एक शिवरूप. संहारमूर्ती जसे शिवाचे उग्र रूप दर्शवितात, तसेच दक्षिणामूर्ती हे त्याचे शांत रूप म्हणून ओळखले जाते. दक्षिणा म्हणजे बुद्धी. ही दक्षिणा ज्याचे नेत्र व मुख आहे, ती दक्षिणामूर्ती होय. शिव हा योग, ज्ञान, विविध शास्त्रे, कला या सर्वांचा सर्वोच्च अधिकारी मानला जातो. त्यांसंबंधी अनेक कथा लोकमानसात प्रचलित आहेत. जगाला विद्यांची दिक्षा देत असताना शंकर दक्षिणेकडे तोंड करून बसला आणि त्याचे हे रूप दक्षिणामूर्ती म्हणून प्रसिद्ध झाले असे मानले जाते. अनेक शास्त्रीय व लौकिक ग्रंथांतील ज्ञानाचा उगम हा शिवपार्वतीच्या संवादातून झाला अशीही समजूत आहे. गुप्तकाळ व त्यानंतर दक्षिणामूर्ती अधिक प्रचलित झालेल्या दिसतात. मध्ययुगीन कालखंडात विशेषत: दक्षिण भारतात शिवाचे हे रूप अधिक लोकप्रिय झाले. आद्यशंकराचार्यांनी दोन दक्षिणामूर्तीस्तोत्रे रचली आहेत. भारतीय पुरातत्त्वज्ञ टी. ए. गोपीनाथ राव (१९१९-१८७२) यांनी शिवाच्या दक्षिणामूर्तींची योग, ज्ञान, वीणा व व्याख्यान अशी चार वर्गांत विभागणी केली आहे; तर पुरातत्त्वज्ञ जे. एन. बॅनर्जी यांच्या मते शिव ही सर्वच नृत्यप्रकार व नर्तकांचे आराध्य दैवत असल्यामुळे शिवाच्या नृत्यप्रतिमेचाही अंतर्भाव यात केला पाहिजे.

योगदक्षिणामूर्ती, कांचीपुरम (तमिळनाडू).

योगदक्षिणामूर्ती : योगगुरू म्हणून शिवाचे अंकन हे साधारणत: तीन प्रकारे केले जाते : पहिल्या प्रकारात शिव वज्रपर्यंकासन/वज्रपद्मासन/स्वस्तिकासन/समाधीआसन/ध्यानासनात बसलेला आहे. तो चतुर्भुज असून पुढचा उजवा हात योगमुद्रेत आहे, तर डावा हात गुडघ्यावरून पुढे आणलेला आहे. मागच्या उजव्या हातात अक्षमाला तर डाव्या हातात कमळ आहे. सभोवती ऋषी व भक्तगण आहेत. दुसऱ्या प्रकारात शिवाने डावा पाय उत्कटिकासनात दुमडून घेतलेला असून उजवा पाय खाली सोडलेला असतो. हा दुमडलेला डावा पाय त्याच्या शरीराभोवती योगपट्टासारखा दिसतो. पुढील डावा हात गुडघ्यावर ठेवलेला असतो; तर तिसऱ्या प्रकारात शिव उत्कटिकासनात बसलेला असून त्याचे दोन्ही पाय योगपट्टाप्रमाणे शरीराभोवती वेढलेले असतात. खालचे दोन्ही हात गुडघ्यांवर विसावलेले असतात, वरच्या उजव्या हातात अक्षमाला व डाव्या हातात कमंडलू असतो.

योगदक्षिणामूर्ती प्रकारातील सर्वांत प्राचीन प्रतिमा कांचीपुरम (तमिळनाडू) येथील कैलासनाथ मंदिरात आहे. हा शिव एका वटवृक्षाखालील पीठावर अर्धउत्कटिकासनात बसलेला असून उजवा पाय खाली सोडला आहे, त्याचे शरीर आणि डावा दुमडलेला पाय योगपट्टाने बांधलेला आहे. मागील हातांमध्ये अक्षमाला आणि कमळ/अग्नी असून पुढचा उजवा हात योगमुद्रेत व डावा हात अभयमुद्रेत आहेत. शिवाच्या उजव्या कोपराखाली फणा उभारलेला एक नाग आहे तर पायाशी, पीठाखाली दोन हरणे बसली आहेत. डोक्याच्या दोन्ही बाजूंस भुतांची एकेक जोडी दिसते. सारेजण तल्लीन होऊन शिवाचे कथन ऐकत असावेत, अशा प्रकारे साजिवंत करण्यात शिल्पकार यशस्वी झाला आहे. याच मंदिरात योगदक्षिणा प्रकारातील आणखी एक शिल्प आहे; मात्र येथे वरच्या उजव्या हातात शिवाने नाग धारण केलेला दिसतो.

