पेशीद्रव्य (पेशीद्रव) हे एक पेशीअंगक आहे. पृथ्वीवरील सर्व सजीवांची शरीरे एक वा अनेक पेशींनी बनलेली आहेत. सर्व पेशींमध्ये जीवद्रव्य (Protoplasm) असते. दृश्यकेंद्रकी पेशींमध्ये (Eukaryotic cells) केंद्रक आणि पेशीद्रव्य यांना मिळून जीवद्रव्य असे म्हणतात. दृश्यकेंद्रकी पेशींमध्ये केंद्रक आणि पेशीपटल (Cell membrane) यांच्यामधील जागेत पेशीद्रव्य (Cytoplasm) असते. पेशीपटलापासून केंद्रकपटलापर्यंतच्या जागेत पेशीद्रव्य असते. जीवाणूंसारख्या आदिकेंद्रकी पेशींमध्ये केंद्रक नसल्याने पेशीद्रव्य पूर्ण पेशीभर पसरलेले असते. पेशीद्रव्यात पेशीद्राव (Cytosol), पेशीअंगके (Cell organelles) आणि अंतर्भूत पदार्थ (Inclusions) या तीन घटकांचा समावेश होतो.
प्रवाही परंतु, पाण्यापेक्षा दाट पेशीद्रावाने पेशीतील ७०% जागा व्यापलेली असते. पेशीपटलापासून केंद्रकपटलापर्यंतच्या सर्व जागेत पेशीद्राव असतो. पेशीद्राव हे मुख्यत: पाणी आणि कमी प्रमाणात त्यात विरघळलेले व मिसळलेले खनिज पदार्थ, मेद पदार्थ, प्रथिने, विकर वेगवेगळ्या प्रकारचे आरएनए रेणू, जीवनसत्त्वे आणि इतर कार्बनी संयुगे यांचे मिश्रण असते. पेशीद्रावातील प्रथिन रेणूंमुळे एक लवचिक सांगाडा तयार होतो. या सांगाड्यामुळे पेशीद्रावाला थोडाबहुत स्थिर आकार मिळतो. पेशीद्रावातील ॲक्टीन, ट्युब्यूलिन व मायोसीन ही प्रथिने पेशीविभाजनात उपयोगी पडतात. पेशीद्रव्यात असणाऱ्या पेशीअंगकांच्या आत पेशीद्राव नसून वेगळी घटना असणारी अंगक-विशेष (Organelle specific) द्रवमिश्रणे असतात. अंगकांखेरीज वर्णक (Pigments), साठवलेले अन्नपदार्थ (उदा., स्टार्चचे कण), उत्सर्जित करण्यायोग्य पदार्थ (उदा., कॅल्शियम ऑक्झॅलेटचे सिलीकॉन डायऑक्साइड किंवा कॅल्शियम कार्बोनेटचे स्फटिक) असे इतर अनेक अंतर्भूत पदार्थही पेशीद्रव्यात सामावलेले असतात. पेशीद्रव्यातील सोडियम, पोटॅशियम, क्लोराइड इत्यादी आयनांमुळे चेतापेशींमध्ये आवेग निर्माण होतात आणि ते चेतातंतूमधून वाहून नेले जातात. आयनांच्या संतुलनामुळे पेशीद्रव्य सामू स्थिर राहतो. सर्व केंद्रकी पेशीतील पेशीद्रव्यामध्ये ग्लुकोजलयनासाठी आवश्यक विकरे असतात. ग्लुकोजलयन विकरांच्या निर्मितीसाठी लागणारी जनुके सर्वांत प्राचीन समजली जातात. कारण बहुतेक सर्व वनस्पती व प्राणी यांच्या पेशींमध्ये त्यांचा आढळ आहे.
पेशीद्रव्यातील काही अंतर्भूत पदार्थ विशेष प्रकारचे असल्याने त्यांचे अस्तित्व रोगनिदानासाठी उपयोगी पडते. ‘रेबीज’ या विषाणूजन्य रोगात चेतापेशींमध्ये ‘नेग्री कण’ (Negri Bodies) आढळतात. काही पांढऱ्या रक्तपेशींत हिमोसायडेरीनचे (Haemosiderin) लोहयुक्त कण सापडतात. पेशीद्रव्यात हिमोसायडेरीनचे कण अधिक प्रमाणात आढळत असल्यास शरीरांतर्गत रक्तस्राव झाला असल्याचे निदान केले जाते.
पहा : पेशीअंगके.
संदर्भ :
- https://www.britannica.com/science/cytoplasm
- https://microbenotes.com/cytoplasm-structure-components-properties-functions/
- https://opentextbc.ca/anatomyandphysiology/chapter/3-2-the-cytoplasm-and-cellular-organelles/
समीक्षक : प्रमोद जोगळेकर