पनाही, जाफर : ( ११ जुलै १९६० ). प्रसिद्ध इराणी चित्रपट दिग्दर्शक, पटकथाकार व संकलक. त्यांचा जन्म मिआने, अझरबैजान, इराण येथे झाला. जाफरचे वडील रंगकाम करीत. ते स्वतः चित्रपटाचे चाहते होते; मात्र जाफर यांनी चित्रपट पाहू नयेत असे त्यांना वाटत होते. मुले आणि तरुणांच्या बुद्धिमत्ता विकसनाकरता कार्यरत असणाऱ्या ‘कानून’ या संस्थेमुळे कलात्मक व आंतरराष्ट्रीय चित्रपट पाहण्याची संधी जाफर यांना उपलब्ध झाली. ‘कानून’ च्या माध्यमातून त्यांना अब्बास किआरोस्तामी या प्रसिद्ध इराणी दिग्दर्शकाच्या चित्रपटांची ओळख प्रथमत: झाली. जाफर आणि कम्बुजिया पर्तोवी या प्रसिद्ध इराणी लेखक-दिग्दर्शकाचा परिचयही कानूनच्या माध्यमातूनच झाला.

विसाव्या वर्षी जाफरना मनाविरुद्ध सैन्यात प्रवेश घ्यावा लागला. १९८० ते ८२ च्या दरम्यान, त्यांनी सैन्यातर्फे छायांकनकार म्हणून इराण-इराक युद्धात काम पाहिले. ते काम करीत असताना १९८१ मध्ये त्यांना कुर्दिश लोकांनी सुमारे ७६ दिवस डांबून ठेवले होते. हा कुर्दिश गट इराणच्या सैन्याशी लढत होता. सैन्यातून परतल्यानंतर त्यांनी तेहरानमधल्या ‘कॉलेज ऑफ सिनेमा अँड टीव्ही’ येथे प्रवेश घेतला. १९८८ मध्ये पदवी घेऊन बाहेर पडण्याच्या आधीच ते साहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम पाहत होते. इराणी दूरचित्रवाणी वाहिन्यांकरता त्यांनी काही माहितीपट बनवले. कम्बुजिया पर्तोवी यांच्या द फिश  या चित्रपटाचे साहाय्यक दिग्दर्शनाचे काम जाफर यांनी पाहिले. इटलीचे प्रख्यात दिग्दर्शक व्हित्तोरिओ डी’सिका यांच्या बायसिकल थिव्ह्ज  या चित्रपटाचा जाफर यांच्यावर मोठा प्रभाव पडला. यानंतर त्यांनी ८ मिमी.चा कॅमेरा वापरून लघुपट बनवायला सुरुवात केली. त्यांनी अनेक उत्कृष्ट लघुपट बनविले. त्यांचा आवडता दिग्दर्शक अब्बास किआरोस्तामीच्या थ्रू दी ऑलिव्ह ट्रीज  या चित्रपटाकरिता साहाय्यक दिग्दर्शक म्हणून त्यांनी काम पाहिले. १९९५ साली त्यांनी द व्हाईट बलून  हा चित्रपट स्वतंत्रपणे दिग्दर्शित केला. या चित्रपटाला कान चित्रपट महोत्सवात परकीय भाषेतील चित्रपटाचे सर्वोत्कृष्ट पारितोषिक मिळाले. हा चित्रपट एका लहान मुलीच्या आयुष्यातील एका दिवसातल्या काही तासांमधील घडलेल्या घटनांवर आधारित आहे. यात एका हलक्याफुलक्या कथेची अतिशय परिणामकारक रीतीने दिग्दर्शकाने मांडणी केलेली आहे. पुढे द मिरर (१९९७), द सर्कल (२०००), क्रिमसन गोल्ड (२००३), ऑफसाईड (२००६) यासारखे अनेक उत्तमोत्तम चित्रपट पनाही यांनी दिग्दर्शित केले.

