जॉर्जियातील एक प्रसिद्ध पुरातत्त्वीय स्थळ. हे स्थळ जॉर्जियाची राजधानी तबलिसी येथून नैर्ऋत्येला ८५ किमी. अंतरावरील गवताळ प्रदेशातील सिल्क रोड व्यापारी मार्गावर असून येथील मध्ययुगीन चर्च हे एक नाविन्यपूर्ण प्रागैतिहासिक स्थळ आहे. येथे सु. १८ लक्ष वर्षपूर्व काळातील इरेक्टस मानव या जातीचे निर्विवाद अस्तित्व दर्शविणारे जीवाश्म मिळाले आहेत. आफ्रिका खंडाव्यतिरिक्त मिळालेल्या या प्राचीन जीवाश्मांचे पुरावे मानवी उत्क्रांती आणि प्राचीन काळातील मानवी स्थलांतर यांवर नव्याने प्रकाश टाकणारे आहेत.

मध्ययुगीन चर्च, दमनिसी (जॉर्जिया).

दमनिसी येथे १९३० पासून सुरू झालेल्या उत्खननातून मध्ययुगीन काळातील काही इमारतींचे भग्न झालेले अवशेष मिळाले. याशिवाय काही प्राण्यांची अश्मीभूत हाडे मिळाली. १९८३ मध्ये जॉर्जियन पुराजीवाश्मशास्त्रज्ञ अबेस्लोम वेकुआ (१९२५-२०१४) यांनी या जीवाश्मांमध्ये नामशेष झालेल्या गेंड्याचे दात आहेत, असे सिद्ध केले आणि हे जीवाश्म प्लाइस्टोसीन (प्रतिनूतन) काळातील असावेत, असे अनुमान केले. १९८४ मध्ये उत्खननातून काही अश्मयुगीन दगडी हत्यारे मिळाली. यानंतर येथील उत्खननात फ्रान्स, जर्मनी, स्पेन आणि अमेरिका येथील अनेक शास्त्रज्ञ सामील झाले आणि मानवी जीवाश्मांचा शोध लागला. १९९१ मध्ये जॉर्जियन पुरातत्त्वज्ञ डेव्हिड लॉर्डकीपनेझ यांनी दमनिसी येथील उत्खननातून मानवी जीवाश्मांचे अवशेष शोधून काढले. त्यानंतर जीवाश्मरूपी ५ मानवी कवट्या जवळजवळ अखंड स्वरूपात मिळाल्या आहेत. येथे मिळालेल्या अश्मीभूत मानवी कवट्यांपैकी डी २२८० ही एका प्रौढ व्यक्तीच्या मेंदूची पेटी (ब्रेन केस) आहे, तर डी २२८२ / डी २११ ही एका तरुण व्यक्तीची आहे. डी २७०० / डी २७३५ ही कवटी एका लहान मुलाची आहे. याशिवाय दोन मानवी जबडे मिळाले आहेत : डी ३४४४ / डी ३९०० एक दंतविरहित खालचा जबडा आहे आणि डी २६०० हा एक मोठा जबडा आहे. २००५ मध्ये मिळालेली डी ४५०० ही कवटी अखंड स्वरूपात आहे.

इरेक्टस मानवाच्या कवट्या, दमनिसी.

दमनिसी येथील उत्खननातून पुरातत्त्वीय आणि स्तरीय रचनेनुसार दोन मुख्य स्तर निश्चित केले आहेत :

स्तर अ (A) – पायरोक्लास्टिक (ज्वालामुखीद्वारे उद्रेक झालेल्या खडकाच्या तुकडेयुक्त) वाळू मिश्रित गाळ असलेला स्तर. या स्तरातून प्रामुख्याने सर्व मानवी जीवाश्म आणि अनेक प्राण्यांचे अश्मीभूत हाडे सापडली आहेत.

