ओडिशाच्या किनाऱ्यावरील माणिकपटणा, खलकत्तापटणा व सध्या आंध्र प्रदेशात असलेले कलिंगपटणा ही प्राचीन ओडिशातील प्रमुख बंदरे होती. तेथून प्राचीन काळापासून निरनिराळ्या आकाराच्या जहाजांनी आग्नेय आशियाई देशांशी व्यापार चालत असल्याचे उल्लेख आढळतात. जहाज बुडल्याचे शिल्पांकन ओडिशातील रत्नगिरी या पुरातत्त्वीय स्थळावर ‘अष्टमहाभयताराʼ या बौद्ध देवतेच्या संदर्भात आढळले आहे; तथापि भारतात ब्रिटिश येण्याअगोदर जहाजे बुडल्याच्या कोणत्याही अभिलेखीय नोंदी उपलव्ध नाहीत. ब्रिटिश काळात मात्र गंजाम येथे चाललेले फत्ते सालेम (१७६१), एचएमएस कॅरन (१८२०), प्रिन्सेस रॉयल (१८५०) आणि फ्रेंच जहाज वेल्लेडा (१८७५) अशी जहाजे बुडल्याच्या काही घटना ज्ञात आहेत.
राष्ट्रीय समुद्र विज्ञान संस्थानमधील पुरातत्त्वज्ञांनी ओडिशाच्या किनाऱ्यावरील काही ठिकाणी बुडलेल्या जहाजांचे सर्वेक्षण केले. कोणार्कपासून सहा किमी. उत्तरेला ६ ते ८ मी. खोलीवर एका बुडलेल्या जहाजाचे अवशेष दिसले. त्यात बॉयलर, कप्तानाचा कक्ष (केबिन) आणि नांगराची साखळी यांचा समावेश होता. हे अवशेष मिनिकॉय (लक्षद्वीप) बेटापाशी मिळालेल्या व गोव्यातील एमी शोल्स (Amee Shoals) भागात मिळालेल्या यंत्रसामग्रीच्या अवशेषांप्रमाणे असून कोणार्कपाशी बुडलेले हे जहाज वाफेवर चालणारे असल्याचे स्पष्ट झाले.
अभिलेखीय नोंदींवरून दिसले की, ब्रिटिश शाही नौदलाची एचएमएस कॅरन (HMS Carron) ही युद्धनौका ६ जुलै १८२० रोजी कोणार्क किनाऱ्यापाशी (पुरीपासून उत्तरेला ४८ किमी.) भरकटून गाळात अडकली व ती फुटून बुडली. ही युद्धनौका दारूगोळा व छोट्या तोफा घेऊन चेन्नईकडे (मद्रास) निघाली होती. कोणार्क किनाऱ्यापाशी दिसलेले जहाजाचे अवशेष याच युद्धनौकेचे असावेत, असे प्राथमिक संशोधनातून दिसून आले.
वेल्लेडा (Velleda) नावाचे फ्रेंच मालवाहू जहाज १८७५ मध्ये एका अतितीव्र चक्रीवादळात सापडून गोपालपूर किनाऱ्यापाशी केंद्रपाडाच्या हुकीटोला भागात बुडाल्याच्या घटनेची नोंद आहे. या जहाजाची लांबी ७६ मी. व रुंदी १५ मी. होती आणि त्यावर अन्नधान्य, साखर, दारू व वाईन असा माल होता. या ठिकाणी समुद्रात काही अंतरावर ओहोटीच्या वेळेस जहाजाचे वरचे काही भाग उघडे पडतात. बहुधा हे वेल्लेडा जहाज असावे; तथापि त्याचे सखोल पुरातत्त्वीय संशोधन होणे बाकी आहे.
संदर्भ :
- Patra, Benudhar, ‘Ports and port towns of early Odisha: text, archaeology and identificationʼ, Proceedings of the Indian History Congress, 74: 54-63, 2013.
- Tripati, Sila; Bux, Sabir & Behera, Rudra Prasad, ‘Exploration of a shipwreck off the coast of Konark, Odishaʼ, Man and Environment, XLI(1): 75-81, 2016.
समीक्षक : भास्कर देवतारे