मॅक्स प्लांक सोसायटी, जर्मन :
मॅक्स प्लांक ह्या सुप्रसिद्ध, प्रथितयश सैद्धांतिक भौतिक वैज्ञानिकाचे नाव धारण केलेली ही जगातील अत्युत्तम संशोधन करणारी संस्था आहे. भौतिकशास्त्रात संशोधन करायला फारसा वाव नाही अशी परिस्थिती विसाव्या शतकाच्या उत्तरार्धात निर्माण झाली होती. त्या काळात प्लांक ह्यांनी क्वांटम सिद्धांत (Quantum Theory) हा तिकारक सिद्धांत मांडला. या सिद्धांताने भौतिकशास्त्राला एक वेगळीच दिशा दिली. १९१८ चा भौतिकशास्त्राचा नोबेल पुरस्कार देऊन त्यांच्या या कार्याचा गौरव करण्यात आला होता. १९४७ साली त्यांचे निधन झाल्यावर या महान शास्त्रज्ञाच्या नावाने एका मोठ्या संस्थेची स्थापना करण्यात आली. १९३० ते ३७ ह्या काळात प्लांक ज्या कैसर विल्हेल्म सोसायटीचे (Kaiser Wilhelm Society) प्रमुख होते तिचे १९४८ मध्ये ‘मॅक्स प्लांक सोसायटी फॉर दि अंडव्हान्समेंट ऑफ सायन्स’ असे नामांतर करण्यात आले.
जर्मनीमध्ये मूलभूत संशोधनाला चालना देणे हे मॅक्स प्लांक सोसायटीचे प्रमुख उद्दिष्ट आहे. त्याचे मुख्यालय बर्लिनमध्ये आहे. जर्मनी तसेच इतर देशात विविध क्षेत्रात संशोधन करणाऱ्या अनेक संस्था या सोसायटीच्या अधिपत्याखाली कार्यरत आहेत.२०१८ मध्ये या संशोधन संस्थांची संख्या ८६ एवढी होती. रसायनशास्त्र, भौतिकशास्त्र, जीवशास्त्र या विज्ञान शाखांबरोबरच सामाजिक विज्ञान, कला आणि मानव्यशास्त्र अशा विविध विषयांवर देखील या संस्थांमध्ये संशोधन केले जाते. याखेरीज वेगवेगळ्या विद्यापीठाशी आणि संशोधन संस्थांशी सहकार्य करून काही संशोधन विभाग सुरू करण्यात आले आहेत. अशा संस्था जर्मनी, युरोप तसेच इतर देशात देखील आहेत. त्यात प्रिन्स्टन विद्यापीठाच्या सहकार्याने न्यू जर्सीमधील मॅक्स प्लांक प्रिन्स्टन भौतिक प्लाझ्मा संशोधन केंद्र (Max Planck Princeton Research Centre for Plasma Physics) आणि हार्वर्ड विद्यापीठाच्या सहकार्याने मॅक्स प्लॅंक हार्वर्ड पुरातन भूमध्य सामुद्रिक संशोधन केंद्र (Max Planck Harvard Research Centre for the Ancient Mediterranean) ह्यांचा समावेश आहे. भारत आणि जर्मनी यांचे संशोधन सहकार्य वाढावे यासाठी दिल्लीत जर्मन नाविन्यपूर्ण संशोधन संस्था (German Centre for Research and Innovation) या नावाचे केंद्र उभारले गेले आहे. मॅक्स प्लांक सोसायटीच्या अधिपत्याखाली असलेल्या सर्व संस्थांमधून मोलाचे संशोधन केले जाते. केवळ दर्जेदार मूलभूत संशोधनच करण्याचा या संस्थेचा कटाक्ष असतो. त्यासाठी लागणाऱ्या सर्व सुविधा शास्त्रज्ञांना पुरविण्यात येतात. जर्मन शासनाकडून त्यांना आर्थिक सहाय्य मिळते. याखेरीज उद्योग व्यवसायाला मदत करून या संस्था निधीसंकलन करतात. या संस्थेत चालणाऱ्या कामाचे महत्त्व ओळखून काही दानशूर व्यक्ती या संस्थेला देणगीही देतात. १९४८ पासून २०२० पर्यंत या संस्थेत काम करणाऱ्या एकूण ३५ शास्त्रज्ञांना नोबेल पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे. नेचर या जगन्मान्य संशोधन पत्रिकेत प्रकाशित होणाऱ्या लेखांचा विचार केल्यास मॅक्स प्लॅंक सोसायटीचा तिसरा क्रमांक लागतो. ऑटो हान, वर्नर हायझेनबर्ग, अल्बर्ट आईन्स्टाईन, वॉल्टर बोथे, अर्न्स्ट रुस्का, थिओडोर हांस्क, राईनहार्ड गेंझेल असे भौतिकी वैज्ञानिक, कार्ल झिगलर, पॉल क्रुटझेन, इमनवेल शार्पेनटिअर असे रसायन वैज्ञानिक आणि फिओडोर लाईनेन, बर्ट साकमान, ख्रिस्तीन न्यूसलीन फोलहार्ड असे वैद्यकीय विज्ञानातील अनेक ख्यातनाम संशोधक मॅक्स प्लांक सोसायटीने चालविलेल्या संस्थांशी निगडीत होते. २००६ साली टाइम्स हायर एज्युकेशन सप्लिमेंट ह्या लंडनस्थित पाक्षिक नियतकालिकाने केलेल्या सर्वेक्षणानुसार बिगर विद्यापीठीय संशोधन संस्थांमध्ये मॅक्स प्लांक सोसायटीचा क्रमांक पहिला होता.
मॅक्स प्लांक सोसायटीच्या वतीने उत्तम संशोधनाला मॅक्स प्लांक संशोधन पारितोषिक देण्यात येते. २०१८ पासून यात अलेक्झांडर फॉन हुंबोल्ट प्रतिष्ठान सामील झाले आहे. आता हे पारितोषिक मॅक्स प्लांक-हुंबोल्ट संशोधन पारितोषिक म्हणून देण्यात येते. यासाठी जागतिक स्तरावर उत्तम काम करणाऱ्या मध्यमवयीन संशोधकाची निवड केली जाते. त्यांच्या पुढील कार्याला उत्तेजन मिळावे असा या पारितोषिकाचा हेतू आहे. याखेरीज आणखी दोन संशोधकांना मॅक्स प्लांक-हुंबोल्ट पदक देखील देण्यात येते. या सर्व पारितोषिकाची माहिती सोसायटीच्या संकेत स्थळावर उपलब्ध आहे.
संशोधनातून जे ज्ञान निर्माण होते ते सर्वांना मुक्तपणे उपलब्ध झाले पाहिजे असा एक विचार अलिकडच्या काळात मूळ धरू लागला आहे. या विचाराला मॅक्स प्लांक सोसायटीने मोठा हातभार लावला आहे. या सोसायटीच्या वतीने चालविल्या जाणाऱ्या संस्थांमधून होणारे संशोधन मुक्तपणे सर्वांना उपलब्ध करून दिले जाते. याखेरीज सोसायटीने पुढाकार घेऊन डिजिटल लायब्ररी विकसित केली आहे. याच्या मदतीने जगाच्या कानाकोपऱ्यातील संशोधक कोणतीही उपयुक्त माहिती विनाशुल्क मिळवू शकतात.
समीक्षक : श्रीनिवास केळकर