डिकिन्स, रॉजर : (२४ मे १९४९). आंतरराष्ट्रीय स्तरावरील ब्रिटिश प्रकाशचित्रकार/चलच्चित्रणकार (Cinematographer). त्यांचा जन्म इंग्लंडमधील टॉर्की, डेवन या शहरात झाला. त्यांचे पूर्ण नाव रॉजर अलेक्झांडर डेकिन्स. त्यांचे वडील बांधकाम कंपनी चालवायचे आणि त्यांची आई अभिनेत्री व चित्रकार होती. त्यामुळे वयाच्या सुरुवातीच्या दिवसातच त्यांना चित्रकलेची आवड निर्माण झाली. त्यांनी बाथ, सोमरसेट येथे ‘बाथ कला अकादमी’मध्ये प्रवेश मिळवला. तिथे ते ग्राफिक डिझायनिंग शिकले. तेथे शिकत असताना त्यांना छायाचित्रणाची आवड निर्माण झाली. त्या अकादमीचे अतिथी व्याख्याता रॉजर मेन हे त्यांचे  प्रेरणास्थान होते. त्यांनी काही काळ ग्रामीण भागात छायाचित्रणाचा सराव केला. त्यानंतर त्यांना नॅशनल फिल्म स्कूलमध्ये प्रवेश मिळाला (१९७२). पदवीनंतर त्यांनी पुढील सात वर्षे साहाय्यक चलच्चित्रणकार म्हणून काम केले.

आफ्रिकेतील दोन माहितीपटांसाठी रॉजर यांची चलच्चित्रणकार म्हणून नियुक्ती झाली. त्या काळात त्यांनी भारत आणि सुदानमध्ये मानववंशशास्त्र या विषयावर काही माहितीपटसुद्धा चित्रित केले होते. कारकीर्दीच्या सुरुवातीच्या काळात त्यांनी काही सांगीतिक प्रकल्पांवर काम केले. वॉल्कॉट नावाची कथात्म मालिका त्यांनी चित्रित केली. या मालिकेत पूर्व लंडनमध्ये असणाऱ्या एका दुष्ट गुप्तहेराची कथा मांडण्यात आली होती. या मालिकेमधील रॉजर डिकिन्स यांचे काम बघून त्यांचे शाळकरी मित्र व त्यांचे सहकारी मायकल रेडफोर्ड यांनी त्यांना अनादर टाइम, अनादर प्लेस (१९८३) या चित्रपटावर काम करायची संधी दिली. हा चित्रपट कान चित्रपट महोत्सवात दाखवण्यात आला. यानंतर या दोघांनी जॉर्ज ऑर्वेल यांच्या नाइन्टीन एटीफोर या पुस्तकावर आधारित नाइन्टीन एटीफोर या चित्रपटावर काम केले.

रॉजर यांनी सुरुवातीच्या काळात कोएन ब्रदर्स, सॅम मेंडीस व डेनिस विलेनुवे यांच्यासोबत काम केले. १९८०च्या दशकात रॉजर यांनी ब्रिटनमध्ये आपले काम सुरू ठेवले. या दशकांत त्यांनी डिफेन्स ऑफ द रेल्म (१९८६), सिड अँड नॅन्सी (१९८६), व्हाईट मिस्चीफ (१९८७), स्टॉर्मी मंडे (१९८८), पास्कालीस आयलंड (१९८८) या चित्रपटांचे चलच्चित्रण केले.

अमेरिकेमध्ये चलच्चित्रणकार म्हणून रॉजर डिकिन्स यांचा पहिला चित्रपट माउंटन्स ऑफ द मून १९९० साली प्रदर्शित झाला. १९९१ मध्ये त्यांचे जुने सहकारी कोएन ब्रदर्स यांच्यासोबत त्यांनी बार्टन फिंक या चित्रपटापासून पुन्हा काम करायला सुरुवात केली. १९९४ मध्ये त्यांना अमेरिकन चलच्चित्रणकार सोसायटीचे सदस्यत्व मिळाले. त्यानंतर त्यांनी द शॉशांक रिडम्प्शन या चित्रपटाचे चलच्चित्रणकार म्हणून काम केले. या चित्रपटाने रॉजर डिकिन्स यांना उत्कृष्ट चलच्चित्रणकार म्हणून त्यांचे पहिले ऑस्कर नामांकन मिळवून दिले. त्यानंतर नव्वदच्या दशकात त्यांनी फार्गो (१९९६) आणि कुंडून (१९९७) या चित्रपटांसाठी काम केले. कोएन ब्रदर्स यांच्या ओह ब्रदर..व्हेर आर्ट दो? (२०००) या चित्रपटाच्या चित्रित झालेल्या दृश्यांवर त्यांनी तब्बल दोन महिने रंगदुरुस्ती (color-correction) कामासाठी सहकार्य केले. यातील मिसिसिपीमध्ये चित्रित झालेल्या हिरव्यागार दृश्यांना त्यांनी तांबड्या पिवळसर दृश्यांमध्ये रूपांतरित केले आहे. पूर्णपणे संगणकीकृत रंगदुरुस्ती (Digitally color-corrected) झालेला हा पहिला चित्रपट आहे. रॉजर डिकिन्स यांनी परत एकदा कोएन ब्रदर्स यांच्या द मॅन हू वॉझण्ट देअर (२००१) या चित्रपटासाठी काम केले. २००८ या वर्षात त्यांनी चलच्चित्रण केलेले  द असॅसिनेशन ऑफ द जेसी जेम्स बाय द कॉवर्ड रॉबर्ट फोर्ड आणि नो कंट्री फॉर ओल्ड मॅन हे दोन चित्रपट ऑस्करसाठी नामांकित झाले. त्यानंतर त्यांनी चलच्चित्रण केलेले द रीडर (२००९), ट्रू ग्रीट (२०११), स्कायफॉल (२०१३), प्रिस्नर्स (२०१४), अनब्रोकन (२०१५) आणि सिकारिओ (२०१६) हे त्यांचे प्रमुख चित्रपट ऑस्कर पुरस्कारासाठी नामांकित झाले.

