मिशनरी हा शब्द ‘मित्तेरे’ (Mittere) म्हणजे पाठविणे या लॅटिन धातूपासून आलेला आहे. विशिष्ट कार्यासाठी पाठविलेली व्यक्ती म्हणजे मिशनरी होय. न्याय, दया व शांती यांवर आधारलेल्या देवराज्याची घोषणा करण्यासाठी येशू ख्रिस्त यांनी आपल्या शिष्यांना साऱ्या राष्ट्रांकडे पाठविले. त्यांच्यापैकी संत थॉमस आणि संत बार्थोलोमिओ (बार्थोलोम्यू) हे भारतात आले. त्यामुळे अगदी पहिल्या शतकातच ख्रिस्ती धर्म भारतात प्रविष्ट झाला.
इसवी सनाच्या सोळाव्या शतकात भारतात आलेल्या पोर्तुगिजांबरोबर पुष्कळ ख्रिस्ती मिशनरीही आले. ते केवळ धर्मप्रसारासाठी आले नव्हते, तर त्यांच्यामध्ये अनेक क्षेत्रांतील काही तज्ज्ञ धर्मगुरू होते. त्यांनी धर्मप्रसारापेक्षा आपल्या अंगी असलेल्या कलागुणांनी भारताच्या उभारणीसाठी कसे योगदान दिले, ते पुढील विवेचनावरून लक्षात येईल.
खगोलशास्त्रीय योगदान : मोगल बादशाह अकबर याच्या कारकिर्दीत भारतात आलेल्या पोर्तुगीज मिशनरींमध्ये काही खगोलशास्त्रज्ञ असल्याचे समजताच बादशहाने पोर्तुगीज व्हाइसरॉय जान लूईस दे अन्ड्राडे यांच्याशी संपर्क साधून अशा मिशनरींना आपल्या इबादतखान्यात उच्चस्तरीय चर्चेसाठी बोलावले. सदर चर्चेसाठी पाठविलेल्या तीन जेज्वीट (जेझुइट) धर्मगुरूंच्या शिष्टमंडळात खगोलशास्त्रज्ञ-भूगोलज्ञ फादर आन्तॉन्यो मॉंसरॅत हेही होते.
या तिन्ही धर्मगुरूंची विद्वत्ता पाहून अकबर बादशहा खूश झाला व त्याने आपली मुले सलीम व मुराद यांच्यावर सुसंस्कार करून त्यांना शिक्षण देण्यासाठी त्या तिन्ही धर्मगुरूंना आपल्या दरबारी काही वर्षे ठेवून घेतले. याच काळात आन्तॉन्यो मॉंसरॅत यांनी बादशहाच्या परवानगीने संपूर्ण उत्तर भारताचे सर्वेक्षण करून प्रथम शंभर स्थळांची अक्षरयुग्मे (कोऑर्डिनेटस) निश्चित केली. त्यानंतर काबूल येथे जाऊन त्यांनी इ.स. १५९० साली भारताचा पहिला नकाशा तयार केला.
सतराव्या शतकात भारतात आलेले दुसरे खगोलशास्त्रज्ञ-मिशनरी म्हणजे फादर जे. रिचाऊड. या फ्रेंच मिशनरी धर्मगुरूंनी पाँडिचेरी येथे बारा फूट व्यासाची दुर्बीण बसवून अनेक निरीक्षणे नोंदविली. त्या निरीक्षणांतून इ.स. १६८९चा धूमकेतू, दि. ४ एप्रिल १६८९चे सूर्यग्रहण यांचे अचूक निदान केले. तसेच आकाशगंगेतील एका अनियमित तारकासमूहांचा आणि अल्फा सेंटॉरी व अल्फा क्रुईस या नक्षत्रांच्या द्विमान गुणधर्माचा शोध लावला.
आणखी एक खगोलशास्त्रज्ञ-मिशनरी म्हणजे फादर पेरी माऊंडइट. त्यांनी योहानेस केप्लरच्या रूडाल्फीन टेबल्स या सारणी-तक्त्याच्या साहाय्याने दि. २३ मार्च १७८१ रोजी होणाऱ्या सूर्यग्रहणाचे अचूक निदान केले होते.
