बोधात्मक अर्थविज्ञान: बोधात्मक भाषाविज्ञानाची सैद्धांतिक शाखा. अमेरिकन भाषावैज्ञानिक लिओनार्द टाल्मी यांनी केलेल्या भाषाविज्ञानातील मौलिक संशोधनातून ही शाखा निर्माण झाली व विकसित होत गेली. बोधात्मक अर्थविज्ञानात टाल्मीप्रमाणेच जॅकेनडॉफ, लेकॉफ, जॉहान्सन, लँगाकर, स्वीट्सर, फोकोनी यांसारख्या भाषावैज्ञानिकांचे कार्यही महत्त्वपूर्ण आहे.

भाषिक अर्थविज्ञानाच्या दृष्टीने, विसाव्या शतकाच्या सुरुवातीला उच्चारणातील ऐतिहासिक बदलावर अधिक भर होता. दुसऱ्या  टप्प्यात, सोस्यूरच्या संरचनावादी अभ्यासपद्धतीमध्ये भाषेच्या समकालीन घटकावर लक्ष केंद्रीत झाले. या अभ्यासपद्धतीमध्ये मानसिक प्रक्रिया व भाषा याचाही विचार केला गेला. पुढे वर्तणूकवैज्ञानिकांच्या अभ्यासात तो अधिक स्पष्ट झाला (पाहा: वर्तनवाद). तिसऱ्या  टप्प्यात, अर्थविज्ञानावर तर्कशास्त्र व गणितशास्त्रातून विकसित झालेल्या तात्त्विक घटकांचा अधिक प्रभाव राहिला. यामधील सिद्धांत हे रूपलक्षी पद्धतीवर आधारित होते. या पद्धतीत भाषा ही बोधात्मक संरचना म्हणून दुर्लक्षित राहिली. परिणामी, विसाव्या शतकाच्या शेवटी रूपलक्षी पद्धतीतील कल कमी होऊन भाषेचा बोधात्मक पद्धतीने अभ्यास वाढत गेला.

बोधात्मक अर्थविज्ञानाची सहा मूलतत्त्वे

बोधात्मक अर्थविज्ञानाची सहा मूलतत्त्वे पुढीलप्रमाणे आहेत:

(१) संकल्पनानिर्मिती म्हणजे अर्थनिर्मिती होय. बोधात्मक भाषावैज्ञानिकांच्या मते, अर्थ हा मानवी मेंदूमध्ये तयार होतो. अर्थनिर्मितीसाठी बहिस्थ प्रकटीकरणाची पूर्वअट आवश्यक नाही. बोधात्मक अर्थविज्ञानात अर्थ हा सत्यतेच्या शक्यतेवर अवलंबून नसतो. उदा. ‘कप’ ही संकल्पना कप ही वस्तू पाहिल्यावरच तयार होते, असे नव्हे.

(२) सांकल्पनिक रचना या संवेदनांतर्भूत असतात. उदा. वस्तूचा आकार, रंग, तापमान, लांबी, रूंदी, खोली इ. विविध गुणधर्माचे ज्ञान माणसाला त्याच्या विविध इंद्रियाद्वारे आकळते. माणसाच्या विविध मूर्त वा अमूर्त गोष्टींबाबतच्या संकल्पना त्याच्या स्वानुभवातून, संवेदनातून, त्याच्या बाह्यविश्वाशी सततच्या सहसंबंधातून मनो-शारीरिक प्रक्रियेद्वारे निर्माण होतात. उदा. मानवाला त्याच्या दैनंदिन व्यवहारामध्ये गुरुत्वाकर्षणाचा सतत अनुभव येतो, मग त्याबाबतची संकल्पना त्याच्या मनात तयार होते, ती बऱ्याचदा नवीन अनुभवानुसार सहजपणे बदलतही जाते. तो या गुरुत्वाकर्षणाच्या एका संकल्पनेवर अधारित असंख्य संकल्पना निर्माण करतो व भाषेत वापरतो. उदा. खाली पडणे – गुरुत्वाकर्षाने पृथ्वीच्या पृष्ठभागाच्या दिशेने खेचले जाणे, वर उडणे – गुरुत्वबलावर मात करून त्याविरोधी अवकाशात जाणे, इ.

(३) अर्थ घटक हे भौमितिक रचनांवर आधारित असतात. साधारणपणे विश्वातील विविध गोष्टी बिंदू, रेषा, क्षेत्र अशा सामान्य भौमितिक रचनांद्वारे समजून घेतल्या जातात. उदा. ‘मी बेळगाववरून कोल्हापूर, कराड, सातारा, पुणे करून मुंबईला पोहोचलो’ या वाक्यातील बेळगाव-मुंबई प्रवासाचे एका रेषेप्रमाणे आकलन होईल व त्या रेषेवरील विविध बिंदू म्हणजे कोल्हापूर, कराड, सातारा व पुणे होत .

