पर्शियन आखात (इराणचे आखात) आणि ओमानचे आखात यांना जोडणारी एक अरुंद सामुद्रधुनी. ओमानच्या आखातातूनच पुढे अरबी समुद्रहिंदी महासागरात जाता येते. या सामुद्रधुनीची लांबी सुमारे १६७ किमी. व रुंदी ५५ ते ९५ किमी. आहे. या सामुद्रधुनीच्या उत्तरेस इराण, तर दक्षिणेस अरबस्तान द्वीपकल्पावरील ओमान व संयुक्त अरब अमीर राज्ये (अमिराती) हे देश आहेत. दक्षिणेस सामुद्रधुनीला लागून मुसंदम द्वीपकल्प असून तो ओमानपासून अलग असलेला ओमानचा भाग आहे. मुसंदम द्वीपकल्प आणि इराण यांदरम्यान सामुद्रधुनीची रुंदी सर्वांत कमी आहे. जगातील मोठमोठ्या तेलवाहू जहाजांच्या वाहतुकीच्या दृष्टीने सामुद्रधुनी पुरेशी खोल व सागरी अडथळ्यांपासून मुक्त आहे. मुसंदम द्वीपकल्पाजवळ तिची खोली सर्वाधिक असून इराणच्या बाजूला ती कमी होत गेलेली आहे. जगातील खनिज तेल व नैसर्गिक वायुच्या संभाव्य साठ्यांपैकी अनुक्रमे दोन तृतीयांश आणि एक तृतीयांश साठे पर्शियन आखाताच्या सभोवतालच्या देशांत असून हे सर्व देश खनिज तेल व नैसर्गिक वायू उत्पादनातही अग्रेसर आहेत. त्यांचा तेलाचा व्यापार पर्शियन आखातातून पुढे याच हॉर्मझ सामुद्रधुनीमार्गे जगभरातील देशांशी चालतो. त्यामुळे जगातील सर्वाधिक महत्त्वाच्या सागरी मार्गांपैकी हा एक असून औद्योगिक दृष्ट्या विकसित व विकसनशील देशांच्या दृष्टीने हा मार्ग आणि त्यास भोवतालचा प्रदेश अतिशय महत्त्वपूर्ण बनला आहे. येथील उत्पादित खनिज तेलाचे त्याच प्रदेशात मोठ्या प्रमाणावर शुद्धीकरण केले जाते. त्यामुळे शुद्ध तेलाची, तसेच कच्च्या तेलाची मोठ्या प्रमाणावर निर्यात प्रामुख्याने वायव्य यूरोपीय देश, संयुक्त संस्थाने, पूर्व आशियातील देश आणि जगातील इतर अनेक देशांना केली जाते. त्यामुळे जगभरातील वेगवेगळ्या देशांच्या मोठमोठ्या तेलवाहू, तसेच इतर मालवाहू व्यापारी जहाजांची निरंतर वाहतूक या सामुद्रधुनीतून चालू असते.

ओपेकच्या (पेट्रोलियम उत्पादन व निर्यात करणाऱ्या देशांची संघटना) सदस्य देशांपैकी पर्शियन आखातालगत असलेले सौदी अरेबिया, इराण, संयुक्त अरब अमीर राज्ये, कुवैत आणि इराक हे देश आपल्याकडील तेलाची निर्यात बहुतेक याच सामुद्रधुनीमार्गे करतात. हॉर्मझ सामुद्रधुनी हा जगातील सर्वांत महत्त्वाच्या व मोक्याच्या सागरी मार्गांपैकी एक आहे; कारण हॉर्मझ सामुद्रधुनी हा पर्शियन आखात ओमानच्या आखाताला आणि तसेच पुढे अरबी समुद्र व हिंदी महासागराला जोडणारा एकमेव सागरी मार्ग आहे. जगाच्या सुमारे २०% खनिज तेल व नैसर्गिक तेलाची निर्यात केवळ या सामुद्रधुनीमार्गे होते. आपत्कालीन परिस्थितीत संयुक्त अरब अमीर राज्यांना आपली निर्यात ओमानच्या आखातावर वसलेल्या अल फुजाइरा (फुजाइरा) या संयुक्त अरब अमीर राज्यांचा भाग असलेल्या अमिरातीतून नळमार्गाने वळविता येत असली, तरी इराण, इराक, कुवेत, कॉटार व अमिराती या देशांकडून होणाऱ्या खनिज तेल निर्यातीचा हाच प्राथमिक मार्ग आहे. सौदी अरेबियाने तांबड्या समुद्र किनाऱ्यापर्यंत सुमारे १,२०० किमी. लांबीचा पूर्व ‌- पश्चिम असा नळमार्ग तयार केलेला आहे. भारत मध्यपूर्वेतील देशांकडून याच सामुद्रधुनीमार्गे तेलाची आयात करतो. भौगोलिक दृष्ट्या येथून होणाऱ्या एकूण निर्यातीपैकी सुमारे ८०% आयात आशियातील प्रामुख्याने चीन, भारत, जपान व दक्षिण कोरियाकडून केली जाते. इराणचे आर्थिक व लष्करी दृष्ट्या महत्त्वाचे असलेले बंदर अब्बास हे बंदर या सामुद्रधुनीच्या उत्तर किनाऱ्यावर आहे. तेथून जवळच इराणची किश्म, हॉर्मझ, हेंजाम व लारक ही बेटे आहेत.

