विद्यार्थ्यांचा शारीरिक, बौद्धिक, भावनिक असा सर्वांगीण विकास होण्याच्या दृष्टीने विद्यार्थ्यांचे व्यक्तिमत्त्व कसे आकाराला येत आहे, हे नियमितपणे पडताळून पाहणे म्हणजेच आकारिक मूल्यमापन होय. आकारिक मूल्यमापनाचा उपयोग विद्यार्थ्यांच्या अध्ययन प्रगतीवर सातत्याने देखरेख ठेवण्यासाठी केला जातो. आकारिक मूल्यमापन हे अध्ययन आणि अध्यापन या प्रक्रियांशी अंतर्गत जोडलेले असते. हे मूल्यमापन अध्ययन-अध्यापनाच्या कालावधीतच केले जाते आणि त्याचा मुख्य उद्देश शिक्षक आणि विद्यार्थी या दोघांनाही सातत्याने प्रत्याभरण देणे आणि अध्ययन-अध्यापनाच्या प्रक्रियेत सुधारणा करणे हा असतो.

आकारिक मूल्यमापन ही संकल्पना मायकेल स्क्रिव्हन यांनी १९६७ मध्ये अभ्यासक्रम मूल्यमापनावर काम करताना प्रथमता मांडली. स्क्रिव्हन यांच्या मते, ‘आकारिक मूल्यमापन हे प्रामुख्याने एखादा कार्यक्रम, उत्पादन किंवा व्यक्तीच्या विकासातील प्रक्रियेदरम्यान संबंधित घटकांसाठी केले जाते, जेणेकरून त्या कार्यक्रमाच्या गुणवत्तेत सुधारणा करता येईल’. म्हणजेच, आकारिक मूल्यमापनाचा मुख्य उद्देश विशिष्ट प्रक्रियेवर सतत देखरेख ठेवणे हा आहे. सुरुवातीला ही संकल्पना अभ्यासक्रम विकासाच्या संदर्भात वापरली जात होती; परंतु कालांतराने ती अध्यापनशास्त्र आणि अध्ययन-अध्यापन प्रक्रियेमध्येही वापरण्यात येऊ लागली. विशेषतः शिक्षण हक्क अधिनियम २००९ नुसार सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन कार्यपद्धती महाराष्ट्र शासनाने २०१०-११ या वर्षापासून इयत्ता पहिली ते आठवी पर्यंतच्या वर्गांसाठी लागू केली. ज्यामध्ये आकारिक मूल्यमापन संकल्पनेचा अधिक साकल्यांनी विचार करण्यात आला.

महत्त्व ꞉ आकारिक मूल्यमापन हे शिक्षण प्रक्रियेत विद्यार्थ्यांच्या अध्ययनाची प्रगती तपासण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे साधन आहे. हे मूल्यमापन सतत चालणारे असल्यामुळे शिक्षकांना त्यांच्या अध्यापन प्रक्रियेत सुधारणा करण्याची संधी मिळते, तसेच विद्यार्थ्यांनाही त्यांच्या अध्ययनात सुधारणा करण्यासाठी दिशा मिळते. शिक्षण अधिक प्रभावी आणि विद्यार्थीकेंद्रित करण्यासाठी आकारिक मूल्यमापनाचे पुढील प्रमाणे महत्त्व आहे.