इसवी सन १७१८ साली भारतात आलेले फ्रेंच मिशनरी फा. क्लाऊडे क्लोद स्टॅनिस्लॉस हेही खगोलशास्त्रज्ञ होते. त्यांनी सतरा फूट व्यासाचे भिंग, खगोलशास्त्रीय घड्याळ व इतर यंत्रसामग्री घेऊन बंगालमधील चंदरनागोरहून जयपूरपर्यंत प्रवास करून अनेक महत्त्वपूर्ण निरीक्षणे केली. त्यातून त्यांनी ६३ शहरांचे अक्षांशरेखांश निश्चित केले. तसेच काही ताऱ्यांचे पृथ्वीपासूनचे अंतर निश्चित केले. दि. १ डिसेंबर १७३२चे चंद्रग्रहण आणि दि. ३ मे १७३४चे सूर्यग्रहण यांचे त्यांनी केलेले भाकीत खरे ठरले. दि. २ एप्रिल १७३४ रोजी याच धर्मगुरूंनी फत्तेपूरसिक्रीहून गुरूच्या पहिल्या उपग्रहाचा शोध लावला.
इसवी सन १७३० साली फादर फ्रान्सिस व्हेंडल, फादर ॲन्टोनी गेबेल स्वर्गर आणि फादर ॲण्ड्र्यू स्ट्रोबल हे तीन मिशनरी भारतात आले. त्यांनी महाराज जयसिंग यांना त्यांच्या खगोलशास्त्रीय उपक्रमात मोलाचे मार्गदर्शन केले. त्यांच्या निरपेक्ष सेवेने महाराज इतके प्रभावित झाले की, त्यांनी फादर स्ट्रोबलबरोबर आपले शिष्टमंडळ पोपमहाशयांना आणि रोमन बादशहाला भेटण्यास पाठवून त्यांच्याशी मैत्रीचे नाते जोडले. या मैत्रीतून दोघांच्या सहकार्याने खगोलशास्त्रात फार मोठी झेप घेण्याची महाराजांची इच्छा होती. दुर्दैवाने इ.स. १७४३ साली महाराजांच्या अकाली निधनाने ती इच्छा अपूर्ण राहिली.
इसवी सन १७४३ मध्ये भारतात आलेल्या फादर जोसेफ टिफेंथालेर या धर्मगुरूंनी सुमारे ४३ वर्षे भारतात वास्तव्य करून ऐतिहासिक आणि भौगोलिक क्षेत्रांत अभ्यास करून हिस्टॉरिकल अँड जिऑग्रफिकल डिस्क्रिप्शन ऑफ हिंदुस्थान या नावाचा ग्रंथ लिहिला. त्यात अनेक नकाशेही आहेत. या धर्मगुरूंनी जयपूरच्या महाराज जयसिंग यांच्या दिल्ली, जयपूर, उज्जेन (उज्जयन), वाराणसी (बनारस) आणि मथुरा येथील वेधशाळांना मार्गदर्शन करून भारतीयांना पाश्चात्त्य खगोलशास्त्राची ओळख करून दिली, त्यांच्याबरोबर असलेल्या फादर ओवन या धर्मगुरूंनी दिल्ली येथे जंतरमंतर तयार केले.
वैज्ञानिक योगदान : भारतात शास्त्रीय दृष्टिकोन आणि विज्ञानाची आवड निर्माण करण्यासाठी फादर यूजीन लेफॉंत या मिशनऱ्याने ‘इंडियन असोशिएशन फॉर दि कल्टिवेशन ऑफ सायन्स’ ही संस्था सुरू केली. जेज्वीट मिशनरींनी सुरू केलेल्या निरनिराळ्या शैक्षणिक संस्थांमधून अनेक भारतीय वैज्ञानिक घडले. मद्रास कोईमतूर विद्यापीठाचे माजी व्हाईस चान्सलर सवारीमुत्तू इग्नासीमुत्तू हे जेज्वीट मिशनरींच्याच हाताखाली शिकले. त्यांना ‘आंतरराष्ट्रीय कीटकशास्त्रज्ञ’ (International Entomologist) म्हणून प्रसिद्धी मिळाली. त्यांनी शोधलेल्या कीटकाला ‘इग्नासीमुत्तू कीटक’ असे नाव देण्यात आले आहे. शिवाय माजी राष्ट्रपती ए.पी.जे. अब्दुल कलाम, आण्विक भौतिकशास्त्रज्ञ चिदंबरन, खगोलशास्त्रज्ञ के. कस्तुरीरंगन, नॅशनल केमिकल लॅबचे माजी संचालक पॉल रत्नस्वामी यांच्यासारख्या विभूतीही घडल्या.
