एक शिवरूप. शिव ही संहारदेवता असली तरीही वेळप्रसंगी तो आपल्या भक्तांवर प्रसन्न होऊन त्यांच्यावरील संकटांचे निवारण करणारा म्हणून अनुग्रह अर्थात कृपा करणाऱ्या शिवाची अनेक रूपे प्रसिद्ध आहेत. त्यांसंबंधी अनेक कथा लोकमानसात प्रचलित आहेत. त्यांपैकी काही महत्त्वाच्या अनुग्रहमूर्ती म्हणजे अर्जुनानुग्रह, चंडेशानुग्रह, रावणानुग्रह, विष्णवनुग्रह, नंदेशानुग्रह, मार्कंडेयानुग्रह या होत. मात्र अनुग्रहमूर्ती या संहारमूर्तींइतक्या प्रसिद्ध नाहीत.

किरातार्जुन (राजा रविवर्माकृत एक चित्र).

 

अर्जुनानुग्रह किंवा किरातार्जुनमूर्ती : अर्जुनाने शिवाकडून पाशुपतास्त्र कसे प्राप्त केले याची कथा ‘महाभारता’तील वनपर्वात येते. इंद्राच्या सल्ल्यानुसार अर्जुन पाशुपतास्त्रासाठी हिमालयात कठोर तप करत होता. त्याची परीक्षा पाहण्यासाठी शंकराने शिकाऱ्याचे म्हणजे किराताचे रूप घेतले. वनात रानडुकराच्या रूपात एक राक्षस अर्जुनावर हल्ला करण्यासाठी आला. अर्जुन आणि किरात या दोघांनी एकाच वेळी त्याच्यावर नेम धरला आणि त्याला मारले. मात्र त्याचे श्रेय घेण्यावरून दोघांत भांडण लागले. त्यानंतर झालेल्या द्वंद्वयुद्धात अर्जुन पराभूत झाला; पण शेवटी त्याने किराताचे खरे रूप ओळखले आणि त्याचे पाय धरले. शिवालाही अर्जुनाच्या शौर्याची आणि तो संहारक अस्त्र धारण करण्यास सक्षम आहे याची कल्पना आली. मग शिवशंकराने आपला कृपाप्रसाद म्हणून अर्जुनाला आपले पाशुपतास्त्र दिले. ही कथा भारवीच्या ‘किरातार्जुनीय’ व अनंतभट्टाच्या ‘भारतचंपू’ या ग्रंथांतही येते. मूर्तिकला व चित्रकलेत हा विषय लोकप्रिय आहे, मात्र या प्रकारच्या प्रतिमेचे वर्णन केवळ ‘श्रीतत्त्वनिधी’ या एकाच ग्रंथात सापडते. त्यातील वर्णनानुसार शिव हा चतुर्भुज, त्रिनेत्र व लाल रंगाचा असावा, त्याने जटामुकुट, यज्ञोपवीत व इतर आभूषणे ल्यालेली असावीत. तो समभंग स्थितीत उभा असून वरच्या दोन हातांत परशू व मृग, तर खालच्या हातात धनुष्यबाण असावेत. त्याच्या डाव्या बाजूस पार्वती आणि जवळच अर्जुन दाखवावेत; पैकी आभूषणे ल्यालेला अर्जुन हा हात जोडून उभा असावा, असे सांगितले आहे.