पनाही यांनी बनवलेल्या चित्रपटांवर इराणमध्ये अनेकदा बंदी घालण्यात आली; पण त्यांच्या चित्रपटांनी आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांमध्ये बक्षीसे पटकावली आहेत. अनेक चित्रपट समीक्षक, अभ्यासक त्यांची गणना महत्त्वाच्या दिग्दर्शकांत करतात. इराणी सरकारने २००१ ते २०१० या काळात जाफर पनाहींना सरकारविरोधी चित्रपट बनविल्याच्या आरोपावरून अनेकदा अटक केली. अनेकदा चौकशीसही त्यांना सामोरे जावे लागले. १ मार्च २०१० रोजी जाफर पनाही आणि त्यांच्या कुटुंबियांना अटक करण्यात आली. जाफर यांच्याव्यतिरिक्त इतरांना चौकशी करून सोडून देण्यात आले. राजकीय अस्थैर्यावर माहितीपट बनवल्याच्या आरोपांतर्गत ही अटक केली गेली आहे, असे इराण सरकारने स्पष्ट केले. या कारणानेच त्यांना डिसेंबर २०१० मध्ये सहा वर्षे कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आली. त्यांनी वीस वर्षे चित्रपट बनवायचा नाही, हा देखील या शिक्षेचा एक अत्यंत त्रासदायक असा भाग होता. त्यांनी कुठल्याही स्वरूपाचे लिखाण करायचे नाही, इराणी किंवा परदेशी माध्यमांना मुलाखती द्यायच्या नाहीत, वैद्यकीय कारण किंवा हज यात्रेचे कारण वगळता देश सोडून जायचे नाही अशा जाचक अटी त्यांवर लादल्या गेल्या. २०११ मध्ये त्यांच्यावर लावलेले आरोप मागे घेण्यात आले; पण त्यांना देश सोडून कुठेही जाण्यास बंदी केली गेली. जगभरातून, बऱ्याचशा चित्रपटप्रेमी संस्था व व्यक्तींतर्फे त्यांच्या सुटकेकरता प्रत्यत्न करण्यात आले. फ्रान्स, जर्मनी व कॅनडा सरकारतर्फेही त्यांच्या अटकेचा निषेध करण्यात आला. २०१० ते २०१३ दरम्यान जगभरच्या अनेक व्यक्ती, संघटना आणि सरकारे यांनी जाफर पनाहीच्या सुटकेकरता विविध प्रयत्न केले. कायद्याच्या बडग्याला न घाबरता जाफर यांनी चित्रपटनिर्मिती सुरूच ठेवली. २०११ साली धिस इज नॉट अ फिल्म  या नावाने त्यांनी एक माहितीपटसदृश चलतचित्र बनवले. ते इराणमधून बेकायदेशीर रीत्या कान महोत्सवात पाठवले गेले. तिथे या माहितीपटाने सर्वोत्कृष्ट माहितीपटाचा पुरस्कार पटकावला. २०११ सालच्या कान महोत्सवात, २०१३ च्या बर्लिन महोत्सवात, २०१५ च्या बर्लिन महोत्सवात त्यांचे चित्रपट, माहितीपट दाखविले गेले. यानंतर क्लोज्ड कर्टन (२०१३) आणि टॅक्सी (२०१५) या चित्रपटांची निर्मिती जाफर यांनी केली. २०१८ या वर्षीच्या कान चित्रपट महोत्सवात त्यांच्या थ्री फेसेस  या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट पटकथा लेखनाचा पुरस्कार मिळाला. या वर्षीही त्यांना देश सोडून महोत्सवाकरता जाण्याची परवानगी नसल्याने, त्यांची मुलगी सोलमन पनाही हिने त्यांच्या वतीने हा पुरस्कार स्वीकारला.

पनाहींचे बालपण गरिबीत गेले. त्यावेळच्या अनुभवामुळे त्यांचा जगाकडे पाहण्याचा मानवतावादी दृष्टीकोन आपोआप विकसित होत गेला. हाच दृष्टीकोन पनाहींच्या चित्रपटांचे सूत्रही आहे. त्यांचे चित्रपट इराणमधील महिला, मुले व शोषित घटकांच्या हालअपेष्टा दर्शवणारे आणि त्यांकडे माणुसकीच्या दृष्टीकोनातून पाहण्याकरिता प्रवृत्त करतात. त्यांच्या चित्रपटांतून इराणी नव-वास्तववादाचे वेगळे रूप समोर येते. त्या चित्रपटांमध्ये इराणच्या सद्यकालीन स्त्रियांच्या समस्यांवर भाष्य केलेले आहे. त्यांच्या चित्रपटांतील पात्रे ही कायमच सामान्यांपैकी एक वाटतात. किंबहुना म्हणूनच ती प्रेक्षकाला जवळची किंवा आपली वाटतात. एखाद्या कवीच्या अथवा कलाकाराच्या नजरेतून मानवतावादाकडे पाहून अथवा हा विचार मनात ठेऊन त्या पद्धतीने पनाही यांनी चित्रण केलेले आहे. पनाहींच्या चित्रपटांमधील पात्रे वाईट वृत्तीची अथवा विचारांची निदर्शक नाहीत, तर प्रत्येक व्यक्ती ही मूलत: चांगलीच असते, हे त्यांचे प्रमुख विचारसूत्र जाफर त्यांच्या चित्रपटांतून दर्शवितात. त्यामुळे हे चित्रपट पाहताना प्रेक्षक भावूक होतात, चित्रपटातली पात्रे आणि त्यांच्या भावभावनांशी ते एकरूप होतात. क्रांतीनंतर पूर्णपणे बदलून गेलेल्या इराणचा दृष्टीकोनही जाफर यांच्या चित्रपटांमधून पहायला मिळतो. त्यांच्या चित्रपटांतून ते हिंसा थेट न दाखवता प्रतिकात्मक रूपात दाखवितात.

जाफर यांच्या चित्रपट निर्मितीच्या कार्याला अनेक पुरस्कारांना गौरविण्यात आले. लोकार्नो आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात त्यांना द मिरर या चित्रपटाकरिता गोल्डन लेपर्ड हा महोत्सवातील सर्वोच्च पुरस्कार मिळाला (१९९७). व्हेनिस आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात द सर्कल  या चित्रपटाकरिता गोल्डन लायन हा महोत्सवातील सर्वोच्च पुरस्कार मिळाला (२०००). कान व बर्लिन येथील आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांत अनुक्रमे त्यांच्या क्रिमसन गोल्ड (२००३) आणि ऑफसाईड (२००६) या चित्रपटांना परीक्षक समितीतर्फे पुरस्कार देण्यात आला. धिस इज नॉट अ फिल्म  या माहितीपटाकरिता त्यांना कान व लंडन येथील महोत्सवात पुरस्कार मिळाले. बर्लिन आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात क्लोज्ड कर्टन या चित्रपटाकरता त्यांना सर्वोत्कृष्ट पटकथा लेखनाचा पुरस्कार मिळाला (२०१३). तसेच ६५ व्या बर्लिन आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात टॅक्सी  या चित्रपटाकरिता गोल्डन बियर हा सर्वोत्कृष्ट चित्रपटासाठी देण्यात येणारा पुरस्कार मिळाला.

समीक्षक : अभिजीत देशपांडे