स्पेनमधील ओविडो येथील सान साल्वादोर चर्चमध्ये ‘सुदारियम’ नावाचे एक वस्त्र जपून ठेवण्यात आले आहे. ३३x२१ इंच आकाराचे हे वस्त्र क्रूसावर मरण पावलेल्या ख्रिस्ताचे तोंड झाकण्यासाठी वापरण्यात आले होते, असे मानले जाते (सुदारियम या लॅटिन शब्दाचा अर्थ धर्मवस्त्र होय). वेदनांनी कळवळत मृत झालेल्या माणसाचा भयानक बनलेला चेहरा त्याच्या आप्तस्वकीयांच्या नजरेस पडू नये म्हणून ज्यू लोकांत शवाचा चेहरा कपड्याने झाकण्याची पद्धत होती. या सुदारियमचा उल्लेख बायबलच्या ‘नव्या करारा’तील जॉनच्या शुभवर्तमानातील २०:५–८ या अध्यायात आढळतो. ख्रिस्ताचा मृतदेह दफनभूमीकडे नेत असताना त्याचा चेहरा झाकण्यासाठी हे वस्त्र वापरले गेले असावे, असा तज्ज्ञांचा कयास आहे. या कपड्यावर चेहऱ्याची प्रतिमा उमटलेली नसली, तरी त्यावर रक्ताचे व विशिष्ट शरीरद्रव्याचे (लसिका) डाग मात्र आढळतात. सुदारियमचा कपडा मलमलीचा बनलेला आहे. या सुदारियमविषयी स्पेनमध्ये फारसे कुणाला माहीत नव्हते. परंतु मॉन्सिनिअर रिक्की नावाचे धर्मगुरू तुरीनच्या प्रेतवस्त्राचा अभ्यास करत असताना चर्चमधल्या जुन्यापुराण्या नोंदी तपासून पाहात होते, तेव्हा त्यांना इ. स. ८०० पासून स्पेनमध्ये असलेल्या या अवशेषाचा सुगावा लागला.

सुदारियमचे वस्त्र

ती १९६९ सालची घटना होय. या वस्त्राचे तुरीन प्रेतवस्त्राशी असलेले साधर्म्य पाहून त्यांनी अभ्यासाला प्रारंभ केला होता. १९७८ साली ‘स्पॅनिश सोसायटी फॉर स्टडी ऑफ सुदारियम’ या समितीची स्थापना होऊन या अवशेषाला भरपूर प्रसिद्धी देण्यात आली. सान साल्वादोर मंदिरातील ‘सांता कमारा’ या पवित्र वेदीवर हे वस्त्र सुरक्षित ठेवण्यात आले आहे. दरवर्षी गुड फ्रायडे आणि ‘क्रूसाच्या विजय सणा’च्या सप्ताहात (१४ ते २१ सप्टेंबर) हे वस्त्र भाविकांच्या दर्शनासाठी खुले ठेवण्यात येते.

दोन दशके आधी जॅनिस बेनेट नावाच्या स्पेन भाषेची शिक्षिका व ग्राफिक चित्रकार असलेल्या बाईने या वस्त्राचा विशेष अभ्यास करून सेक्रेड ब्लड, सेक्रेड इमेज : दी सुदारियम ऑफ ओविडा  हे इंग्रजी भाषेत पुस्तक लिहिले, तेव्हा हे वस्त्र जगभर ख्यातकीर्त झाले.

या वस्त्रावर तीन प्रकारचे डाग आहेत. डोक्यावर काटेरी मुकुट खुपसल्याने जखमातून साकळलेल्या रक्ताचे डाग आहेत. माणूस गुदमरून मरण पावतो, तेव्हा त्याच्या फुफ्फुसात विशिष्ट द्रव जमा होतो. क्रूसावर टांगविलेले ख्रिस्ताचे मृत शरीर जमिनीवर ठेवले असता, हा फुफ्फुसातील द्रव नाकातोंडावाटे बाहेर पडला असावा व तेच डाग सुदारियमवर उमटले असावेत, असे काही अभ्यासकांना वाटते. तिसरा डाग अंगठ्याच्या ठशाचा आहे. येशूचे शव दफनभूमीकडे नेले जात असताना जोसेफ, जॉन किंवा निकोदम या त्याच्या तीन मित्रांपैकी एकाने त्याच्या चेहऱ्यावर सुदारियमचा कपडा अंगठा दाबून ठेवले असावे.