किरातार्जुनमूर्ती या इ. स. सहाव्या शतकापासून पाहायला मिळतात. त्यांपैकी बहुतेक प्रतिमा दक्षिणेकडील मंदिरांमध्ये आढळतात. बदामी चालुक्यकालीन पापनाथ मल्लिकार्जुन आणि विरुपाक्ष मंदिरातील प्रतिमा ही सर्वांत प्राचीन समजली जाते. वेरूळच्या कैलास लेण्यात मुख्य मंदिराकडे जाणाऱ्या पायऱ्यांच्या उत्तरेकडील भिंतीवर ‘महाभारता’तील अनेक प्रसंग चित्रित केले आहेत. त्यांत वरच्या पट्टिकेत एक किरातार्जुनाचे शिल्प आहे. कथेतील सर्व घटनाक्रम येथे पाहायला मिळतो. प्रथम तपश्चर्या करणारा अर्जुन दिसतो. एका पायावर उभा राहून त्याने आपले हात आकाशाच्या दिशेने उंचावले आहेत. त्यापुढे शिकारीचे दृश्य आहे; एका बाजूस अर्जुन तर दुसरीकडे किरात दिसतो. त्यापुढे प्रत्यक्ष शिकार, मग त्या दोघांचे द्वंद्व. पुढील दृश्यात शिवाची ओळख पटल्यावर अर्जुन साष्टांग नमस्कार करताना दिसतो आणि शिव त्याला पाशुपतास्त्र बहाल करतात. येथे शिव चतुर्भुज असून त्यांनी त्रिशूळ, धनुष्यबाण धारण केले आहेत.

श्रीशैल्य येथे एका शिल्पपटात शिव अर्जुनाला बाणाच्या रूपात पाशुपतास्त्र देत आहेत, असे दृश्य कोरले आहे. चतुर्भुज शिवाच्या वरच्या हातात परशू व त्रिशूळ आहेत, तर खालचा डावा हात कमरेवर आहे. उजव्या हाताने ते अर्जुनाला बाण देत आहेत. समोर उभ्या अर्जुनाने उजवा हात अस्त्र घेण्यासाठी पुढे केला आहे, त्याच्या डाव्या हातात धनुष्य आहे. पार्वती शिवाच्या उजव्या बाजूस उभी असून तिच्या हातात कमळ आहे.

चंडेशानुग्रह, बृहदीश्वर मंदिर, गंगैकोंड चोलपुरम् (तमिळनाडू).

चंडेशानुग्रह : चंडेशानुग्रह प्रकारच्या प्रतिमा दक्षिण भारतात आढळून येतात. याबाबतची कथा अशी की, तमिळनाडूमध्ये मन्नी नदीकाठी सेयनालुर या गावात विचारशर्मा हा शिवभक्त राहत असे. तो गायी चरायला नेई आणि तिथेच वाळूचे शिवलिंग तयार करून त्याची पूजा करत असे. त्याने या गायी काही दुष्ट प्रवृत्तीच्या गुराख्यांच्या तावडीतून सोडवल्या होत्या. त्या स्वस्थचित्ताने भरभरून दूध देऊ लागल्या; जास्त झालेल्या या दुधाचा अभिषेक विचारशर्मा आपल्या वाळूच्या शिवलिंगावर करू लागला. हे सर्व पाहणाऱ्या त्या दुष्ट गुराख्यांनी त्याच्या वडिलांकडे तक्रार केली. त्यांनी जाऊन पाहिले तर विचारशर्मा खरोखर दूध वाळूवर ओतत होता; मात्र ते जास्तीचे होते हे त्यांना कळले नाही. त्यांनी संतापून त्या शिवलिंगाला लाथ मारली. शिवलिंग मोडलेले पाहताच क्रोधित झालेल्या विचारशर्माने लाथ मारणारा कोण आहे हे न पाहताच परशूच्या घावाने आपल्या वडिलांचेच पाय तोडून टाकले. त्याच्या या अनन्यसाधारण भक्तीने प्रसन्न होऊन शिव प्रकट झाले आणि आपल्या गळ्यातील फुलांचा हार त्याच्या डोक्याला गुंडाळून त्याच्यावर कृपा केली. त्याला आपल्या गणांचा प्रमुख केले आणि ‘चंडेश’ हे नामाभिधान दिले.