राजस्थानातील अजमेर शासकीय वस्तुसंग्रहालयात एक उल्लेखनीय योगदक्षिणामूर्ती आहे. सुमारे ११ व्या शतकातील ही प्रतिमा चतुर्मुख, अष्टभुज अशी आहे. जटामुकुटधारी शिव पद्मपीठावर वज्रपद्मासनात बसलेला दिसतो. त्याखाली त्याचे वाहन नंदी आहे. मुंडमाळेसह अनेक अलंकार त्याने धारण केलेले आहेत. दुर्दैवाने सुरेख असा जटामुकुट व सर्वच हात भग्नावस्थेत आहेत.

व्याख्यान किंवा ज्ञानदक्षिणामूर्ती, अहिच्छत्र, (उत्तर प्रदेश).

व्याख्यानदक्षिणामूर्ती : शिव हा सर्व शास्त्रांचा अधिपती असल्यामुळे तो व्याख्यानमुद्रेत (अंगठा व तर्जनी एकमेकांना चिटकवून पंजा श्रोत्यांकडे) दाखविला जातो. त्याने मागच्या उजव्या हातात अक्षमाला तर डाव्या हातात सर्प धारण केलेले असतात. खालचा डावा हात वरदमुद्रेत असतो किंवा डाव्या गुडघ्यावर ताणून ठेवलेला असतो. कधीकधी हातात पोथीही असते. या प्रतिमेत शिव वटवृक्ष किंवा पिंपळाच्या झाडाखाली ताठ बसलेला दर्शवितात. उजवा पाय पीठावरून सरळ खाली सोडलेला असून तो अपस्मारपुरुष/मूयलक नावाच्या दैत्यावर ठेवलेला असतो. डावा पाय दुमडून उजव्या मांडीजवळ किंवा मांडीवर ठेवलेला आढळतो. त्याच्या डोक्यावर जटामुकुट किंवा जटाभार असून त्यावर फुले, सर्प, चंद्रकोर, गंगा असावेत. त्याने इतरही अलंकार, यज्ञोपवीत धारण केलेले असावेत. त्याचा वर्ण स्फटिकशुभ्र असून नजर नाकाच्या शेंड्यावर स्थिर असावी. ‘शिल्परत्न’ या ग्रंथानुसार देवाची ही प्रवचनमुद्रा अत्यंत पवित्र अशी असून त्याचे विचार ऐकण्यासाठी तिथे श्रोते उपस्थित असणे आवश्यक आहे. यात ऋषिमुनी, देव, यक्षकिन्नर यांचा समावेश असावा.

भारतीय पुरातत्त्वज्ञ नी. पु. जोशी (१९२२-२०१६) यांनी असे मत मांडले आहे की, दक्षिणामूर्ती या मूर्तीप्रकारातील अनेक वैशिष्ट्ये उदा. व्याख्यानमुद्रा, वृक्षाखाली आसन, भोवताली चार शिष्य असणे, पायाजवळ दोन हरणे या गोष्टी त्यावरील बौद्ध प्रभाव दर्शवितात. दक्षिणामूर्तीचे लकुलीश या प्रतिमेशी साम्य आढळते. वाराणसी येथील तिलभांडेश्वर मंदिरात एका विशाल वृक्षाखाली व्याख्यानमुद्रेत बसलेली शिवप्रतिमा आहे. त्यात शिव ऊर्ध्वलिंगी असून त्याने मांडीभोवती योगपट्ट गुंडाळला आहे. त्याच्या सभोवताली चार शिष्य बसले आहेत. नी. पु. जोशी यांच्या मते ते आचार्य लकुलिशाचे शिष्य कुशिक, गार्ग्य, मैत्रेय व करुष असावेत. साधारणत: मंदिरांतून  व्याख्यानदक्षिणामूर्तीच्या प्रतिमा अधिक आढळतात.

