मोजकर्तो. पर्निंग. दक्षिणपूर्व आशियातील पूर्व जावा (इंडोनेशिया) मधील एक पुरातत्त्वीय स्थळ. मानवी उत्क्रांती आणि स्थलांतर यांवर प्रकाश टाकणारे हे महत्त्वपूर्ण स्थळ आहे. नेदर्लंड्स इंडीजचे भूगर्भीय सर्वेक्षण संस्थेचे जीवाश्मशास्त्रज्ञ गस्टाव्ह हेन्रिक राल्फ व्हॉन कोनिंगस्वाल्ड (१९०२-१९८२) यांच्या नेतृत्वाखालील पूर्व जावामधील केंडेंग पर्वतरांग (पेगुनुनॅन केंडेंग) येथे जीवाश्मांच्या उत्खननाचे काम सुरू होते (१३ फेब्रुवारी १९३६). त्या वेळी अँडोयो या इंडोनेशियन सदस्याला जीवाश्मीत मानवी कवटी सापडली. जोहान डूफाइस या भूगर्भ शास्त्रज्ञाने या उत्खननाच्या भूशास्त्रीय नोंदी केल्या होत्या. सुरुवातीला व्हॉन कोनिंगस्वाल्ड यांनी या कवटीला ‘पिथेकॅन्थ्रोपस मोजोकर्टेन्सिस’ असे नाव दिले होते. तथापि यूजीन दुबॉ (‘जावा मॅन’चा जनक) यांनी सुचविल्याप्रमाणे कोनिंगस्वाल्ड यांनी १९३६ मध्ये दिलेल्या एका व्याख्यानात या मानवी कवटीला मोजोकर्टेन्स मानव (होमो मोजोकर्टेन्सिस) असे म्हटले. पुढे १९९४-१९९७ मध्ये प्रसिद्ध झालेल्या संशोधनानुसार त्याचे इरेक्टस मानव म्हणून वर्गीकृत केले गेले. ही मानवी कवटी मोजोकेरटो शहराच्या ईशान्येस १० किमी. अंतरावर परनिंग आणि सुंबर्टेंग गावांच्या दरम्यान सापडली होती. त्यामुळे काही लेखांमध्ये या कवटीस ‘परनिंग कवटी’ असेही संबोधले आहे. मोजोकेरटो येथे मिळालेली अश्मीभूत कवटी ही एका किशोरवयीन बालकाची आहे (१९९७). त्यामुळे यास मोजोकेरटो बालक/किशोर (Mojokerto child) म्हणूनही ओळखले जाते.

मोजोकेरटो बालकाची अश्मीभूत कवटी (इरेक्टस मानव).

मोजोकेरटो/पर्निंग कवटी मिळाल्यानंतर त्या काळी स्थानिक वर्तमानपत्रात प्रसिद्ध झालेल्या माहितीमध्ये काही तफावत असल्यामुळे ही कवटी नेमकी कुठे सापडली? याबद्दल वादविवाद सुरू झाले आणि या महत्त्वाच्या संशोधनावर एक मोठे प्रश्नचिन्ह उभे राहिले. जोहान डूफाइस या भूगर्भ शास्त्रज्ञाने १९३६ मध्ये उत्खनन केलेल्या स्तरांच्या नोंदीनुसार मानवी कवटी ही चुनखडकावर असलेल्या अँडेसाइटयुक्त ग्रॅव्हेल (ज्वालामुखीय घटक/अश्मरी) मधून मिळाली असून त्यावर ज्वालामुखीय राखेचा थर होता. यावर अधिक प्रकाश टाकण्यासाठी त्या काळातील केलेल्या नोंदी पडताळून उत्खननाचे ठिकाण पुनर्स्थापित करण्याचे प्रयत्न सातत्याने चालू आहेत. त्या आधारे इरेक्टस मानवाचे कालमापन निश्चित करण्याचे संशोधन चालू आहे.

इंडोनेशियन पुरामानवशास्त्रज्ञ तेउकू जॅकॉब (१९२९-२००७) आणि भूगर्भशास्त्रज्ञ गार्निस कर्टीस यांनी १९७१ मध्ये यांनी कवटी मिळालेल्या ठिकाणच्या मातीतील प्युमिसचे पोटॅशियम अरगॉन पद्धतीने कालमापन १९±०५ लाख वर्षपूर्व असे केले. नंतर विसाव्या शतकाच्या अखेरीस प्रसिद्ध झालेल्या संशोधनानुसार जीवाश्मशास्त्रज्ञ सी. सी. स्विशर आणि इतरांनी (१९९४) अरगॉन-अरगॉन (40Ar/39Ar) पद्धतीने १८.१±०४ लाख वर्षपूर्व असे कालमापन केले. या संशोधनामुळे आफ्रिका खंडात ज्ञात असलेल्या इरेक्टस मानव जातीच्या अवशेषांपेक्षा मोजोकर्टेन्स मानव (होमो मोजोकर्टेन्सिस) कवटी जुनी आहे, असे सूचित होते.

मोजोकेरटो येथे मिळालेल्या अश्मीभूत कवटीचा अभ्यास करताना शोधकर्ता राल्फ व्हॉन कोनिंगस्वाल्ड.