इ. स. आठवे शतक ते अकरावे शतक या काळातील चंडेशानुग्रहमूर्ती कांची, मदुराई, कांचीपुरम, गंगैकोंड चोलपुरम् येथे आढळतात. ‘अंशुमद्भेदा’तील वर्णनाप्रमाणे शिव हा वरदमुद्रेत असावा, त्याचा चेहरा डावीकडे वळलेला असून त्याचा उजवा हात थोड्या खालच्या पीठावर पद्मासनात बसलेल्या किंवा उभ्या चंडेशाच्या डोक्यावर ठेवलेला असावा. चंडेश अंजलीमुद्रेत असावा. शिवाशेजारी पार्वती असावी व ते चंद्रशेखर मूर्तीप्रमाणे बसलेले असावेत. चंडेशाची उंची शिवाच्या गुडघा, मांडी, छाती, मान किंवा चेहऱ्याइतकीच असली पाहिजे. अशा प्रकारातील मूर्तींपैकी सातव्या शतकातील चंडेशानुग्रहाची प्राचीन मूर्ती कांचीपुरम येथे कैलासनाथ मंदिरावर पाहायला मिळते. ही मूर्ती काहीशी झिजलेली असून चतुर्भुज शिवाच्या हातातील आयुधे नीट दिसत नाहीत. त्याचा एक उजवा हात वरदमुद्रेत आहे, उजवा पाय जमिनीवर असून डावा पाय आसनावर दुमडून घेतला आहे. त्याच्या उजव्या बाजूस खांद्यावर परशू घेतलेला चंडेश आहे. त्याचे वडील यज्ञदत्तही जमिनीवर पडलेले दिसतात.

इ. स. ११ व्या शतकातील एक मूर्ती गंगैकोंडचोलपुरम् येथील बृहदीश्वर मंदिरात आहे. यात शिवपार्वती वामललितासनात बसलेले आहेत. चंडेश शिवासमोर खाली अंजलीमुद्रेत बसलेला असून त्याने आपले मस्तक आदराने पुढे झुकवले आहे. शिवाच्या मागच्या दोन्ही हातात परशू आणि मृग आहेत, तर पुढचा डावा हात चंडेशाच्या डोक्यावर ठेवला असून उजव्या हाताने तो त्याच्या डोक्याला फुलांचा हार गुंडाळतो आहे, असे दिसते.

विष्णवानुग्रह, मीनाक्षी सुंदरेश्वर स्वामी मंदिर, मदुराई (तमिळनाडू).

विष्णवानुग्रह किंवा चक्रदानमूर्ती : विष्णूंना शंकराकडून सुदर्शन चक्र कसे मिळाले याची कथा ‘महाभारता’त आहे. एकदा असुरांशी लढणे विष्णूंना कठीण जाऊ लागले, तेव्हा त्यांनी आपली शक्ती वाढवण्यासाठी शिवाची आराधना केली. सुदर्शनचक्र मिळवण्यासाठी ते अधिकाधिक कठोर तप करू लागले. त्यांनी एक सहस्त्र कमळे शिवाला अर्पण करण्याचे ठरवले होते. एक दिवस पूजा करताना त्यांच्या लक्षात आले की, कमळाचे एक फूल कमी आहे. वास्तविक, विष्णूची परीक्षा पाहण्यासाठी शिवानेच ते लपवून ठेवले होते. त्या कमळपुष्पाची भरपाई करण्यासाठी विष्णूंनी स्वतःचा एक डोळा काढून तो शिवाला अर्पण केला (विष्णूचे डोळे हे कमळासारखे-कमलनयन-आहेत असे मानले जाते). या निस्सीम भक्तीमुळे शंकर प्रसन्न झाले आणि त्यांनी विष्णूंना सुदर्शनचक्र दिले. ‘शिवपुराण’ व ‘स्कंदपुराण’ या कथेला अप्रत्यक्ष पुष्टी देतात.

