गांडूळ या प्राण्याचा समावेश वलयी संघाच्या (Annelida) ऑलिगोकीटा (Oligocheta; अल्परोमी) वर्गामध्ये होतो. याच्या सु. १,८०० हून अधिक जाती आहेत. त्यांपैकी भारतात सर्वत्र आढळणाऱ्या जातीचे शास्त्रीय नाव फेरेटिमा पोस्थ्यूमा (Pheretima posthuma) असे आहे. जवळजवळ सर्व विद्यापीठांतून तिची शरीररचना अभ्यासली जाते.

गांडूळ (फेरेटिमा पोस्थ्यूमा) : शरीररचना-अधर बाजू.
गांडूळ (फेरेटिमा पोस्थ्यूमा) : शरीररचना.

फेरेटिमा प्रजातीतील गांडूळ ओलसर मातीमध्ये कुजणारा पालापाचोळा, शेतजमीन, उकिरडे, बागा अशा ठिकाणी जमिनीच्या पृष्ठभागालगत आढळते. त्याचे शरीर दंडगोलाकृती, तपकिरी रंगाचे असून पुढील (अग्र) टोकाकडे निमुळते असते. त्याच्या शरीराची लांबी १५—३० सेंमी. असून शरीर १००—१५० खंडांनी बनलेले असते. १४-१५-१६व्या खंडानी मिळून जाड कॉलरसारखी प्रमेखला (Clitellum) बनलेली असते. प्रमेखलेमुळे शरीराचे प्रमेखला पूर्व, प्रमेखला व प्रमेखला पश्च असे तीन भाग होतात. पहिला, शेवटचा व प्रमेखला सोडून सर्व खंडांवर कायटीनाने बनलेल्या दृढरोमांची (Setae/chaetae) एक रांग असते. ओलसर मातीमधून बाहेर येताना आधार म्हणून या दृढरोमांचा उपयोग होतो. १७व्या व १९व्या खंडावर खालील (अधर) बाजूस जनन अंकुरकांची प्रत्येकी एक जोडी असते.

गांडूळ हा प्राणी उभयलिंगी आहे. त्याच्या शरीरात वृषणांच्या दोन जोड्या व अंडाशयांची एक जोडी असते. तेराव्या खंडाच्या खालील बाजूस स्त्रीजननरंध्र तर चौदाव्या व सोळाव्या खंडाच्या खालील बाजूवर पुंजनन रंध्रे असतात. फेरेटिमा प्रजातीत चार शुक्रग्राहिकेच्या (Spermatheca) जोड्या सहाव्या, सातव्या, आठव्या व नवव्या खंडामध्ये असतात. या शुक्रग्राहिकेमध्ये दुसऱ्या गांडुळाच्या शुक्रपेशी समागमाच्या वेळी साठवून ठेवल्या जातात.

गांडुळाचा समागम पावसाळ्यात (जुलै ते ऑक्टोबर) होतो. समागम सु. १ तास चालतो. समागमाच्या वेळी दोन गांडुळे चिकट श्लेष्माच्या साहाय्याने परस्परांच्या विरुद्ध दिशेने एकत्र येतात. परस्परांच्या शुक्रग्राहिकेमध्ये शुक्रपेशींची अदलाबदल होते व दोन्ही गांडुळे एकमेकांपासून वेगळी होतात. त्यानंतर स्त्री-जननअंगे कार्यक्षम होतात. प्रमेखलेभोवतीच्या ग्रंथींद्वारे (कॉलरच्या आकाराच्या नलिकेद्वारे) स्राव स्रवला जातो व कोश (Cocoon) निर्मिती होते. बीजांडातून प्रमेखलेमध्ये अंडी घातली जातात आणि कोश पुढील दिशेने सरकतो. यावेळी शुक्रग्राहिकेमधून शुक्रपेशी कोशात प्रवेश करतात. अंडाचे फलन कोशात होते. कोशामधून गांडुळाचे सर्व शरीर बाहेर पडते व कोश शरीरापासून सुटा होतो. परंतु, या फलित अंडापैकी फक्त एका अंडातून भ्रूण गांडूळ बाहेर येते. एका गांडुळामध्ये एका आठवड्यात २-३ कोशांची निर्मिती होते. २—४ आठवड्यानंतर भ्रूण गांडूळ कोशातून बाहेर येते. साधारणपणे त्याची जननांगे विकसित होण्यास सुमारे साठ ते नव्वद दिवस लागतात. गांडूळ उभयलिंगी असले तरी त्याच्यात स्वफलन (स्वनिषेचन – स्वत:च्या शुक्रपेशीद्वारे स्वत:च्याच बीजांडाचे फलन) होत नाही. याचे कारण जनन संस्थेतील पुंजनन संस्था आधी कार्यक्षम होते.

गांडूळ (ईसेनिया फेटिडा)
गांडूळ (फेरेटिमा पोस्थ्यूमा)

