अपृष्ठवंशी उपसृष्टीतील प्राथमिक पेशी संघटन असलेल्या सजीवांचा संघ. यामध्ये सर्व प्रकारच्या स्पंजांचा समावेश होतो. या संघातील प्राण्यांच्या शरीरावर बाहेरून अनेक छिद्रे असतात, म्हणून या संघाचे नाव छिद्री संघ (Phylum porifera) असे पडले आहे. हालचालीचा अभाव असल्याने त्यांची गणना काही शतकांपूर्वी वनस्पती वर्गात होत असे. अठराव्या शतकाच्या उत्तरार्धात स्पंजातील बहिर्वाही छिद्रातून प्रवाहित होणारे पाणी आणि त्या छिद्राचे बदलणारे आकारमान या निरीक्षणावर आधारित निष्कर्षानुसार त्यांची गणना प्राणिजगतात केली जाऊ लागली.

छिद्री संघातील प्राणी बहुपेशीय व जलचर आहेत. ९८% स्पंज सागरी पाण्यात आढळतात, तर गोड्या पाण्यात त्यांची संख्या अत्यंत कमी आहे. छिद्री संघात सुमारे १५,००० प्राण्यांची नोंद झालेली आहे. यातील जीवाश्मस्वरूपात सापडलेल्या काही जातींचे जीवाश्म ६०० दशलक्ष वर्षापूर्वींचे आहेत. समुद्राच्या आंतरावेलीय प्रदेशात (Intertidal zone) म्हणजे भरती व ओहोटी यामधील सागरी पाण्यापासून सु. ८,५०० मीटर खोलीवरील अगाध क्षेत्रामध्ये (Abyssal plain) त्यांचा आढळ आहे. प्रवाळ व खारफुटी प्रदेशांत किंवा खडकासारख्या दृढ पृष्ठभागावर स्पंजाची वाढ लवकर होते. ते पाण्याखाली खडक, शंख-शिंपले तसेच खेकड्यांच्या पाठीवरील कवचाला चिकटून असतात. गोड्या पाण्याच्या बैकल सरोवरात स्पंजाची परिसंस्था तयार झालेली आहे. तर अमेरिकेच्या पॅसिफिक महासागरी किनाऱ्याजवळ मोठ्या प्रमाणात आढळणाऱ्या स्पंज वसाहतीमुळे एका बेटाची निर्मिती झाली आहे.

आकाराने सर्वांत मोठा स्पंज (झेस्टोस्पंजिया म्यूटा)

पूर्ण वाढलेल्या स्पंजांचा आकार असममित (Asymmetrical) किंवा अरीय (Radial) सममित असतो. त्यांच्या रंगात व आकारात विविधता आढळते. पंख्याच्या आकाराचे, झाडांच्या फांद्यांप्रमाणे, गोलाकार, दंडगोलाकार, नळकांड्यासारखे, तर काही कपाच्या आकाराचे स्पंज आढळतात. सायकॉन सिलिएटम (Sycon ciliatum) हा स्पंज आकाराने सर्वांत लहान असून त्याची उंची २.५–७.५ सेंमी. असते. कॅरिबियन समुद्रात आढळणारा झेस्टोस्पंजिया म्यूटा (Xestospongia muta) हा स्पंज आकाराने सर्वांत मोठा असून त्याची उंची १०–१२० मी. व व्यास सु. २ मी. इतका असतो. याला जायंट बॅरल स्पंज असेही म्हणतात.

छिद्री संघातील प्राण्यांचे वर्गीकरण पेशींची रचना व त्यांच्या आधार कंटिकांच्या रासायनिक घटकावरून करण्यात आले आहे. या प्राण्यांच्या पेशीमध्ये आधारासाठी सिलिका व कॅल्शियम कार्बोनेट यांनी बनलेल्या कंटिका किंवा केरॅटिन प्रथिनासारखे तंतू असतात. त्यानुसार छिद्री संघाचे कॅल्केरिया, हेक्झॅक्टिनेलिडा (काच स्पंज) व डेमोस्पंजिया अशा तीन वर्गांत वर्गीकरण केले आहे.

छिद्री संघातील प्राण्यांच्या विविध आकारातील कंटिका

(१) कॅल्केरिया वर्ग (Calcarea) : यातील प्राण्यांची शरीररचना साधी नलिकेप्रमाणे असून ते उथळ समुद्रात आढळतात . नलिकेच्या मध्यभागात एक उभी मध्यपोकळी असते. त्याच्या दूरस्थ टोकावर मोठे छिद्र असते. या छिद्रातून आत आलेले पाणी बाहेर पडते. शरीर दोन पेशी स्तरांनी बनलले असते. बाह्य स्तर मुख्यत्वे चपट्या संरक्षक पेशींनी बनलेला असून अधूनमधून छिद्री पेशी असतात. अंत:स्तर जत्रुक (Collar) पेशींचा बनलेला असतो. छिद्री पेशीतून समुद्राचे पाणी आत येते. मध्यपोकळीच्या अस्तरामध्ये मोठी कशाभिका व त्याभोवती जत्रुक गळपट्टी असलेल्या पेशी असतात. यांना चवकपेशी (Chonocyte) म्हणतात. कशाभिकेच्या हालचालीमुले मध्यपोकळीत पाणी आणले जाते. कशाभिकेच्या भोवती असलेल्या जत्रुक पेशीमध्ये अन्नकण जमा होतात. जत्रुक पेशीच्या तळाशी असलेल्या अमीबीय पेशी (Amebocyte) अन्नरिक्तिकेत जमा होतात. अमीबीय पेशी अन्नरिक्तिकेसह अन्न इतर भागांत वाहून नेतात.

