विचार करणारा, प्रगल्भ बुद्धिप्रधान, प्रत्यक्षात शारीरिक दृष्ट्या अधिक प्रगत असलेला आधुनिक मानव. त्यालाच शास्त्रीय भाषेत ‘सेपियन मानव’ (होमो सेपियन) असे म्हणतात. या मानवांचा उदय आणि ते आफ्रिकेतून बाहेर पडून जगभर पसरण्याची कहाणी विसाव्या शतकात प्रामुख्याने गेल्या एक लाख वर्षांपुरती मर्यादित होती. याचे कारण म्हणजे गेल्या एक लाख वर्षांमधले मानवी जीवाश्म जगात अनेक ठिकाणी आढळले आहेत. तथापि १९८७ नंतर सूत्रकणिकांमधील (मायटोकॉन्ड्रिया) डीएनए (डीऑक्सिरायबोन्यूक्लिइक ॲसिड) रेणूंच्या अभ्यासातून असे चित्र पुढे आले की, जगभरातील सर्वांचीच माता सुमारे १,५०,००० ते २,००,००० वर्षांपूर्वी आफ्रिकेत अस्तित्वात होती. तिला ‘ईव्ह’ असे नाव देण्यात आले; तथापि या नावाचा आणि ख्रिश्चन धर्मकथांमधील आदम-ईव्ह जोडप्याचा काहीही संबंध नाही. वैज्ञानिकांनी केवळ सोयीसाठी हे नाव दिलेले आहे. तसेच सर्वचजण या एकाच स्त्रीचे वंशज नसून अशा अनेक आद्य स्त्रियांचा समूह होता.
डीएनए रेणूंवरील संशोधनानुसार असे दिसते की, आजच्या मानवजातीमधील सर्वांच्या पूर्वज असलेल्या आद्य स्त्रियांचा समूह आफ्रिकेत दीड लाख वर्षांपूर्वी अस्तित्वात होता. म्हणजेच आधुनिक मानव किमान तेवढे प्राचीन आहेत. अर्थात या मताला दुजोरा देणारे इतर पुरावे त्या वेळी नव्हते; परंतु लवकरच हे चित्र बदलले. याचे कारण म्हणजे इथिओपियात १९९७ मध्ये हर्टो या ठिकाणी १,६०,००० वर्षपूर्व या काळातले मानवी जीवाश्म मिळाले. त्यानंतर दोनच वर्षांनी इथिओपियातच ओमो किबिश येथे मिळालेल्या मानवी जीवाश्मांचा काळ १,९५,००० वर्षपूर्व असल्याचे दिसले. तथापि १९६७ मध्ये मिळालेल्या ओमो-१ व ओमो-२ या मानवी कवट्यांचा काळ पूर्वी ठरवलेल्या काळापेक्षा जुना म्हणजे सुमारे २,३३,००० वर्षपूर्व असल्याचे अलीकडील संशोधनातून पुढे आले आहे (२०२२).
दक्षिण आफ्रिकेत आधुनिक मानवांशी साम्य असणारे २,६०,००० वर्षपूर्व काळातले काही जीवाश्म या अगोदरही मिळाले होते; परंतु आधुनिक मानव इतके प्राचीन असतील असे कोणालाच वाटत नव्हते. या कहाणीला २०१७ मध्ये एकदम निराळीच कलाटणी मिळाली. मोरोक्कोत जेबेल इरहाउड येथे मिळालेले आधुनिक मानवांचे जीवाश्म ३,१५,००० (कमी अधिक ३४०००) वर्षपूर्व काळातले असल्याचे सिद्ध झाले. या पुराव्यावरून असे सूचित झाले की, आधुनिक मानवांची उत्पत्ती कदाचित आपल्याला वाटते त्यापेक्षा कितीतरी अगोदर झाली असावी.
जेबेल इरहाउड येथे आधुनिक मानवांचे जीवाश्म मिळाल्यानंतरही हे मानव आफ्रिकेतून बाहेर पडण्याचा काळ एक लाख वर्षपूर्व असावा, असे सर्वसाधारणपणे दिसत होते. या पारंपरिक विचाराला २०१८ मध्ये पहिले आव्हान मिळाले. इझ्राएलमधील माउंट कार्मेल पर्वतात असलेल्या मिसलिया नावाच्या गुहेत मिळालेला एक मानवी जबडा १,९४,००० ते १,७७,००० वर्षपूर्व या काळातला आहे. आफ्रिकेबाहेरील आधुनिक मानवांचा हा सर्वांत जुना पुरावा असल्याने ते मानव आफ्रिकेतून बाहेर पडणे किमान ६०,००० वर्षे अगोदरच घडल्याचे स्पष्ट झाले आहे. या अगोदर इझ्राएलमधील स्खूल व काफ्जेह येथे मिळालेले जीवाश्म आफ्रिकेबाहेरील आधुनिक मानवांचे सर्वांत जुने पुरावे होते. त्यांचा काळ १,२०,००० ते ९०,००० वर्षपूर्व असा होता.
