क्लार्क, जॉन डेस्मंड : (१० एप्रिल १९१६ – १४ फेब्रुवारी २००२). विख्यात इंग्लिश पुरातत्त्वज्ञ. त्यांचा जन्म लंडन येथे झाला. त्यांच्या कुटुंबाचा सौंदर्यप्रसाधनांचा व्यवसाय होता. ब्रिस्टल आणि बाथ गावांजवळ बोर्डिंग (निवासी) शाळांमध्ये शालेय शिक्षण पूर्ण केल्यावर क्लार्क यांनी केंब्रिजमधील ख्राइस्ट कॉलेजात प्रवेश घेतला (१९३४) आणि पुरातत्त्व व मानवशास्त्रात पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले (१९३७). केंब्रिजमध्ये असताना त्यांच्यावर आफ्रिकेतील पुरातत्त्वीय संशोधनाची सुरुवात करणारे विख्यात ब्रिटिश पुरातत्त्वज्ञ माइल्स बर्किट (१८९०–१९७१) आणि सर ग्रॅहम क्लार्क यांचा मोठा प्रभाव होता. या दोघांमुळेच आपण प्रागितिहासाकडे विशेष लक्ष देण्याचे ठरवल्याचे क्लार्क यांनी आत्मचरित्रपर लेखनात नमूद केले आहे. विशेषतः दगडी अवजारांबरोबरच प्रागैतिहासिक पर्यावरणाचा अभ्यास करण्याची नितांत गरज असल्याचा सर ग्रॅहम क्लार्क यांचा आग्रह असे. याच काळात डेस्मंडनी सर मॉर्टिमर व्हीलर यांच्या मेडन कॅसल उत्खननात भाग घेतला आणि क्षेत्रीय पुरातत्त्वीय संशोधन पद्धती शिकून घेतल्या.

पदव्युत्तर शिक्षण पूर्ण झाल्यावर डेस्मंडना डेव्हिड लिव्हिंग्स्टन मेमोरियल म्यूझियममध्ये (लिव्हिंग्स्टन, झांबिया) अभिरक्षक पदासाठी विचारणा झाली (१९३७). पुढे या संग्रहालयाचे नाव ऱ्होड्स-लिव्हिंग्स्टन म्यूझियम असे झाले. केंब्रिजमध्ये भाषांच्या वर्गात भेटलेल्या बेट्टी केबल बॉम यांच्याशी त्यांनी झांबिया (तेव्हाचा उत्तर ऱ्होडेशिया) येथे विवाह केला (१९३८).

डेस्मंड यांनी  येथे अभिरक्षक पद स्वीकारल्यावर लगेचच झांबेझी (Zambezi) नदीच्या परिसरात पुरातत्त्वीय सर्वेक्षण सुरू केले. त्यांनी मुंबवा (Mumbwa) या स्थळाचे उत्खनन केले आणि तेथे अश्मयुग व लोहयुग या काळातील संस्कृतींचा कालक्रम निश्चित केला. त्याचबरोबर पुरातत्त्वीय अवशेषांच्या अर्थनिश्चितीकरता विविध आदिवासी जमातींच्या जीवनाचे अवलोकन करून आफ्रिकेतील लोकजीवनशास्त्रीय माहितीचा विस्तार केला.

दुसरे महायुद्ध सुरू झाल्याने डेस्मंड यांच्या कामात खंड पडला. ते ब्रिटिश लष्करात सार्जंट म्हणून रुजू झाले (१९४१). पाच वर्षांच्या या सेवेत त्यांना आफ्रिकेच्या इतर भागांमध्ये जाण्याची संधी मिळाली. कामातून वेळ मिळेल तेव्हा सोमालिया, इथिओपिया आणि मादागास्कर येथे त्यांनी पुरातत्त्वीय आणि लोकजीवनशास्त्रीय निरीक्षणे केली. तसेच संग्रहालयासाठी पुरावशेष जमा करून त्यांच्या नोंदी प्रसिद्ध केल्या. डेस्मंड लष्करी सेवेत असताना बेट्टी क्लार्क यांनी संग्रहालय उत्तम प्रकारे सांभाळले.

लष्करी सेवेतून परतल्यावर डेस्मंडनी एक वर्षाची रजा घेतली आणि केंब्रिज विद्यापीठात डॉक्टरेटसाठी प्रवेश घेतला (१९४८). त्यांनी झांबेझी नदीच्या खोऱ्यातील अश्मयुगीन स्थळे या विषयावर पीएच. डी. पदवी (१९५१) प्राप्त केली. झांबेझी नदीच्या खोऱ्यातील त्यांचे संशोधन पुढे अनेक वर्षे चालू होते व त्यावरील पुस्तके त्यांनी प्रकाशित केली.