या प्रकारच्या प्रतिमा केवळ दक्षिण भारतात आढळतात. त्यांचे वर्णन ‘उत्तरकारणागम’, ‘उत्तरकामिकागम’ व ‘श्रीतत्त्वनिधी’ या ग्रंथांत येते. ‘उत्तरकारणागमा’नुसार शिव हा त्रिनेत्र आणि चतुर्भुज असावा. त्याने दोन्ही उजव्या हातात चक्र, टंक आणि वरच्या डाव्या हातात मृग धारण केलेले असावे. खालचा डावा हात वरदमुद्रेत असावा. तो सव्यललितासनात बसलेला असावा; त्याच्या डावीकडे पार्वती बसलेली असावी, तर उजवीकडे ब्रह्मदेव उभा असावा. विष्णू अंजलीमुद्रेत कमळपुष्प व स्वत:चा डोळा अर्पण करून पूजा करत असावा. ‘उत्तरकामिकागमा’तील वर्णनाप्रमाणे विष्णू हा अंजलीमुद्रेत उभा असून त्याने एका हातात चक्र धारण केलेले असावे, इतर दोन हातांत कमळ व शंख असावेत. ‘श्रीतत्त्वनिधी’त असे वर्णन आहे की, शिवाने टंक, मृग व परशू धारण केले असून त्याचा एक हात वरदमुद्रेत आहे. तो जटामुकुटधारी व त्रिनेत्र असावा. विष्णू वर्णाने काळा असावा आणि अंजलीमुद्रेत शिवासमोर उभा असावा. या वर्णनाचे इ. स. आठव्या शतकातील एक शिल्प कांचीपुरमच्या कैलासनाथ मंदिरात आहे. येथे शिवपार्वती उच्चासनावर बसलेले आहेत. चतुर्भुज शिवाने आपले मागचे दोन्ही हात आश्चर्याने वर उचलले आहेत. खालचा डावा हात सिंहकर्ण मुद्रेत असून उजवा हात पार्श्वभागावर ठेवला आहे. त्याच्या आसनासमोर खाली गुडघ्यावर चतुर्भुज विष्णू बसला आहे. पुढच्या डाव्या हाताने तो आपला डोळा काढतो आहे, तर मागच्या डाव्या हातात कमलपुष्प आहे. उजव्या हातांपैकी पुढचा हात कटकमुद्रेत आहे, पण मागचा दिसत नाही.

तमिळनाडूमधील मदुराई येथील मीनाक्षी सुंदरेश्वरस्वामी मंदिरात १६ व्या शतकातील एक विष्णवानुग्रह शिल्प आहे. येथे शिव सव्यललितासनात तर पार्वती वामललितासनात बसलेले आहेत. शिवाच्या मागच्या हातात परशू आणि मृग तर पुढचा डावा हात वरदमुद्रेत असून उजव्या हाताने तो विष्णूला चक्र देत आहे. विष्णू शिवाच्या खालच्या बाजूस असून तो आपल्या दोन्ही हातांनी ते सुदर्शनचक्र घेत आहे.

रावणानुग्रह, होयसळेश्वर मंदिर, हळेबीडू (कर्नाटक).

रावणानुग्रह : अनुग्रहमूर्तींपैकी सर्वाधिक प्रसिद्ध असणारे हे शिल्प. इ. स. सहाव्या शतकापासून ते चौदाव्या शतकापर्यंतची अशी शिल्पे उत्तर व दक्षिण भारतात सर्वत्र पाहावयास मिळतात. यासंबंधीची कथा ‘ब्रह्मपुराणा’त सापडते. रावणाने आपला भाऊ कुबेर याचा पराभव केला आणि त्याचे पुष्पक विमान हस्तगत केले. त्यातून तो लंकेस परतत असताना कैलास पर्वताजवळ शर्वण येथे आला. तेथे एक विचित्र गोष्ट घडली ती म्हणजे रावणाचे विमान तेथून पुढे जात नव्हते. नंदिकेश्वर नावाचा एक शिवभक्त तेथे आला आणि त्याने सांगितले की, कैलास पर्वतावर शिव आपली पत्नी उमा हिच्यासह क्रीडा करत आहे, त्यामुळे या परिसरातून कोणालाही जाण्यास मनाई आहे. कुबेरावरील विजयाने रावण मत्त झाला होता; त्याने आपले दहाही हात वापरून कैलासच मुळापासून हलवून बाजूला ठेवण्याचा प्रयत्न चालविला. कैलासाला धक्के बसू लागले आणि उमेसह सर्व शिवगण भयभीत झाले. भगवान शंकरांनी रावणाची आगळीक ओळखून आपल्या पायाच्या अंगठ्यानेच पर्वत खाली दाबला आणि रावणाचे हात त्याखाली अडकले. आता मात्र रावणाचा अहंकार गळाला आणि त्याने शंकरांची प्रार्थना करायला सुरुवात केली. शेवटी शंकरांनी त्याला मुक्त करून लंकेस जायची परवानगी दिली.