(४) सांकल्पनिक रचना प्रतिमा-बंधात्मक असतात. विविध वस्तू वा गोष्टींबद्दलच्या प्रतिमा आपल्या मनोपटलावर उमटत असतात. या प्रतिमा साधारण, त्रोटक, जाड्याभरड्या व कमी तपशीलाच्या असतात. प्रतिमांमध्ये वस्तूचा रंग, कोपरे वैगेरेसारखे तपशील गाह्य धरले जात नाहीत.

(५) अर्थ हा रचनेपेक्षा प्राथमिक/ प्रधान असून बऱ्याच प्रमाणात रचनांचे स्वरूपही ठरवितो. बोधात्मक अर्थवैज्ञानिकांच्या मते, अर्थाशिवाय रचनांना महत्त्व नसते. बोलणाऱ्याला अपेक्षित असणारा अर्थ हा त्यास अनुकूल असणाऱ्या  (भाषिक) रचनेतून व्यक्त होतो.

(६) संकल्पना प्रोटोटाईप (मूळ-नमूना) परिणाम दर्शवितात. संकल्पनांच्या अभिजातवादी सिद्धांतानुसार विविध संकल्पना एकमेकांपासून पूर्णपणे भिन्न असतात, तर बोधात्मक विज्ञानानुसार विविध संकल्पना मूलत: प्रतिमा-बंधात्मक असल्याने त्या पूर्णपणे भिन्न नसून त्यांच्या स्वतंत्र आस्तित्त्वाबरोबरच त्या एकमेकांना छेदूनही जातात. त्याचबरोबर एकाच वस्तूच्या अनेक पूरक स्वरूपाच्या संकल्पना होऊ शकतात. मात्र अशा स्थितीत मूळ-नमूना असणाऱ्या  संकल्पनेशी त्या साध्यर्म्य दाखवितात. उदा. कपाविषयीच्या अनेक प्रतिमा निर्माण होऊ शकत असल्या तरी त्यांच्यामध्ये कपाच्या मूळ (प्रोटोटाईप) संकल्पनेपेक्षा अधिक फरक जाणवत नाही.

बोधात्मक अर्थविज्ञानात अभ्यासले जाणारे घटक 

टाल्मीच्या मते बोधात्मक अर्थविज्ञानात सांकल्पनिक ज्ञानाचे स्वरुप, त्याची रचना व प्रक्रिया आणि त्याचे भाषेच्या माध्यमातून होणारे प्रकटीकरण या घटकांचा अभ्यास होतो. यामध्ये मुख्यत्वे काळ व अवकाश, घटना व दृश्ये, वस्तू व प्रक्रिया, स्थान व गती आणि बल व कार्यकारणभाव यांसारख्या अत्यंत पायाभूत अशा सांकल्पनिक घटकांचा अभ्यास केला जातो. त्याचप्रमाणे मानसिक प्रक्रियांवर प्रभाव टाकणाऱ्या  घटकांत अवधान व दृष्टीकोन, इच्छा/ संकल्प व हेतू/ उद्देश आणि अपेक्षा व परिणाम इ. घटकांचा समावेश होतो. यामध्ये शब्दांची रूपे व वाक्यरचना यांच्या अर्थरचनांचाही अभ्यास केला जातो. याचप्रमाणे यामध्ये अनुक्रमे रूपकात्मक रचना (metaphorical structures), आर्थिक चौकट (semantic frame), मजकूर व संदर्भ (text and context) यांचा सांकल्पनिक रचनांशी असलेला संबंध या बाबींचा अभ्यास केला जातो.

भाषेत आशयात्मक शब्दव्यवस्था (खुला गट) व व्याकरणिक शब्दव्यवस्था (मर्यादित गट) असे दोन विभाग पडतात. टाल्मी खुल्या गटात प्रामुख्याने नाम, क्रियापद व विशेषणांच्या मूळरूपांचा समावेश तर मर्यादित गटात विविध प्रत्यय, शब्दयोगी अव्यय, उभयान्वयी अव्यय, इ. शब्दांबरोबरच शब्दक्रम, नाम वा कर्ता यासारख्या संज्ञा इत्यादींचा समावेश करतो. त्याच्या मते, संकल्पना निर्मितीच्या दृष्टीने खुला गट सांकल्पनिक आशय व्यक्त करतो, तर मर्यादित गट सांकल्पनिक संरचना व्यक्त करतो. उदाहरणार्थ, जगातील बहुतांशी भाषा मर्यादित गटाच्या घटकामार्फत वचन व्यक्त करतात (उदा. एकवचन, अनेकवचन, इ.), पण जगात कोणतीही अशी भाषा नाही की जी मर्यादित गटाच्या घटकामार्फत रंग व्यक्त करू शकेल. विविध भाषांमध्ये रंग आशयात्मक गटातील शब्दांनीच व्यक्त केला जातो.