  • विद्यार्थीकेंद्रित शिक्षण : आकारिक मूल्यमापन हे विद्यार्थीकेंद्रित असते. त्यामुळे शिक्षकांना विद्यार्थ्यांच्या व्यक्तिगत गरजा ओळखून त्यानुसार अध्यापनात सुधारणा करता येतात. प्रत्येक विद्यार्थ्यांची अध्ययन शैली आणि आकलन पातळी ही वेगवेगळी असते. आकारिक मूल्यमापनामुळे शिक्षकांना विद्यार्थ्यांच्या गतीनुसार त्यांच्या गरजांचा विचार करून अध्यापन करण्याची संधी मिळते.
  • शिक्षक आणि विद्यार्थ्यांना तात्काळ प्रत्याभरण : आकारिक मूल्यमापनाच्या माध्यमातून शिक्षक आणि विद्यार्थी दोघांनाही अध्ययन-अध्यापन प्रक्रियेबाबत तात्काळ अभिप्राय मिळतो. आकारिक मूल्यमापनामुळे विद्यार्थी स्वतःच्या अध्ययनाच्या प्रगतीबद्दल सतत माहिती मिळवू शकतात. त्याच प्रमाणे शिक्षकांना आपल्या अध्यापनाच्या प्रभावीतेबद्दल सातत्याने माहिती मिळते आणि गरजेनुसार अध्यापन पद्धतीत आवश्यक ते बदल, सुधारणा किंवा नवीन अध्यापन तंत्रांचा अवलंब करता येतो.
  • निदानात्मक आणि उपचारात्मक कार्य : आकारिक मूल्यमापन हे शिक्षण प्रक्रियेत निदानात्मक आणि उपचारात्मक अशा दोन्ही पद्धतींनी कार्य करते; कारण ते विद्यार्थी अध्ययन-अध्यापनाच्या प्रक्रियेत येणाऱ्या अडचणी ओळखण्यास (निदानात्मक) आणि त्यावर योग्य उपाययोजना करण्यास (उपचारात्मक) मदत करते. आकारिक मूल्यमापन हे केवळ विद्यार्थ्यांची चाचणी घेण्याचे साधन नाही, तर ते त्यांच्या अध्ययनाच्या प्रक्रियेत सुधारणा घडविण्यासाठी एक प्रभावी उपाय आहे. यामुळे विद्यार्थ्यांची प्रगती सातत्याने तपासता येते आणि त्यांना त्यांच्या अडचणींवर मात करण्यासाठी योग्य दिशादर्शन करता येते.

वैशिष्ट्ये ꞉ आकारिक मूल्यमापनाची वैशिष्ट्ये पुढील प्रमाणे आहेत ꞉

  • आकारिक मूल्यमापन अध्ययन-अध्यापनासोबत सतत चालणारी प्रक्रिया आहे.
  • आकारिक मूल्यमापन हे अनौपचारिक स्वरूपाचे असते, तर संकलित मूल्यमापन हे औपचारिक असते. त्यामुळे आकारिक मूल्यमापन हे अनौपचारिक वर्ग चाचण्या, मौखिक चाचण्या, निरीक्षण, गृहपाठ, विविध शैक्षणिक उपक्रम यांच्या माध्यमांतूनही केले जाते.
  • आकारिक मूल्यमापनात शिक्षक आणि विद्यार्थी यांच्या सक्रिय व कृतीयुक्त सहभागाची  आवश्यकता असते.
  • आकारिक मूल्यमापन ही प्रत्याभरण आधारित प्रक्रिया आहे. ज्यामुळे हे मूल्यमापन फक्त गुणांकनासाठी नसून विद्यार्थी कसा शिकतो, यावर आधारित असते. विद्यार्थ्यांना त्यांच्या बलस्थानांची आणि सुधारणा करण्याच्या गरज असलेल्या बाबींची जाणीव करून देण्यासाठी हे मूल्यमापन तपशीलवार प्रत्याभरण देते.
  • आकारिक मूल्यमापनात विविध मूल्यमापन साधनांचा समावेश केला जातो. त्याच बरोबर विविध उपक्रम, साधने आणि तंत्रांचा उपयोग करून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास घडविण्याची संधी दिली जाते.
  • आकारिक मूल्यमापन विद्यार्थ्यांच्या शिकण्याच्या क्षमतांमध्ये वाढ करण्यास मदत करते.
  • आकारिक मूल्यमापनात विद्यार्थ्यांना त्यांच्या मूल्यमापनासाठी वापरण्यात आलेल्या निकषांबद्दल पूर्ण माहिती दिली जाते.
  • आकारिक मूल्यमापन फक्त विद्यार्थालाच नव्हे, तर अध्यापनात सुधारणा होण्यासाठी शिक्षकालाही सक्षम बनविते.

