ब्रह्मवैवर्त पुराण : प्राचीन पुराणांपैकी एक पुराण. श्रीकृष्णाने ब्रह्माचे केलेले विवरण यात असल्यामुळे या पुराणाला ब्रह्मवैवर्त हे नाव मिळाले आहे. दक्षिणेत यालाच ब्रह्मकैवर्त पुराण असे म्हणतात. आदिब्रह्मवैवर्त या नावाचे एक प्राचीन पुराणही आढळते. जीवाच्या उत्पत्तिचे कारण तसेच ब्रह्माद्वारा समस्त भू-मंडल, जल-मंडल आणि वायु-मंडलामध्ये विचरण करणाऱ्या जीवांचा जन्म आणि पोषण या संबंधी सविस्तर वर्णन यात आले आहे. या पुराणाचा काळ आठवे, दहावे किंवा पंधरावे शतक मानला जातो. हे पुराण बहुधा बंगाल प्रांतात लिहिले गेले असावे,असे मत आहे. यात २७६ अध्याय व १८,००० श्लोक आहेत. इतर पुराणांप्रमाणे सर्ग (जगाची निर्मिती), प्रतिसर्ग (प्रलय), वंश (राजवंश), मन्वंतरे (विशिष्ट कालखंड) व वंशानुचरित (ऋषि व राजवंशातील व्यक्तींची चरित्रे) ही पुराणांची पाचही लक्षणे या पुराणात दिसतात. श्रीकृष्णाच्या लीलांना यात महत्त्वाचे स्थान असल्याने हे वैष्णव पुराण आहे. पद्मपुराणाने केलेल्या विभागणीनुसार हे राजस पुराण आहे. या पुराणाची विभागणी ब्रह्म, प्रकृती, गणेश, कृष्णजन्म या चार खंडात केलेली आहे.
चार खंडातील विषयांची माहिती पुढीलप्रमाणे : ब्रह्मखंड – या खंडात या पुराणाची परंपरा सांगितलेली दिसते. गोलोकात श्रीकृष्णांनी हे पुराण ब्रह्माला दिले. ब्रह्माने पुष्कर तीर्थावर हे पुराण धर्माला सांगितले. धर्माने आपला मुलगा नारायणाला सांगितले व नंतर त्याने नारदांना, नारदांनी व्यासांना व व्यासमुनींनी सूतनंदास सांगितले. यात प्रथम सृष्टी उत्पत्तिचे वर्णन येते. गोलोक, वैकुंठलोक व शिवलोक या तीन लोकांच्या स्थितीचे वर्णन येते. प्रकृती, सावित्री, कामदेव, रती यांच्या निर्मितीच्या कथा येतात. राधा व गोपींच्या उत्पत्तिचे वर्णन तसेच, पृथ्वी, पर्वत, समुद्र यांच्या उत्पत्तिची वर्णने येतात. यातील कथाभागात नारद व मालवती यांची कथा येते. याच कथेद्वारे श्रीकृष्ण आराधनेचा महिमा सांगितला आहे. ब्रह्मदेवाच्या मुलांच्या नावांची व्युत्पत्ती येथे दिसते. उदा. जो मुलगा चित्त, चेतस् (मन) पासून निर्माण झाला तो प्रचेतस् होय. याच खंडात देवता सूर्याद्वारे संकलित एक स्वतंत्र आयुर्वेद संहितेचा उल्लेख मिळतो. यात आयुर्वेदाच्या आचार्यांची परंपरा, सोळा प्रमुख विद्वान, चौसष्ठ प्रकारचे रोग व त्यांच्यावरील उपाय या सर्व मुद्द्यांवर सविस्तर चर्चा केलेली दिसते. हा या खंडाचा महत्त्वाचा भाग आहे.
प्रकृती खंड – या खंडात विभिन्न देवींच्या शक्ती व चरित्रांचे वर्णन सापडते. याची सुरुवात पंचदेवीरूपा प्रकृतीने होते. यात दुर्गा, महालक्ष्मी, सरस्वती, गायत्री, सावित्री या पाच देवींची वर्णने आढळतात. श्रीकृष्ण व राधा यांच्या लीलांचे वर्णन दिसते. राधेच्या मुखापासून सरस्वतीची उत्पत्ती, याज्ञवल्क्यांनी केलेली सरस्वतीची स्तुती, लक्ष्मी-गंगा-सरस्वती या विष्णूच्या तीन पत्नी, त्यांच्यातील वाद, नंतर शापग्रस्त होऊन पृथ्वीवर जन्म घेणे यासारख्या अद्भूत कथा वाचायला मिळतात. तुलसी व शंखचूड यांचा विवाह, तुलसी पूजेचे महत्त्व यांची सविस्तर माहिती मिळते. येथे रामचरित्र व सीता, द्रौपदीच्या पूर्वजन्माच्या कथा थोडक्यात आल्या आहेत. तसेच सत्यवान-सावित्री कथा, सावित्री-यमराज संवाद या गोष्टी आल्या आहेत. अध्याय ५५ ते ६७ या अध्यायांमध्ये सविस्तर दुर्गा महिमा वर्णन केला आहे.
गणपती खंड – नारदांनी नारायण ऋषींना गणेशचरित्राबद्दल विचारले ते गणेशचरित्र या खंडात विस्ताराने आले आहे. शिव व पार्वती विवाह, स्कंदाच्या जन्माची कथा, गणपतीचा जन्म या कथा दिसतात. शनैश्चराने गणपतीचे डोके कापले व गणपतीला विष्णूने हत्तीचे मुख बसवल्याचा उल्लेख यात येतो. विघ्नेश, गणेश, हेरम्ब, गजानन,लंबोदर, एकदंत, शूर्पकर्ण ह्या विघ्ननाशक गणेशाची आठ नावे येथे आली आहेत. याच खंडात सूर्यकवच तसेच सूर्यस्तोत्र यांचे वर्णन आले आहे. कालीकवच, दुर्गाकवच यांचाही उल्लेख येथे दिसतो. अध्याय २४ ते ४६ मध्ये भगवान परशुरामांचे चरित्र सांगितले आहे.
श्रीकृष्ण खंड – या खंडात एकूण १०१ अध्याय आहेत. प्रामुख्याने यात श्रीकृष्णाचे चरित्र आले आहे. कृष्णाने वेगवेगळ्या दैत्यांचा, असुरांचा वध करताना केलेल्या पराक्रमाचे वर्णन यात दिसते. श्रीकृष्णकवचाचे वर्णन केलेले आढळते. श्रीकृष्ण लीलांचे यातील वर्णन भागवत पुराणापेक्षा वेगळे आहे. इतर कथानकात गंगेची उत्पत्ती, शंकर व सती कथा, इंद्र, सूर्य, अग्नी, धन्वंतरी यांचे गर्वहरण अशा अनेक कथा वाचायला मिळतात. गृहस्थधर्माविषयी माहिती, अन्नदानाचे महत्त्व, धर्माची गरज अशा काही मुद्द्यांवर विचार केलेला दिसतो. या पुराणात नंतरही भर पडल्याचे म्हटले जाते. बंगालमध्ये या पुराणाचा विशेष प्रचार आहे.
संदर्भ :
- झा, तारणीष, ब्रह्मवैवर्त पुराण (पूर्व भाग व उत्तर भाग), हिंदी साहित्य संपादक, इलाहाबाद (प्रयाग),१९८४.
समीक्षण : सुनीला गोंधळेकर