रावणानुग्रह मूर्ती सर्वत्र प्रसिद्ध असल्या तरी त्यांची ग्रांथिक वर्णने उपलब्ध नाहीत. रावणाच्या हातांची संख्या व त्यातील आयुधे यांत वैविध्य दिसते. दोन व चार हातांच्या रावणाच्या प्रतिमा राणी महाल, झाशी (उत्तर प्रदेश) येथे, तर सहा हातांच्या रावणाची प्रतिमा लखनौ येथील संग्रहालयात आहे. क्वचित गर्दभमुखी रावणही पाहावयास मिळतो. मथुरा संग्रहालयातील गुप्तकालीन शिल्पपट्टावर कोरलेली रावणानुग्रह प्रतिमा ही सर्वांत प्राचीन समजली जाते. महाराष्ट्रातील घारापुरी येथील राष्ट्रकूटकालीन रावणानुग्रह शिल्प भग्न असले तरी त्याची भव्यता व बारकावे नजर खिळवून ठेवणारे आहेत. या शिल्पपटाचे दोन भाग असून खालच्या भागात कैलास हलवू पाहणारा रावण दिसतो; त्याच्या हातांपैकी फक्त उजवीकडचे सहा-सात हात वगळता इतर भग्न झाले आहेत. डावीकडे शिवगण आहेत. वरच्या भागात मध्यभागी शिवपार्वती आणि त्यांच्या आजूबाजूला देवदेवता, यक्षकिन्नर इ. दिसतात. शिवपार्वती संपूर्ण उठावात कोरल्यामुळे जिवंत वाटतात.

वेरूळच्या कैलास लेण्यात पाच तोंडे आणि वीस हातांचा रावण वीरासनात शिल्पांकित केला आहे. त्याचे सर्वांत वरचे दोन हात कैलास पर्वत उचलत आहेत. वर शिवपार्वती त्यांच्या गणांसह दिसतात. दोन्ही कोपऱ्यांत अनेक ऋषीमुनी रावणाचे गर्वहरण पाहण्यास एकत्र आले आहेत. शिवाचा शांत भाव आणि उन्मत्त रावणाची हिंसक मुद्रा यांतील फरक येथे प्रकर्षाने जाणवतो. कर्नाटकमधील बेलूर येथील चन्नकेशव मंदिरावरील शिल्प १२ व्या शतकातील आहे. त्यात मध्यभागी एका चौकोनी मंडपात शिवपार्वती असून पर्वताखाली गुडघ्यांवर बसलेला आणि पर्वत हलवण्याचा प्रयत्न करणारा रावण आहे. त्याच्या हातात तलवारही आहे. या शिल्पात अनेक देवदेवता, विविध पशुपक्षी, इतर बारीकसारीक तपशील विलक्षण कौशल्याने दाखवले आहेत.

मानवस्वरूप नंदी (सपत्नीक), संस्कृत विश्वविद्यालय संग्रह.

नंदेशानुग्रह/अधिकारनंदिन् : ‘शिवमहापुराणा’तील कथेनुसार नंदी हा सालंकायण ऋषींचा पुत्र होय. बरीच वर्षे पुत्रप्राप्ती होत नसल्यामुळे त्यांनी सालग्राम या ठिकाणी साल वृक्षाखाली तप केले. त्यामुळे विष्णू प्रसन्न झाले आणि त्यांनी सालंकायण ऋषींना वर मागण्यास सांगितले. ऋषींनी आपल्याला सद्गुणी पुत्र मिळावा अशी विनंती केली. त्याबरोबर विष्णूच्या उजव्या कुशीतून एक पुरुष बाहेर आला, तो हुबेहूब शिवासारखा दिसत होता. त्याचे नाव नंदिकेश्वर असे ठेवण्यात आले. ‘लिंगपुराणा’त दिलेल्या कथेनुसार सिलाद नावाचे नेत्रहीन ऋषी होते. त्यांना मानवापासून न झालेला पण अमर्त्य असा पुत्र हवा होता. तेव्हा इंद्राने त्यांना शिवशंकरांची तपश्चर्या करण्याचा सल्ला दिला. त्याप्रमाणे त्यांनी शिवाची कठोर तपश्चर्या केली. शिवाने प्रसन्न होऊन त्यांना तसा वर दिला. एकदा सिलाद यज्ञ करत असताना त्यातून अगदी शिवासारखा दिसणारा एक मुलगा बाहेर आला. त्यालाही शिवासारखेच चार हात, त्रिनेत्र व जटामुकुट होते. त्याने आपल्या हातात शूल, टंक, गदा आणि वज्र धारण केले होते. शंकरांनी त्याचे नाव ‘नंदी’ असे ठेवले.