आकारिक मूल्यमापन हे विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्वाला आकार मिळत असताना त्यांच्या होणाऱ्या प्रगतीचे मूल्यमापन करण्यासाठी आणि अध्ययन-अध्यापन प्रक्रिया सुधारण्यासाठी एक महत्त्वाचे साधन आहे. हे मूल्यमापन अधिक प्रभावी करण्यासाठी शिक्षकांनी योग्य मूल्यमापन साधनांची निवड करावीत. विद्यार्थ्यांचा सक्रिय सहभाग सुनिश्चित करावा आणि त्वरित व उपयुक्त प्रत्याभरण द्यावे. विद्यार्थ्यांच्या वैयक्तिक गरजा लक्षात घेऊन, अभ्यासक्रमात आवश्यक सुधारणा केल्यास शिक्षण अधिक लवचिक आणि समावेशक होऊ शकते. पारंपरिक परीक्षांच्या तुलनेत आकारिक मूल्यमापनामुळे विद्यार्थ्यांना सतत मार्गदर्शन मिळते, त्यांचे आकलन वाढते आणि आत्मविश्वास वाढतो.

उद्दिष्टे ꞉ आकारिक मूल्यमापनाची उद्दिष्टे पुढील प्रमाणे आहेत ꞉

  • आकारिक मूल्यमापनाचे मुख्य उद्दिष्ट हे विद्यार्थ्यांची बलस्थाने, उणिवा आणि त्रुटी शोधून  विद्यार्थ्यांच्या अध्ययन प्रक्रियेत सुधारणा करणे हे आहे.
  • अध्ययन-अध्यापन प्रक्रियेच्या अंतिम निकालांचे मोजमाप करणे नसून त्यातील मोठ्या किंवा लहान अडथळ्यांची ओळख करून त्यात आवश्यक सुधारणा सुचवणे, हे आकारिक मूल्यमापनाचे उद्दिष्ट असते. त्यामुळे संकलित परिणामापूर्वीच आवश्यक सुधारणा करता येतात.
  • शिक्षक आणि विद्यार्थी या दोघांनाही सतत प्रत्याभरण देऊन अध्ययन-अध्यापन प्रक्रियेत आलेले यश आणि अपयश समजून घेणे.
  • विद्यार्थ्यांच्या प्रगतीचा सातत्याने आढावा घेणे आणि त्यांच्या शिकण्याच्या गतीचा अभ्यास करून गरजेनुसार मदत करणे.
  • विद्यार्थ्यांच्या अध्ययनात येणाऱ्या अडचणीनुसार शिक्षकांना सुधारात्मक कार्यक्रम आखण्यासाठी आणि अध्यापन पद्धती सुधारण्यासाठी मार्गदर्शन करणे.
  • विद्यार्थी स्वयंमूल्यमापनाला प्रोत्साहन देणे आणि विद्यार्थ्यांना त्यांच्या प्रगतीबाबत जागरूक करणे.

फायदे ꞉ आकारिक मूल्यमापनाचे अनेक फायदे आहेत :

  • आकारिक मूल्यमापनामुळे शिक्षक-विद्यार्थी संवाद सुधारतो.
  • विद्यार्थी आणि शिक्षक मूल्यमापन प्रक्रियेत सक्रिय सहभागी असल्यामुळे अध्ययन-अध्यापन समस्यांविषयी मोकळेपणाने बोलू शकतात.
  • आकारिक मूल्यमापनामुळे शिक्षकांना प्रभावी अध्यापन तंत्र रचना करण्यास मदत होते. प्रत्येक विद्यार्थ्याच्या बळकट आणि दुर्बल बाबी ओळखून विद्यार्थ्यांच्या गरजेनुसार शिक्षक आपल्या अध्यापन पद्धती सुधारू शकतो आणि अध्यापनाच्या नवीन पद्धती अवलंबू शकतो.
  • आकारिक मूल्यमापनामुळे विद्यार्थ्यांना स्वतःच्या अध्ययनाच्या पद्धतीचे खरे मूल्यमापन करता येते. त्यांना त्यांच्या अभ्यासातील कोणत्या क्षेत्रात सुधारणा करण्याची गरज आहे, हे समजते आणि त्यानुसार ते अध्ययनाच्या नवीन पद्धती अवलंबू शकतात. ज्यामुळे अभ्यासातील सुधारणा करण्यासाठी विद्यार्थ्यांना स्वतःहून प्रेरणा मिळते.
  • आकारिक मूल्यमापनामुळे विद्यार्थ्यांना चांगल्या अध्ययन सवयी विकसित होण्यास मदत होते. विद्यार्थी नियमित अभ्यास करण्यासाठी प्रेरित होऊन त्यांना कोणत्या अध्ययन घटकांवर अधिक लक्ष केंद्रित करावे लागेल, हे समजण्यास मदत होते.
  • अभ्यासक्रमाच्या सामग्रीची व अध्यापनासाठी वापरण्यात आलेल्या साहित्याची प्रभाविता तपासण्यासाठी हे मूल्यमापन उपयुक्त ठरते.

