षणाविषयी फारशी माहिती उपलब्ध नाही. त्यांना लहानवयातच जुन्या अवशेषांसंबंधी गोडी लागली असावी, कारण त्यांनी १८४६ ते १९४८ या काळात पोम्पेई (पाँपेई) येथे सर्वेक्षणाचे प्राथमिक काम पूर्ण केले होते. तथापि त्यांच्या इटालियन राष्ट्रवादी राजकीय मतांमुळे आणि क्रांतिकारकांचे एक गुप्त दल (Carbonari) निर्माण केले म्हणून नापोलीचा राजा दुसरा फर्डिनांड याच्या राजवटीत त्यांना काही वर्षे कारावास भोगावा लागला. तुरुंगात असताना फिओरेल्लींनी लिहिलेला तीन खंडांचा हिस्ट्री ऑफ पोम्पेयन अँटिक्स  हा ग्रंथ प्रकाशित झाला (१८६०-६४).

तुरुंगातून सुटल्यावर फिओरेल्लींची नेपल्स विद्यापीठात प्राध्यापक म्हणून नेमणूक झाली (१८६०). त्यांनी त्याच वर्षी पोम्पेई उत्खननाला सुरुवात केली. हे काम १८७५ पर्यंत चालू होते. याच काळात १८६३ पासून फिओरेल्ली नेपल्सच्या नॅशनल म्युझियमचे संचालक होते. त्यांनी १८७५ मध्ये पोम्पेई उत्खननाचे निष्कर्ष मांडणारा डेस्क्रिझिओने डी पोम्पे हा ग्रंथ प्रकाशित केला. त्याच वर्षी त्यांच्याकडे संपूर्ण इटलीच्या पुरातत्त्वीय स्थळांचे नियंत्रण करण्याची जबाबदारी देण्यात आली. ते पुरातत्त्व खात्याच्या महासंचालक पदावर त्यांच्या मृत्यूपर्यंत कार्यरत होते.

फिओरेल्लींनी अवघी पंधरा वर्षे पोम्पेई उत्खनन केले असले, तरी पुरातत्त्वविद्येच्या इतिहासात त्यांचे कार्य अत्यंत महत्त्वाचे आणि पथदर्शी मानले जाते. २४ ऑगस्ट ७९ रोजी वेसुवियस पर्वतातील ज्वालामुखीच्या उद्रेकानंतर राखेत गाडले गेलेले हे शहर सतराव्या शतकापासूनच प्रसिद्ध झालेले होते. पोम्पेई येथे फिओरेल्लींनी सर्वेक्षण सुरू करण्याअगोदर जवळजवळ शंभर वर्षे अनियंत्रित उकरणे चालू होते. या काळात केवळ मौल्यवान पुरावस्तू उकरून त्या धनिकांच्या खासगी संग्रहासाठी विकणे हाच मुख्य उद्देश असल्याने त्या उकरण्याला कसलीही शिस्त नव्हती. तसेच तेथे काय व कुठे सापडले याची कसलीही नोंद करण्याची कोणालाच गरज वाटत नव्हती. साहजिकच पोम्पेईमध्ये प्रचंड नासधूस झालेली होती.

फिओरेल्लींनी पोम्पेई उत्खननाला प्रारंभ करतानाच या उत्खननाचा उद्देश पोम्पेईचे जतन आणि सर्व माहिती प्रसिद्ध करणे हा असल्याचे स्पष्ट केले होते. त्यामुळे त्यांनी सर्व कामाच्या दैनंदिन नोंदी ठेवण्याचा आग्रह धरला. त्यांनी उत्खननाची नोंदवही (Journal) ठेवण्याची पद्धत काम करणाऱ्यांच्या अंगवळणी पाडली. आधुनिक पुरातत्त्व संशोधनात अशा नोंदवहीला (Logbook) अनन्यसाधारण स्थान आहे. फिओरेल्लींनी पद्धतशीरपणे चौकटी आखून उत्खननाचे नियोजन करण्याची सुरुवात केली. त्यांनी संपूर्ण स्थळाचा नकाशा बनवून त्याचे विविध विभाग (regiones, insulae, domus) पाडले. तसेच आता जरी हे अगदी सामान्यज्ञान वाटले, तरी कुठेही न उकरता एकावेळी विशिष्ट कारणासाठी एकाच विभागात उत्खनन करण्याची पद्धत त्यांनी तयार केली. उत्खननात मिळालेल्या वस्तूंना तीन आकडी विशिष्ट क्रमांक दिले आणि उत्खननाच्या ठिकाणी मिळालेल्या सर्व पुरावस्तू काळजीपूर्वक ठेवण्याची व्यवस्था केली; तथापि फिओरेल्लींच्या दृष्टीने सुट्या पुरावस्तू नव्हे, तर त्यांचे स्थळाच्या एकूण इतिहासातील महत्त्व याला मध्यवर्ती स्थान होते.

पोम्पेईमध्ये ज्वालामुखीच्या राखेत गाडल्या गेलेल्या माणसांचा अभ्यास करण्यासाठी प्लॅस्टर ऑफ पॅरिस वापरून त्यांच्या प्रतिकृती (Plaster cast) बनवण्याची पद्धत फिओरेल्लींनी वापरली. ज्या ठिकाणी मानवी शरीर, प्राणी अथवा सेंद्रिय पदार्थ होते, ते आता जळून गेल्याने तेथे पोकळी निर्माण झाली असणार, हे त्यांनी ओळखले आणि मग अशा पोकळ्यांमध्ये प्लॅस्टर ओतून त्यांनी मरणारा माणूस शेवटच्या क्षणी काय करत होता, त्याच्या अंगावर काय कपडे होते, अशा स्वरूपाची अतिशय महत्त्वाची पुरातत्त्वीय माहिती मिळवली. ही पद्धत पुरातत्त्वात ‘फिओरेल्ली पद्धतʼ म्हणून ओळखली जाते.

फिओरेल्लींनी पुरातत्त्व खात्याचे महासंचालक असताना विद्यार्थ्यांसाठी प्रशिक्षण संस्था सुरू केली. या संस्थेमुळे इटलीत पुढील काळात अनेक पुरातत्त्वज्ञ तयार झाले. पुरातत्त्वीय उत्खननातून मिळालेली माहिती लोकांपर्यंत जावी यासाठी त्यांनी प्रयत्न केले. पोम्पेई उत्खनन चालू असताना तेथे तयार केलेले तात्पुरते पुरावस्तू संग्रहालय (Antiquarium) सर्व लोकांना खुले असायचे.

नेपल्स येथे त्यांचे निधन झाले.

संदर्भ :

  • Dawyer, Eugene, Pompeii’s Living Statues: Ancient Roman Lives Stolen from Death, The University of Michigan Press, 2010.
  • Genovese, R. A. Giuseppe Fiorelli e la tutela dei beni culturali dopo l’unità d’Italia, Edizioni Scientifiche Italiano, Napoli, 1992.

                                                                                                                                                                                 समीक्षक : जयेंद्र जोगळेकर