कार्टर, हॉवर्ड : (९ मे १८७४–२ मार्च १९३९). ईजिप्तचा राजा (फॅरो) तुतानखामेन (तूतांखामेन) याचे थडगे शोधणारे ईजिप्तविद्या अभ्यासक व पुरातत्त्वशास्त्रात उत्खनित वस्तू जतन करण्याच्या पद्धतींमध्ये एक नवीन पायंडा पाडणारे इंग्लिश पुरातत्त्वज्ञ. त्यांच्या कामामुळे प्राचीन ईजिप्तच्या संस्कृतीबद्दलची महत्त्वपूर्ण माहिती मिळाली. तसेच दफने अथवा थडग्यांची उत्खनने करताना मृतांबद्दल योग्य आदर बाळगला पाहिजे, ही समज पुरातत्त्वविद्येत आली.
कार्टर यांचा जन्म लंडनचे उपनगर असलेल्या केन्सिंग्टन येथे झाला. ते अकरा मुलांच्या कुटुंबातील सर्वांत धाकटे होते. त्यांचे वडील सॅम्युअल जॉन कार्टर हे चित्रकार होते व ते धनिक जमीनदारांसाठी चित्रे काढत असत. त्यांचा एक भाऊ विल्यम कार्टर (१८६३–१९३९) वडिलांप्रमाणेच चित्रकार बनला. लंडनमधील हवा मानवत नसल्याने कार्टर नॉरफोक परगण्यामधील स्वॉफहॅम येथे वाढले. लहान असताना आजारी पडत असल्याने त्यांना घरीच खासगीरित्या शिक्षण दिले गेले. वडील वरचेवर स्वॉफहॅमला येत असत आणि लहान हॉवर्डला चित्रकलेमधील मूलभूत गोष्टींचे प्रशिक्षण देत असत. कार्टर यांना कधीही औपचारिक शिक्षण मिळाले नाही.
कार्टर यांच्या वडिलांच्या आश्रयदात्यांपैकी एक विल्यम टायसन-अॅमहर्स्ट हे स्वाफहॅम जवळील मतदारसंघाचे पार्लमेंट (संसद) सदस्य होते. त्यांना ईजिप्तविद्येत रस होता. कार्टर वडिलांसोबत चित्र रंगवण्याचे काम पाहण्यासाठी गेले असताना त्यांनी टायसन-अॅमहर्स्ट यांचा ईजिप्तमधून जमा केलेल्या प्राचीन वस्तूंचा संग्रह पाहिला आणि त्यातूनच त्यांना ईजिप्तमधील पुरातत्त्वाची आवड निर्माण झाली. टायसन-अॅमहर्स्ट यांनीच कार्टरनी ईजिप्तमधील स्थळांवर काम करावे, अशी शिफारस केली. १८९१ मध्ये वयाच्या सतराव्या वर्षी कार्टर जहाजाने ईजिप्तमधील अलेक्झांड्रियाला गेले. तेथे ईजिप्शियन एक्सप्लोरेशन फंड या संस्थेसाठी (Egyptian Exploration Fund) त्यांनी ट्रेसर म्हणून काम सुरू केले. त्यांची पहिली नेमणूक मध्य ईजिप्तमधील बेनी हसन (Beni Hasan) येथील उत्खननावर झाली. बेनी हसन येथे इ. स. पू. सु. १९३८ ते १६३० या काळातील राजपुत्रांची दफने आढळली आहेत. या ठिकाणी असलेले कोरीव लेख आणि चित्रे यांच्या प्रतिकृती बनवणे, हे त्यांचे काम होते.
