इबोला विषाणू हा मनुष्य आणि इतर कपिवर्गीय प्राण्यांमध्ये (Primates) संसर्ग घडवणारा आक्रमक विषाणू आहे.  फायलोव्हिरीडी (Filoviridae)  कुळात त्याचा समावेश होतो. लॅटिन भाषेत फायलम (filum – filament) म्हणजे धागा किंवा तंतू होय. लांबलचक धाग्यासारखी रचना हे या कुळातील विषाणूंचे वैशिष्ट्य आहे. या विषाणूंना त्यांचे फायलोव्हायरस (Filo virus) हे नाव त्यावरून मिळाले आहे. या कुळातील मारबर्ग हा विषाणू देखील जीवघेणा रक्तस्रावी आजार उत्पन्न करतो.

पार्श्वभूमी : इबोला विषाणू सर्वप्रथम १९७६ मध्ये इबोला नदीच्या खोऱ्यात सापडला. त्यावरूनच त्याला इबोला विषाणू म्हटले गेले. काँगो (त्यावेळचा झायरे) आणि सुदानमध्ये एकदमच आलेल्या साथींमध्ये ५०० पेक्षा अधिक रुग्णांना अज्ञात रक्तस्रावी तापाची लागण झाली आणि त्यात शेकडो लोक मृत्युमुखी पडले.  इबोला विषाणूचा हा पहिला नोंदवला गेलेला उद्रेक होता. काँगोमधील डॉ. जॉन जाक मायेंबे (Jean Jacques Muyembe) आणि पीटर पायोट (Peter Piot) व ग्विडो व्हान डर ग्रोएन (Guido van der Groen) या बेल्जियन वैज्ञानिकांनी रुग्णांच्या ऊतींमधून हा नवीन विषाणू वेगळा केला आणि त्याच्या संक्रमणाचा अभ्यास केला. पहिल्या उद्रेकानंतर काँगो, गॅबॉन, सुदान, युगांडा व आसपासच्या भागांमध्ये वारंवार इबोलाच्या अनेक लहान-मोठ्या साथी येऊ लागल्या. २०१४-१६ मध्ये पश्चिम आफ्रिकेतील गिनी, सिएरा लीओन आणि लायबेरियामध्ये २८,६०० आणि २०१८ – २०२० मध्ये काँगोमध्ये ३,५०० लोकांना इबोलाची लागण झाल्यानंतर जागतिक आरोग्य संघटनेने त्याची गंभीर दखल घेतली. या साथींमधून इबोला विषाणूची जागतिक महामारी निर्माण करण्याची क्षमता अधोरेखित झाली.

इबोला विषाणू (इलेक्ट्रॉन सूक्ष्मदर्शकाखालील छायाचित्र)

विषाणूची संरचना : इलेक्ट्रॉन सूक्ष्मदर्शकाखाली इबोला विषाणू लांब तंतूप्रमाणे दिसतो. त्याचा व्यास ८० नॅमी. तर लांबी ८०० – १४,००० नॅमी.पर्यंत असू शकते. हे लवचिक विषाणू तंतू सापासारखे वेटोळे, फांद्या फुटलेले, विभागलेले, डुकराच्या शेपटाप्रमाणे, ६ आकड्याप्रमाणे, यू (U), जी (g), वाय (Y) अक्षराप्रमाणे अशा नानाविध आकारात आढळतात. आयबोल्ट किंवा शेफर्ड्स क्रूक (Shepherds crook) हा विशेष आकारही त्यात नेहमी आढळतो. तंतूंच्या बाहेरील भाग आश्रयी पेशींच्या पेशीपटलापासून बनलेले वसा-प्रथिनांचे गुळगुळीत आवरण (Lipoprotein  membrane) असते. पेशीतून बाहेर पडताना विषाणू ते लपेटून घेतात. त्याखाली आधारक प्रथिनांचे (Matrix proteins) कवच व गाभ्यामध्ये विषाणूचा एकेरी ऋण पेड आरएनए (Single stranded, Negative  sense) जीनोम (Genome) असतो. आरएनएभोवती सर्पिल आकाराच्या प्रथिनांचे संरक्षक कवच असते. याला एकत्र न्यूक्लिओकॅप्सिड (Nucleocapsid) म्हणतात. १९,००० न्यूक्लिओटाइडे (Nucleotides) असलेल्या जीनोममध्ये सात जनुके असतात. पेशींमध्ये शिरून, स्वतःच्या प्रती निर्माण करण्याची सर्व माहिती या जीनोममध्ये लिहिलेली असते.