नंदीचे उपनयन झाले व लवकरच त्याने वेदाध्ययनात प्रावीण्य मिळवले. मात्र काही काळाने मित्र व वरुण या दोन ऋषींनी सांगितले की तो अल्पायुषी आहे. तेव्हा नंदीने घोर तप करण्यास सुरुवात केली. शेवटी शिव प्रसन्न झाले, त्यांनी त्याला आलिंगन दिले व आपल्या गळ्यातील हार त्याच्या गळ्यात घालून नंदीला वृद्धत्व आणि मृत्यू यांतून मुक्त केले; त्याची नेमणूक आपल्या गणांच्या प्रमुखपदी केली आणि मरुताची कन्या सुयशा हिच्याशी त्याचा विवाह लावून दिला.

‘रामायणा’त नंदीकेश्वर हा शिवाचा एक अवतार म्हणून येतो. कैलासाकडे जाणाऱ्या रावणाला त्याने अडवले. रावणाने त्याला उद्देशून अवमानकारक शब्द वापरले तेव्हा नंदीने त्याला शाप दिला की तुझ्या वंशाचा नाश हा माकडांच्या हातून होईल. ‘भागवतपुराणा’त असे वर्णन आहे की, यज्ञप्रसंगी दक्ष-प्रजापतीने  शिवाबद्दल जे अपशब्द उच्चारले ते असह्य झाल्याने नंदीने त्याची चांगलीच कानउघाडणी केली. ‘विष्णुधर्मोत्तर पुराणा’तील वर्णनानुसार नंदीला तीन डोळे, चार हात असावेत व तो लाल रंगाचा असावा. त्याने व्याघ्राजिन (वाघाचे कातडे) परिधान केलेले असावे. त्याच्या हातात त्रिशूळ असून लोकांची व्यवस्था करण्याकडे त्याचे लक्ष असावे. नंदीकेश्वर बऱ्याच वेळा वृषभरूपात किंवा शिवाचे प्रतिरूप असा चित्रित केलेला असतो. प्रत्येक शिवमंदिरात गाभाऱ्याकडे तोंड करून वृषभरूपी नंदी बसलेला दिसतो.

इ. स. ११ व्या शतकातील चोळ शैलीत घडवलेली नंदीची पंचधातूची एक सुंदर प्रतिमा वेलुवर (तमिळनाडू) येथे आहे. तो त्रिभंग अवस्थेत उभा असून त्याच्या जटामुकुटात गंगा व चंद्रकोर आहेत. त्याच्या मागच्या दोन्ही हातांत परशू व मृग असून पुढचे दोन्ही हात नमस्कारमुद्रेत आहेत. पत्नी सुयशासह ते पद्मपीठावर उभे आहेत.