स्तर ब (B) – हा स्तर झीज झालेल्या ज्वालामुखीय दगडापासून तयार झालेला वाळू मिश्रित गाळाचा असून यात अश्मयुगीन दगडी हत्यारे मोठ्या प्रमाणात मिळाली. या स्तरातून अगदी नगण्य स्वरूपात जीवाश्म प्राप्त झाले आहेत.

हे दोन्ही स्तर एका चुनखडीयुक्त थरामुळे वेगळे झाले आहेत. या चुनखडीयुक्त स्तरामुळे स्तर A ची झीज कमी झाली असावी व त्यामुळे जीवाश्मांचे नैसर्गिक रीत्या जतन झाले असावे, असे शास्त्रज्ञांचे मत आहे.

दमनिसी अश्मयुगीन स्थळाचे उत्खननकर्ते : वेकुआ आणि लॉर्डकीपनेझ.

उत्खननातून ८००० पेक्षा जास्त दगडी हत्यारे मिळाली आहेत. ही हत्यारे बनविण्यासाठी मॅशवेरा नदीच्या पात्रातील वैविध्यपूर्ण गोटे दमनिसी येथे आणले होते. दगडी हत्यार समूहामध्ये मोठ्या प्रमाणात लहान आकाराचे छिलके, गाभे, गाभ्यापासून छिलके काढताना राहिलेले तुकडे आणि छिलके काढण्यासाठी लागणारे गोल आकाराचे दगड (हॅमर स्टोन्स) आहेत. अगदी सोप्या पद्धतीने तयार केलेली ही दगडी हत्यारे ओल्डोवान परंपरेशी साधर्म्य दाखवतात.

दमनिसी येथील लुप्त/नामशेष झालेले (व्हिलाफ्रांकीयन) प्राणी, मानवी जीवाश्मांचे इरेक्टस मानव या पुरामानवाशी असलेले साधर्म्य आणि ४० ए आर / ३९ ए आर (40Ar/39Ar) या पद्धतीने ज्वालामुखीय राखेतील नैसर्गिक काचेचे (ग्लास शार्ड) केलेले कालमापन १८ लाख वर्षपूर्व आले आहे. यावरून दमनिसी येथे १८ लाख वर्षांपूर्वी आदिमानवाचे अस्तित्व होते, हे सिद्ध झाले आहे.

दमनिसीपासून १३ किमी. अंतरावर स्थित केव्हमो ओरोझमनी या स्थळावर संशोधन करण्यात आले. फायटोलिथचा अभ्यास आणि ४० ए आर / ३९ ए आर कालमापन पद्धतीने केलेल्या कालमापनावरून येथील १५ मी. जाडीचा जलोढीय-सरोवरीय मिश्रित गाळ हा आद्य प्रतिनूतन काळातील आहे. या गाळामध्ये असलेल्या दोन ज्वालामुखीय थरांचे कालमापन १८ लाख वर्ष आणि १७ लाख वर्षपूर्व असे आहे. यावरून असे सिद्ध होते की, दमनिसी आणि केव्हमो ओरोझमनी ही दोन्ही स्थळे एकाच काळातील आहेत.

याचबरोबर येथे अनेक लुप्त झालेल्या प्राण्यांचे अश्मीभूत अवशेष मिळाले. यात प्रामुख्याने खूप मोठे वक्राकार दात असलेले शिकारी मांजर (सेबर टूथ कॅट), सिंहाच्या आकाराचे तरस, लांडगे, कोल्हे, छोट्या मानेचे जिराफ, विशालकाय शहामृग, हत्ती आणि चित्ता अशा अनेक प्राण्यांची अश्मीभूत हाडे आहेत. दमनिसी येथे महाकाय चित्त्याचे (अॅसिनोनिक्स पार्डीनेन्सीस) पुढील पायाचे एकसंध जीवाश्म मिळाले आहे. या जीवाश्माच्या अभ्यासातून असे निदर्शनास आले की, हा महाकाय चित्ता जवळजवळ १०० कि. वजनाचा होता. तसेच यावरून असा निष्कर्ष काढला की, आद्य प्रतिनूतन काळात चित्त्याचे मांस हे मुबलक प्रमाणात उपलब्ध होते.

