मनुष्याच्या कृतीचे पर्यावरणावर काय परिणाम होतील, याचे सर्वंकष आकलन करण्याची प्रक्रिया म्हणजे पर्यावरण मूल्यमापन होय. मूल्यमापनामध्ये एखाद्या बाबीचे संख्यात्मक आणि गुणात्मक मापन केले जाते. पर्यावरण मूल्यमापनामध्ये मनुष्याने विकासाच्या हेतूने केलेल्या कृतींचे पर्यावरणावर काय परिणाम होतील, याचे आकलन केले जाते. भारतामध्ये १९५७ मध्ये भारताचे तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी सर्वप्रथम मोठी धरणे उभारताना त्या धरणांचा किंवा प्रकल्पांचा त्या परिसरातील मानवी जीवनावर, वन्य जीवनावर आणि पर्यावरणावर काय परिणाम होईल यांचा अभ्यास करण्याची आवश्यकता प्रतिपादित केली होती.

पर्यावरण मूल्यमापनाची उद्दिष्टे :

  • विकास आणि पर्यावरण यांत समतोल साधणे.
  • विकासाची कोणतीही योजना, प्रकल्प राबविण्यापूर्वी संबंधित बाबींचा पर्यावरणावर काय प्रभाव पडेल, याचा अभ्यास करणे.
  • पर्यावरणावर होऊ शकणारे प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष परिणाम टाळण्यासाठी उपाययोजना सूचविणे.
  • परियोजना ज्या क्षेत्रात राबविली जाते, त्या क्षेत्रातील सजीव सृष्टीचे संरक्षण व संवर्धन करणे.
  • पर्यावरणाचा समतोल राखणे इत्यादी.

जागतिक स्तरावर तयार करण्यात आलेल्या दूरगामी विकास योजनेनुसार (२०२०) पर्यावरण मूल्यमापन करताना सौंदर्यमूल्य, हवेची गुणवत्ता, जैविक स्रोत, सांस्कृतिक स्रोत, भूगर्भशास्त्र व मृत्तिका, घातक द्रव्ये, पाण्याची उपलब्ध व गुणवत्ता, भूभागाचा उपयोग, गोंगाट (ध्वनी प्रदूषण), जनसंख्या व निवास व्यवस्था, जनसेवा, दळणवळण आणि एखाद्या योजनेमुळे, प्रकल्पामुळे होणारे फायदे किंवा तोटे ही मुद्दे विचारात घेतली जाते.

भारत सरकारच्या वन आणि पर्यावरण मंत्रालयाकडे पर्यावरण मूल्यमापनाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. जलसिंचन परियोजना, जलविद्युत संयत्र, नदीच्या खोऱ्यातील धरणे किंवा प्रकल्प, औष्णिक विद्युत प्रकल्प, खणन परियोजना, उद्योग, कारखाने, बंदरे, सेझ (विशेष आर्थिक क्षेत्र), नवीन मानवी वस्त्या, गावे, शहरे, पर्यटन प्रकल्प, सागर योजना, रस्ते विकास-दळणवळण इत्यादी प्रकारच्या योजनांचे पर्यावरणावर होणारे प्रभाव तपासूनच शासनाद्वारे संबंधित योजनेस परवानगी द्यायची की, नाही याचा निर्णय घेतला जातो.

भारत सरकारच्या वन आणि पर्यावरण मंत्रालयाने पर्यावरण मूल्यमापन करण्यासाठी पर्यावरण प्रभाव मूल्यमापन विभाग स्थापन केला असून त्याचे तीन उपविभाग करण्यात आले आहेत. प्रत्येक उपविभाग विविध परियोजनेसंदर्भात पर्यावरणाचे मूल्यमापन स्वतंत्रपणे करीत असतो.

समीक्षक : उमाजी नायकवाडे