वाईदनरीच, फ्रांझ (Weidenreich Franz) : (७ जून १८७३ – ११ जुलै १९४८). प्रसिद्ध जर्मन शरीरशास्त्रज्ञ आणि मानवशास्त्रज्ञ. रक्तविज्ञान आणि मानवी उत्क्रांती या क्षेत्रांमध्ये फ्रांझ यांचे मोलाचे योगदान आहे. फ्रांझ यांचा जन्म एदनकोबन, जर्मनी येथे झाला. त्यांचे वडील व्यापारी होते. त्यांनी म्युनिक, कील, बर्लीन व स्ट्रॉसबर्ग या विद्यापीठांतून वैद्यकशास्त्र व जीवशास्त्र या विषयांचे शिक्षण घेऊन इ. स. १८९९ मध्ये वैद्यकशास्त्राची एम. डी. ही पदवी मिळविली. ते इ. स. १९१९ ते १९२४ या काळात हायडलबर्ग विद्यापीठात शरीरशास्त्राचे प्राध्यापक; इ. स. १९२८ ते इ. स. १९३३ या काळात फ्रँकफर्ट विद्यापीठात मानवशास्त्राचे प्राध्यापक; तर इ. स. १९३४ मध्ये शिकागो विद्यापीठात अभ्यागत प्राध्यापक म्हणून त्यांनी काम केले.

फ्रांझ हे चीनमधील पेकिंग मेडिकल कॉलेज येथे गेले. तेथे त्यांनी पेकिंगजवळच्या चौकोंटिन येथे मिळालेला सिनॅनथ्रोपस जीवाश्मांच्या जबड्याची हाडे, दात, कवटी आणि इतर अवशेषांच्या सविस्तर अभ्यासामध्ये योगदान दिले. जावा मानव (पिथिकॅनथ्रोपस इरेक्टस) आणि चीनमध्ये मिळालेला सिनॅनथ्रोपस यांचा एकत्रित अभ्यास करून हे दोनही जीवाश्म एकत्रितपणे होमो इरेक्टस या परागतमध्ये (जिनस) समावेश करून त्यांनी महत्त्वपूर्ण निष्कर्ष काढले. डेव्हिडसन ब्लॅक यांच्या निधनानंतर पेकिंग युनियन मेडिकल कॉलेजच्या सेनोझोईक लेबॉरटरीच्या प्रमुखपदी ते रूजू झाले.

फ्रांझ यांनी गिगॅनरोपिथिकस किंवा जायंटोपिथिकस ब्लॅकी याचे गिगँथ्रोपस किंवा जायंटोपस ब्लॅकी असे नामकरण केले. पिल्टडाऊन मानव हा एक काल्पनिक राक्षस असून त्यात काहीही सत्य नाही, हे सांगणाऱ्या अभ्यासकांच्या गटात ते सहभागी होते. मानवी उत्क्रांतीमधील बहुस्थानीय सिद्धांत मांडणाऱ्या संशोधकांत ते अग्रणी होते.

फ्रांझ यांनी इ. स. १९३६ ते इ. स. १९४३ या काळात सिनॅनथ्रोपसच्या अवशेषांवर भरपूर संशोधन करून आपले शोधनिबंध लिहिले. दुसऱ्या महायुद्धाच्या काळात अमेरिकेच्या म्यूझियम ऑफ नॅचरल हिस्टरी या संस्थेत ते रुजू झाले. येथे त्यांनी इ. स. १९४१ ते इ. स. १९४८ या काळात संशोधन कार्य केले. सिनॅनथ्रोपस जीवाश्मांचे मूळ अवशेष आश्चर्यकारक रीत्या गहाळ झाले होते; मात्र सुदैवाने या पार्श्वभूमीवर फ्रांझ यांनी या जीवाश्मांची चित्रे, छायाचित्रे, सविस्तर नोंदी आणि साचे घेतले होते. त्यामुळे जगासाठी हा महत्त्वपूर्ण संशोधन वारसा उपलब्ध होऊ शकला. फ्रांझ यांना त्यांच्या मानवशास्त्रातील मौलिक कार्यासाठी इ. स. १९४६ मध्ये व्हायकिंग फंड मेडल हा पुरस्कार देण्यात आला.

फ्रांझ यांनी अनेक शोध निबंध लिहिले असून त्यांनी ऑब्जर्व्हेशन ऑन दी फॉर्म अँड प्रॉपर्टेशन्स ऑफ दी एनडोक्रॅनिअल कास्ट ऑफ सिनॅनथ्रोपस पेकिनेन्सिस, अदर होमिनिड्स अँड दी ग्रेट एप्स (१९३६); दी मँडीबल्स ऑफ सिनॅनथ्रोपस पेकिनेन्सिस (१९३६); दी एक्स्ट्रीमिटी बोन्स ऑफ सिनॅनथ्रोपस पेकिनेनिन्स (१९४१); दी ब्रेन अँड इट्स रोल इन दी फायलोजेंटिक ट्रान्सफॉर्मेशन ऑफ दी ह्यूमन स्कूल (१९४१) दी स्कूल ऑफ सिनॅनथ्रोपस पेकिनिन्स (१९४३); जायंट अर्ली मॅन प्रॉम जावा अँड साऊथ चायना (१९४५); एप्स, जायंट्स अँड मॅन (१९४६); मोर्फोलॉजी ऑफ सोलो मॅन (१९५१) इत्यादी महत्त्वपूर्ण पुस्तके लिहिली

फ्रांझ यांचे न्यूयॉर्क येथे निधन झाले.

संदर्भ :

  • Srivastava, R. P., Morphology of the Primates & Human Evolution, New Delhi, 2009.
  • William, L. Straus, Science New Series Volume, 1954.

समीक्षक : सुभाष वाळिंबे