देशपांडे, वि. भा. : (३१ मे १९३८ – ९ मार्च २०१७). महाराष्ट्रातील प्रसिद्ध नाट्यसमीक्षक. नाट्यक्षेत्रात ते ‘विभा’ म्हणून ओळखले जात असत. त्यांचा जन्म पुणे येथे सर्वसामान्य कुटुंबात झाला. त्यांच्या आईचे नाव इंदिरा. विभांनी पुण्यातील नूतन मराठी विद्यालयातून शालेय शिक्षण घेतले. विद्यार्थीदशेतच त्यांनी नाटकाशी संबंधित विविध स्पर्धा, वार्षिक संमेलने, आंतरशालेय नाट्यवाचन स्पर्धेत सहभाग घेतला आणि यशही प्राप्त केले. नाट्यप्रेमी शिक्षकांचे संस्कार या काळात त्यांच्यावर झाले. महाविद्यालयीन शिक्षणासाठी त्यांनी सर परशुरामभाऊ महाविद्यालयात प्रवेश घेतला. महाविद्यालयीन जीवनात नाटक आणि एकांकिका यांमध्ये त्यांची रुची व वावर वाढला. पुढे प्रोग्रेसिव्ह ड्रॅमॅटिक असोसिएशन (पी.डी.ए) आणि रंगायन या नाट्यसंस्थांशी त्यांचा संबंध आला. नाट्यमहर्षी के. नारायण काळे यांचे लेखनिक म्हणूनही ते काम करू लागल्यामुळे त्यांच्या सहवासात विभा यांची नाटक-रंगभूमी या क्षेत्राची जाण प्रगल्भ झाली. प्रसिद्ध अशा पुरुषोत्तम करंडक नाट्यस्पर्धेची सुरुवात झाल्यानंतर पहिल्याच वर्षी त्यांनी त्यात भाग घेतला होता (१९६३). तेव्हापासून पुढची पन्नास वर्षे ते स्पर्धक, परीक्षक, संयोजक आणि प्रमुख पाहुणे या नात्याने पुरुषोत्तमशी जोडले गेले.

एम. ए. मराठीची पदवी घेतल्यानंतर विभांनी  एम. ई. एस. महाविद्यालय, विलिंग्डन महाविद्यालय, सांगली आणि मॉडर्न महाविद्यालय, पुणे याठिकाणी मिळून ३५ वर्षे अध्यापनाचे कार्य केले. नाटकाविषयी लेखन करताना या विषयातले सैद्धांतिक ज्ञान संपादन करण्याच्या हेतूने विभांनी ‘पौराणिक आणि ऐतिहासिक नाटकांतील व्यक्तिरेखाटन (आरंभ ते १९७०)’ हा विषय घेऊन पीएच.डी. केली (१९७४). त्यांनी पुणे विद्यापीठ, फर्ग्युसन कॉलेज, शिवाजी विद्यापीठ, मराठवाडा विद्यापीठ येथे नाट्यशास्त्र विषयाचे अभ्यागत प्राध्यापक म्हणूनही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. मॉडर्न महाविद्यालयातून निवृत्त झाल्यानंतर (१९९८) त्यांनी पूर्ण वेळ नाट्यसमीक्षक म्हणून काम केले.

प्राध्यापक म्हणून काम करीत असतानादेखील विभा नाटकाशी जोडलेले असल्याने पीएच.डी. झाल्यानंतर भारतातील विविध रंगभूमींचा अभ्यास करण्यासाठी ते भारतभर फिरले. या प्रवासात त्यांना मराठी, हिंदी व कर्नाटक इत्यादी रंगभूमी जवळून पाहता आल्या. तसेच संस्कृत, हिंदी, छत्तीसगढ़ी, कन्नड, तमीळ, तेलुगू, पंजाबी, गुजराती, इंग्रजी, फ्रेंच, जर्मन इत्यादी भाषांमधील नाटके त्यांनी अभ्यासली आणि अनेक मराठी व अमराठी रंगकर्मींशी त्यांची ओळख झाली. नाट्यविषयक रंगमंचीय कार्यक्रम, सादरीकरण, एकपात्री प्रयोग, व्याख्याने, चर्चा यात त्यांचा मार्गदर्शक, संहिता लेखक आणि वक्ता म्हणून सहभाग असायचा. नाट्यक्षेत्रातील नवनवीन घडामोडी समजून घेण्यासाठी सांस्कृतिक आणि नाट्यक्षेत्रात त्यांचा सतत वावर होता. तत्कालीन बहुतेक मराठी नाटकांच्या पहिल्या प्रयोगाला ते आवर्जून हजर असायचे.

