लबक, सर जॉन : (३० एप्रिल १८३४–२८ मे १९१३). प्रसिद्ध इंग्लिश पुरातत्त्वज्ञ, मानवशास्त्रज्ञ, जीवशास्त्रज्ञ, बँकर आणि राजकारणी. त्यांच्या आईचे नाव हॅरिएट हॉथम. वडील सर जॉन विल्यम लबक (थर्ड बॅरोनेट) हे लंडनचे श्रीमंत बँकर होते. जॉन लबक हे केंटमधील डाउन (Downe) गावाजवळील हाय एल्म्स इस्टेट या त्यांच्या पिढीजात शेतीवाडीवर वाढले. चिझलहर्स्ट येथील वास्तव्याचा काळ (१८६१-१८६५) वगळता ते आयुष्यभर एल्म्स इस्टेटीवरच राहिले.

चार्ल्स डार्विन हे डाउनमध्ये  राहायला आल्यानंतर (१८४२) लबक त्यांचे सर्वांत जवळचे बनले. ही मैत्री पुढे चाळीस वर्षे टिकून होती. इटन कॉलेजमध्ये पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर लबकनी त्यांच्या वडिलांच्या बँकेत (जी नंतर काउट्स अँड कंपनीमध्ये विलीन झाली) वयाच्या बाविसाव्या वर्षी भागीदार म्हणून काम करायला सुरुवात केली. या क्षेत्रातही लबक यांनी चांगली कामगिरी केली. पुढे ते इन्स्टिट्यूट ऑफ बँकर्स या संस्थेचे पहिले अध्यक्ष बनले (१८७९). तसेच ते लंडन चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष होते (१८८८-९२).

केंटमधील मेडस्टोन मतदारसंघाचे संसद (पार्लमेंट) सदस्य म्हणून लबक यांनी १८७० पासून राजकीय क्षेत्रात अनेक प्रकारे योगदान दिले. प्राथमिक शिक्षणापासूनच विज्ञानाच्या अभ्यासाचा पुरस्कार, मुक्त व्यापार, बँकिंगच्या क्षेत्रात सुधारणा, कामगारांचे कामाचे तास कमी करणे आणि प्राचीन वारसास्थळांचे जतन अशा अनेक विषयांवर त्यांनी संसदेत मोलाचे कार्य केले. निवडणूकविषयक सुधारणांसाठी, विशेषतः एक माणूस एक मत (Single Transferable Vote) यासाठी जॉन लबकनी राजकीय दबावगट तयार केला होता (१८९४).

लबक यांना लहानपणापासूनच विज्ञानात रस होता. डार्विन यांच्या सहवासामुळे लबक यांनी प्राणिशास्त्र व उत्क्रांती या विषयांवर संशोधन केले. त्यांनी डार्विन यांच्या पुस्तकांसाठी रेखाटने करून दिली होती. डार्विननी बीगल मोहिमेतून आणलेल्या प्राणिशास्त्रीय नमुन्यांचा अभ्यास करून लबक यांनी लहानवयातच आपला पहिला शोधनिबंध प्रकाशित केला होता. सन १८५५ मध्ये त्यांनी मस्क-ऑक्स या प्राण्याचे जीवाश्म शोधून काढले. हा ब्रिटनमधला हिमयुगाचा पहिला पुरावा होता. त्यांचा डाफ्निया (Daphnia) या पाण्यातील किड्याच्या जीवनचक्रासंबधीचा १८५८ मधील शोधनिबंध महत्त्वाचा असल्याने त्यांना रॉयल सोसायटीचे सदस्यत्व देण्यात आले. एकीकडे राजकारणात सक्रीय असतानाच लबक यांचे कीटकांवरील संशोधन चालू होते. कीटकांचे, विशेषतः मुंग्या व मधमाशा यांचे वर्तन आणि त्यांच्यामधील बुद्धिमत्ता यात लबकना रस होता. त्यांची मोनोग्राफ ऑन कोलेम्बोला अँड थायसॅनुरा (१८७१), ऑन द ओरिजीन अँड मेटामॉर्फोसेस ऑफ इन्सेक्ट्स (१८७२), अँट्स, बीज अँड वास्प्स (१८८२), आणि ऑन द सेन्सेस, इन्सेक्ट्स अँड इंटेलिजन्स ऑफ ॲनिमल्स (१८८३) ही पुस्तके प्राणिशास्त्रात महत्त्वाची मानली जातात.