गांडुळाच्या माती खाऊन जमिनीच्या आत बिळे करून राहण्याच्या प्रवृत्तीमुळे शेतातील जमीन भुसभुशीत होते. जमिनीतून हवा खेळती राहून पिकांच्या मुळाशी पिकांना आवश्यक असलेल्या सूक्ष्म जीवाणूंची संख्या वाढते आणि पिकांची वाढ चांगली होते. हिवाळ्यात किंवा कोरड्या हवामानात ते सुमारे २ मी. खोलीपर्यंत जमिनीत आढळतात. मातीतील वनस्पतींचे अवशेष हे गांडुळाचे मुख्य अन्न आहे. गांडुळाने विष्ठेच्या स्वरूपात बाहेर टाकलेल्या मातीमध्ये सभोवतालच्या मातीच्या तुलनेत नायट्रोजन पाच पट, सल्फर सात पट, पोटॅशियम अकरा पट, तर मँगॅनीज आणि इतर सूक्ष्म अन्नद्रव्ये दुपटीने जास्त असतात. ही विष्ठा जमिनीतील पिकांना सेंद्रिय खत म्हणून उपयुक्त आहे. गांडुळाच्या शरीरातून म्हणजे त्वचेतून इतर काही द्रव्ये बाहेर पडत असतात. या द्रव्यांचाही उपयोग पिकांच्या वाढीसाठी होतो. मृत झालेल्या गांडुळाच्या शरीराचा देखील खत म्हणून उपयोग होतो. त्याचे शरीर लवकर कुजते आणि त्यातून जमिनीला नत्राचा पुरवठा होतो. सर्वसाधारणपणे मेलेल्या एका गांडुळापासून दहा मिलीग्रॅम नायट्रेट मिळते.

लुम्ब्रिसिडी कुलातील ईसेनिया फेटिडा (Eisenia fetida) ही मूळ युरोपातील गांडुळाची जाती गांडूळ खत प्रकल्पासाठी भारतात मुद्दाम आयात केली जाते. जमिनीच्या पृष्ठभागालगत त्याचा  वावर असतो. त्यामुळे साखर कारखान्याची मळी, कुजण्यायोग्य पाने, ऊस गाळल्यानंतरचे अवशेष इत्यादिंपासून गांडूळ खत बनविण्यासाठी ही जाती उपयुक्त आहे. त्यामुळे ४० ते ६० दिवसांत सेल्युलोजचे उत्तम खतामध्ये रूपांतर होते. या जातीच्या तांबड्या रंगामुळे या गांडुळाचे नाव ‘ब्लड वर्म’ असे पडले आहे. त्याची व्यवस्थितपणे हाताळणी केल्यास त्याच्या त्वचेमधून घाणेरडा वास सोडला जातो. त्यावरून तिचे नाव फेटिडा असे पडले आहे. म्यानमार, युगांडा व भारतात पाणी विरहित स्वच्छतागृहांमधील मलकुंडामध्ये (Septic tank) या गांडुळाचा वापर प्रायोगिक तत्त्वावर करण्याचे प्रयोग यशस्वी झाले आहेत.

गांडूळ : विविध जाती

नेहमीपेक्षा खूप मोठ्या आकाराच्या गांडुळांच्या जातीचा समावेश मेगॅस्कोलेक्सिडी (Megascolecidae) कुलात केला जातो. ऑस्ट्रेलियात आढळणाऱ्या मेगॅस्कोलेसीड ऑस्ट्रॅलिस (Megascolides australis) या गांडुळाची लांबी जवळजवळ ३ मी. असून हे जगातील सर्वांत मोठे गांडूळ आहे. महाराष्ट्रात मेगास्कोलेक्स कोकनेंसिस (Megascolex kokanensis) आणि बॅरोगॅस्टर प्रशाडी (Barogaster prashadi) या दोन जातींची मेगॅस्कोलेक्सिडी कुलात नोंद झाली आहे. महाराष्ट्रातील पश्चिम घाट वनांमध्ये जाड गांडुळासारखे दिसणारे देवगांडूळ आढळते. परंतु, ते उभयचर वर्गाच्या अपोडा (Apoda) गणातील असून त्याचा गांडुळाशी कसलाही संबंध नाही.

गांडुळाच्या शरीरात असलेल्या रक्त द्रवातील (Plasma) हिमोग्लोबिनमुळे त्याचा रंग तांबडा दिसतो. फेरेटिमा पोस्थ्यूमा  या गांडुळाचा रंग लाल-तपकिरी वा मातकट असतो. यूरोपमध्ये आढळणाऱ्या लुम्ब्रिकस टेरेस्ट्रिस (Lumbricus terrestris) या जातीचा रंग लालसर तपकिरी, ऑस्ट्रेलियात आढळणाऱ्या मेगॅस्कोलेसीड ऑस्ट्रॅलिस या जातीचा रंग निळसर करडा, तर ग्रेट ब्रिटनमध्ये आढळणाऱ्या अलोलोबोफोरा क्लोरोटिका (Allolobophora chlorotica) ही जाती हिरव्या रंगाची असते.

गांडुळामध्ये ऐकण्याची किंवा पाहण्याची क्षमता नसते. परंतु, ते प्रकाश आणि कंपनांच्या बाबतीत संवेदनशील असतात. तसेच गांडुळामध्ये पुनर्जननाची (शरीराचा नाहीसा झालेला भाग पुन्हा उत्पन्न करण्याची) क्षमता असते.

गांडूळ हे अनेक पक्षी आणि प्राण्यांचे खाद्य आहे. मासेमारीसाठी त्याचा आमिष (Fish bait) म्हणून वापर करतात, त्यामुळे त्याला एंजेल वर्म (Angle worm) असेही म्हणतात. गांडुळाचे आयुष्य सर्वसाधारणपणे ३—१० वर्षांचे असते.

पहा : ॲनेलिडा, ऑलिगोकीटा, कीटोपोडा, वलयी संघ.

संदर्भ :

  • https://www.britannica.com/animal/earthworm
  • https://scialert.net/fulltext/?doi=ijzr.2011.93.99
  • https://www.iaszoology.com/earthworm/
  • K N Bhal , Pheretima Indian Zoological Memoires
  • https://earthwormsofindia.com/about-earthworms-of-india.php
  • http://faunaofindia.nic.in/PDFVolumes/fi/028/index.pdf
  • http://www.ncbi.org.in/biota/fauna/

समीक्षक : सुरेखा मगर-मोहिते