साराशिना निक्की : अभिजात जपानी साहित्यातील हेइआन कालखंडामधील रोजनिशी. ही साहित्यकृती इ.स.१०५९ मध्ये सुगिवारा नो ताकासुएच्या मुलीने लिहिली आहे. ही मुलगी लेडी साराशिना म्हणून प्रसिद्ध असल्याने ह्या रोजनिशीचे नाव साराशिना निक्की असे आहे. वयाच्या १२ वर्षापासून ते ५० वर्षापर्यंतच्या नोंदी या रोजनिशीमध्ये आढळतात. मोठ्या हुद्दयावर असलेल्या वडिलांच्या बरोबर केलेल्या प्रवासाचे वर्णन या रोजनिशीमध्ये केले आहे. हे प्रवासवर्णन अतिशय सुंदर रीतीने केले गेले आहे. ही रोजनिशी प्रवास करत असताना लिहिली गेली नसून, त्यातील नोंदी नंतर केल्या गेल्या आहेत. नोंदी करताना यात लेखिकेने साहित्यतत्त्व जोपासले आहे. लांब प्रवास करताना लहान मुलांच्या मनात येणार्‍या गोष्टी यात आल्या असून, त्या वाचकांच्या मनाला आकर्षित करतात. प्रवासवर्णन, स्वप्ने, पतीच्या मृत्यूनंतरचे दु:ख या बाबी साराशिनाने प्रभावी आणि परिणामकारकरित्या यात लिहिल्या आहेत. दुर्दैवाने तिच्या वयाच्या ५० व्या वर्षांनंतरची तिच्याबद्दलची माहिती उपलब्ध नाही.

साराशिना निक्की या रोजनिशीमध्ये दोन प्रकारचे विषय हाताळले आहेत. लेखांच्या आणि काव्याच्या, दोन्हीच्या माध्यमातून या रोजनिशीत विचार प्रकट केले आहेत. यामध्ये बौद्ध धर्म, त्यातले रीतिरिवाज यांच्याबद्दल माहिती दिली आहे. हेइआन कालखंडामध्ये लिहिल्या गेलेल्या रोजनिशींमध्ये धर्माबद्दल लिहिले गेलेली ही एकमेव रोजनिशी आहे. लेडी साराशिना आपल्या कल्पनाविश्वात रमणारी होती. तिची मोठी बहीण आणि सावत्र आई गेंजी मोनोगातारी या आणि इतर साहित्याबद्दल बोलत असत. ते ऐकून साराशिना राजकुमार गेंजीची स्वप्न बघू लागली होती. गेंजी मोनोगातारीचे त्या काळामध्ये वाचन करणारी पहिली व्यक्ती लेडी साराशिना होती. स्वप्न बघताना बुद्ध आणि त्याच्या पूजेकडे दुर्लक्ष झाल्याबद्दलची खंत या रोजनिशी मध्ये दिसून येते. साराशिनाने घटनांचा उल्लेख खूप उघडपणे केला आहे. आजूबाजूला घडणार्‍या घटनांबद्दल मर्मभेदक टिपणी केल्यामुळे ही रोजनिशी इतर रोजनिशींपेक्षा वेगळी ठरते. या रोजनिशीमध्ये प्रवासाबरोबर राजदरबार, साराशिनाचे लग्न, बौद्ध धर्म याबद्दल पण लिहिले आहे. गेंजी मोनोगातारी आणि कागेरो मोनोगातारी या साहित्यकृतींची साराशिनाला लिहिताना मदत झाली. प्रवासवर्णन ह्या सदराखाली मोडणारी ही पहिली रोजनिशी असावी असे मत आहे. आजही जपानी शालेय पुस्तकांमध्ये या रोजनिशीचा काही भाग अभ्यासक्रमात आहे. या रोजनिशीचा As I crossed a bridge of dreams या नावाने इंग्रजीमध्ये अनुवाद केला गेला आहे.

संदर्भ :

  • Kodansha, Kodansha Encyclopedia of Japan,Vol,7, New York, 1983.

समीक्षक : निस्सीम बेडेकर


Discover more from मराठी विश्वकोश

Subscribe to get the latest posts sent to your email.