सर विल्यम पेट्री (१८५३–१९४२) या विख्यात ब्रिटिश पुरातत्त्वज्ञांच्या मार्गदर्शनाखाली कार्टर यांचे पुरातत्त्वज्ञ म्हणून प्रशिक्षण झाले. हे प्रशिक्षण बरेचसे कार्टर यांच्या स्वतःच्या परिश्रमांमुळे झाले होते. कारण त्या काळातील सर्वोत्कृष्ट पुरातत्त्वज्ञ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पेट्री यांना कार्टर कधीकाळी उत्तम उत्खनन करणारा चांगला पुरातत्त्वज्ञ होईल याचा जरादेखील विश्वास वाटत नव्हता; तथापि पेट्री यांच्या अल् अमर्ना (Al-Amarna) येथे काम करताना अनेक महत्त्वाचे पुरावे उजेडात आणून कार्टर यांनी पेट्रींचे मत चुकीचे असल्याचे सिद्ध केले. या प्रशिक्षण कालावधीत कार्टर यांनी पुढे ईजिप्शियन पुरावस्तू सेवेचे (Egyptian Antiquities Service) संचालक झालेल्या सर गॅस्टन मास्पेरो (१८४६–१९१६) यांच्या हाताखालीही काम केले.
कार्टर यांना ईजिप्शियन पुरावस्तू सेवेसाठी काम करण्याचे आमंत्रण देण्यात आले (१८९९). त्यांची अप्पर ईजिप्तमधील पुरातत्त्वीय स्थळांचे पहिले महानिरीक्षक म्हणून नेमणूक करण्यात आली. नाईल नदीकाठी होत असलेल्या पुरातत्त्वीय उत्खनननांवर देखरेख ठेवणे आणि त्यांच्यावर नियंत्रण ठेवणे ही या पदाची जबाबदारी होती. त्यांनी लुक्सर येथील सुप्रसिद्ध व्हॅली ऑफ द किंग्ज (Valley of the Kings) येथे अमेरिकन हौशी ईजिप्तविद्या अभ्यासक थिओडोर डेव्हिस (१८३८–१९१५) यांच्या वतीने पद्धतशीर सर्वेक्षण केले. तसेच सहा थडग्यांमध्ये प्रकाशव्यवस्था करण्यास मदत केली.
कार्टर यांची लोअर आणि मिडल ईजिप्तच्या निरीक्षण कार्यालयात बदली करण्यात आली (१९०३). त्यांचे मुख्यालय सक्कारा येथे होते. या पदावर असताना कार्टर यांनी दार अल्-बहरी येथील स्त्री फॅरो, राणी हत्ससेप्यूत (हॅटशेपसूट) (Queen Hatshepsut) हिच्या थडग्याचे उत्खनन केले. तसेच त्यांनी अठराव्या राजघराण्यातील फॅरो चौथा थूतमोज (Thutmose IV) याच्या लुक्सर येथील थडग्याचे संशोधन केले. परंतु लवकरच काही ईजिप्शियन रक्षक आणि मद्यधुंद फ्रेंच पर्यटकांच्या गटांतील हिंसक वादाच्या प्रकरणानंतर त्यांनी पदाचा राजीनामा दिला (१९०५).
कार्टर यांची ओळख कार्नरवॉनचे पाचवे अर्ल जॉर्ज हर्बर्ट (लॉर्ड कार्नरवॉन) यांच्याशी झाली (१९०७). कार्टर यांच्या संशोधनासाठी आवश्यक निधी पुरवण्यासाठी ते उत्साहाने तयार होते. कार्नरवॉन निधी देत असलेल्या सर्व उत्खननांची देखरेख कार्टर करू लागले. कार्नरवॉन यांनी कार्टर यांच्या पूर्वी अज्ञात असलेल्या फॅरो तुतानखामेनचे (किंग तुत) थडगे (KV62) शोधण्याच्या मोहिमेसाठी वित्तपुरवठा केला. परंतु दीर्घकाळ प्रचंड उत्खनन (अंदाजे ७०,००० टन वाळू आणि खडी) करूनही हाती काही न लागल्याने निराश झालेल्या कार्नरवॉननी आपण आता फक्त आणखी एका हंगामासाठी निधी देणार असल्याचे सांगितले (१९२२). ४ नोव्हेंबर १९२२ रोजी कार्टरना तुतानखामेनच्या थडग्याकडे जाणाऱ्या पायऱ्या सापडल्या. कार्टरनी २२ नोव्हेंबर १९२२ रोजी कार्नरवॉन, त्यांची मुलगी लेडी इव्हलीन व फोरमन आर्थर कॅलेंडर यांच्यासह तुतानखामेनच्या थडग्यात प्रवेश केला. या शोधाने ईजिप्तविद्येत एक नवीन पर्व सुरू झाले.