डार्विन यांच्या सिद्धांतावर जे मोठे वादविवाद झाले, त्यात लबक यांचा महत्त्वाचा सहभाग होता. सन १८६० च्या सुप्रसिद्ध ऑक्सफर्ड उत्क्रांतीविषयक चर्चेत (Oxford Evolutionary Debate) लबक यांनी उत्क्रांतीवादी वैज्ञानिक थॉमस हेन्री हक्सली  (T. H. Huxley) यांच्या समर्थनार्थ भाषण केले होते. लबक यांनी डार्विनच्या सिद्धांताची पुष्टी करण्यासाठी पुरातत्त्वीय पुरावे वापरले होते. तसेच डार्विन यांच्या सिद्धांताचे समर्थन करण्यात ते आघाडीवर होते.

पुरातत्त्वात उत्क्रांतीमधील तत्त्वांचा वापर करणे हे लबक यांचे वैशिष्ट्य होते. त्यांनी १८६५ मध्ये प्रिहिस्टॉरिक टाइम्स हा एकोणिसाव्या शतकातील सर्वांत प्रभावशाली पुरातत्त्वीय ग्रंथ प्रकाशित केला. हे पुस्तक लबकनी यूरोपमधील अनेक पुरातत्त्वीय स्थळांना भेट देऊन केलेल्या संशोधनावर आधारित होते. दीर्घकाळ हा ग्रंथ क्रमिक पुस्तक म्हणून वापरला जात होता. प्राचीन अवशेषांचे विश्लेषण करून ते सर्वसामान्यांपर्यत पोहोचेल अशा प्रकारे सिद्धांत मांडणे हे त्यांचे योगदान अतिशय महत्त्वाचे आहे. कारण मानवजातीला प्रदीर्घ असा इतिहासपूर्व इतिहास आहे हे तेव्हा मानले जात नव्हते. तसेच पुरातत्त्वविद्या अद्याप वैज्ञानिक शाखा म्हणून विकसित झालेली नव्हती. अशा काळात सी. जे. थॉमसन यांच्या त्रियुग सिद्धांताला बळकटी देणे आणि त्यांनी सूचवलेल्या अश्मयुग या मानवी संस्कृतीच्या विकासातील टप्प्याचे पुराश्मयुग (Palaeolithic) आणि नवाश्मयुग (Neolithic) असे विभाजन करण्याचे मोलाचे कार्य लबकनी केले. पुराश्मयुगाची व्याख्या पुरातत्त्वीय अवशेषांच्या आधारावर करण्याची संकल्पना लबक यांनी रुजवली. त्यांनी निर्माण केलेल्या पुराश्मयुग आणि नवाश्मयुग या संज्ञा आजही पुरातत्त्वात वापरल्या जातात. लबक यांचे द ओरिजिन ऑफ सिव्हिलायझेशन अँड द प्रिमिटिव्ह कंडिशन ऑफ मॅन हे पुरातत्त्वावरील दुसरे पुस्तक १८७० मध्ये प्रकाशित झाले. नैसर्गिक निवडीचा परिणाम म्हणून, मानवी गट केवळ सांस्कृतिक प्रकारेच नाही तर, त्यांच्या जैविक क्षमतांमध्येही एकमेकांपासून वेगळे झाले आहेत, असे आग्रहाचे प्रतिपादन लबक यांनी केले. या पुस्तकानंतर लबक यांनी प्रागितिहासासंबंधी नव्याने फारसे लेखन केले नाही. बहुधा त्यांच्या राजकारणातील वाढत्या सहभागामुळे व प्राणिशास्त्राकडे जास्त लक्ष दिल्यामुळे असे झाले असावे.