छापखाना : इ.स. १५५६ साली मिशनरींनी भारतात गोवा येथे प्रथमच छापखाना सुरू केला. त्यात छापली गेलेली पहिली दोन पुस्तके म्हणजे संत फ्रान्सिस झेव्हिअर यांचे कॅथेकिझम ऑफ ख्रिश्चन डॉक्ट्रिन आणि फादर थॉमस स्टीफन यांचे अलौकिक मराठी महाकाव्य क्रिस्तपुराण. मात्र हे छापले गेले रोमन लिपीत; कारण देवनागरी (मराठी) लिपी छापण्याचे तंत्र तोपर्यंत अवगत नव्हते.
वाङ्मयनिर्मिती : परदेशातून आलेल्या ख्रिस्ती मिशनरी धर्मगुरूंनी भारतीय भाषा आणि संत वाङ्मय यांचा सखोल अभ्यास करून त्यांनी जी काही वाङ्मयीन सेवा दिलेली आहे त्याला तोड नाही. मराठी भाषेचे सुंदर लेणे म्हटलेल्या क्रिस्तपुराण या महाकाव्याची रचना करणारे फादर थॉमस स्टीफन, तमिळ आणि संस्कृत भाषापंडित आणि संस्कृतीकरणाचे प्रणेते फादर रॉबर्ट डी नोबिली, संस्कृत व मलयाळम् भाषांवर प्रभुत्व मिळवून संस्कृत भाषेच्या व्याकरणाची निर्मिती करणारे तसेच मलयाळम् भाषेतील ‘पुथेन पाना’ या लोकप्रिय काव्याची रचना करणारे अर्नोस पाद्री (फादर जॉन अर्नेस्ट), तेम्बावणि नावाच्या तमिळ महाकाव्याचे रचनाकार फादर जोसेफ बेस्की ऊर्फ वीर मामुनीवर बेस्की, भारतीय मुद्रणकलेचे जनक आणि समाचार दर्पण या बंगाली पहिल्या वृत्तपत्राचे संस्थापक आणि रामायण, महाभारत यांचे इंग्रजी भाषांतर करणारे विल्यम कॅरी, संत वाङ्मय अभ्यासक जस्टीन ॲबट, मराठी ख्रिस्ती समाजाचे पहिले मुखपत्र निरोप्याचे संस्थापक फादर हेन्री डोरिंग आणि मराठी संत वाङ्मय अभ्यासक फादर मॅथ्यू लेदर्ले तसेच रामकथेवर हिंदी भाषेतून डॉक्टरेट मिळविणारे पद्मश्री फादर डॉ. कामिल बुल्के अशा कितीतरी मिशनरी धर्मगुरूंनी भारतीय वाङ्मयात फार मोठे योगदान दिल्याचे दिसून येते.
रुग्णसेवा : रुग्णसेवा आणि वैद्यकीय सुविधा पुरविण्याच्या कामीही मिशनरी मागे पडले नाहीत. पोर्तुगीज काळात वसई किल्ल्याच्या परिसरात त्यांनी ‘मिझरीकोर्दिया’ या नावाने सुसज्ज असे रुग्णालय सुरू केले. नंतरच्या काळात देशभर वैद्यकीय सेवा देण्यासाठी ख्रिस्ती धर्मभगिनी आघाडीवर राहून कार्य करीत राहिल्या व आजही करीत आहेत.
शेती : स्वातंत्र्योत्तर काळात महाराष्ट्राच्या खेडोपाडी असंख्य छोटे शेतकरी सावकारांच्या कर्जाच्या ओझ्याखाली दबलेले होते. शिवाय इ.स. १६६०च्या शतकात महाराष्ट्रात भयंकर दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली. अशावेळी गरीब शेतकऱ्यांच्या मदतीला ख्रिस्ती धर्मगुरूचे योगदान याकामी फार मोठे आहे. फा. बाकर स्वत: एका शेतकरी कुटुंबातून आले होते. भारतीय शेतकऱ्यांची दयनीय अवस्था पाहून त्यांनी अहमदनगर येथे समाज केंद्र सुरू करून गरजवंत शेतकऱ्यांसाठी अनेक योजना राबविल्या. शेतकऱ्यांसाठी कर्जयोजना तसेच दुष्काळी परिस्थितीला तोंड देण्यासाठी मार्गदर्शन करून फादर बाकर यांनी प्रथमच सुरू केलेली सर्वोत्कृष्ट योजना म्हणजे ‘माती अडवा, पाणी जिरवा’ (Conserve land, harness) होय. फा. बाकर यांच्या कल्पकतेतून साकारलेल्या या योजनेच्या धरतीवर ‘पाणी अडवा, पाणी जिरवा’ हा प्रकल्प सरकारतर्फे राबविला जात आहे.