तुतानखामेनच्या थडग्यातील अवशेषांचे तपशीलवार अध्ययन करण्यासाठी कार्टरना दहा वर्षे लागली. त्यांनी उत्खननाची व मिळालेल्या सर्व वस्तूंची अतिशय काटेकोरपणे नोंद करून ठेवली आहे. कार्टर यांच्यापूर्वी अनेकांनी केवळ तेथील संपत्तीसाठी किंवा वैयक्तिक संग्रहासाठीच्या कलावस्तूंसाठी थडग्यांचे उत्खनन करून एक प्रकारे प्राचीन ईजिप्तमधील संस्कृतीचे शोषण केले. परंतु तांत्रिक साधने मर्यादित असूनही कार्टर यांनी तुतानखामेनच्या थडग्यातील खजिना काळजीपूर्वक जतन करण्याचा आणि उत्खननाकडे बघण्याचा जो वैज्ञानिक दृष्टीकोन वापरला, तो प्रशंसनीय आहे
कार्टर यांच्या शोधाच्या संबंधात एक आख्यायिका प्रचलित झालेली आहे. तिला ‘फॅरोंचा शापʼ (Curse of the Pharaohs) असे म्हणतात व छद्मपुरातत्त्वात ती वारंवार वापरली जाते. कार्टरना फॅरोचे थडगे उघडण्याच्या धोक्यांबद्दल अनेकदा इशारे आणि धमक्यांचीही पत्रे मिळाली होती. थडगे उघडताना जे लोक हजर होते, त्यांतील अकरा जण पुढील सात वर्षांच्या आत मरण पावले, ज्यात लॉर्ड कार्नरवॉन (१९२३) यांचा समावेश होता. त्यावरून ही कथित शापाची व त्यामुळे होणाऱ्या गूढ मृत्यूंची कहाणी निर्माण झाली. फॅरोंच्या चिरविश्रांतीत अडथळा आणणाऱ्या प्रत्येकाला शाप भोवतो, अशी ही कहाणी आहे; तथापि स्वतः कार्टर पुढे सतरा वर्षे जगले व नैसर्गिकपणे मरण पावले. हे बघता ती कपोलकल्पित असल्याचे सिद्ध होते.
निवृत्तीनंतर कार्टर यांना अमेरिकेतील येल विद्यापीठाने डॉक्टर ऑफ सायन्सची मानद पदवी दिली आणि स्पेनमधील रेल अकादमिया दे ला हिस्टोरिया या संस्थेने मानद सदस्यत्व देऊन कार्टर यांचा सन्मान केला. कार्टर त्यांच्या कामामुळे जगप्रसिद्ध झाले आणि त्यांना धनदौलत मिळाली असली, तरी ब्रिटिश सरकारने इतर प्रमुख पुरातत्त्वज्ञांप्रमाणे त्यांचा सार्वजनिकरित्या कधीही सन्मान केला नाही.
केन्सिंग्टन (लंडन) येथे त्यांचे निधन झाले. त्यांचे दफन पश्चिम लंडनमधील पुटनी व्हाल दफनभूमीत करण्यात आले.
संदर्भ :
- James, T. G. H. Howard Carter: The Path to Tutankhamun, Tauris Parke, London 2012.
- Vandenberg, Philipp, The Forgotten Pharaoh: The Discovery of Tutankhamun, Hodder and Stoughton, London, 1980.
- Wilkinson, Toby, A World Beneath the Sands: Adventurers and Archaeologists in the Golden Age of Egyptology, Picador, London, 2020.
- https://www.britannica.com/biography/Howard-Carter
- https://www.newworldencyclopedia.org/entry/Howard_Carter_(archaeologist)
- https://www.history.co.uk/biographies/howard-carter
समीक्षक : जयेंद्र जोगळेकर