रॉजर डिकिन्स यांना जरी कथात्म चित्रपटांच्या चलच्चित्रणकारीसाठी ओळखले जात असले तरी त्यांचा सचेतपट (animation movies) दुनियेतसुद्धा मोलाचा वाटा आहे. त्यांनी प्रथम पिक्सार अनिमेशन स्टुडिओच्या वॉल ई (२००८) या सचेतपटासाठी तांत्रिक सल्लागार म्हणून काम केले. त्यानंतर त्यांनी रँगो (२०११), राईज ऑफ द गार्डीयन्स (२०१२), द क्रूड्स (२०१३), हाऊ टू ट्रेन युअर ड्रॅगन (२०१०, २०१४, २०१९) या चित्रपटांच्या तीन भागांसाठी आणि विवो (२०२१) इत्यादी सचेतपटांसाठी त्यांनी तांत्रिक सल्लागार म्हणून काम केले आहे.

नैसर्गिक प्रकाश किंवा कृत्रिम रीत्या तयार केलेला प्रकाश आणि छाया यांचे कल्पकतेने संयोजन करून साकारलेली दृश्ये रॉजर डिकिन्स यांनी चलच्चित्रित केलेल्या चित्रपटात प्रामुख्याने दिसतात. मागे प्रखर प्रकाशयोजना ठेवून केवळ बाह्याकार दिसणारी काळी आकृती (silhouette) अशा दृश्यांसाठी रॉजर डिकिन्स यांचे चित्रपट वेगळे ठरले. नाइन्टीन एटीफोर या चित्रपटात रॉजर यांनी ब्लीच बायपास नावाचे तंत्र वापरले. हे तंत्र पुढे जाऊन त्यांनी सेव्हन (१९९५) आणि सेविंग प्रायवेट रायन (१९९८) या चित्रपटासाठी वापरले. ब्लीच बायपास ही एक रासायनिक प्रक्रिया आहे. रंगीत फिल्मवर प्रक्रिया करून त्यातील चंदेरी रंग वर काढला जातो. ज्यामुळे रंगीत असणारी फिल्म ही काळ्या आणि सफेद रंगामध्ये ठळकपणे दिसते.

ब्रिटिश फिल्म अँड टेलिव्हिजनसाठी केलेल्या विशेष कामगिरीसाठी रॉजर डिकिन्स यांना बीकन्सफील्ड, बकिंगहमशर येथील राष्ट्रीय फिल्म अँड टेलिव्हिजन स्कूलच्या वतीने खास पदवी देऊन सन्मानित करण्यात आले. त्यांना द मॅन हू वॉझण्ट देअर, नो कंट्री फॉर ओल्ड मॅन, ट्रू ग्रीट, ब्लेड रनर 2049 आणि 1917 अशा पाच चित्रपटांसाठी बाफ्ता पुरस्कार मिळाले आहेत. फार्गो ए सिरियस मॅन या चित्रपटांसाठी त्यांना ‘इंडिपेंडट स्पिरीट’ हा पुरस्कार मिळाला. त्यांना २०११ मध्ये अमेरिकन चलच्चित्रणकार सोसायटीने व २०१५ मध्ये ब्रिटिश चलच्चित्रणकार सोसायटीने जीवन गौरव पुरस्कार देऊन गौरवले. रॉजर डिकिन्स यांना त्यांचा पहिला ऑस्कर पुरस्कार २०१८ साली ब्लेड रनर 2049 या चित्रपटासाठी आणि त्यानंतर दुसरा ऑस्कर पुरस्कार २०२० मध्ये 1917 या चित्रपटासाठी मिळाला.

समीक्षक : आशुतोष जरंडीकर