दमनिसी येथील अश्मयुगातील मानवी प्रजातीच्या (जीनस) आरंभिक काळातील मानवी जातीचे (स्पीशीझ) जीवाश्म  आणि त्यासोबत या आदिमानवाने तयार केलेली पण अंशतः शिल्लक राहिलेली दगडी हत्यारे हे एक गूढ रहस्य आहे.  मानवी प्रजातीच्या एकाच समूहातील वेगवेगळ्या वयाच्या स्त्री आणि पुरुषांच्या अश्मीभूत कवट्या, जबडे आणि सोबत अश्मयुगीन हत्यारे हे दमनिसी येथे एकाच ठिकाणी मिळाल्यामुळे एका समूहातील विविधता (पॅलिओडेम) जाणून घेण्यासाठी या स्थळाला एक अनन्यसाधारण महत्त्व आहे. त्याविषयी चालू असलेल्या संशोधनामुळे मानवी उत्क्रांती, आदिमानवाचे स्थलांतर, नवीन जागेत जगण्यासाठी केलेला संघर्ष यांबद्दल नवीन माहिती मिळत आहे, पण त्याबरोबरच हे रहस्य अधिकाधिक गूढ होत आहे, असे दिसते.

दमनिसी हे यूरेशियातील पहिल्या मानवाचे उगमस्थान आणि यूरोप, आशिया आणि आफ्रिका खंडांना जोडणारे एक अनन्यसाधारण स्थान आहे. त्यामुळे २००७ मध्ये यूनेस्कोतर्फे (संयुक्त राष्ट्रांची शैक्षणिक, वैज्ञानिक व सांस्कृतिक संस्था) ह्या स्थळाला जागतिक वारसा स्थळ म्हणून घोषित केले गेले.

संदर्भ :

  • Garcia, Tristan; Féraud, Gilbert; Falguères, Christophe; Henry de Lumley; Perrenoud, Christian; Lordkipanidze, David, ‘Earliest human remains in Eurasia: New 40Ar/39Ar dating of the Dmanisi hominid-bearing levels, Georgia’, Quaternary Geochronology, Vol. 5 (4), pp. 443-451, 2010. https://doi.org/10.1016/j.quageo.2009.09.012
  • Lordkipanidze, David; Ponce de León, Marcia; Margvelashvili, Ann; Rak, Yoel; Rightmire, G. Philip; Vekua, Abesalom & Zollikofer, Christoph, (2013). ‘A Complete Skull from Dmanisi, Georgia, and the Evolutionary Biology of Early Homo’, Science, Vol. 342. Pp. 326-31, New York, 2013. https://www.science.org/doi/10.1126/science.1238484
  • Vekua, Abesalom. ‘Giant Ostrich in Dmanisi Fauna’, Bulletin of the Georgian National Academy of Sciences, Vol. 7 (2), pp.143-148, 2013.
  • https://whc.unesco.org/en/tentativelists/5225/

छायाचित्र संदर्भ :

  • मध्ययुगीन चर्च, दमनिसी (जॉर्जिया) : https://www.studiomilou.sg/wp-content/uploads/2019/03/Book-Dmanisi.pdf
  • इरेक्टस मानवाच्या कवट्या, दमनिसी : https://lh5.googleusercontent.com/proxy/I_qz5TBNvK14PmSCG3cKVDVVlQcpFFXLpgZ5iLCpSnmm14ao1PTFsTme1WRdY7ftkB4fqHU1gdEQVvMdzjKcY2bQWRj43DUisXqk
  • दमनिसी अश्मयुगीन स्थळाचे उत्खननकर्ते : वेकुआ आणि लॉर्डकीपनेझ : https://www.studiomilou.sg/wp-content/uploads/2019/03/Book-Dmanisi.pdf

 

समीक्षक : जयेंद्र जोगळेकर