हॉर्मझ सामुद्रधुनीतील जहाजांची वर्दळ व वाहतूक नियंत्रित करण्यासाठी ३ किमी. रुंदीची जहाजांची मार्गिका (शिपिंग चॅनेल) आखून देण्यात आली आहे. त्या मार्गिकेवरूनच वाहतूक केली जाते. या मार्गिकेच्या बाजूने ३ किमी. रुंदीचे निर्बंधित विभाग आहेत. संयुक्त राष्ट्राच्या नियमानुसार देशांना त्यांच्या किनाऱ्यापासून १२ नॉटिकल मैल (२२.२ किमी.) अंतरापर्यंत ताबा ठेवता येतो. म्हणजे सर्वांत चिंचोळ्या ठिकाणी ही सामुद्रधुनी व त्यातील जहाजांची मार्गिका या पूर्णपणे इराण व ओमानच्या ताब्यातील जलभागात येतात. सामुद्रधुनीतील सर्वाधिक जलमार्ग ओमानच्या प्रादेशिक जलहद्दीतून व काही मार्ग इराणच्या प्रादेशिक जल हद्दीतून जात असला, तरी त्याचे नियमन आंतरराष्ट्रीय सागर विधी व संयुक्त राष्ट्रांच्या सागरविषयक कायद्यातील संकेतानुसार केले जाते. सामुद्रधुनीतील उत्तरेकडील सागर मार्गाचे नियंत्रण इराण करतो, तर दक्षिणेकडील मार्गाचे नियंत्रण ओमान करतो. युद्धजन्य परिस्थितीत इराणने अनेकदा हॉर्मझ सामुद्रधुनी बंद करण्याची धमकी दिली असली, तरी या सामुद्रधुनीमार्गे होणारी वाहतूक इराण दीर्घ काळपर्यंत बंद करू शकत नाही. १९८० च्या दशकातील इराण-इराक युद्धात इराणने हॉर्मझ सामुद्रधुनीतील वाहतूक थांबवलेली नव्हती; पण दोन्ही देशांनी या सामुद्रधुनीतून जाणाऱ्या तेलवाहू जहाजांवर हल्ले केले होते. या सामुद्रधुनीच्या विशिष्ट अशा भौगोलिक रचनेमुळे सामुद्रधुनी अडविणे किंवा तिच्यातून जाणाऱ्या जहाजांवर हल्ला करणे सोपे जाते. इराणच्या सामुद्रधुनीलगतच्या स्थानामुळे अनेकदा इराण व अमेरिकेदरम्यान तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. जून २०२५ मध्ये इझ्राएल-इराण युद्धात संयुक्त संस्थानाने इराणच्या तीन अणुप्रकल्पांवर केलेल्या हवाई हल्ल्यामुळे इराणच्या संसदेने हॉर्मझ सामुद्रधुनी मार्ग वाहतुकीसाठी बंद करून नाकाबंदी करण्याचा निर्णय घेतला होता. असे असले, तरी ‘सुप्रीम नॅशनल सिक्युरिटी कौंन्सिल’ची परवानगी घेतल्याशिवाय हा मार्ग असा बंद करण्याची अंमलबजावणी करता येत नाही. इराणच्या संसदेच्या या निर्णयामुळे जगातील खनिज तेलाच्या किमती अचानक वाढल्या आणि खनिज तेल वाहतुकीबाबत जगभर तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. हॉर्मझ सामुद्रधुनीचा मार्ग वाहतुकीसाठी बंद झाला, तर त्याचे फार मोठे परिणाम जागतिक अर्थव्यवस्थेवर, आंतरराष्ट्रीय व्यापारावर आणि तेलाच्या किंमत वाढीवर होऊ शकतात. या मार्गाने सर्वाधिक तेल आयात करणाऱ्या चीन, भारत, जपान या देशांचे फार मोठे आर्थिक नुकसान होऊ शकते. विशिष्ट भौगोलिक स्थानामुळे या सामुद्रधुनी मार्गाला कोणताही पर्यायी समुद्री मार्ग उपलब्ध नाही. हॉर्मझ सामुद्रधुनीच्या पर्यायांमध्ये इतर वाहतूक मार्गांनी तेलाची वाहतूक तांबड्या समुद्रावरील किंवा ओमानच्या आखातावरील बंदरांपर्यंत नेणे हा एक पर्याय आहे. सौदी अरेबियाच्या व संयुक्त अरब अमीर राज्यांतील काही कंपन्या तांबडा समुद्र किनाऱ्यावरील बंदरांपर्यंत नळमार्गाने तेल वाहून नेतात. हॉर्मझ सामुद्रधुनीपासून काही अंतरावरील बहारीन येथे १९९५ पासून संयुक्त संस्थानांचा हवाई तळ असून या सामुद्रधुनीतील सुरक्षित वाहतुकीच्या दृष्टीने त्याची भूमिका महत्त्वाची ठरते.

समीक्षक : सुरेश फुले


Discover more from मराठी विश्वकोश

Subscribe to get the latest posts sent to your email.