कर्नाटकी, अरुण वासुदेव : (४ ऑक्टोबर १९३२—१८ सप्टेंबर १९९९). मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते व दिग्दर्शक. त्यांचा जन्म कोल्हापूरातील यळगूड (ता. हातकणंगले) या गावी झाला. भारतीय चित्रपटसृष्टीच्या उदयकाळातले नावाजलेले छायाचित्रणकार वासुदेवराव कर्नाटकी हे त्यांचे वडील होत. त्यांच्या आईचे नाव सुलभादेवी होते. प्रसिद्ध दिग्दर्शक, अभिनेते मास्टर विनायक यांचे वासुदेवराव कर्नाटकी हे धाकटे बंधू. जन्मजात सर्जनशीलता, कुटुंबातला चित्रपटनिर्मितीचा वारसा आणि कोल्हापूरचे सांस्कृतिक वातावरण यांनी अरुण यांच्यातला चित्रकर्मी आकार घेत गेला.

अरुण कर्नाटकी यांनी सुरुवातीस प्रसिद्ध मराठी अभिनेते व दिग्दर्शक राजा परांजपे यांच्यासोबत गुन्हेगारी-रोमांचक शैली असलेल्या पाठलाग (१९६४) आणि पडछाया (१९६५) या चित्रपटांसाठी साहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केले. पुढे दत्ता धर्माधिकारी (वाट चुकलेले नवरे, १९६४; सतीचं वाण, १९६९), राजदत्त (मधुचंद्र, १९६७), सदाशिव रावकवी (अन्नपूर्णा, १९६८; भक्त पुंडलिक १९७५) अशा त्या काळातल्या आघाडीच्या दिग्दर्शकांकडे साहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम करण्याची संधी त्यांना मिळाली. मराठी चित्रपटसृष्टीवर आपल्या वैशिष्ट्यपूर्ण शैलीची छाप सोडणाऱ्या दिग्दर्शकांच्या हाताखाली वेगवेगळ्या चित्रपटांसाठी साहाय्यक म्हणून काम करताना त्यांच्यातील दिग्दर्शकीय कौशल्य विकसित, चतुरस्र झाले. विशेष म्हणजे मराठी चित्रपटसृष्टीत १९६० च्या दशकात आलेल्या तमाशापटांच्या लाटेत न अडकता त्यांनी आपले गुरू राजा परांजपे यांच्याप्रमाणे सामाजिक समस्या, कौटुंबिक नाट्य, नर्मविनोदी प्रणयकथा असणारे चित्रपट दिग्दर्शित केले. याचबरोबर त्यांनी पाठलाग, पडछाया, अन्नपूर्णा, धन्य ते संताजी धनाजी, छंद प्रीतीचा, मानाचा मुजरा, कोर्टाची पायरी  इत्यादी चित्रपटांत विविध भूमिका साकारल्या.

१९७६ साली अरुण कर्नाटकी यांनी जवळ ये लाजू नको या चित्रपटाद्वारे स्वतंत्र दिग्दर्शक म्हणून आपल्या कारकीर्दीची सुरुवात केली. विजयानंद चित्रची निर्मिती असणाऱ्या या विनोदी-सामाजिक चित्रपटात अशोक सराफ, उषा नाईक, गणपत पाटील यांच्या प्रमुख भूमिका होत्या. कथेची हलकीफुलकी मांडणी आणि खुमासदार संवाद यांनी हा चित्रपट गाजला. त्यांनी दिग्दर्शित केलेल्या चित्रपटांमध्ये तिखट मिरची घाटावरची (१९७९), घरजावई (१९८१), पायगुण (१९८३), आली लहर केला कहर (१९८४), चव्हाटा (१९८४), धोंडी धोंडी पाणी दे (१९८६), आई तुळजाभवानी (१९८७), बंदिवान मी या संसारी (१९८८), घरकुल पुन्हा हसावे, लपवाछपवी (१९८९), डोक्याला ताप नाही (१९९०), अपराधी (१९९२), सारेच सज्जन (१९९३) इत्यादी सामाजिक, विनोदी, कौटुंबिक चित्रपटांचा समावेश आहे. रानपाखरं (१९८०) ह्या त्यांनी दिग्दर्शित केलेल्या तमाशापटात तमाशा कलावंतांच्या आयुष्यातील फरपट त्यांनी यथार्थपणे दाखवली. त्यांनी त्या कालखंडातले आघाडीचे व्यावसायिक दिग्दर्शक म्हणून मराठी चित्रपटसृष्टीत आपले स्थान पक्के केले. सहजता, साधेपणा आणि एकरेषीयता हे अरुण यांच्या दिग्दर्शकीय शैलीचे विशेष. पण तेवढ्या मर्यादेतही त्यांनी वेगवेगळे विषय, आशय मांडणारे सामाजिक, धार्मिक, रहस्यमय, अद्भुतरम्य तसेच विनोदी चित्रपट दिग्दर्शित केले.