चीनमधील शान्सी (Shaanxi) प्रांतात १९७८ मध्ये सापडलेल्या मानवी जीवाश्मांमध्ये एक कवटी दाली कवटी (Dali Cranium) म्हणून प्रसिद्ध आहे. ही कवटी पूर्वी मोरोक्कोमध्ये सापडलेल्या सेपियन मानवी कवटीसारखीच आहे. तिचा काळ २,६७,००० (कमीअधिक १३,९००) वर्षपूर्व असा आहे.
चीनमध्येच ग्वांगझी (Guangxi) प्रांतात २००९ मध्ये एका गुहेत आधुनिक मानवाचा एक जबडा मिळाला. या जीवाश्माचा काळ १,१०,००० वर्षपूर्व असा आहे. या मानवाची हनुवटी आधुनिक मानवाप्रमाणे असली तरी हाडाची अधिक जाडी कमी प्रगत होमिनिनचे निदर्शक होती. हा दोन जातीमधील संकराचा परिणाम असावा. २०१५ मध्ये चीनमधील हूनान प्रांतातील दाओक्सिआन (Dioxian) येथील फुयान गुहेत १३ आधुनिक मानवांचे १,२०,००० ते ८०,००० वर्षपूर्व काळातील दात मिळाले. या सर्व पुराव्यांवरून असे दिसते, की आधुनिक मानव आफ्रिकेतून खूपच अगोदरपासून बाहेर पडून चीनपर्यंत पसरत गेले होते. या संदर्भात चीनमधील लिउजिआंग (Liujiang) येथे मिळालेली कवटी हा महत्त्वाचा पुरावा आहे. ही आधुनिक मानवाची कवटी ६८,००० वर्षपूर्व या काळातील आहे.
आधुनिक मानवांचा विस्तार जगभरात कसा होत राहिला हे जीवाश्मांच्या पुराव्यांवरून स्पष्ट होते. चीनमध्ये १,२०,००० ते ६०,००० वर्षपूर्व काळात स्थिरावलेले आधुनिक मानव ऑस्ट्रेलियात ६५,००० ते ५०,००० वर्षपूर्व या काळात, यूरोपात ४५,०००-४३,००० या दरम्यान तर अमेरिका खंडात १५,०००-१३,३०० या काळात पोहोचलेले दिसतात. आधुनिक मानवांचा यूरोपातील प्रवेश तुलनेने अलीकडच्या काळातला आहे. यूरोपात आधुनिक मानवांचे अस्तित्व दाखवणारे पहिले जीवाश्म १८६८ मध्ये दक्षिण फ्रान्समधील क्रो-मॅग्नॉन या शैलाश्रयात मिळाले होते. तेथे चार प्रौढ माणसे व एका अर्भकाचे अवशेष मिळाले होते. त्यांचा काळ ३२,००० ते ३०,००० वर्षपूर्व असा आहे. या अवशेषांचे महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे या सर्वांना मुद्दाम एकत्र पुरण्यात आले असून त्यांच्याबरोबर काही वस्तू जाणीवपूर्वक ठेवलेल्या आढळल्या. यांतील यातील एका प्रौढ पुरुषाचा जीवाश्म क्रो-मॅग्नॉन मानव या नावाने प्रसिद्ध आहे. [⟶ पुराप्राणिविज्ञान; मानवप्राणि].
आधुनिक मानव आफ्रिकेतून बाहेर पडून जगभर पसरले ही घटना एकापेक्षा जास्त वेळा घडली असावी, असे दर्शवणारे संशोधन पुढे आले आहे. आजवर मिळालेल्या मानवी जीवाश्मांच्या काळानुसार व शारीरिक वैशिष्ट्यांनुसार त्यांचे प्रारंभिक आधुनिक मानव आणि शारीरिकदृष्ट्या अधिक प्रगत आत्ताचे आधुनिक मानव असे सोयीसाठी दोन गट मानले जातात. प्रारंभिक आधुनिक मानवांची कवटी तुलनेने जाड होती. त्यांच्या भुवईखाली हाडाचा ठळक उंचवटा होता आणि त्यांना स्पष्ट अशी हनुवटी नव्हती. अनेकदा आत्ताच्या शारीरिकदृष्ट्या अधिक प्रगत आधुनिक मानवांना सेपियन मानव असे म्हणतात. तर निअँडरथल मानवांचा समावेश सेपियन जातीची एक उपजाती अशा प्रकारे सेपियन-निअँडरथल मानव असा केला जातो.