मार्कंडेयानुग्रह, वेरूळ (महाराष्ट्र)

मार्कंडेयानुग्रह : आपल्या निस्सीम भक्ताची यमाच्या तावडीतून सुटका करणाऱ्या शिवाचे दर्शन मार्कंडेयानुग्रह प्रतिमेतून घडते. मार्कंड ऋषींना शिवाच्या कृपेने एक मनासारखा मुलगा झाला. तो कुशाग्र बुद्धीचा व सर्वज्ञानी होता, पण तो केवळ १६ वर्षेच जगेल हे विधिलिखित होते. हा मार्कंडेय मोठा शिवभक्त होता. त्याला आपल्या मृत्यूबद्दल समजले तेव्हा तो तीर्थयात्रेला निघाला. प्रवास करत तो तमिळनाडूमध्ये तिरुक्कदवूर या ठिकाणी आला, तेथे तो शिव-आराधनेत अगदी तल्लीन होऊन गेला. योगायोगाने त्याच दिवशी मार्कंडेयाच्या वयाची १६ वर्षे पूर्ण होत होती. त्याप्रमाणे यम त्याचे प्राण नेण्यास आले. यमाचा पाश मार्कंडेयाभोवती पडला तेव्हा त्याने शिवलिंगाला घट्ट आलिंगन दिले होते. अशा वेळी आपल्या भक्ताचे प्राण वाचविण्यासाठी शिव स्वतः लिंगातून बाहेर आले व त्यांनी संतापाने यमाच्या छातीवर लाथ मारली. तेव्हा यमाने क्षमायाचना करून माघार घेतली व मार्कंडेयाचे प्राण वाचले. त्याचवेळी त्याचे वय १६ वर्षांपुढे कधीच वाढणार नाही अशी योजना केली आणि मार्कंडेय चिरंजीव झाला.

मार्कंडेयानुग्रह कथा शिल्पकार तसेच चित्रकारांच्या आवडीचा विषय आहे. ‘अंशुमद्भेदागम’, ‘कामिकागम’, ‘कारणागम’ अशा आगमांमध्ये याचे वर्णन आढळते. ‘अंशुमद्भेदागमा’त सांगितल्याप्रमाणे शिव त्रिनेत्र, चतुर्भुज किंवा अष्टभुज असावा. चतुर्भुज असल्यास एका उजव्या हातात परशू व दुसऱ्या उजव्या हातात शूल असावा. हा शूलधारी हात कानापर्यंत वर उचललेला असावा. खालचा डावा हात सूची मुद्रेत असून वरचा हात विस्मयमुद्रेत असावा. शिव अष्टभुज असल्यास उजव्या हातात शूल, परशू, वज्र व खड्ग असावेत आणि दोन्ही डाव्या हातांत खेटक व पाश असावेत. उरलेले दोन्ही हात सूची व विस्मयमुद्रेत असावेत. त्याने आपला एक पाय पद्मपीठावर ठेवलेला असून दुसरा पाय यमाला लाथ मारण्यासाठी त्याच्या छातीपर्यंत आणलेला असावा. यम हा करंडमुकुटधारी आणि दोन्ही बाजूस सुळे असलेला असा दाखवला जातो. त्याच्या हातात पाश असतो, पण तो भयभीत व क्षमायाचना करणारा असतो.

‘कामिकागम’ या ग्रंथात असे वर्णन आहे की, शिव उजव्या पायाने यमाला लाथ मारत आहे, तेव्हा त्याचा डावा पाय जमिनीवर ठेवलेला असतो. उजव्या हातात शूल व परशू असतात, डाव्या हातात नागपाश असतो, शुलाचे टोक खाली यमाच्या मानेत घुसत असते आणि यम खाली पडलेला असतो. या कथेवर आधारित सर्वांत प्राचीन मूर्ती ही इ. स. आठव्या शतकातील असून ती पट्टदकल येथील विरुपाक्ष मंदिराच्या महामंडपावर आहे. येथे मार्कंडेय भयभीत झालेला दिसतो. शिवलिंगाच्या पद्मपीठावर शिव उभा आहे. त्याच्या वरचा उजव्या हातात त्रिशूळ असून खालचा हात कमरेवर आहे. यम दोन्ही हात शिवापुढे पसरून क्षमायाचना करताना दिसतो.

