जठर हा अन्नमार्गातील सर्वांत रुंद व फुगीर पिशवीसारखा स्नायुयुक्त भाग आहे. मानवी शरीरात जठर वरील बाजूस ग्रासनलीमध्ये / ग्रसिकामध्ये (घशापासून जठरापर्यंतचा अन्ननलिकेचा भाग) आणि खालील बाजूस जठर पोकळी आद्यांत्रामध्ये (लहान आतड्याच्या सुरुवातीचा भाग) उघडते. जठराचा आकार इंग्रजी J अक्षराप्रमाणे असतो. जठर उदर पोकळीत डाव्या बाजूस श्वासपटलाखाली असते. जठर व लहान आतड्याचा प्रारंभ यांच्यामधील पोकळीत स्वादुपिंड (Pancreas) असते.

मानवी शरीरातील जठराचे स्थान

रचना : जठराच्या आतील वळणास लघुवक्र कडा व बाहेरील वळणास दीर्घवक्र कडा म्हणतात. प्रौढ व्यक्तीमध्ये जठराच्या लघुवक्र कडेची लांबी ७-८ सेंमी., तर दीर्घवक्र कडेची लांबी २२-२३ सेंमी. असते. रिकाम्या जठराचे आकारमान सु. ७५ मिली. असते. जठर प्रसरणशील असल्याने त्यामध्ये सु. १ लि. अन्न सामावते. नुकत्याच जन्मलेल्या बालकाचे जठर फक्त ३० मिली. इतकेच अन्न सामावून घेऊ शकते. प्रौढ व्यक्तीमध्ये मात्र आहाराच्या सवयीप्रमाणे ही क्षमता २–४ लि.पर्यंत असू शकते.

उदर पोकळीतील सर्व अवयव (जठर, यकृत, स्वादुपिंड, वृक्क, लहान आतडे) व उदर पोकळीचे आतील आवरण यांवर एका चिवट अस्तराचे संरक्षक आवरण असते, त्यास उदरच्छद (Peritoneum) असे म्हणतात. त्यामुळे उदर पोकळीतील सर्व अवयव जिथल्या तिथे राहतात. जठर, लहान आतडे अशा अवयवांवर हे आवरण दुहेरी असते. जठर व ग्रासनली जेथे एकत्र येते तेथे आणि जठर व लहान आतडे यांच्यामध्ये एक परिसंकोची झडप (Sphincter) असते. अन्न जठरामध्ये येण्यासाठी व जठरातील अन्न पुढे लहान आतड्यात थोडे थोडे बाहेर जाण्यासाठी या झडपेचा उपयोग होतो.

मानवी जठर : रचना

जठराचे सामान्यपणे चार भाग केले आहेत. जठराचा हृदयाजवळील भाग हृदयस्थ (Cardiac stomach), उदर पोकळी व छातीची पोकळी हे विभागणाऱ्या मध्यपटलाजवळील भागास बुध्न (Fundus; वळणदार किंवा वक्राकार), जठराच्या सर्वांत मोठ्या पिशवीसारख्या भागास जठरकाय (Body) व जठराच्या अंतिम भागास जठरनिर्गम (Pyloric) अशी नावे आहेत. जठरबुध्नाचा आकार घुमटाकार असून बुध्न अंत:त्वचेतील ग्रंथी श्लेष्मा स्रवतात. जठरकाय भागाच्या आतील बाजूस अनेक घड्या असतात. जसजसे अन्न जठरात साठत जाते तसतशा या घड्या उलगडल्या जातात. अशाने जठराचा आकार मोठा होतो. जठरातील अन्नाचे बहुतांश पचन जठरकाय भागात होते. जठरनिर्गम भागातील थोडे थोडे अन्न लहान आतड्यात परिसंकोची झडपेमधून जाते.