भारतीय उपखंडात सापडलेले मानवी जीवाश्म फारच कमी आहेत. नर्मदा नदीच्या खोऱ्यात हथनोरा, नेताखेडी, गुर्ला, उमरिया, देवाकाचार, बुधनीघाट व धनाघाट या अवघ्या सात ठिकाणी मानवी जीवाश्म मिळाले आहेत. त्यांची संख्या फक्त १५ आहे. नर्मदा नदीच्या काठावर वसलेल्या मध्य प्रदेशातील हथनोरा (जि. सीहोर) या स्थळावर भारतीय भूवैज्ञानिक अरुण सोनकीया यांच्या नेतृत्वाखालील भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण (जी एस आय) पथकाने १९८२ मध्ये मानवी कवटीचे जीवाश्म शोधून काढले. याशिवाय धनसी (जि. होशंगाबाद) येथील नर्मदेच्या उत्तरेकडील तीरावर सर्वांत जुन्या नामशेष हत्तीचे (स्टेगोडॉन) दात आणि वरच्या जबड्याचे जीवाश्म शोधून काढले. हथनोरा येथे मिळालेल्या कवटीचा तुकडा आणि नेताखेडी येथील मांडीच्या हाडाचा तुकडा २,५०,००० ते २,००,००० वर्षपूर्व या काळातले आहेत, तर हथनोरा येथील इतर जीवाश्मांचा काळ १,५०,००० ते १,००,००० वर्षपूर्व असा आहे. नेताखेडी येथेच मिळालेल्या हाताच्या हाडाचा काळ सुमारे ७५,००० वर्षपूर्व असा आहे. नर्मदा नदीच्या खोऱ्यातील मानवांना नेमके कोणत्या जातीत समाविष्ट करावे याबद्दल अनेक मते आहेत. प्रारंभी त्यांचा समावेश आशियाई इरेक्टस मानवामध्ये केला होता. तसेच हे जीवाश्म मोठ्या आकाराचा मेंदू असलेल्या हायडल्बर्ग मानवासारख्या कोणत्यातरी वेगळ्या मानव जातीचे असावेत, असे मत मांडण्यात आले होते. या जीवाश्मांमध्ये दणकट बांध्याच्या, उंच (सुमारे १६०-१६४ सेंमी.) व मोठ्या आकाराचा मेंदू असलेल्या मानवांचे अवशेष आहेत. या खेरीज तेथे कमी उंचीच्या (सुमारे १३५-१४५ सेंमी.) पण मजबूत बांध्याच्या मानवांचे अस्तित्व असल्याचे दिसून आले आहे. त्यांच्यासाठी वेगळी ⇨नर्मदा मानव (होमो नर्मदेन्सिस) म्हणजे नर्मदा नदीच्या खोऱ्यातील मानव ही जात सुचवण्यात आली आहे; तथापि तिला मान्यता मिळालेली नाही. भारतीय उपखंडातील कमी उंचीच्या पण मजबूत बांध्याच्या लोकांचा आणि अंदमानातील पिग्मींप्रमाणे छोट्या आकाराच्या लोकसमूहांचा उगम अशा प्रकारच्या जातीतून अथवा आधुनिक मानवांच्याच उपजातीपासून झाला असावा असे दिसते.