लबक एथ्नोलॉजिकल सोसायटीचे अध्यक्ष (१८६४-६५) व इंटरनॅशनल असोसिएशन फॉर प्रिहिस्टॉरिक आर्किऑलॉजीचे अध्यक्ष होते (१८६८). तसेच त्यांनी रॉयल अँथ्रोपोलॉजिकल सोसायटीचे अध्यक्षपद (१८७१-७३), तसेच रॉयल सोसायटीचे उपाध्यक्षपद (१८७१) भूषवले. या काळात त्यांनी आर्थर जॉन इव्हान्स (१८५१–१९४१) यांच्यासोबत काम केले. त्यांनी ब्रिटीश असोसिएशन फॉर द ॲडव्हान्समेंट ऑफ सायन्सचे १८८१ मध्ये अध्यक्षपद भूषवले. ऑक्सफर्ड, केंब्रिज (जेथे ते १८८६ मध्ये व्याख्याता होते), एडिंबरा, डब्लिन आणि सेंट अँड्र्यूज या विद्यापीठांनी मानद डॉक्टरेट पदवी देऊन त्यांचा सन्मान केला होता. लबक यांना पुरातत्त्व व मानवशास्त्रासह विविध वैज्ञानिक शाखांच्या विकासात आणि वैज्ञानिक ज्ञान लोकांपर्यंत नेण्यात रस होता. लंडन विद्यापीठाचे कुलगुरू असताना (१८७२-१८८०) त्यांनी या दिशेने मोलाचे कार्य केले.

लबक यांचे योगदान निव्वळ सैद्धांतिक नव्हते. त्यांच्या प्रयत्नांमुळेच १८८२ मध्ये प्राचीन वारसास्थळांचे संरक्षण करण्यासाठीचा ब्रिटनमधील पहिला कायदा संमत करण्यात आला. ॲव्हबरी (Avebury) येथील भव्य महापाषाणयुगीन वारसास्थळाचे जतन होण्याचे श्रेय निःसंशयपणे लबक यांचे आहे. त्यांनी तेथील खूप मोठी जमीन १८७१ मध्ये खरेदी केल्यामुळे या वारसास्थळाचा आणखी नाश रोखला गेला. आज ॲव्हबरी हे ब्रिटनमधील सर्वांत प्रसिद्ध प्रागैतिहासिक स्थळांपैकी एक असून ते संरक्षित केलेले आहे.

सन १८६५ ते १९०० या काळात लबक फोर्थ बॅरोनेट (Fourth Baronet) होते, तर जानेवारी १९०० मध्ये त्यांच्या कार्याच्या सन्मानार्थ त्यांना फर्स्ट बॅरन ॲव्हबरी (First Baron Avebury) म्हणून राजपरिवाराकडून बढती देण्यात आली.

लबक यांनी दोन विवाह केले. त्यांच्या पहिल्या पत्नीचे नाव एलेन फ्रान्सिस हॉर्डन असून त्यांना सहा मुले होती. एलेनच्या मृत्यूनंतर (१८७९) पाच वर्षांनी त्यांनी ब्रिटिश पुरातत्त्वज्ञ, लेफ्टनंट जनरल ऑगस्टस हेन्री पिट रिव्हर्स (१८२७–१९००) यांची मुलगी ॲलिस हिच्याशी लग्न केले. त्यांना या पत्नीपासून पाच मुले झाली.

किंग्सगेट कॅसल, केंट येथे हृदयविकाराच्या झटक्याने लबक यांचे निधन झाले.

संदर्भ :

  • Patton, Mark, Science, Politics and Business in the Work of Sir John Lubbock, Ashgate Publishing, London, 2007.
  • Thompson, Michael, Darwin’s Pupil: The Place of Sir John Lubbock, Lord Avebury, 1834-1913, in late Victorian and Edwardian England, Melrose Books, 2009.
  • Trigger, Bruce G. A History of Archaeological Thought, Cambridge University Press, Cambridge, 2006.

                                                                                                                                                                                      समीक्षक : जयेंद्र जोगळेकर