पुरातत्त्वज्ञ माइक मोरवूड आणि इतर (२००३) यांच्या संशोधनानुसार मोजोकेरटो कवटीचे विभाजन तेजोरेषा कालमापन पद्धतीनुसार १४.९±०.१३ लाख वर्षपूर्व असे आहे. या उलट जैवपुरातत्त्वशास्त्रज्ञ हॅरी बरघुईस आणि इतर (२०२१) यांनी मोजोकेरटो कवटी मिळालेल्या स्तराचे नव्याने बहुविद्याशाखीय अभ्यास केला. यानुसार मोजोकेरटो कवटी ज्या गाळाच्या स्तरातून (conglomerate) मिळाली तो स्तर एमआएस-१४ ते एमआएस-१५ (५.५ ते ६ लाख वर्षपूर्व) या काळात तयार झाला असावा, असा दावा केला आहे. यावरून या कवटीचे कालमापन आधी केलेल्या कालमापनापेक्षा अनेक पटीने अलीकडच्या काळातील (young) असावे असे दिसते.

नवीन संशोधनानुसार (२०२०) ७१५ अश्मीभूत मानवी दातांचा (यांपैकी २९० दात प्लाइस्टोसीन काळातील, तर ४२५ दात हे होलोसीन काळातील आहेत) आकारशास्त्रीय विश्लेषणात्मक आणि तुलनात्मक अभ्यास केला आहे. अभ्यासलेल्या दातांची ६ गटांमध्ये (गट १ ते ६) विभागणी केली आहे. या अभ्यासानुसार नुसार गट १ ते ३ मधील मानवाचे दात हे आफ्रिकेतील इरेक्टस मानव या जातीशी साधर्म्य दर्शवितात आणि ते आद्य प्लाइस्टोसीन काळातील असावेत. गट ४ मधील मानव मध्य प्लाइस्टोसीन काळातील असून जावा बेटावर नवखे म्हणून ओळखले जाऊ शकतात.

भूगर्भशास्त्रीयदृष्ट्या मोजोकेरटो हा भाग विस्तृत प्रदेशाचा एक भाग असून तेथे सागरी किनारपट्टी, ज्वालामुखी पर्वत आणि नदी खोऱ्यांसह विविध नैसर्गिक भूप्रदेश अस्तित्वात होते. आद्य प्लाइस्टोसीन काळातील मोजोकेरटो मानव सागरी-किनारपट्टीच्या भूप्रदेशात राहत होते आणि नंतरच्या काळात नदी खोऱ्याने तयार (fluvial) झालेल्या भूप्रदेशात राहत होते. यावरून असे सूचित होते की, होमो प्रजातींनी विविध पर्यावरणीय ठिकाणांचा वापर केला असावा.

मोजोकेरटो हे स्थळ जावा, इंडोनेशियाच्या व्यापक पुरातत्त्वीय भूप्रदेशाचा एक भाग म्हणून सांगिरानसारख्या इतर महत्त्वपूर्ण स्थळांशी जोडलेले आहे. एकत्रितपणे ही स्थळे या प्रदेशातील मानवी उत्क्रांती अधिक चांगल्याप्रकारे समजून घेण्यात योगदान देतात. थोडक्यात, प्रारंभिक मानवी उत्क्रांती, अनुकूलन आणि स्थलांतर, तसेच पुरापर्यावरण आणि पर्यावरणीय बदलांचे परिणाम यांविषयी पुरातत्त्वीयदृष्ट्या मोजोकेरटोचे महत्त्वपूर्ण योगदान आहे.

संदर्भ :

  • Anton, S., ‘Developmental age and taxonomic affinity of the Mojokerto child, Java, Indonesia’, American Journal of Physical Anthropology, 102, pp. 497-514, 1997.
  • Huffman O. Frank; Shipman, Pat; Hertler, Christine; John de Vos & Aziz, Fachroel, ‘Historical Evidence of the 1936 Mojokerto Skull Discovery, East Java’, Journal of Human Evolution, Vol. 48 (4), pp. 321-363, 2005. https://doi.org/10.1016/j.jhevol.2004.09.001
  • Huffman O.F., Y. Zaim, J. Kappelman, D.R. Ruez Jr., J. de Vos, Y. Rizal, F. Aziz and C. Hertler, ‘Relocation of the 1936 Mojokerto skull discovery site near Perning, East Java’, Journal of Human Evolution, Vol. 50, pp. 431-451, 2006. https://doi.org/10.1016/j.jhevol.2005.11.002
  • Jacob, T.; Curtis, G. H., 1971. ‘Preliminary potassium-argon dating of early man in Java’, Contributions of the University of California Archaeological Research Facility, 1971.
  • Morwood, M. J.; O’Sullivan, P.; Susanto, E. E. & Aziz, F., ‘Revised age for Mojokerto 1, an early Homo erectus cranium from East Java, Indonesia’. Australian Archaeology, Vol. 57, pp.1-4, 2003. https://doi.org/10.1080/03122417.2003.11681757
  • चित्रसंदर्भ : १. मोजोकेरटो बालकाची अश्मीभूत कवटी (इरेक्टस मानव) – After Huffman & others 2005. २. मोजोकेरटो येथे मिळालेल्या अश्मीभूत कवटीचा अभ्यास करताना शोधकर्ता राल्फ व्हॉन कोनिंगस्वाल्ड https://en.m.wikipedia.org/wiki/File:COLLECTIE_TROPENMUSEUM_Dr._G.H.R._von_Koenigswald_tijdens_onderzoek_naar_schedels_op_Java_TMnr_10018632.jpg

समीक्षक : जयेंद्र जोगळेकर


Discover more from मराठी विश्वकोश

Subscribe to get the latest posts sent to your email.