आपल्या पूर्वजांपेक्षा सर्वसाधारणपणे हलक्या वजनाची अस्थिसंस्था आणि मोठ्या आकाराचा मेंदू व अशा मोठ्या मेंदूला सामावून घेतल्याने कवटीची झालेली विशिष्ट रचना ही आधुनिक मानवांची महत्त्वाची शारीरिक वैशिष्ट्ये आहेत. आधुनिक मानवांच्या मेंदूचे आकारमान सरासरी १३०० घ.सेंमी. असले तरी जगभरातील लोकसमूहांमध्ये त्यात प्रचंड वैविध्य आढळते. आधुनिक मानवांची कवटी पूर्वजांपेक्षा तुलनेने कमी जाडीची व काहीशी उंच असून कपाळ सरळ उभे व सपाट आहे. तसेच आधीच्या मानवांपेक्षा आधुनिक मानवांमध्ये भुवईखाली कमी उंचवटा आढळतो. दातांचा आकारही तुलनेने कमी आहे. पुराजीवविज्ञानात जीवाश्मांचे वर्णन करताना तुलनेसाठी प्रत्येक जातीसाठी एक नमुना ‘प्रमाण नमुना’ (होलोटाइप) मानला जातो. परंतु आधुनिक मानवांच्या शरीररचनेत, बाह्य शारीरिक लक्षणांमध्ये व आकारातही प्रचंड विविधता असल्याने असा कोणताही प्रमाण नमुना नाही. स्वीडिश वैज्ञानिक कार्ल लिनीअस (१७०७-१७७८) यांनी १७५८ मध्ये आपल्या जातीला होमो सेपियन (सेपियन मानव) हे नाव दिले, तेव्हा असा प्रमाण नमुना मानण्याची पद्धत नव्हती. एडवर्ड ड्रिंकर कोप (१८४०-१८९७) या विख्यात अमेरिकन पुराजीववैज्ञानिकांनी त्यांचे शरीर विज्ञानाला दान केले होते. त्यांच्या मृत्यूनंतर त्यांची जी कवटी पेनसिल्व्हेनिया विद्यापीठात आहे, ती सेपियन मानवाचा प्रमाण नमुना मानावी असे रॉबर्ट बाकर यांनी १९९४ मध्ये सुचवले होते. परंतु ते मान्य झालेले नाही.
आधुनिक मानवांची शरीररचना इतर कपिंप्रमाणेच असली व प्रायमेट (नरवानर गण) प्राणी म्हणून असलेली काही वैशिष्ट्ये टिकून राहिलेली असली, तरी आजूबाजूच्या बदलत्या परिस्थितीशी जुळवून घेण्यासाठी शरीरबाह्य सांस्कृतिक साधनांचा शोध लावणे आणि आजूबाजूची परिस्थिती बदलण्याची क्षमता हे महत्त्वाचे वैशिष्ट्य फक्त आपल्या जातीकडे आहे. तसेच फक्त आपल्या जातीला इतिहासाचे म्हणजे भूतकाळाचे भान आहे. काल व अवकाश यांच्या संकल्पना, प्रगत बुद्धीमुळे आपण कोण आहोत अशा प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी निर्माण झालेले तत्त्वज्ञान, परस्पर संवादासाठी रंग, शब्द, प्रतीके व भाषेचा वापर आणि सृजनशील मन ही वैशिष्ट्ये इतर कोणत्याही प्राण्याकडे नाहीत. त्यामुळेच अग्नीचा अचूक उपयोग ओळखण्यापासून मानवी संस्कृतीचा जो प्रवाह सुरू झाला त्यानंतर आपण आपल्या तीन लाख वर्षांपूर्वीच्या पूर्वजांपेक्षा कितीतरी बदललो आहोत. आपण आधुनिक मानव आता कृत्रिम सजीवच तयार करण्यासाठी सज्ज झालो आहोत. तसेच आपल्या ग्रहाबाहेर पडून इतरत्र आपल्यासारखे कोणी आहे का याचा शोध घेतो आहोत. याचवेळी पर्यावरणात वाईट बदल घडवताना स्वतःचा संपूर्ण विनाश घडवण्याची भयंकर क्षमताही आपण मिळवली आहे.
संदर्भ :
- Scerri, E. M.; Will, M., ‘The revolution that still isn’t: The origins of behavioral complexity in Homo sapiens’, Journal of Human Evolution, Vol. 179, 2023. https://doi.org/10.1016/j.jhevol.2023.103358
- Stringer, Chris, ‘The origin and evolution of Homo sapiens’, Philosophical Transactions of The Royal Society B, 371:1-12, 2016. https://royalsocietypublishing.org/doi/10.1098/rstb.2015.0237
- White, Tim D.; Asfaw, B.; DeGusta, D.; Gilbert, H.; Richards, G. D.; Suwa, G.; Howell, F. C. ‘Pleistocene Homo sapiens from Middle Awash, Ethiopia’, Nature, 423 (6491) : 742–747, 2003. https://doi.org/10.1038%2Fnature01669
छायाचित्र संदर्भ :
- आधुनिक मानवांचे जीवाश्म, जेबेल इरहाउड (मोरोक्को). Higham, Tom, ‘The World Before Us’
- इझ्राएलमधील स्खूल येथे मिळालेला जीवाश्म. (smithsonian.org)
- क्रो-मॅग्नॉन जीवाश्म कवटी (smithsonian.org)
- नर्मदा नदीच्या खोऱ्यातील मानवी जीवाश्म (ए. आर. संख्यन, २०२०).
समीक्षक : मनीषा पोळ