पुरामानववैज्ञानिकांनी मानवी जीवाश्मांतील नव्याने सुचवलेली परंतु सर्वमान्य न झालेली एक जाती. इथिओपियात आवाश नदीच्या खोऱ्यात बोडो डी`आर (Bodo D`ar) या ठिकाणी संशोधक जॉन ई. काल्ब यांच्या नेतृत्वाखालील मोहिमेतील सदस्यांना १९७६ मध्ये एक कवटी मिळाली होती. तिचे नाव ‘बोडो कवटी’ (Bodo cranium) असून काळ ६,००,००० वर्षपूर्व आहे.
कॅनडामधील विनिपेग विद्यापीठातील पुरामानववैज्ञानिक मिर्जाना रोक्सांडिक व तिच्या सहकाऱ्यांनी या कवटीचा २०२१ मध्ये पुन्हा अभ्यास केला. तसेच त्यांनी आत्तापर्यंत ऱ्होडेशिएन मानव व हायडल्बर्ग मानव असे वर्गीकरण केलेल्या इतर जीवाश्मांचा फेरआढावा घेतला. झँबियात काबवे (पूर्वीचा ऱ्होडेशिया) येथील काबवे-१ (ब्रोकन हिल कवटी) हा जीवाश्म, उत्तर टांझानियातील लेक नडूटू किंवा एनडूटू (Ndutu) येथील जीवाश्म कवटी आणि दक्षिण आफ्रिकेतील इलान्ड्सफोन्तेन (Elandsfontein) येथे मिळालेली साल्दान्हा कवटी (Saldanha cranium) यांचा सखोल अभ्यास करून त्यांनी या अवशेषांसाठी २०२२ मध्ये बोडो मानव (होमो बोडोएन्सिस) ही नवीन जात सुचवली आणि ही जात सेपियन म्हणजेच आधुनिक मानवांची थेट पूर्वज असावी, असेही मत व्यक्त केले. बोडो कवटीवरून या जातीस ‘बोडो मानव’ हे नाव दिले असावे, असा काही संशोधकांचा अंदाज आहे. तर बोडो मानव हे नाव बोडो डी`आर या नावापासून घेतले असावे, असेही काही संशोधकांना वाटते.
रोक्सांडिक व त्यांचा चमू यांच्या मते, हायडल्बर्ग मानव असे नामकरण झालेल्या जीवाश्मांमध्ये एवढे शारीरिक वैविध्य आहे की, एकसंध जात म्हणून या जीवाश्मांचा विचार करणे तर्कसंगत नाही. तसेच आफ्रिका खंडातील ज्या मानवी जीवाश्मांचे वर्गीकरण करताना अडचणी येतात त्यांना कुठेतरी ढकलण्यासाठी हायडल्बर्ग मानव ही जात सोईस्कर ठरते, आणि म्हणून हे नाव पूर्णपणे बाद केले पाहिजे असे त्यांनी सुचवले आहे. तसेच ऱ्होडेशिएन मानव हे नाव वापरल्याने ब्रिटिश काळात झँबियात वंशभेद व दडपशाही करणाऱ्या खाणउद्योगसम्राट, राजकारणी सेसिल जॉन ऱ्होड्स (१८५३-१९०२) याचा अनाठायी गौरव होतो, म्हणून हे नाव वापरणे टाळावे, असेही रोक्सांडिक व तिच्या सहकाऱ्यांना वाटते; तथापि ब्रिटिश भौतिक मानववंशशास्त्रज्ञ ख्रिस स्ट्रिंगर यांच्यासारख्या अनेक अभ्यासकांना हे मान्य नाही. स्ट्रिंगर यांनी २०१९ मध्ये संशोधनातून असे दाखवून दिले की, बोडो डी`आर येथील कवटी ज्या जातीची आहे तिची उत्क्रांतीवृक्षावरील शाखा आधुनिक मानवांच्या शाखेपेक्षा निराळी आहे. तसेच त्यांच्या मते जर ऱ्होडेशिएन मानव नाव नको असेल तर अगोदरच उपब्लध असलेल्या इतर पर्यायांचा विचार करायला हवा. दक्षिण आफ्रिकेतील इलान्ड्सफोन्तेन येथे मिळालेल्या साल्दान्हा कवटीचा अभ्यास करून १९५०-६० या दशकात साल्दान्हा मानव (होमो साल्दानेन्सिस) हे नाव मॅथ्यू ड्रेनन यांनी सुचवले होते. जर काही जुन्या जीवाश्मांच्या वर्गीकरणाचा फेरविचार करायचा असेल तर बोडो मानव ऐवजी हे नाव स्वीकारणे मानव जातींच्या नामकरणाच्या नियमांना धरून होईल, असा मतप्रवाह पुरामानवविज्ञानात आहे.
संदर्भ :
- Roksandic, M.; Radović , P.; Wu, X‐J and Bae, C. J. “Homo bodoensis and why it matters”, Evolutionary Anthropology, 2022.
- Roksandic, M.; Radović , P.; Wu, X‐J and Bae, C. J. 2022. “Resolving the ‘muddle in the middle’: the case for Homo bodoensis”, Evolutionary Anthropology 31(1): 20‐29, 2022. https://doi.org/10.1002/evan.21929
- Straus, W. L. “Saldanha Man and his Culture”, Science 125 (3255) : 973-974, 1957.
- छायाचित्र संदर्भ : बोडो कवटी https://en.m.wikipedia.org/wiki/File:Bodo_cranium
समीक्षक : मनीषा पोळ