सिंहपूर (जि. शहडोल, मध्य प्रदेश) येथे एक व्याख्यानमूर्ती आहे. चतुर्भुज शिव सव्यललितासनात बसलेला आहे. मागच्या दोन हातांत त्रिशूळ व अक्षमाला असून पुढचा उजवा हात व्याख्यानमुद्रेत आहे व डाव्या हातात कमंडलू आहे. त्याची सर्व आभूषणे रुद्राक्षाची आहेत. पीठाखाली नंदी बसलेला आहे व शिवाकडे कान टवकारून पाहत आहे. इतरही दोन नंदी समोरासमोर अंजलीमुद्रेत बसले आहेत. शिवाशेजारी एक स्त्री उभी आहे. अव्यूर (जि. तंजावर, तमिळनाडू) येथील शिव मंदिरात चोळ काळाच्या पूर्वार्धातील एक सुरेख व्याख्यानमूर्ती आहे. चतुर्भुज शिवाचा पुढचा उजवा हात चिन्मुद्रेत असून डाव्या गुडघ्यावर ठेवलेल्या डाव्या हातात एक पोथी आहे. मागच्या उजव्या हातात सर्प तर डाव्या हातात अग्नी आहे. डावा पाय दुमडून उजव्या मांडीवर ठेवलेला असून उजवा पाय पीठावरून खाली लोंबकळत सोडलेला व अपस्मारपुरुषाच्या अंगावर ठेवलेला दिसतो. शिवाच्या जटा एका रेखीव ललाटपट्टाने एकत्र बांधल्या आहेत. त्याच्या डाव्या कानात पत्रकुंडल व उजव्या कानात नक्रकुंडल आहे. छातीवर यज्ञोपवित आणि रुद्राक्षांची माळ रुळत आहे.

ज्ञानदक्षिणामूर्ती : शिवाच्या दक्षिणामूर्तींचा प्रतिकात्मक अर्थ ‘दक्षिणामूर्ती उपनिषद’ व ‘सुतसंहिते’मध्ये सांगितला आहे. शिवाच्या हातातील पोथी/पुस्तक ही ज्ञानाचे, बुद्धीचे प्रतीक आहे. त्याच्या हातातील अक्षमाला ही तत्त्वांचे, शरीररचना ही ऊर्जेचे व पद्मासन हे ॐकाराचे प्रतीक आहे. माथ्यावरील वटवृक्ष हा ‘माया’ आहे, तर नंदी म्हणजे धर्म होय. अज्ञानरूपी अपस्मारपुरुष हा शेवटी शिवाच्या (ज्ञानाच्या) पायाखाली चिरडला जातो.

शिवाचे हे वर्णन व्याख्यान व ज्ञानदक्षिणामूर्ती या दोन्ही प्रकारांना लागू आहे. मात्र व्याख्यानदक्षिणामूर्ती प्रकारात त्याचा पुढचा उजवा हात व्याख्यानमुद्रेत असतो, तर ज्ञानदक्षिणामूर्ती या प्रतिमेचा हात समदर्शक किंवा ज्ञानमुद्रेत असतो. याव्यतिरिक्त या दोन्ही प्रतिमांची इतर सर्व लक्षणे सारखीच असतात. त्यामुळे पुरातत्त्वज्ञ गोपीनाथ राव  यांनी व्याख्यानदक्षिणामूर्ती या ज्ञानदक्षिणामूर्तींचेच एक उपांग आहेत असे प्रतिपादन केले आहे. फक्त ‘मत्स्यपुराण’ ज्ञानदक्षिणामूर्तीला चार किंवा आठ हात असावेत असे सांगते.