जत्रुक पेशी हे स्पंज वर्गीय प्राण्यांचे वैशिष्ट्य आहे. या प्रकारच्या पेशी प्राणीसृष्टीत इतर कोणत्याही संघात आढळत नाही. अमीबीय पेशी इतर कार्याबरोबर स्पंजाच्या शरीरातील कंटिका सुद्धा स्त्रवतात. कंटिकेस एक, तीन किंवा चार टोके असतात; उदा., सायकॉन (Sycon), ग्रँशिया (Grantia).

(२) हेक्झॅक्टिनेलिडा / काच स्पंज वर्ग (Hexactinellids or glass sponges) : या वर्गातील प्राणी अत्यंत खोल सागरी पाण्यात आढळतात. याच्या कंटिका सिलिकाने बनलेल्या असल्याने याला काच (Glass) स्पंज म्हणतात. सिलिकाने बनलेल्या सहा टोके असलेल्या कंटिका हे यांचे वैशिष्ट्य आहे. जपानजवळच्या खोल समुद्रात त्यांचा अधिवास आहे. यामध्ये यूप्लेक्टेला (Euplectella; Venus’ Flower Basket) या स्पंजाचा समावेश होतो. वाढ अत्यंत सावकाश होते.

स्पंज : विविध प्रकार

(३) डेमोस्पंजिया वर्ग (Demospongia) : हा स्पंज संघातील सर्वात विविधता असलेला वर्ग आहे. जगभरात असलेल्या स्पंजांपैकी ८,८०० जातींचा यात समावेश केला गेला आहे. त्यांचे शरीर तुलनेने मऊ असून शरीरावर कॅल्शियम कार्बोनेटच्या अर्गोनाइट किंवा कॅल्साइट स्फटिकांपासून बनलेल्या कंटिका असतात. शरीराचा आधार कंटिका व स्पॉन्जिन प्रथिन तंतू किंवा या दोन्ही घटकांनी बनलेला असतो. बहुतांशी सागरी पाण्याच्या तळाशी यांचा अधिवास असतो. यातील स्पॉन्जिला गणात गोड्या पाण्यातील स्पंजांचा समावेश केला आहे. या वर्गातील सर्वांत मोठ्या स्पंजाचा व्यास १ मी. नोंदलेला आहे. मोठ्या आकाराच्या स्पंजाचे आयुष्य ५००–१,००० वर्षांएवढे दीर्घ असल्याने समुद्राची क्षारता, तापमान बदल यांचे ते दर्शक आहेत; उदा., स्नान स्पंज (Bath sponge). बाजारात मिळणारा स्नान स्पंज व्यापारी दृष्टीने महत्त्वाचा आहे. त्याच्या कंटिका विरघळवून त्याचा वापर स्नानगृहात स्नानाच्या वेळी आणि सौंदर्यप्रसाधनांमध्ये करतात.

शरीररचना : स्पंज बहुपेशीय असून देहभित्ती (Body wall) बाह्यस्तर, मध्यस्तर आणि अंत:स्तर अशा तीन स्तरांची बनलेली असते. देहभित्तीत अंतर्वाही (पाणी आत नेणारी) रंध्रे (छिद्रे) असून त्यांची उघडझाप होत असते. ती नालरूप असून, बाह्यपृष्ठापासून स्पंज पोकळी पर्यंत किंवा मध्य गुहेपर्यंत गेलेली असतात. बाह्यरंध्रामधून आत शिरलेले पाणी नालीद्वारे स्पंज पोकळीत येते. पाण्यावाटे ऑक्सीजन, अन्नघटक (प्लवके) आत येतात. बाह्यस्तर हा चपट्या पेशींचा (Pinacocytes) बनलेला असतो.

मध्यस्तर हा कोलाजेनसदृश जेलचा बनलेला असून अंत:कंकालाप्रमाणे काम करतो. यात असलेल्या कॅलशियमयुक्त कंटिका देहभित्तीला आधार देण्याचे काम करतात. या स्तरात विविध प्रकारच्या अमीबीय हालचाल करणाऱ्या पेशी असतात. जत्रुक पेशींनी गोळा केलेले अन्नद्रव्य इतर पेशींपर्यंत पोहोचवण्याचे काम या पेशी करतात. तसेच या पेशी मध्यस्तराचा महत्त्वाचा घटक असलेल्या कोलॅजेनची (Collagen) निर्मिती करतात. पुनरुत्पादनाच्या क्रियेत स्त्रीयुग्मकांची निर्मिती अमीबीय पेशींपासून होते. त्यांच्या सततच्या हालचालीने पाणी गाळण्याची प्रक्रिया सुलभ होते.