मतप्रवाह ꞉ आकारिक मूल्यमापनाबाबत सकारात्मक आणि नकारात्मक असे दोनीही मतप्रवाह दिसून येतात :

  • आकारिक मूल्यमापन हे विद्यार्थ्यांच्या अध्ययनाच्या प्रक्रियेत सकारात्मक परिवर्तन घडवू शकते आणि शिक्षकांना अध्यापन सुधारण्यास मदत करते.
  • काही अभ्यासकांच्या मते, आकारिक मूल्यमापन परीक्षेच्या ताण-तणावापेक्षा अध्ययन-अध्यापनाच्या प्रक्रियेला अधिक महत्त्व देते.
  • आकारिक मूल्यमापनामुळे विद्यार्थ्यांच्या कौशल्यांचा सर्वांगीण विकास होतो आणि शिक्षण अधिक समावेशक व विद्यार्थी केंद्रित होते.
  • आकारिक मूल्यमापनामध्ये शिक्षकांना प्रत्येक विद्यार्थ्याच्या प्रगतीचा स्वतंत्र अभ्यास करावा लागत असल्याने त्यासाठी वेळ आणि अतिरिक्त साधने लागतात.
  • विद्यार्थी अंतिम परीक्षांमध्ये मिळणाऱ्या गुणांना अधिक महत्त्व देतात आणि आकारिक मूल्यमापनाला गांभीर्याने घेत नाहीत.

शिक्षकांनी वेळेचे प्रभावी व्यवस्थापन करणे, मूल्यमापन प्रक्रियेसाठी योग्य प्रशिक्षण घेणे आणि विद्यार्थ्यांना सतत मूल्यमापनाचे महत्त्व पटवून देणे आवश्यक आहे. सतत मूल्यमापन, संवाद आणि प्रत्याभरण यांमुळे शिक्षण अधिक प्रभावी होते, तसेच विद्यार्थ्यांना त्यांच्या प्रगतीबद्दल सतत जागरूक ठेवता येते.

आकारिक मूल्यमापन केवळ विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक मूल्यमापनासाठी नसून त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आणि स्व-अभ्यासाला चालना देण्यासाठी एक प्रभावी साधन आहे. हे मूल्यमापन शिक्षक-विद्यार्थी संवाद सुधारते, स्वमूल्यमापनाची सवय लावते आणि विद्यार्थ्यांना त्यांच्या शिकण्याच्या गतीनुसार प्रगती करण्याची संधी देते. याची प्रभावी अंमलबजावणी केल्यास शिक्षणाची गुणवत्ता वाढण्यास निश्चित मदत होईल.

संदर्भ :

  • उपासनी, ना. के.; कुलकर्णी, के. वि., शैक्षणिक मूल्यमापन आणि संख्याशास्त्र, पुणे, १९८७.
  • कदम, चा.; चौधरी, बा. आ., शैक्षणिक मूल्यमापन, पुणे, १९९२.
  • दांडेकर, वा. ना., शैक्षणिक मूल्यमापन आणि संख्याशास्त्र, पुणे, २००४.

समीक्षक : विजयकुमार पाईकराव


Discover more from मराठी विश्वकोश

Subscribe to get the latest posts sent to your email.