संकल्पनानिर्मिती वा अर्थनिर्मितीमध्ये भौमितिक रचना, दृष्टीकोन, अवधान वितरण, बल गतिविज्ञान आणि कार्यकारणभाव व आकृती-पृष्ठभूमी या बाबींचा समावेश होतो. जगातील विविध गोष्टींचा (वस्तू अथवा घटना) मानवी मनोपटलावर बिंदू, रेषा, क्षेत्र इत्यादि प्रकारच्या सामान्य भौमितीक रचनेच्या माध्यमातून बोध होतो. प्रत्येक अचल दृश्य वा चल घटना ही प्रामुख्याने आकृती व पृष्ठभूमी यात विभागली जाते (उदा. ‘कप टेबलावर आहे’ या वाक्यात ‘कप’ ही आकृती तर ‘टेबल’ ही पृष्ठभूमी  होईल). तदनंतर दृश्य वा घटनेचे वास्तविक वा काल्पनिक निरीक्षणाचे ठिकाण ,अंतर, दिशा, इ. बाबी महत्त्वाच्या ठरतात. उदा. ‘तो (आकृती) घरात (पृष्ठभूमी) गेला’ व ‘तो (आकृती) घरात (पृष्ठभूमी) आला’ यामधील पहिल्या दृशाबाबतचे निरीक्षणाचे ठिकाण घराच्या बाहेर असून दुसऱ्यामध्ये ते घराच्या आत आहे. तसेच या दोन्ही दृश्यात आकृती परस्परविरोधी दिशेने गेल्याचे लक्षात येते. त्याचबरोबर त्या दृश्यातील वा घटनेतील नेमक्या कोणत्या बाबींवर निरीक्षकाने कमी वा अधिक लक्ष केंद्रीत केले आहे, हे ही आवश्यक ठरते (‘मुलगा कुरूप आहे’, ‘मुलाचा चेहरा कुरूप आहे’ आणि ‘मुलाच्या गालावर डाग आहेत’ या तीन वाक्यामधून व्यक्त पहिल्या दृश्यामध्ये निरीक्षणाने मुलावर, दुस-या दृश्यामध्ये मुलाच्या चेहऱ्यावर तर तिसऱ्या दृश्यामध्ये मुलाच्या गालावर लक्ष केंद्रीत केले आहे. अनुक्रमे मुलगा, चेहरा व गाल यामध्ये लक्ष बृहद बाबींकडून छोट्या बाबींकडे केंद्रीत असल्याचे दिसून येते).

उपरोक्त नमूद दृश्याप्रमाणेच हे लक्षाचे केंद्र (focus) घटनेच्या बाबतही बदलते. उदा. ‘मला स्वप्न पडलं’, ‘मला विमानात बसल्याचं स्वप्न पडलं’, ‘मी स्वप्नात विमानातून परदेशात गेलो’ यामध्ये पहिली स्वप्न पडण्याची बृहद घटना आहे, दुसऱ्या  घटनेत कोणते स्वप्न याबाबत काहीसा खुलासा आहे, तर शेवटच्या घटनेत अधिक स्पष्ट खुलासा आहे. निरिक्षकाचे लक्ष अनुक्रमे स्वप्न, स्वप्नातील विमान व स्वप्नातील विमानातूनची परदेशवारी यावर केंद्रीत झाल्याचे दिसून येते. वरील बाबींप्रमाणेच संकल्पनानिर्मिती किंवा अर्थनिर्मितीमध्ये बल गतिविज्ञानाचीही (force dynamics) भूमिका स्पष्ट होते.

बोधात्मक अर्थविज्ञानाचा उपयोग उपरोक्त नमूद गोष्टींबरोबरच विविधार्थिता, रूपकांचे सखोल विश्लेषण  व वर्गीकरण  यासाठी होतो.

पाहा.  बोधात्मक भाषाविज्ञान, बोधात्मक व्याकरण, बोधात्मक रूपक सिद्धांत.

परिभाषा

सत्यतेची  शक्यता – truth conditions

प्रतिमा-बंधात्मक – image-schematic

रूपकात्मक रचना – metaphorical structures

आर्थिक चौकट – semantic frame

मजकूर व संदर्भ – text and context

निरीक्षणाचे ठिकाण – vantage point

केंद्र – focus

गतिविज्ञान – force dynamics

विविधार्थिता – polysemy

रूपकांचे सखोल विश्लेषण – metaphorical analysis

वर्गीकरण – categorization

संदर्भ :

  1. Allwood,Jens,Gärdenfors,Peter (Edi), Cognitive Semantics: Meaning and Cognition, Philadelphia and Amsterdam, 1999. 2. Evans,Vyvyan, Green, Melanie, Cognitive Linguistics: An Introduction, MIT Press, 2006. 3.Talmy, Leonard, Toward a Cognitive Semantics, Massachusetts, M. I, T. Press, 2000.

समीक्षक : सोनल कुलकर्णी