आफ्रिका खंडातील एक अत्युकृष्ट संग्रहालय उभे करून डेस्मंड ऱ्होड्स-लिव्हिंग्स्टन म्यूझियममधून संचालक म्हणून निवृत्त झाले (१९६१). त्याच वर्षी ते कॅलिफोर्निया विद्यापीठात (बर्कली) मानवशास्त्राचे प्राध्यापक झाले. या पदावर ते पंचवीस वर्षे होते. पहिली काही वर्षे दरवर्षी ते काही महिने आफ्रिकेत आणि नंतर चीन व भारतात क्षेत्रीय संशोधनासाठी जात असत. डेस्मंड यांचे कामाचे सातत्य त्यांच्या ३०० शोधनिबंधात आणि ३० पुस्तकांमध्ये स्पष्ट दिसून येते. विशेषतः त्यांचे द ॲटलास ऑफ आफ्रिकन प्रिहिस्ट्री (१९६७) हे पुस्तक आफ्रिका खंडातील प्रागितिहासात मैलाचा दगड मानले जाते.

डेस्मंड यांनी झांबिया (कलांबो फॉल्स), इथिओपिया (गादेब, मध्य अवाश), नायजर (अद्रार बाउस), सिरिया (लटाम्ने), चीन (निहेवान बेसीन), भारत (सोन नदीखोरे), अंगोला, टांझानिया, मालावी आणि दक्षिण आफ्रिका अशा अनेक देशांमध्ये महत्त्वाच्या प्रागैतिहासिक स्थळांचे उत्खनन केले. भारतात बेलन व सोन नदीच्या खोऱ्यातील अश्मयुगीन स्थळांचे संशोधन करण्यासाठी डेस्मंड यांना अलाहाबाद विद्यापीठातील जी. आर. शर्मा यांनी निमंत्रित केले होते. अनेक पुरातत्त्वज्ञ आणि भूवैज्ञानिक सहभागी असलेल्या या संयुक्त संशोधन कार्याचा (१९८० – ८२) अहवाल पुस्तकरूपात प्रसिद्ध झाला आहे. डेस्मंड यानंतर अनेकदा भारतात आले आणि डेक्कन कॉलेजतर्फे केल्या जाणाऱ्या प्रागैतिहासिक स्थळांच्या उत्खनननाला भेटी दिल्या.

डेस्मंड यांना अनेक पुरस्कार मिळाले. त्यात कमांडर ऑफ द ऑर्डर ऑफ द ब्रिटिश एम्पायर (१९६०), कमांडर ऑफ द नॅशनल ऑर्डर ऑफ सेनेगल (१९६७), लंडनच्या रॉयल अँथ्रॉपोलॉजिकल इन्स्टिट्यूटचे हक्सली पदक (१९७४), सोसायटी ऑफ अँटिक्वेरीज ऑफ लंडन या संस्थेचे सुवर्णपदक (१९८५) आणि आर्किऑलॉजिकल इन्स्टिट्यूट ऑफ अमेरिकाचे सुवर्णपदक (१९८९) यांचा समावेश आहे. जोहान्सबर्गचे विटवॉटर्सरँड विद्यापीठ (१९८५) व केपटाउन विद्यापीठ (१९८५) यांनी मानद डॉक्टरेट देऊन त्यांचा सन्मान केला.

कॅलिफोर्नियातील ओकलँड येथे डेस्मंड यांचे निधन झाले. त्यानंतर दोनच महिन्यात त्यांच्या पत्नीचाही मृत्यू झाला.

संदर्भ :

  • Clark, J. D. The Prehistoric Cultures of the Horn of Africa, Cambridge University Press, Cambridge, 1954.
  • Clark, J. D. The Prehistory of Africa, Thames and Hudson, London, 1970.
  • Cooke, H. B. S.; Harris, J. W. K. & Harris, K. ‘Desmond Clark: His career and contributions to prehistoryʼ, Journal of Human Evolution, 16: 549–581, 1987.
  • Korisettar, Ravi & Gurjar, Ravi, ‘Interview with Prof. J. Desmond Clarkʼ, Man and Environment, XIV (1): 133-138, 1989.
  • Paddayya, K. & Misra, V. N. ‘Professor John Desmond Clark and Betty Clarkʼ, Man and Environment, XXVIII (1): 107-112, 2003.

                                                                                                                                                                                          समीक्षक : शंतनू वैद्य