जठर भित्ती स्तर

अन्ननलिका चार स्तरांची बनलेली असते. सर्वांत बाह्य स्तर चिवट सीरमी पटलांनी (Serosa) बनलेला असतो. कोलॅजेन तंतू थर व संयोजी ऊतींनी बनलेला हा थर म्हणजे अन्ननलिकेचे बाह्य आवरण असते. सीरमी पटलाखाली स्नायुस्तर (Muscle layer) असतो. स्नायूंची रचना वर्तुळाकार व उभ्या स्नायू खंडांची असते. या स्नायू स्तरामुळे अन्ननलिकेचा क्रमसंकोच होत असतो. स्नायू स्तराखाली अवश्लेष्मल पटल (Submucosa; अव म्हणजे खाली सर्वांत आतील श्लेष्मल पटलाखालील स्तर) असते. जठराच्या सर्वांत आतील श्लेष्मल पटलामध्ये (Mucosa) जठर ग्रंथी असतात.

जठर ग्रंथी (Gastric glands) : जठराच्या श्लेष्मल स्तरामध्ये असंख्य खळग्यांमध्ये जठर ग्रंथी उघडतात. त्यांच्या स्थानांप्रमाणे त्यांना हृदयस्थ ग्रंथी (Cardiac glands), बुध्न ग्रंथी (Fundic glands आणि जठरनिर्गम ग्रंथी (Pyloric glands) म्हणतात. हृदयस्थ ग्रंथीमध्ये श्लेष्मल द्रव अधिक प्रमाणात, तर बुध्न ग्रंथीमध्ये पेप्सिनोजेन व हायड्रोक्लोरिक अम्ल अधिक स्रवते.  जठराच्या अंतिम भागातील ग्रंथीमध्ये श्लेष्म अधिक स्रवते. काही विखुरलेल्या पेशी गॅस्ट्रीन संप्रेरक तयार करतात. अन्न जठरात आल्याशिवाय जठर ग्रंथीमधून जठर रस स्रवण्यास प्रारंभ होत नाही. एकदा अन्न जठरात आले म्हणजे गॅस्ट्रीन संप्रेरकाच्या प्रभावाखाली जठर रस स्रवतो. जठर ग्रंथीचे तोंड जठर पोकळीत उघडते. ज्या नलिकेतून जठर रस पोकळीपर्यंत येतो, त्यास ग्रीवा (ग्रंथीची सुरईच्या आकाराची मान) म्हणतात. प्रत्यक्ष जठर ग्रंथीमध्ये तीन ते चार प्रकारच्या पेशी असतात. ग्रंथीमध्ये ग्रीवेच्या खालील भागात असलेल्या मुख्य पेशी (Chief cells) कणांच्या स्वरूपात पेप्सिनोजेन विकर स्रवतात. ग्रंथीमध्ये अधून मधून हायड्रोक्लोरिक अम्ल स्त्रवणाऱ्या भित्तीय पेशी (Parietal Cell) असतात, त्यास अम्ल स्रावी पेशी म्हणतात. ग्रीवा व जठर ग्रंथी ज्या भागातून जठर पोकळीत उघडते त्या भागातील पेशी श्लेष्म स्रवतात.

