मानवी जीवाश्मांतील सर्वांत प्राचीन जाती. पुरामानवशास्त्रामध्ये ही जाती एक महत्त्वाचा टप्पा मानली जाते. टांझानियातील पुराणाश्मयुगीन अवशेषांसाठी प्रसिद्ध असलेल्या ओल्डुवायी गॉर्ज येथे १९६० मध्ये एक आकाराने छोटा असलेला खालचा जबडा (ओएच-७) मिळाला. विख्यात केनियन पुरामानवशास्त्रज्ञ व पुरातत्त्वज्ञ लुई लीकी (१९०३-१९७२) व त्यांचे सहकारी फिलिप टोबियास (१९२५-२०१२) आणि ब्रिटिश प्रायमेट वैज्ञानिक जॉन नेपियर (१९१७-१९८७) यांनी हा जीवाश्म ऑस्ट्रॅलोपिथेकस आणि पॅरान्थ्रोपस या जातींपेक्षा वेगळा आहे हे ओळखले. त्यांनी त्याला हॅबिलिस मानव (होमो हॅबिलिस) असे नाव दिले. हे मानव २४ लक्ष वर्षपूर्व ते १४ लक्ष वर्षपूर्व असे १० लाख वर्षे अस्तित्वात होते. त्यांचे जीवाश्म आफ्रिकेच्या पूर्व आणि दक्षिण भागांत आढळले आहेत.

हॅबिलिस मानवाचा जीवाश्म ओएच १६, ओल्डुवायी गॉर्ज (टांझानिया).

ऑस्ट्रॅलोपिथेकसपेक्षा हॅबिलिस मानवांच्या दातांचा आकार लहान होता आणि कवटीचे आकारमान थोडे जास्त (७७५ घन सेंमी.) होते; तथापि या मानवांची शारीरिक वैशिष्ट्ये बरीचशी कपिंप्रमाणेच होती.

हॅबिलिस मानव गवताळ प्रदेशात राहत. हवामान कोरडे आणि थंड होत गेल्याने या जातीने मांस खाणे व दगडी अवजारांचा वापर करणे सुरू केले असावे. हे मानव मुख्यतः शाकाहारी असून काही प्रमाणात प्राण्याचे मांस खात असले तरी ते शिकारी नव्हते. मेलेल्या प्राण्याचे मांस काढून ते खात असत. या मानवांचा संबंध ओल्डोवान दगडी अवजारांशी आहे. हे मानव दगडी अवजारांचा वापर सर्वप्रथम करत असावेत. यावरून त्यांना ‘हँडी मॅन’ असे नाव देण्यात आले होते. परंतु दगडी अवजारांचा वापर त्यापेक्षाही प्राचीन असल्याचे आता दिसून आले आहे. ऑस्ट्रॅलोपिथेकस गार्ही या जातीचे २६ लक्ष वर्षांपूर्वीचे जीवाश्म आणि दगडी अवजारे एकत्रित सापडल्याने हॅबिलिस मानव हेच अवजारे बनवण्याचे तंत्र अवगत असलेले पहिले मानव होते, असे आता मानले जात नाही; तथापि याबद्दल अद्यापही वैज्ञानिकांमध्ये एकमत आढळत नाही.

केन्या (केनिया) येथील कूबी फोरा या ठिकाणी हॅबिलिस मानवांचे जीवाश्म मिळाले (१९८६). त्यांचा सखोल अभ्यास केल्यावर असे दिसून आले की, केएनएम-इआर १४७० व केएनएम-इआर १८०२ हे जीवाश्म निराळे असून ते वेगळ्या जातीचे असावेत असे मानून त्यांना रूडॉल्फ मानव (होमो रूडॉल्फेन्सिस) असे नाव देण्यात आले. तसेच हॅबिलिस मानव जातीपासून इरेक्टस मानव (होमो इरेक्टस) जातींची उत्क्रांती झाली असावी, असे मानले जात असे. परंतु सन २००० मध्ये केनियात मिळालेल्या जीवाश्मांवरून असे दिसते की, हॅबिलिस व इरेक्टस या दोन्ही जाती किमान ५ लाख वर्षे एकाच भागात वावरत असावेत. हॅबिलिस मानवांची उक्रांती कोणापासून झाली आणि त्यांच्यापासून कोणती मानव जात उत्क्रांत झाली, याचा उलगडा अद्यापही झालेला नाही.

संदर्भ :

छायाचित्र संदर्भ : https://humanorigins.si.edu/

समीक्षक : मनीषा पोळ