नदीच्या किंवा प्रवाहाच्या क्षरण (झीज) कार्यामुळे खडकाळ प्रदेशांत निर्माण होणाऱ्या अरुंद व खोल दरीला घळई किंवा निदरी असे संबोधले जाते. सामान्यपणे घळई हे भूमिस्वरूप पर्वतीय किंवा डोंगराळ प्रदेशांतील कठीण खडकांच्या भागांत आढळते. फ्रेंच शब्द ‘गॉर्ज’ म्हणजे ‘मान’ किंवा ‘गळा’ या शब्दावरून ही संज्ञा आलेली असावी. घळई आणि कॅन्यन या दोन्ही भूमिस्वरूपाचे वर्णन करताना प्रवाह किंवा नद्यांच्या प्रवाहमार्गात आढळणारी अरुंद व खोल दरी असेच केले जात असले, तरी घळई ही कॅन्यनपेक्षा लहान असते. अनेक नैसर्गिक शक्तींमुळे घळईची निर्मिती होत असली, तरी नदी किंवा प्रवाहाचे क्षरण कार्य हा घळई निर्मितीतील सर्वांत महत्त्वाचा व सामान्य घटक आहे. नदी पर्वतीय भागातील कठीण खडकाच्या, तीव्र उताराच्या प्रदेशांतून वाहत असताना तिचा वेग खूप जास्त असतो. त्यामुळे नदी आपल्या खडकाळ पात्राच्या तळभागाचे म्हणजे अधोगामी क्षरण हे काठांच्या क्षरणापेक्षा (पार्श्व क्षरण) जास्त करते. झीज कार्यामुळे निर्माण होणारा अवसाद (निक्षेप) ती आपल्या प्रवाहाबरोबर खालच्या दिशेने वाहून नेते. पुराच्या वेळी नदीप्रवाहाचा वेग आणि क्षरणाची तीव्रता अधिकच वाढते. तळभागाची सतत झीज होत राहिल्यामुळे तिचे पात्र अधिकाधिक खोल होत जाऊन काठावरील बाजू तशीच तीव्र उताराची राहते. अशाप्रकारे नदीच्या क्षरण कार्यामुळे खडकाळ प्रदेशांत खोल, अरुंद व लांब अशा आकाराची जी दरी निर्माण होते, त्या दरीला घळई असे संबोधले जाते.

हिमालय पर्वत पार करून भारताकडे वाहत येणाऱ्या अनेक हिमालयीन नद्यांनी अशाप्रकारे हिमालयात खोल घळईंची निर्मिती केलेली आहे. हिमालय पर्वतात असंख्य नद्यांची उगमस्थाने असून त्या पूर्वप्रस्थापित स्वरूपाच्या व हिमालयापेक्षाही जुन्या आहेत. हिमालयाचे उत्थान अगदी मंद गतीने होत होते. त्याच वेळी या नद्यांनी आपल्या पात्राचे अधोगामी क्षरण करून आपला प्रवाहमार्ग कायम राखला. त्यामुळे सिंधू, सतलज, ब्रह्मपुत्रा इत्यादी नद्यांनी हिमालयात खोल घळईंची निर्मिती केलेली आहे. उदा., सिंधू नदी हिमालयातील ४,५०० ते ५,२०० मी. खोलीच्या खोल घळईतून वाहते. भारतात नर्मदा नदीने भेडाघाटमध्ये संगमरवरी खडकातून तयार केलेली घळई प्रसिद्ध आहे. अनेकदा दोन पर्वतरांगांच्या किंवा टेकड्यांच्या दरम्यानच्या खडकाळ प्रदेशांतून वाहणाऱ्या नदीमुळे घळईची निर्मिती होते. आफ्रिकेतील माली देशात सेनेगल नदीपात्रात तलारी घळई आढळते.

भूगर्भीय उत्थान क्रियेमुळेही घळईंची निर्मिती होते. या क्रियेत पृथ्वीच्या पृष्ठभागाची वरच्या दिशेने हालचाल होते. या क्रियेत भूकंप आणि पर्वत निर्माणकारी (गिरिजनन) हालचालींचा समावेश होतो. अनेकदा क्षरणकार्य आणि भूगर्भीय उत्थान यांच्या एकत्रित परिणामातून घळईची निर्मिती होते. हिमनद्यांचे वहन आणि त्यांचे वितळणे यांमुळेही घळईची निर्मिती होते. हिमनद्यांमुळे पृथ्वीचे भूपृष्ठ खरवडले जाऊन खोल आणि तीव्र उताराच्या मोठमोठ्या कॅन्यन व घळईंची निर्मिती होते. हिमनद्या वितळल्यानंतर त्या घळई उघड्या पडतात. घळईंवर धरणे बांधून मोठेमोठे जलविद्युतनिर्मिती प्रकल्प उभारता येतात. भारतातील सतलज नदीवरील भाक्रा-नानगल प्रकल्प असाच घळईवर उभारण्यात आलेला आहे. चीनमधील यांगत्सी नदीवरील थ्री गॉर्जेस डॅम हे अशा जलविद्युत निर्मिती प्रकल्पाचे प्रसिद्ध उदाहरण आहे. तसेच त्या धरणांपासून वरचे पात्र जलवाहतुकीच्या दृष्टीनेही उपयुक्त ठरते.

समीक्षक : शेख मोहम्मद बाबर