स्पंज रचना

अंत:स्तर वैशिष्ट्यपूर्ण फुलदाणीच्या आकाराच्या जत्रुक पेशींनी बनलेला असतो. या पेशींच्या मध्यावर कशाभिका असून तिच्याभोवती पातळ पापुद्र्याने जोडलेल्या सूक्ष्म पेशींची पारदर्शक, संकोचनशील (आंकुचन पावणारे) गळपट्टी (कॉलरसारखे कडे) असते. बाह्यस्तरातील रंध्रामधून आलेल्या पाण्यातील प्लवक व आवश्यक त्या इतर अन्नद्रव्यांचे पचन जत्रुक पेशीत होऊन कशाभिकांच्या सततच्या हालचालीमुळे ते स्पंजमुखाद्वारे किंवा बहिर्वाही छिद्रावाटे (Osculum) बाहेर टाकले जाते. प्रजजन  काळात जत्रुक पेशी पुंयुग्मकांची निर्मिती करतात.

स्पंजांमध्ये चेतासंस्था, पचनसंस्था आणि रक्ताभिसरण संस्था नसते. स्पंजांचे पोषण हे सर्वसाधारणपणे पाण्यातील प्लवके व इतर अन्नद्रव्य गाळून होत असले तरी, अन्नघटकांची कमतरता असलेल्या वातावरणात स्पंजच्या काही प्रजाती लहान कवचधारी प्राण्यांवरही आपली उपजिविका करतात.

प्रजनन : छिद्री संघातील प्राण्यांचे प्रजनन हे लैंगिक तसेच अलैंगिक पद्धतीने होते. अलैंगिक प्रजननात विखंडन, मुकुलन तसेच पुनरुद्धन या प्रक्रियांचा समावेश होतो. बहुतेक स्पंज उभयलिंगी असतात, मात्र  काही वेळा स्त्री आणि पुंयुग्मकांची निर्मिती वेगवेगळ्या वेळी होते. लैंगिक प्रजनन प्रक्रियेत स्त्रीयुग्मक आणि पुंयुग्मक यांचे शरीरांतर्गत फलन होऊन डिंभ बाहेर पडतो. काही काळ पाण्यात पोहल्यावर डिंभ आधाराला चिकटतो व त्यापासून नवीन स्पंज तयार होतो.

काही वनस्पती व प्राणी स्पंज संघातील प्राण्यांसोबत सहजीवन साधतात. अशाप्रकारच्या सहजीवनातून (सहभोजिता; Commensalism) स्पंज प्राण्यांना जरी फारसा फायदा होत नसला तरी नुकसान मात्र होत नाही. उदा., कोळंबीच्या काही जाती मोठ्या स्पंजच्या पोकळ्यांमध्ये (कप्प्यांमध्ये) राहतात व त्या पोकळ्यांमधून वाहणारे अन्नकण खातात. खेकड्यांच्या काही जाती लपण्यासाठी तसेच शरीरावरील फसवे आवरण म्हणून स्पंजच्या तुकड्यांचा वापर करतात.

अपृष्ठवंशी उपसृष्टीत बहुपेशीय संघ निर्माण होण्यामागे स्पंज संघाच्या जीनोममध्ये झालेले बदल कारणीभूत ठरले आहेत. पेशींची कार्याप्रमाणे विभागणी होणे हा महत्त्वाचा बदल समूहाने राहणाऱ्या एकपेशीय सजीवांच्या जीनोममध्ये झाल्याने पेशीचा बाह्य स्तर, कशाभिक पेशी, छिद्र पेशी, जनन पेशी अशी कार्यविभागणी झालेली दिसून येते. या कार्यविभागणीकरिता आवश्यक असलेली जनुके सध्या अस्तित्वात असलेल्या सर्व बहुपेशीय वनस्पती आणि प्राण्यांमध्ये टिकून राहिली आहेत. त्यामुळे बहुविविधतेमधील उत्क्रांतीस चालना मिळाली आहे. ऑस्ट्रेलियामधील प्रवाळ बेटांवर आढळणाऱ्या डेमोस्पंजिया वर्गातील स्पंजांमध्ये सर्वप्रथम ६३५ दशलक्ष वर्षांपूर्वीचा बहुपेशीय जीनोमक्रम आढळला आहे. हा जीनोमक्रम सर्व बहुपेशीय सजीवामध्ये टिकून राहिला आहे. या जीनोमचा वापर करून कर्करोगातील पेशींच्या गाठी कशा बनतात यावर आधारित संशोधन सध्या सुरू आहे.

संदर्भ :

  • https://courses.lumenlearning.com/boundless-biology/chapter/phylum-porifera/
  • https://manoa.hawaii.edu/exploringourfluidearth/biological/invertebrates/phylum-porifera
  • https://study.com/academy/lesson/amoebocytes-definition-functions.html
  • https://ucmp.berkeley.edu/porifera/porifera.html
  • https://www.sciencedirect.com/topics/agricultural-and-biological-sciences/porifera
  • tolweb.org/Porifera/2464

 समीक्षक : प्रमोद जोगळेकर