एक लुप्त पुरातन मानवी जाती. सु. ७ लाख ते २ लाख वर्षपूर्व या काळात अस्तित्वात असलेल्या या जातीच्या जीवाश्मांचा शोध १९०८ मध्ये जर्मनीतील हायडल्बर्ग शहराजवळील मौर येथे लागला. या जातीला हायडल्बर्ग हे नाव देण्याआधी त्यांची गणना इरेक्टस मानव अथवा आदिम सेपियन मानव जातींत केली जात असे. या जातीचे जीवाश्म यूरोपमध्ये पेट्रालोना (ग्रीस) व अरागो (फ्रान्स) या ठिकाणी आढळले असून आशियात चीनमधील माबा व दाली या स्थळांवरही त्यांचे अवशेष मिळाले आहेत; तथापि त्यांच्या वर्गीकरणाबद्दल अद्याप वादविवाद आढळतात. याखेरीज आफ्रिकेत बोडो दार (इथिओपिया), काबवे (झँबिया) व नडुटु (टांझानिया) येथे या मानवांचे पुरावे मिळाले आहेत.

हायडल्बर्ग मानवाचे जीवाश्म.

हायडल्बर्ग मानव मोठ्या जंगली प्राण्यांची शिकार करून जगत असत. दगडी अवजारांव्यतिरिक्त जर्मनीतील श्योनिंगन या ठिकाणी ४ लाख वर्षांपूर्वीच्या एका लाकडी भाल्याचा पुरावा मिळाला आहे. तसेच हे मानव ७ लाख ९० हजार वर्षांपूर्वी अग्नीचा वापर करत असावेत, असे इझ्राएलमधील गेशर बेनोट या-अक्वाव येथे मिळालेल्या अवशेषांवरून दिसते. साधेसुधे निवारे तयार करणारी ही पहिली जाती आहे. फ्रान्समधील तेरा अमाता या स्थळावर यासंदर्भातील पुरावे आढळले आहेत.

अलीकडच्या काळातील नवीन शोधांच्या पार्श्वभूमीवर काही अभ्यासकांनी हायडल्बर्ग मानवांच्या उत्क्रांतीवृक्षावरील स्थानाचा फेरविचार करावा असे सुचवले आहे. इथिओपियात आवाश नदीच्या खोऱ्यात बोडो दार (बोडोडी`आर) या पुरास्थळावर १९७६ मध्ये एक कवटी मिळाली होती. ‘बोडो कवटी’ म्हणून ती विख्यात आहे. तिचा काळ ६ लक्ष वर्षपूर्व एवढा आहे. कॅनडियन पुरामानववैज्ञानिक मिर्जाना रोक्सांडिक व तिच्या सहकाऱ्यांनी या कवटीचा पुन्हा अभ्यास करून तिच्या नावावरून बोडो मानव (होमो बोडोएन्सिस) ही नवीन जात असल्याचे मत मांडले (२०२१). तसेच ऱ्होडेसिएन मानव (होमो ऱ्होडेसिएन्सिस) व हायडल्बर्ग मानव मानलेल्या सर्व जीवाश्मांचा समावेश या बोडो मानवात करावा असेही त्यांनी सुचवले आहे. शिवाय ही जाती आधुनिक मानवांची थेट पूर्वज होती, असे मत व्यक्त केले आहे. अर्थातच अद्याप हे संशोधन सर्वमान्य झालेले नाही.

संदर्भ :

समीक्षक : मनीषा पोळ