(स्थापना : १४ सप्टेंबर २००७). भारतीय अंतराळ विज्ञान आणि तंत्रज्ञान (आयआयएसटी) ही शासकीय आर्थिक साहाय्य असलेली आणि विद्यापीठ मान्यता प्राप्त संस्था आहे. तिरुवअनंतपुरमच्या नेदुमनगल उपनगरात ही संस्था आहे. अंतराळ विज्ञानाचे प्रशिक्षण आणि संशोधनाचे शिक्षण देणारी ही आशिया खंडातील एकमेव संस्था आहे. इस्रो (इंडियन स्पेस रीसर्च ऑर्गनायझेशन) अवकाश विज्ञान विभाग यांच्या मदतीने ही संस्था उभारण्यात आली आहे. भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम हे या संस्थेचे पहिले कुलपती होते. नेहमीच्या अभियांत्रिकी शिक्षणाबरोबर येथे पदवी ते डॉक्टरेट पर्यन्तचे शिक्षण अंतराळ विज्ञान, तंत्रज्ञान आणि त्याचा प्रत्यक्ष उपयोग यावर दिले जाते.

भारतीय अंतराळ विज्ञान आणि तंत्रज्ञान संस्थेची इमारत

भारतीय अंतराळ विज्ञान क्षेत्रासाठी वैज्ञानिक आणि अभियंते यांची गरज पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवून विज्ञान व तंत्रज्ञान विभागाने पदवी, पदव्युत्तर आणि डॉक्टरेट पर्यंतचे शिक्षण व संशोधन करण्यासाठी विक्रम साराभाई स्पेस सेंटरच्या तिरुवनंतपुरम येथील परिसरात प्रारंभीच्या २७० कोटी रुपयांच्या भांडवलातून या प्रकल्पाची सुरुवात झाली. दरवर्षी चाळीस कोटी रुपयांच्या खर्चाची तरतूद अवकाश विज्ञान विभागाने केली होती. अंतराळ तंत्रज्ञानामधील बी.टेक. पदवी देणारी ही भारतातील एकमेव संस्था आहे. १४ जुलै २००८ ला मानव संसाधन विकास मंत्रालयाने विद्यापीठ अनुदान आयोगाच्या सल्ल्याने या संस्थेस मानद विद्यापीठाचा दर्जा पाच वर्षांच्या कालावधीसाठी बहाल केला.

भारतीय अंतराळ विज्ञान आणि तंत्रज्ञान संस्था पदवी-पदव्युत्तर आणि डॉक्टरेट अंतराळ विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्राशिवाय मूलभूत विज्ञान आणि डॉक्टरेटनंतर संशोधनातील संधीसुद्धा येथे उपलब्ध करून देत. २०१३ पर्यन्त बी.टेक. पदवीसाठी अंतराळ, विमानविज्ञान आणि भौतिकशास्त्र यातील पदवी दिली जात होती. २०१४ नंतर मात्र पदवी आणि पदव्युत्तर बी.टेक., एम.टेक.साठी पाच वर्ष कालावधीसाठीचा अभ्यासक्रम आखण्यात आला. वायुगतिकी खगोलविज्ञान आणि खगोलभौतिकी, भूविज्ञान, एम.टेक. मशीन लर्निंग आणि कॉम्प्यूटिंग, भूमाहिती विज्ञान, उड्डाण विज्ञान, कंट्रोल सिस्टीम, डिजिटल सिग्नल प्रोसेसिंग, सूक्ष्मलहरी इंजिनियरिंग, ऑप्टिकल इंजिनियरिंग, पॉवर इलेक्ट्रॉनिक्स अशा विविध विषयातील तंत्रज्ञानविषयक शिक्षण येथे मिळते. सध्या विज्ञान शाखेतील गणित, भौतिकी, रसायन, अर्थ आणि अवकाश विज्ञान व तंत्रज्ञान विभागात अवकाश अभियांत्रिकी, विमानविज्ञान व मानव्य हे विभाग सुरू आहेत.

भारतीय अंतराळ विज्ञान व तंत्रज्ञान संस्थेचे काही आंतरराष्ट्रीय विद्यापीठे व संस्थाबरोबर सामंजस्य करार झाले आहेत. सामंजस्य करार झालेल्या संस्थेमध्ये विद्यार्थ्यांना संयुक्त संशोधन करण्याची संधी मिळते. या संस्थेमध्ये कॅलटेक युनायटेड स्टेटस, जेट प्रॉपलशन लॅबोरेटरी युनायटेड स्टेटस, कॉलोराडो युनिव्हर्सिटी बौल्डर युनायटेड स्टेटस, टेकह्निऑन – इस्रायल, केंब्रिज युनिव्हर्सिटी–युनायटेड किंगडम, नानयंग टेक्नॉलॉजीकल युनिव्हर्सिटी सिंगापूर यांचा समावेश आहे. इस्रो व अवकाश विज्ञान, उच्च क्षमता इंधन निर्मिती, संदेशवहन, संदेश ग्रहण, उपग्रह निर्मिती, अग्निबाण निर्मिती अशा वीसहून अधिक संस्थांमधून आवश्यक तंत्रज्ञ व संशोधक या संस्थेमधून उपलब्ध झाल्याने कुशल प्रशिक्षित तंत्रज्ञ तयार करणे व त्यांना  सामावून घेण्याने जागतिक पातळीवर इस्रो आपले स्थान टिकवून आहे. भारतीय अंतराळ विज्ञान व तंत्रज्ञान संस्थेचे भारतीय पातळीवरील २०२३ साली केलेले नामांकन ४८ व्या क्रमांकाचे आहे.

कळीचे शब्द : #वायुगतिकी #खगोलविज्ञान #खगोलभौतिकी #भूविज्ञान #मशीन लर्निंग आणि कॉम्प्यूटिंग #भूमाहितीविज्ञान #उड्डाण विज्ञान  #कंट्रोल सिस्टीम #डिजिटल सिग्नल प्रोसेसिंग #सूक्ष्मलहरी #इंजिनियरिंग #ऑप्टिकल इंजिनियरिंग #पॉवर #इलेक्ट्रॉनिक्स

संदर्भ :

समीक्षक : किशोर कुलकर्णी