व्याख्यान किंवा ज्ञानदक्षिणामूर्ती प्रकारची सर्वात प्राचीन प्रतिमा ही बहुधा गुप्त काळातील असून ती अहिच्छत्र (जि. बरेली, उत्तर प्रदेश) येथे सापडली आहे. मृद्फलकावर कोरलेल्या चतुर्भुज शिवाच्या वरच्या उजव्या हातात अक्षमाला, वरच्या डाव्या हातात कमंडलू व पालवी असून खालचा डावा हात मांडीवर आहे. उजवा हात भंगलेला असल्यामुळे ही व्याख्यानदक्षिणामूर्ती आहे की ज्ञानदक्षिणामूर्ती हे नक्की सांगता येत नाही. येथे शिव अर्धपर्यंकासनात बसलेला असून त्याच्या डावीकडे नमस्कारमुद्रेत पार्वतीही चित्रित केली आहे. पार्वतीच्या वरच्या बाजूस आणखी एक व्यक्ती दिसते. तो बहुधा एखादा शिवगण, ऋषी किंवा भक्त असावा. तिरूवरूर (जि. तिरूवरूर, तमिळनाडू) येथील शिव मंदिरात एक उल्लेखनीय ज्ञानदक्षिणामूर्ती आहे. ती बहुधा चोळ राजा वीरराजेंद्रदेव याच्या कारकिर्दीच्या पाचव्या वर्षी (इ. स. १०६७-६८) स्थापन केलेली असावी. येथे शिव वज्रपद्मासनात/स्वस्तिकासनात बसलेला आहे. तो चतुर्भुज असून मागच्या डाव्या हातात कपाल, तर उजव्या हातात (आता भग्न झालेला) शूल आहे; पुढचा डावा हात अर्धचंद्र मुद्रेत असून उजवा हात ज्ञानमुद्रेत आहे (अंगठा व तर्जनी एकमेकांना जोडून छातीच्या दिशेने रोखणे). अनेकविध शास्त्रांचे ज्ञान देणारी ही मुद्रा आहे. शिव अनेक आभूषणे ल्यालेला दिसतो. त्याचा जटामुकुटही अलंकृत आहे.

वीणाधरमूर्ती, पुदुकोट्टई (तमिळनाडू).

वीणाधरदक्षिणामूर्ती : शिव हा गायन, संगीत व विविध वाद्यांचा स्वामी आहे. त्यामुळे वीणाधरदक्षिणामूर्ती या प्रातिनिधिक स्वरूपात त्याची पूजा केली जाते. इसवी सनाच्या आठव्या शतकापासून वीणाधरमूर्ती सापडतात. तमिळनाडूमध्ये मोठ्या प्रमाणावर वीणाधरमूर्ती आढळतात. साधारणत: त्याच्या दोन हातांत वीणा दाखवली जाते, पण कधीकधी इतरही वाद्ये त्याच्या हातात दिसतात. ‘अंशुमद्भेदागमा’तील वर्णनानुसार ही प्रतिमा चतुर्भुज असून अर्धउत्कटिकासनात (डाव्या पायाची मांडी घालून उजवा पाय खाली लोंबकळत सोडलेला) बसलेली असावी. खालच्या दोन हातांमध्ये वीणा धरलेली असावी. ‘कामिकागमा’नुसार शिवाचे पुढचे दोन्ही हात कटक/सर्पाकार मुद्रेत असावेत. यात डावा हात वर उचललेला असून उजवा हात वीणेला आधार देण्यासाठी खाली धरलेला असतो. इतर दोन हातांत परशु व मृग असावेत, त्याची दृष्टी आपल्या हातावर एकाग्र झालेली असावी; वीणावादन करणाऱ्या शिवाभोवती विविध पशुपक्षी, ऋषिमुनी, विद्याधर, यक्षकिन्नर इ. शिल्पांकित केलेले असावेत.

वीणाधरमूर्ती ही कधी स्वतंत्र तर कधी सप्तमातृकापट्टामध्ये शिल्पित केलेली असते. सप्तमातृकांसह असलेला शिव सहसा बसलेला असून वीणावादन करताना दिसतो. अशा प्रकारच्या प्रतिमा वेरूळ येथील लेणी क्रमांक १४, १६ व २१ मध्ये आहेत. मात्र सप्तमातृका उभ्या असतील तर शिवही उभा असल्याचे दिसते. ओडिशामध्ये पुरी येथे एक स्वतंत्र वीणाधरमूर्ती आहे. येथे चतुर्भुज शिव उच्चासनावर अर्धपर्यंकासनात बसलेला असून तो ऊर्ध्वलिंग आहे. त्याने पुढच्या दोन हातांत वीणा धारण केलेली असावी, मात्र आज ती भग्न झाली आहे. त्याच्या पायाशी नंदी शिवाकडे तन्मयतेने पाहताना दिसतो. तमिळनाडूमध्ये नर्तमलाई (जि. पुदुकोट्टई) येथे चोळ काळातील एक प्रतिमा सापडली असून सध्या ती पुडुकोट्टाई वस्तुसंग्रहालयात आहे. द्विभुज शिव अर्धपर्यंकासनात बसलेला असून त्याने छातीशी वीणा धरली आहे. उजवा हात वर असून त्याने वीणेचा भोपळा धरला आहे व डाव्या हाताने तिच्या खालच्या बाजूस आधार दिला आहे. तल्लीन होऊन वीणावादन करत असताना त्याचा जटाभार डोक्यावर व आजूबाजूला सर्वत्र पसरलेला दिसतो.