विभा यांनी नाट्यविषयक विपुल ग्रंथसंपदेची निर्मिती केली. वि. वा. शिरवाडकर यांच्या प्रेरणेने विभा यांनी १२०० पानी मराठी नाट्यकोश  (२०००) हा नाट्यसृष्टीची साद्यंत माहिती देणारा मराठीतील पहिला नाट्यकोश संपादित केला आहे. यामध्ये भारतातील विविध रंगभूमींच्या संक्षिप्त परिचयासोबत मराठी रंगभूमीच्या सुरुवातीपासूनचा कालखंड शब्दबद्ध करताना जुनी नाटके, मराठी व अमराठी नाटककार, कलाकार, निवडक संगीत नाटके, दिग्दर्शक, तंत्रज्ञ, समीक्षक, पडद्यामागील मदतनीस, प्रेक्षक, नाट्यसंस्था, नाट्यगृह, नाट्यनिर्माते, नाट्यग्रंथ, नियतकालिके, संमेलनाध्यक्ष इत्यादींविषयी माहिती दिलेली आहे. या कोशाचा हिंदी अनुवादही मराठी नाट्यकोश खंड १ व २ या नावाने प्रकाशित झालेला आहे.

मराठी नाट्यसमीक्षा करताना नाटक, साहित्य आणि संगीत या क्षेत्रातल्या मराठी सृष्टीतील दिग्गज साहित्यिक, कलाकारांशी विभांची भेट झाली व मैत्री जमली. त्यांपैकी निवडक वीस कलाकारांची व्यक्तिचित्रे विभांनी नाटकातली माणसं या त्यांच्या पन्नासाव्या पुस्तकातून साकारली आहेत. त्यांच्यानाट्यभ्रमणगाथा (२०१५) या पुस्तकातून आचार्य अत्रे, वि. वा. शिरवाडकर, पु. ल. देशपांडे, वसंत कानेटकर, विजय तेंडुलकर, जयवंत दळवी, निळू फुले, विजया मेहता, ज्योत्स्ना भोळे, पंडित भीमसेन जोशी, कमलाकर सारंग इत्यादी साहित्यिक-कलाकारांची नाटके, प्रयोग आणि त्या त्या व्यक्तिमत्त्वाची वैशिष्ट्ये कथन करीत रंगभूमीच्या इतिहासातील अनेक प्रसंग व घटना त्यांनी उलगडल्या आहेत.

वरील पुस्तकांशिवाय विभांची पुढीलप्रमाणे नाट्यविषयक पुस्तके प्रकाशित आहेत. नाटककार खानोलकर (१९७९), निवडक नाट्य मनोगते (१९८०), नाट्यरंग (कलावंतांच्या मुलाखती – १९८६), रायगडाला जेव्हा जाग येते – सिंहावलोकन (१९८७), स्वातंत्र्योत्तर मराठी नाटक (१९९२), नाट्यस्पंदने (नाट्यविषयक लेख – १९९६), आचार्य अत्रे प्रतिभा आणि प्रतिमा (१९९७), यक्षगान लोकनाटक (१९९८), निवडक नाट्यप्रवेश – १ पौराणिक (२००२), निवडक नाट्यप्रवेश – २ ऐतिहासिक, निवडक नाट्यप्रवेश – ३ सामाजिक, गाजलेल्या भूमिका (२००६), नाटक नावाचे बेट, वारसा रंगभूमीचा, कालचक्र एक अभ्यास, नटसम्राट एक आकलन, नाट्य मित्र, नाट्यसंवाद रचना कौशल्य, मराठी नाटक पहिले शतक, मराठी रंगभूमी – स्वातंत्र्यपूर्व मराठी नाटक व स्वातंत्र्योत्तर काळ, रंगभूमीचा इतिहास – खंड १ व खंड २, माझा नाट्यलेखन -दिग्दर्शनाचा प्रवास इत्यादी.