‘नासा’च्या शास्त्रज्ञांनी तुरीनच्या प्रेतवस्त्रावर उमटलेली प्रतिमा आणि सुदारियमवरील उमटलेली चेहऱ्याची जडणघडण यांची तुलना केली असता त्या दोघांत बरेच साम्य आढळले. ज्यू लोकांत साधारणपणे आढळणारा ए-बी हा रक्तगट या दोन्ही वस्त्रांवरील रक्तात आढळला आहे. सुदारियम वस्त्रात अडकलेल्या परागकणांचा अभ्यास झाला, तेव्हा शास्त्रज्ञांना त्यात पॅलेस्टाइन, आफ्रिका व स्पेन या देशांतील फुलांचे परागकण आढळले. तुरीनच्या प्रेतवस्त्रात सिरिया, तुर्की, ग्रीस, फ्रान्स या देशांतील फुलांचे परागकण आढळतात. त्यावरून या दोन वस्त्रांचा प्रवासमार्ग वेगळा होता, असा निष्कर्ष निघतो. जेरूसलेमपासून स्पेनपर्यंत या वस्त्राची वाटचाल कशी घडली असावी, याचाही ऐतिहासिक मागोवा घेण्यात आला आहे. ६१४ साली पर्शियाने पॅलेस्टाइनवर चढाई केली होती, तेव्हा तिथले ख्रिश्चनांचे नेते फिलिप दी प्रेसबाइट यांनी त्यांच्या लोकांना दक्षिणेकडून आफ्रिकेत नेले होते. आलेक्झान्ड्रियातील बिशपांनी त्यांचे स्वागत केले होते. ख्रिश्चनांनी आपल्यासोबत पवित्र अवशेष नेले होते, त्यात येशूची प्रेतवस्त्रेदेखील होती. येशूला पुरताना तत्कालिक ज्यू-पद्धतीनुसार वेगवेगळी ४० वस्त्रे वापरली गेली होती. पर्शियाने आफ्रिकेवर हल्ला केला, तेव्हा काही ख्रिस्ती मंडळी स्पेनला पळाली होती. त्यांनी आपल्यासोबत संत पीटरच्या पादुका, येशूची आई मरिया हिची अंगवस्त्रे इत्यादी धार्मिक ठेवा जपून नेला होता, असा उल्लेख तेव्हाच्या मुस्लीम सत्ताधीशांच्या दप्तरात आढळतो. ७११ मध्ये मुस्लिमांनी स्पेन काबिज केले, तेव्हा या सगळ्या धार्मिक वस्तू स्पेनमधील उत्तरेकडील जंगलात लपवून ठेवण्यात आल्या होत्या. पुढे  इ. स. ८१३ मध्ये स्पेनचा राजा दुसरा अल्फान्सो याने मुस्लिमांना हुसकावून लावले व लपवून ठेवलेल्या त्या धार्मिक ठेव्याची सन्मानपूर्वक प्रतिष्ठापना केली. याच राजाने सुदारियमसाठी ‘सान्ता कमारा’ ही पवित्र वेदी स्थापन केली होती. कार्बन-१४ चाचणीत हे वस्त्र ख्रिस्तजन्मानंतर ७०० वर्षांनंतरचे असल्याचे दिसून आले होते, पण त्यातील परागकणासारख्या सूक्ष्म कचऱ्यामुळे हा निकाल सबंधित प्रयोगशाळेने धुडकावून लावला होता. भाविकांनी श्रध्देने स्वीकारलेल्या या पवित्र अवशेषाची खात्री पटवून देण्याची जबाबदारी संशोधकांवर येऊन पडली आहे.

संदर्भ :  

  • Bowles, Greg, Two Cloths for Christ? : A Layman’s Perspective on the Shroud of Turin and the Sudarium of Oviedo : 2, California, 2017.
  • तुस्कानो, जोसेफ, तुरीनचे अद्भुत प्रेतवस्त्र, पुणे, २००६.
  • https://www.historicmysteries.com/the-sudarium-of-oviedo/

समीक्षक : फ्रान्सिस कोरिया