दक्षिणामूर्ती, नंजनगोडू, म्हैसूर, (कर्नाटक).

‘श्रीतत्त्वनिधी’ या ग्रंथात व्याख्यानदक्षिणामूर्ती या प्रकारात एक वेगळेच वर्णन दिले आहे. यात शिव चार हातांत पुस्तक, दक्षिणा, योग, वीणा या मुद्रा व वस्तू, पायास योगपट्ट व व्याख्यानपीठावर बसलेला असावा असे सांगितले आहे. कदाचित यात ज्ञान, व्याख्यान, योग व वीणाधर या सर्व दक्षिणामूर्तींचे एकीकरण अपेक्षित असावे. आश्चर्य म्हणजे नंजनगोडू (नंजनगुडू) येथील शिवमंदिरात (जि. म्हैसूर, कर्नाटक) अशीच एक वैशिष्ट्यपूर्ण शिवप्रतिमा आहे. यात शिव वटवृक्षाखाली उत्कटिकासनात बसलेला असून पाय व शरीर योगपट्टाने आवळलेले आहेत. त्याने मागील डाव्या हातात वीणा घेतलेली असून उजव्या हातात नाग आहे. पुढच्या डाव्या हातात पोथी धारण केलेली असून उजवा हात व्याख्यानदर्शक अशा चिन्मुद्रेत आहे. शिवाच्या पीठाखालील शिल्पपटावर मध्यभागी नंदी कोरलेला आहे. त्याखाली विविध भक्त नमस्कारमुद्रेत उभे आहेत. पुरातत्त्वज्ञ गो. बं. देगलूरकर यांच्या मते ही प्रतिमा १२ व्या शतकानंतरची असावी.

 

 

 

संदर्भ :

  • खरे, ग. ह., ‘मूर्तिविज्ञान’. भारत इतिहास संशोधन मंडळ, पुणे,  १९३९; २०१२.
  • जोशी, नी. पु., ‘भारतीय मूर्तिशास्त्र’, प्रसाद प्रकाशन, पुणे, १९७९; २०१३.
  • जोशी, महादेवशास्त्री, ‘भारताची मूर्तिकला’, जोशी ब्रदर्स बुकसेलर्स अँड पब्लिशर्स,  पुणे, १९८०.
  • देगलूरकर, गो. बं., ‘घारापुरी दर्शन’ (जोगेश्वरी व मंडपेश्वर लेणींसह), स्नेहल प्रकाशन. पुणे, २०१३.
  • देगलूरकर, गो. बं., ‘शिवमूर्तये नमः’, स्नेहल प्रकाशन. पुणे, २०१४.
  • Banerjea, J. N., ‘Development of Hindu Iconography’. University of Calcutta, Calcutta, 1956.
  • Rao, T. A. G., ‘Elements of Hindu Iconography’, Vol. II, Part I, II,, Motilal Banarsidass Publishers Pvt. Ltd., Delhi, 1914; 1997.

छायाचित्र संदर्भ :

  • व्याख्यान किंवा ज्ञानदक्षिणामूर्ती, अहिच्छत्र (उत्तर प्रदेश) : Agrawala, V. S., ‘The Terracottas of Ahichchhatra’ Ancient India, No. IV 1947-48., pp. 169.
  • वीणाधरमूर्ती, पुदुकोट्टई (तमिळनाडू) : https://puratattva.in/narthamalai-an-enigma-of-art/ by Saurabh Saxena on April 29, 2011
  • योगदक्षिणामूर्ती, कांचीपुरम (तमिळनाडू) : Rao, T. A. G., ‘Elements of Hindu Iconography’, Vol. II, Part I, Motilal Banarsidass Publishers Pvt. Ltd., Delhi, 1914; 1997.
  • दक्षिणामूर्ती, नंजनगोडू, म्हैसूर, (कर्नाटक) : Rao, T. A. G., ‘Elements of Hindu Iconography’, Vol. II, Part I, Motilal Banarsidass Publishers Pvt. Ltd., Delhi, 1914; 1997.

समीक्षक : श्रीकांत गणवीर


Discover more from मराठी विश्वकोश

Subscribe to get the latest posts sent to your email.