विभा यांची संपादित पुस्तके पुढीलप्रमाणे – निवडक एकांकिका (१९७७), रंगयात्रा (१९५० ते १९८५ पर्यंतचे रंगभूमीविषयक लेख संग्रह – १९८८),मराठी भाषा-साहित्य (१९९०), गानयोगी मल्लिकार्जुन मन्सूर (१९९३), प्रयोगक्षम एकांकिका, प्रतिमा, रूप आणि रंग – के. नारायण काळे यांच्या लेखांचे संपादन, पु.ल.पंच्याहत्तरी, मराठी कलभिरुची, मराठी नाट्यसमीक्षा – काही दृष्टीकोन, निळू फुले (स्मृतिग्रंथ) इत्यादी. त्यांनी चित्तरंजन कोल्हटकर, जितेंद्र अभिषेकी, नाट्य गौरव विशेषांक, पी.डी.ए. नाट्यनिर्मिती, पी.डी.ए. वार्षिकी, पुणे नाट्य संमेलन, बालगंधर्व जन्मशताब्दी, मॉडर्न महाविद्यालय दशकपूर्ती, राम गणेश गडकरी दशकपूर्ती, ललितकलादर्श ७५ वर्षे, शरद तळवलकर इत्यादींचे गौरवपर ग्रंथही संपादित केले.

विभा हे महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे या संस्थेचे २००६ ते २०११ या काळात प्रमुख कार्यवाह होते. साहित्य परिषदेच्या मराठी वाङ्मयाचा इतिहास खंड ७ चे कार्यकारी संपादक म्हणून त्यांनी काम पाहिले. आकाशवाणी आणि दूरदर्शनवरील अनेक नाट्यविषयक कार्यक्रमांमध्ये त्यांचा सक्रिय सहभाग होता. त्यांनी नभोनाट्यलेखनही केले होते. जाणार कुठे, गुलाबी हत्ती, अंमलदार या नाटकांतून अभिनय केला. तर तुझे आहे तुजपाशी, ससा आणि कासव या नाटकांचे दिग्दर्शन केले होते. विभा यांना अनेक पुरस्कार मिळाले. त्यामध्ये महाराष्ट्र साहित्य परिषदेचा उत्कृष्ट संपादनाचा पुरस्कार, नाट्यगौरव पुरस्कार, नाट्यदर्पण पुरस्कार, वि. स. खांडेकर नाट्यसमीक्षक पुरस्कार (१९८३) इत्यादींचा समावेश आहे.

विभा यांच्या आईवडिलांच्या स्मरणार्थ दर वर्षी एका ग्रंथाला ‘इंदिरा-भालचंद्र पुरस्कार’ देण्यात येतो.

रंगभूमीचे साक्षेपी अभ्यासक म्हणून विभा पाच दशकाहून जास्त काळ नाट्यक्षेत्रात कार्यरत होते. नाटकांवर विखारी टीका करण्यापेक्षा लेखक-दिग्दर्शकांना त्यातल्या त्रुटी सौम्यपणाने निदर्शनास आणून देण्याचा त्यांचा प्रयत्न असे. त्यामुळे नाटकाशी संबंधित बहुतांशी लोकांशी त्यांचे मित्रत्वाचे संबंध होते. त्यांचे अल्पशा आजाराने पुणे येथे निधन झाले.

संदर्भ :

  • देशपांडे, वि.भा., गाजलेल्या रंगभूमिका, पुणे, २००६.
  • देशपांडे, वि.भा., मराठी नाट्यकोश, पुणे, २०००.

समीक्षण : वर्षा देवरुखकर