सत्तरच्या उत्तरार्धात अरुण कर्नाटकी यांची गाठ मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते दादा कोंडके यांच्याशी पडली. त्यांनी दादा कोंडके यांच्या पांडू हवालदार (१९७५), तुमचं आमचं जमलं (१९७६), राम राम गंगाराम (१९७७), बोट लावीन तिथं गुदगुल्या (१९७८), ह्योच नवरा पाहिजे (१९८०), आली अंगावर (१९८२), मुका घ्या मुका (१९८७), मला घेऊन चला (१९८९), पळवापळवी (१९९०), सासरचे धोतर (१९९४) अशा यशस्वी चित्रपटांच्या दिग्दर्शनासाठी साहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केले. या जोडीने एकाहून एक धमाकेदार विनोदी चित्रपट देत मराठी चित्रपटसृष्टीला त्या काळात गमावलेली उर्जितावस्था पुन्हा प्राप्त करून दिली. कामगार-कष्टकरी माणसाला आपलेसे वाटावे असे कथानक, द्विअर्थी विनोद, नृत्य-संगीताची लयलूट असणाऱ्या या चित्रपटांनी आपला एक प्रेक्षक वर्ग निर्माण केला. दादा कोंडके यांच्या तेरे मेरे बीचमें (१९८८) या हिंदी चित्रपटासाठीदेखील अरुण कर्नाटकी यांनी दिग्दर्शन साहाय्य केले होते. कर्नाटकी यांनी एकीकडे दादांच्या चित्रपटांचे सहदिग्दर्शक म्हणून व्यग्र असताना असताना, दुसरीकडे आपली स्वतंत्र दिग्दर्शक म्हणून वाटचाल दमदारपणे सुरू ठेवली होती.

अरुण कर्नाटकी यांचा विवाह लता काळे (लता अरुण) या चित्रपट आणि रंगभूमीवर कार्यरत असणाऱ्या अभिनेत्रीबरोबर झाला. या सर्जनशील दांपत्याचा वारसा त्यांच्या कन्या अभिनेत्री प्रिया अरुण म्हणजेच प्रिया लक्ष्मीकांत बेर्डे यांनी हिंदी-मराठी चित्रपटांतून पुढे चालवला.

अरुण कर्नाटकी यांचे कोल्हापूर येथे वयाच्या सदुसष्टाव्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यांनी सामाजिक-कौटुंबिक चित्रपटांच्या युगात मराठी चित्रपटसृष्टीत प्रवेश केला, विविध शैलींचे चित्रपट दिग्दर्शित करत ते चित्रपटसृष्टीत दीर्घकाळ टिकून राहिले आणि मराठी चित्रपटसृष्टीत पुढे आलेल्या विनोदी चित्रपटांच्या लाटेचे तेही एक प्रणेते होते. कृष्णधवल चित्रपटांच्या अवकाशात आपली कारकीर्द सुरू करणाऱ्या या चित्रकर्मीने त्या टप्प्यावर आपले प्रभुत्व गाजवले आणि रंगीत चित्रपटांच्या बदललेल्या सृष्टीशी जुळवून घेत तब्बल तीस दशके मराठी चित्रपटसृष्टीवर आपला ठसा उमटवला.

समीक्षक : संतोष पाठारे