पटवर्धन, शिवाजीराव : (२२ डिसेंबर, १८९२ – ७ मे, १९८६). दाजीसाहेब पटवर्धन. थोर स्वातंत्र्यसेनानी, नामवंत धन्वंतरी आणि कुष्ठरोग निवारणासाठी उभ्या केलेल्या चळवळीसाठी प्रसिद्ध. त्यांचा जन्म कर्नाटकातील आसंगी या गावी झाला. शिवाजीरावांच्या बालपणीच त्यांच्यावरील आई -वडिलांचे कृपाछत्र हरपले; त्यामुळे त्यांचे पालनपोषण त्यांची बहीण बहिणाबाई जोशी यांनी केले. शिवाजीरावांचे बालपण अतिशय दारिद्र्यात गेले. त्यांचे प्राथमिक शिक्षण जमखंडी येथे झाले. त्यानंतर पुढील शिक्षणासाठी त्यांना पुण्याला जावे लागले. तेथून ते मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण झाले. मॅट्रिकनंतर शिवाजीराव उच्च शिक्षणासाठी कोलकात्यास गेले. तेथे त्यांनी होमिओपथीची बी.एच.एम.एस. ही पदवी संपादन केली. शिक्षणक्रम पूर्ण झाल्यानंतर शिवाजीरावांनी वैद्यकीय व्यवसाय करण्याचे ठरविले. काही काळ ते अलाहाबाद, जबलपूर इत्यादी शहरांत राहिले; पण अखेरीस ते अमरावतीला आले आणि त्या ठिकाणी आपला व्यवसाय सुरू केला. विद्यार्थिदशेतच त्यांच्यावर लो. टिळक यांच्या राष्ट्रीय विचारांचा प्रभाव पडला होता.
शिवाजीराव प्रथमपासूनच आपल्या व्यवसायाकडे मानवजातीची सेवा करण्याचे साधन म्हणून पाहत होते. समाजातील सर्व जाति – धर्मांच्या रोग्यांची मानवतावादी दृष्टीकोनातून सेवा करण्यातच त्यांना धन्यता वाटत होती. साहजिकच, आपल्या व्यवसायातून आर्थिक लाभ मिळविण्याचा विचार त्यांनी कधीही केला नाही. पटवर्धन व्यवसायाने डॉक्टर असले तरी त्यांचे राष्ट्रप्रेमही तितकेच जाज्ज्वल्य होते ; त्यामुळे भारताच्या स्वातंत्र्यसंग्रामातही त्यांनी भाग घेतला होता. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या कार्यात ते सहभागी झाले होते. १९२८ मध्ये त्यांनी अमरावती येथे विदर्भ युवक परिषद भरविली होती. विदर्भ प्रांतिक काँग्रेस कमिटीचे सचिव म्हणूनही कार्य केले. सन १९३० मध्ये महात्मा गांधींनी सुरू केलेल्या सविनय कायदेभंगाच्या चळवळीत त्यांनी भाग घेतला होता . त्या वेळी दहीहंडा येथील मिठाच्या सत्याग्रहाचे नेतृत्व त्यांनी केले होते. त्याबद्दल त्यांना दीड वर्ष सक्तमजुरीची शिक्षा झाली होती. सन १९४२ च्या चले जाव चळवळीच्या काळातही त्यांना अटक झाली होती. राजकीय जागृती आणि समाजसेवा यासाठी तरुणांचे संघटन आवश्यक आहे, हे लक्षात घेऊन स्थापन झालेल्या अमरावती येथील सुप्रसिध्द हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाच्या संस्थापकांपैकी ते एक होते. तसेच ते १९२२ पासून सलग दहा वर्षे या मंडळाचे अध्यक्ष होते.
स्वातंत्र्योत्तर काळात त्यांनी कुष्ठरोग्यांच्या सेवेसाठी व कल्याणासाठी स्वतःला वाहून घेतले. सन १९४६ मध्ये त्यांनी अमरावतीला कुष्ठरोग्यांच्या पुनर्वसनासाठी ‘ तपोवन- जगदंबा कुष्ठधामा’ची स्थापना केली. समाजाने घृणास्पद मानलेल्या या रोगापासून कुष्ठरोग्यांची मुक्तता व्हावी म्हणून त्यांच्यावर वैद्यकीय इलाज करण्यासाठी आणि रोगमुक्त झालेल्या कुष्ठरोग्यांचे पुनर्वसन करण्यासाठी त्यांना रोजगार उपलब्ध करून देणे, अशा दुहेरी पातळीवरून त्यांनी कुष्ठरोग्यांसाठी कार्य केले. त्यांच्या पत्नी पार्वतीबाई आणि कन्या अनुताई भागवत यांनी त्यांच्या सर्व उपक्रमात जन्मभर साथ दिली. कुष्ठरोगाने पीडित दुर्दैवी जिवांबद्दल त्यांना करुणा वाटत असे. कुष्ठरोग्यांची सेवा हीच खरी ईश्वराची सेवा या श्रद्धेने ते कामाला लागले. समाजाने वाळीत टाकलेल्या कुष्ठरोगी व्यक्तींच्या मनात जीवन जगण्याची जिद्द निर्माण करावयाची आणि त्याच वेळी कुष्ठरोग्यांकडे पाहण्याच्या समाजाच्या दृष्टिकोनात बदल घडवून आणावयाचा, या दृष्टीने त्यांनी प्रयत्न चालू ठेवले. कुष्ठरोगी हादेखील एक मानव आहे, तोही समाजाचाच एक घटक आहे, समाजातील इतरांप्रमाणे जगण्याचा त्यालाही पूर्ण अधिकार आहे, ही त्यांची भूमिका होती. तपोवनाच्या रूपाने त्यांनी उजाड माळरानावर आदर्श ग्राम निर्माण केले. कुष्ठरोग्यांच्या श्रमातून बहरलेली शेते आणि कुटीरोद्योगाच्या माध्यमातून त्यांनी बनविलेल्या विविध वस्तू यांचे दर्शन त्या ठिकाणी घडते. रोगमुक्त झालेल्या स्त्री – पुरुषांचे विवाह घडवून आणले जातात. त्यामुळे त्यांचे संसारही आता तेथे फुलू लागले आहेत. सहकाराच्या आदर्श तत्त्वावर या वसाहतीचे कार्य सुरू आहे. कुष्ठरोग्यांच्या दृष्टीने अन्यायकारक असलेला १८९८ चा कायदा रद्द करवून घेण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले आणि त्यात यशही मिळविले. कुष्ठरोग्यांच्या संस्थेमार्फत तयार झालेला माल सरकारने घ्यावा आणि त्या मालाला बाजारपेठ मिळवून द्यावी, असा त्यांचा आग्रह होता. या मागणीसाठी त्यांना आपल्या आयुष्याच्या अखेरच्या काळात सरकारशी संघर्षही करावा लागला होता.
भारत सरकारने त्यांना पद्मश्री हा किताब देऊन त्यांच्या कार्याचा गौरव केला. तथापि, शिवाजीरावांना कसल्या मानसन्मानाचा हव्यास नव्हता. प्रायोपवेशनाने त्यांचा मृत्यू झाला.
संदर्भ : https://mr.phondia.com/dr-shivajirao-patwardhan/
समीक्षक- डॉ मोना चिमोटे