वराह पुराण : अवतारी विष्णूने हे पुराण पृथ्वीला सांगितले अशी समजूत आहे. प्रामुख्याने हे पुराण विष्णुदेवतेसंबंधी असले तरी यात शिव आणि शक्ती यांचीही स्तुती व कथा येतात. हे पुराण नवव्या-दहाव्या शतकात तयार झाले असावे, त्याचा काही भाग अकराव्या तर काही भाग पंधराव्या शतकातील असावा असे मत आढळते. याचा पहिला भाग उत्तर भारतात व शेवटचा भाग नेपाळमधे लिहिला गेला असावा असा तर्क आहे. याचे गौडीय व दाक्षिणात्य असे दोन पाठभेद आढळतात. या पुराणात २१८ अध्याय असून त्यापैकी काही गद्यात्मक तर काही गद्य-पद्य मिश्रित आहेत. यात चोवीस हजार श्लोक असल्याचा उल्लेख असला तरी आज उपलब्ध असलेल्या प्रतीत प्रत्यक्षात दहा हजार श्लोक आहेत. काळाच्या ओघात यातील अनेक भाग नष्ट झाले असावेत. सर्ग (जगाची निर्मिती), प्रतिसर्ग (प्रलय), वंश (राजवंश), मन्वंतरे (विशिष्ट कालखंड) व वंशानुचरित (ऋषी व राजवंशातील व्यक्तींची चरित्रे) ही पुराणांची पाचही लक्षणे या पुराणात दिसून येतात. सात्त्विक, राजस, तामस ह्या पुराणांच्या वर्गीकरणानुसार हे पुराण सात्त्विक पुराण आहे. विष्णूच्या भक्ती विषयी वर्णन करणारे म्हणून ह्याला वैष्णव पुराण म्हटले जाते.

पुराणाची सुरूवात पृथ्वी व वराह यांच्या संवादाने होते. यात विष्णूच्या दशावतारांपैकी तिसरा अवतार मानल्या जाणाऱ्या वराह अवताराची कथा वर्णिली आहे. तसेच विष्णू अवतारातील मत्स्य व कूर्मावताराची कथा येते. गौरमुख मुनींकडून विष्णूच्या दहा अवतारांचे, दशावतार स्तोत्राचे वर्णन येते. इतर पुराणांप्रमाणे येथेही प्रथम सृष्टी उत्पत्तीचा विचार केला आहे. नारदांच्या पूर्वजन्माची कथा, राजा अश्वशिराला कपिल मुनी व जैगीषव्य मुनींद्वारा विष्णूचे दर्शन होते याची कथा यात आहे. वसु राजाने अनुष्ठान केलेल्या विष्णूच्या पुण्डरीकाक्षपर स्तोत्राचे वर्णन येते. दुर्जय राजाचे चरित्र, अश्विनीकुमारांच्या उत्पत्तीची कथा येते. दक्ष यज्ञात विष्णू व रुद्राच्या संघर्षाचे वर्णन, शक्तिरुपी गौरीचे वर्णन, हिमालय कन्या गौरीचे वर्णन, गौरी व शिव विवाह, गणेश व कार्तिकेय यांच्या जन्माच्या कथा इ. बाबींचे सविस्तर वर्णन येते. दुर्गादेवी, कुबेर, पितर, चंद्र, सूर्य यांच्या उत्पत्ती कथा, महिषासुर कथा सांगितलेल्या आहेत. दान महात्म्याचे सविस्तर वर्णन केलेले आहे. द्वादशी तिथीच्या व्रतांचे वर्णन तसेच, धान्य, कान्ति, पुत्र, काम्य, आरोग्य, शौर्य इ. संबंधी करावयाच्या व्रतांचे व विधींचे वर्णन आढळते. पितरांचे वर्णन करताना गंगा, शतद्रु, विपाशा, सरस्वती व गोमती नदीत स्नान करून पितरांना तर्पण केल्यास पापांपासून मुक्तता होते. श्राद्धाच्या वेळी हवन करण्याचा विधी, भोजन नियम, मंत्रपाठाचे सविस्तर वर्णन केले आहे.

सत्य, त्रेता, द्वापर या युगांच्या गुणधर्मांचे वर्णन तसेच, कलियुगाचा विचार दिसतो. इतर पुराणांप्रमाणे यातही भौगोलिक वर्णने आढळतात. भारतवर्षातील नऊ खंडांचे वर्णन भुवन-कोश वर्णन, जम्बूद्वीपाचे, कुश द्वीपाचे वर्णन, आठ दिशांच्या नगरींचे वर्णन येते. मेरुपर्वत व तेथील मंदिरे, जलाशय व नद्यांचे वर्णन सविस्तर केलेले दिसते. सत्यतपा मुनींच्या व्रताची कथा आढळते. अगस्त्य गीता तसेच रुद्र गीता सांगितली आहे. वराह अवताराची कथा विस्ताराने आढळते. सुख व दुःखाचे निवारण याचे विवरण आढळते. गुरुकडून शिष्याला दिल्या जाणाऱ्या दीक्षेचे, दीक्षित मनुष्याच्या कर्तव्यांचे वर्णन येते

भगवंताची उपासना करताना मनुष्याकडून होऊ शकणाऱ्या बत्तीस अपराधांचे वर्णन व त्यांच्या प्रायश्चित्तांचे वर्णन आढळते. विष्णू मंदिरातील लेपन व कीर्तन माहात्म्य संगितलेले आहे. वसंत इ. ऋतुंमध्ये विष्णूच्या पूजेचा विधी व महात्म्य तसेच, काष्ठ-पाषाण, माती, कांस्य, रजत इ विष्णूच्या मुर्तींची स्थापना व पूजा विधीचे वर्णन येते. खञ्जन पक्षी या खञ्जरीटाची कथा सांगितली आहे. वराहक्षेत्र कोकामुखतीर्थ, श्रीहरी तीर्थ, हरिद्वार, हृषीकेश, गोकर्णतीर्थ, सोमेश्वर लिंग, मुक्तिनाथ, शालग्रामक्षेत्र तसेच हिमालय पर्वताच्या शिखरावरील गोनिष्क्रमण तीर्थ अशा अनेक तीर्थांचे व स्थानांचे महत्त्व विशद केलेले आहे. कृष्ण लीलांचे वर्णन, मथुरेचे व मथुरेतील इतर तीर्थांचे वर्णन विस्ताराने आढळते. ऋषिपुत्रांच्या संदर्भात यमलोकाचे वर्णन आढळते. उत्तरभागात पुलस्त्य व पुरुराज यांच्या संवादात अनेक तीर्थांचे महत्त्व येते. पुष्कर नावाच्या पुण्य पर्वाचे वर्णन आढळते. शेवट पापापासून मुक्ती देणाऱ्या, यश व किर्ती देणाऱ्या अशा या वराह पुराणाच्या श्रवणाचे फल सांगितलेले आहे.

संदर्भ : 

  • Pusalkar, A.D., Studies in the Epics and Puranas of India, Bombay 1963.

समीक्षक : सुनीला गोंधळेकर