पश्चिम आफ्रिकेतील प्रमुख नदी. ती गिनी, माली या देशांतून तसेच सेनेगल-मॉरिटेनिया या देशांच्या सरहद्दीवरून वाहत जाऊन पश्‍चिमेस अटलांटिक महासागराला मिळते. तिची लांबी १,६४१ किमी. व जलवाहन क्षेत्र ४,५०,००० चौ. किमी. आहे. गिनीमधील फूटा जालन पठारावर उगम पावणारे बाफँग व बाकोई हे सेनेगलचे प्रमुख शीर्षप्रवाह आहेत. हे दोन्ही शीर्षप्रवाह गिनीमधून उत्तरेस वाहत गेल्यानंतर पुढे मालीमध्ये प्रवेश करतात. मालीमधून उत्तरेस बाफँग, तर वायव्येस बाकोई या नद्या वाहत गेल्यानंतर बाफूलाबे येथे त्यांचा संगम होतो. या संगमानंतरचा संयुक्त प्रवाह सेनेगल या नावाने ओळखला जातो. मालीमधून वायव्येस वाहत गेल्यानंतर माली-मॉरिटेनिया देशांच्या सरहद्दीजवळ उत्तरेकडून वाहत येणारी काराकोरो ही उपनदी सेनेगलला मिळते. तेथून पुढे माली-मॉरिटेनिया सरहद्दीवरून सुमारे १०० किमी. वाहत गेल्यावर दक्षिणेकडून वाहत येणारी फालेमे नदी सेनेगलला मिळते. येथेच माली, मॉरिटेनिया व सेनेगल या देशांच्या सरहद्दी एकत्र आल्या आहेत. त्याच्यापुढील मुखापर्यंतचा संपूर्ण प्रवाहमार्ग सेनेगल-मॉरिटेनिया या देशांच्या सरहद्दीवरून प्रथम वायव्येस, त्यानंतर पश्चिमेस व शेवटी दक्षिणेस वाहत जाऊन सेंट लूइस शहराजवळ अटलांटिक महासागराला मिळते. मालीमधील केझपासून वरील प्रवाहमार्गात द्रुतवाह व जलप्रपात आढळतात. त्यांपैकी गूना व फेलो धबधबे उल्लेखनीय आहेत. बाकेलपासून खालचे पात्र बरेच रुंद बनले आहे. काही ठिकाणी सु.२० किमी. रुंदीच्या गाळाच्या मैदानी खोऱ्यातून ती वाहते. डागाना शहरापासून पुढे सेनेगल नदीच्या त्रिभुज प्रदेशास सुरुवात होते. मुखाकडील किनाऱ्याजवळून वाहणारा कॅनरी सागरी प्रवाह आणि व्यापारी वारे यांच्या संचयन कार्यामुळे बार्बरी टंग (लॅग्वे दे बार्बरी) हा किनाऱ्याला समांतर असा लांब व रुंद वाळूचा दांडा निर्माण झाला आहे. त्यामुळे ही नदी या दांड्याला समांतर अशी दक्षिणेस वहात जाते. मुखाजवळ अरुंद नदीमुखखाडी निर्माण झाली असून तिच्यातून आतपर्यंत सागरी लाटा प्रवेश करतात. काएडीच्या खालील पात्रात नागमोडी वळणे आढळतात. बाकेलच्या खाली नदी स्वतंत्र प्रवाहांनी वाहते त्यामुळे पात्रात काही बेटांची निर्मिती झालेली आहे. त्यांपैकी मार्फिल हे कमी रुंदीचे परंतु सु. ५०० किमी. लांबीचे बेट आहे. खालच्या पात्रात सरोवरे, दलदली व बेटे निर्माण झाली आहेत.

सेनेगल नदीकाठावरील सेंट लूइस शहर

बाफँग व फालेमे या नद्यांच्या उगमाकडील क्षेत्रात वार्षिक सरासरी सु. २०० सेंमी., तर सेनेगल खोऱ्यात सुमारे २५ ते ७६ सेंमी. पर्जन्यमान असते. साधारणतः ऑगस्ट ते मध्य ऑक्टोबरपर्यंत नदीतील पाण्याची पातळी सर्वाधिक असते. या कालावधीत केझपर्यंत जहाज वाहतूक होऊ शकते. कोरड्या ऋतूत मात्र जलवाहतूक होऊ शकत नाही. जलसिंचनाच्या दृष्टीने नदीस विशेष महत्त्व आहे. पूरमैदानात भाताची शेती केली जाते. सेनेगल खोऱ्यात विशिष्ट प्रकारचे ॲकेसिआ (एक प्रकारची बाभूळ) वृक्ष आढळत असून त्यांच्यापासून मोठ्या प्रमाणात सेनेगली (अरेबिक) डिंकाचे उत्पादन मिळते. डागानाजवळ सेनेगलच्या ताऊए या उपनदीवर बांधलेले तसेच मुखाकडील भागात सेनेगलवर बांधलेले डायमा डॅम ही धरणे विशेष महत्त्वाची आहेत. खालच्या पात्रातील ग्वीएर्स व रकिझ ही मुख्य सरोवरे असून पुराच्या वेळी नदीतील पाणी त्यांत शिरते. रोसो, बोगे, काएडी ही सेनेगलच्या खालच्या पात्रातील प्रमुख नदीबंदरे आहेत. कार्थेजियन समन्वेषक हॅनो यांनी इ. स. पू. पाचव्या शतकात, तर पोर्तुगीज समन्वेषक बार्थालोमेऊ दीयश हे सेनेगल नदीच्या मुखाजवळ येऊन गेले असावेत. मंगो पार्क यांनी नदीच्या वरच्या खोऱ्याचे समन्वेषण केले होते.

समीक्षक : संतोष ग्या. गेडाम


Discover more from मराठी विश्वकोश

Subscribe to get the latest posts sent to your email.