स्वातंत्र्यलढ्यात सहभाग : ख्रिस्ती मिशनऱ्यांनी भारतात वैज्ञानिक, सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रांत मोलाचे कार्य केले आहे. त्याचबरोबर काही मिशनरींनी भारतीय स्वातंत्र्यलढ्यातही सक्रिय भाग घेतला होता. इ.स. १९३०च्या दरम्यान रेव्ह. जॉन कॉप्ली विन्सेलो या मिशनऱ्याने पुण्यात ‘ख्रिस्त सेवा संघ’ स्थापन केला. या संघाचे सभासद राजकीय क्षेत्रात भारतीय पुढाऱ्यांच्या बाजूने कार्यरत होते. त्यांच्यापैकी फादर व्हेरिअर एल्विन या मिशनऱ्याने इ.स. १९३१ साली पुण्यातील शिवाजी मंदिरातील जाहीर सभेत भाग घेऊन म्हटले की, ‘‘मी भारतात ख्रिस्ती धर्माचा प्रसार करण्यासाठी आलो नसून महात्मा गांधीजींच्या शिकवणुकीचा प्रसार करण्यासाठी आलो आहे’’. फा. एल्विन यांनी अनेक जाहीर सभांमधून म. गांधीजींच्या सत्याग्रहाच्या चळवळीला आपला पाठिंबा व्यक्त केला. ‘ख्रिस्त व सत्याग्रह’ या विषयावर मुंबईत बोलताना त्यांनी ख्रिस्ती लोकांना आवाहन केले की, त्यांनी खादी वापरावी, चरखा चालवावा व काँग्रेसच्या कार्यक्रमाला पाठिंबा द्यावा; कारण जगाने आजपर्यंत अनुभवले नाही अशाप्रकारे म. गांधीजींनी ख्रिस्ताची शिकवण राजकीय क्षेत्रात वापरली आहे. फा. एल्विन यांनी म. गांधीजींची तुलना असिसीचे संत फ्रान्सिस यांच्याशी केली होती.
ख्रिस्त सेवा संघात सामील झालेले आणखी दोन परदेशी ख्रिस्ती मिशनरी म्हणजे रेजिनाल्ड आणि लिओनार्ड शिफ ऊर्फ ब्रदर सत्चिदानंदन. ते दोघेही म. गांधीजींचे खंदे पुरस्कर्ते होते.
इसवी सन १९३० साली सोलापूरच्या दंगलीत दोन पोलिसांना ठार करणाऱ्या भारतीयांना मरणदंडाची शिक्षा ठोठावण्यात आली होती. सदर शिक्षा रद्द व्हावी म्हणून पुण्यात रे मार्केट मैदानात जाहीर सभा घेण्यात आली. सदर सभेच्या अध्यक्षस्थानी जॉन विन्सेलो हे होते. सभेचा ठराव त्यांच्याच सहीनिशी इंग्लंडच्या हाऊस ऑफ कॉमन्सच्या मृत्युदंड शिक्षा समितीकडे पाठविण्यात आला. त्या वेळी ख्रिस्ती मिशनरींनी भारतीय स्वातंत्र्यलढ्यात भाग घेणे योग्य नसल्याचे मत ब्रिटिश सरकारने व्यक्त केले होते. तसेच ख्रिस्ती धर्माधिकाऱ्यांकडेही त्या संबंधात तक्रार नोंदविण्यात आली होती.
अशाप्रकारे स्वातंत्र्यापूर्वीच्या चारशे-साडेचारशे वर्षांत आणि त्यानंतरही भारत देशाच्या वैज्ञानिक, सामाजिक, शैक्षणिक व राजकीय क्षेत्रांत ख्रिस्ती मिशनऱ्यांचे योगदान किती मोलाचे आहे हे लक्षात येते.
संदर्भ :
- Correa, Francis, Mother Church in Mother India, Mumbai, 2008.
- Soares, Aloysius, The Catholic Church in India : A Historical Sketch, Nagpur, 1964.
- कोरिया, फा. फ्रान्सिस, सामवेदी ख्रिस्ती समाज, मुंबई, १९९८.
- पारखे, कामिल, ख्रिस्ती मिशनऱ्यांचे योगदान, पुणे, २००३.
समीक्षक : फ्रान्सिस कोरिया