जठर ग्रंथी

कार्य : जठराचे मुख्य कार्य अन्न थोडा वेळ साठवून ठेवणे हे आहे. जठराच्या स्नायूमुळे जठररस व अन्न यांचे पिष्टी (पेस्टसारखे) मिश्रण तयार होते. जठर पोकळीत अन्नासोबत पेप्सिनोजेन व हायड्रोक्लोरिक अम्ल एकत्र येते. पेप्सिनोजेन व हायड्रोक्लोरिक अम्ल एकत्र आल्यावर पेप्सिनोजेनचे सक्रिय पेप्सिन विकरामध्ये रूपांतर होते. पेप्सिन विकर फक्त अम्ल द्रावणातच कार्यशील आहे. हायड्रोक्लोरिक अम्ल जठरातील मिश्रणाचा सामू २ असा राखून ठेवते. पेप्सिन अन्नामधील फक्त प्रथिनाचे विघटन करून त्याचे बहुपेप्टाइडामध्ये रूपांतर करते. प्रथिनाच्या पेप्टाइड बंधावर पेप्सिनची क्रिया झाल्याने मोठ्या प्रथिन रेणूंचे लहान बहुपेप्टाइडे तयार होतात. अन्नाच्या घुसळल्याने अन्न मिश्रणाचे रूपांतर पातळ आंब (Chyme; Partially digested food) यामध्ये होते. ही प्रक्रिया सु. ४० मिनिटे ते काही तासांमध्ये पूर्ण होते. जठर स्नायूंच्या क्रमसंकोची हालचालींमुळे ही आंब जठराच्या शेवटी असलेल्या द्वारातून आतड्याच्या सुरुवातीच्या भागात येते.

हायड्रोक्लोरिक अम्लामुळे अन्नाबरोबर आलेले जीवाणू नष्ट होतात. अन्नरेणूंचे विघटन होण्यासही हायड्रोक्लोरिक अम्ल मदत करते. जठर पोकळीत प्रथिनांचे विघटन होऊन बहुपेप्टाइडे तयार होत असली तरी जठराच्या भित्तिकेचे श्लेष्म थरामुळे रक्षण होते. स्वयं विघटन घडू नये यासाठी श्लेष्म थर महत्त्वाचा आहे. काही कारणाने जठरामध्ये अधिक हायड्रोक्लोरिक अम्ल स्रवले तर जठराच्या आतील थरामध्ये व्रण (Gastric ulcer) तयार होतात. दूध पिणाऱ्या अर्भकांच्या जठरात पेप्सिन सोबतच रेनिन नावाचे विकर असते. रेनिन विकर दुधातील केसीन प्रथिनाचे विघटन करते. परंतु, जसे जसे आहारातील दुधाचे प्रमाण कमी होते तसे जठरातील रेनिन स्रवणे बंद होते.

जठरामधील प्रथिन विघटनाची क्रिया

पाणी, ॲस्पीरिनसारखी औषधे, प्रतिजैविके, पाण्यात विरघळणारी जीवनसत्त्वे व अल्कोहॉल जठराच्या अंत:त्वचेतून शोषले जातात. गॅस्ट्रीनमुळे पेप्सिनोजेन व हायड्रोक्लोरिक अम्ल स्रवणे सुरू होते. एकदा जठरातील आंब लहान आतड्यात गेली म्हणजे जठराची हालचाल थांबते. जठरात प्रथिनांचे विघटन होत असल्याने कर्बोदके व मेदयुक्त पदार्थ अधिक असलेले अन्न जठरातून लवकर बाहेर पडते.

जठराला उदरगुहा वाहिनीमधून डाव्या व उजव्या जठर धमन्यांमधून रक्तपुरवठा होतो. त्यांच्याच बाजूने धावणाऱ्या डाव्या व उजव्या जठर शिरा जठराकडून यकृतामध्ये जाणाऱ्या शिरेत, तर काही आतड्याकडून हृदयाकडे जाणाऱ्या शिरांमध्ये प्रवेश घेतात. जठराला स्वायत्त चेतासंस्थेकडून चेतापुरवठा होतो. जठराच्या तंत्रिका अनुकंपी व परानुकंपी तंत्रिकापुंजाच्या शाखा असतात. बाराव्या कर्पर चेतेची एक शाखा (Gastric nerve of Vagus) जठरापर्यंत आलेली असते.

पहा : पचन तंत्र (पूर्वप्रकाशित नोंद).

संदर्भ :

  • https://www.britannica.com/science/stomach
  • https://www.ncbi.nlm.nih.gov/books/NBK482334/
  • https://my.clevelandclinic.org/health/body/21758-stomach
  • https://healthjade.net/what-is-the-stomach

                                                                                                  समीक्षक : नंदिनी देशमुख