वेरूळच्या दशावतार लेण्यातील मार्कंडेयानुग्रहाची मूर्ती अतिशय तपशीलवार आणि भव्य आहे. येथे शिव लिंगातून बाहेर प्रकट होत असलेला दिसतो. त्याचा उजवा पाय अजून आतच आहे, तर डाव्या पायाने तो यमाला लाथ मारत आहे. त्याने आपला त्रिशूळ वरच्या उजव्या आणि खालच्या डाव्या हातात मिळून धरला आहे आणि तो यमाच्या पोटात खुपसला आहे. खालचा उजवा हात कट्यावलंबित आहे आणि वरचा डावा हात विस्मयमुद्रेत. पिंडीजवळ गुडघ्यावर बसलेला मार्कंडेय दिसतो; त्याच्या गळ्यात यमाने टाकलेला पाश आहे. कैलास लेण्याच्या उत्तरेकडील मार्गिकेवरही अशीच एक प्रतिमा आहे, मात्र तपशिलात फरक आढळतो. येथे मार्कंडेय शिवलिंगाला मिठी मारून बसला आहे.

तमिळनाडूतील पट्टीश्वरम येथे दहाव्या किंवा अकराव्या शतकातील एक काहीशी वेगळी मूर्ती आहे. येथे यम पाठीवर पडलेला असून शिव त्याच्या छातीवर उभा आहे. तो आपल्या उजव्या पायाने यमाला चिरडत आहे आणि डावा पाय त्याच्या शरीरावर रोवून ठेवला आहे. शिव चतुर्भुज असून त्याने परशू, मृग, त्रिशूळ व कपाल धारण केले आहेत. अकराव्या शतकाच्या उत्तरार्धातील एक प्रतिमा महाराष्ट्रातील अंबरनाथच्या शिवमंदिरावरही आहे.

संदर्भ:

  • Rao, T. A. G., ‘Elements of Hindu Iconography’, Vol. II, Part I, Motilal Banarsidass Publishers Pvt. Ltd., Delhi, 1914; 1997.
  • Rao, T. A. G., ‘Elements of Hindu Iconography’, Vol. II, Part II, Motilal Banarsidass Publishers Pvt. Ltd., Delhi, 1914; 1997.
  • खरे, ग. ह., ‘मूर्तिविज्ञान’, भारत इतिहास संशोधन मंडळ, पुणे,  १९३९; २०१२.
  • जोशी, नी. पु., ‘भारतीय मूर्तिशास्त्र’, प्रसाद प्रकाशन, पुणे, १९७९; २०१३.
  • देगलूरकर, गो. बं., ‘घारापुरी दर्शन (जोगेश्वरी व मंडपेश्वर लेणींसह), स्नेहल प्रकाशन. पुणे, २०१३.
  • देगलूरकर, गो. बं., ‘शिवमूर्तये नमः’, स्नेहल प्रकाशन. पुणे, २०१४.

छायाचित्र संदर्भ :

  • मार्कंडेयानुग्रह, वेरूळ (महाराष्ट्र)  : Burgess, James., ‘Report on the Elura Cave Temples and The Brahmanical and Jain Caves in Western India’, Trubner & Co., London, 1883.
  • किरातार्जुन (राजा रविवर्माकृत चित्र) : https://en.wikipedia.org/wiki/Kirātārjunīya
  • चंडेशानुग्रह, बृहदीश्वर मंदिर, गंगैकोंड चोलपुरम् (तमिळनाडू) :  https://commons.wikimedia.org/wiki/File:Chandeshanugraha.jpeg
  • विष्णवानुग्रह, मीनाक्षी सुंदरेश्वर स्वामी मंदिर, मदुराई (तमिळनाडू) : Rao, T. A. G., ‘Elements of Hindu Iconography’, Vol. II, Part I, Motilal Banarsidass Publishers Pvt. Ltd., Delhi, 1914; 1997.
  • रावणानुग्रह, होयसळेश्वर मंदिर, हळेबीडू (कर्नाटक) : तनश्री रेडीज.
  • मानवस्वरूप नंदी (सपत्नीक), संस्कृत विश्वविद्यालय संग्रह :  जोशी, नी. पु., ‘भारतीय मूर्तिशास्त्र’, प्रसाद प्रकाशन, पुणे, १९७९; २०१३.

समीक्षक : श्रीकांत गणवीर