विषाणूचे प्रकार : एबोला विषाणूचे झायरे (Zaire ebolavirus), सुदान (Sudan ebolavirus), बुंडिबुग्यो (Bundibugyo ebolavirus), ताई फॉरेस्ट (Tai Forest  ebolavirus), रेस्टन (Reston ebolavirus) आणि बोंबाली (Bombali ebolavirus)  हे सहा उपप्रकार ओळखण्यात आले आहेत. यातील पहिले तीन विषाणू अत्यंत संसर्गजन्य आणि वेगाने पसरणारे असून आफ्रिकेतील बहुतांश साथी त्यांच्यामुळे येतात.  १९८९ मध्ये अमेरिकेतील रेस्टन येथे सापडलेला उपप्रकार मुख्यतः कपिवर्गीय प्राण्यांमध्ये संसर्ग घडवतो. रेस्टन, ताइ फॉरेस्ट आणि २०१८ मध्ये नव्यानेच सापडलेला बोंबाली उपप्रकार त्या मानाने सौम्य असून माणसांमध्ये गंभीर रोग उत्पन्न करत नाही.

रोगप्रसार : इबोला पशुसंक्रमित/ प्राणिजन्य (Zoonotic disease) रोग आहे. आफ्रिकेमध्ये होणारे बहुतांश उद्रेक विषाणूग्रस्त वटवाघळे, माकडे, चिंपांझी, गोरिला, यांच्याशी मानवी संपर्क आल्याने होतात. परंतु विषाणूचे नैसर्गिक वसतिस्थान अद्याप नेमके माहिती नाही. टेरोपोडिडी (Pteropodidae)  कुळातील फलभक्षी वटवाघळांच्या (Fruit bats) तीन प्रजातींमध्ये इबोला विषाणू आणि त्याचा आरएनए सापडतो. वारंवार उद्रेक होणाऱ्या भागांमध्ये या तिन्ही प्रजाती आढळतात. वटवाघळांमध्ये आजाराची कोणतीही लक्षणे दिसत नाहीत. परंतु रोगग्रस्त वटवाघळांचे रक्त आणि शारीरिक द्रवांशी संपर्क आल्याने, त्यांचे मांस खाल्ल्याने किंवा वटवाघळांनी अर्धवट खाल्लेल्या अथवा विष्ठेमुळे दूषित झालेल्या फळांमधून इतर माकडे, चिंपांझी, गोरिला, काळवीट, साळींदर इत्यादी प्राण्यांना संसर्ग होतो. या संसर्गाला तज्ञ स्पिल ओव्हर (Spill over) अर्थात ऊतू जाण्याची घटना असे संबोधतात. विषाणूग्रस्त प्राणी आता स्वतःच संसर्गस्रोत बनतात आणि त्यांच्या रक्त, मांस व अन्य शारीरिक द्रवांच्या संपर्कात आलेल्या इतर प्राणी किंवा माणसांमध्ये विषाणू पसरतो. अशाप्रकारे संसर्गचक्र सुरू राहते. उद्रेकांच्या मधील काळात निसर्गात एक किंवा अधिक प्रजातींमध्ये विषाणू टिकून राहत असावा. या गुंतागुंतीच्या प्रणालीमध्ये अचानक मानवी हस्तक्षेप झाल्याने इबोला विषाणू माणसापर्यंत पोहोचतो, असे वैज्ञानिक मानतात. त्यामुळे इबोला विषाणूला नव्याने उद्भवणारा विषाणू म्हटले जाते.

वटवाघळाच्या सरळ संपर्कातून, त्यांच्या लाळेने किंवा विष्ठेने दूषित झालेल्या फळांमधून तसेच रोगग्रस्त प्राण्यांची शिकार, मांस हाताळणे आणि खाण्यातून इबोला विषाणू माणसापर्यंत पोहोचतो. डोळे, नाक व तोंडातील श्लेष्मल पटले किंवा त्वचेवरील अत्यंत सूक्ष्म जखमांमधून इबोला विषाणू शरीरात प्रवेश करतो. स्नायू आणि हाडे वगळता सर्व पेशींमध्ये आणि विशेषतः संयोजी (Connective tissue)  ऊतींमध्ये तो वेगाने वाढतो. आठ ते दहा दिवसांच्या उबवण कालानंतर (Incubation period) आजाराची लक्षणे दिसू लागतात.  हा कालावधी काही वेळा २ – २१ दिवसांपर्यंत असू शकतो.

इबोला विषाणू संसर्ग : काही लक्षणे

लक्षणे : या आजाराची लक्षणे अचानक दिसू लागतात आणि हळूहळू गंभीर होत जातात. सुरुवातीला मरगळ, प्रचंड थकवा, ताप, घसा खवखवणे, डोकेदुखी, स्नायू आणि सांध्यांमध्ये वेदना ही लक्षणे दिसतात. प्राथमिक लक्षणे फ्लू, मलेरिया, टायफॉइडशी मिळतीजुळती असल्याने काही वेळा सुरुवातीला इबोलाचे नेमके निदान करणे कठीण असते.  या लक्षणांना कोरडी लक्षणे (Dry symptoms) म्हणतात. चार ते पाच दिवसांनी तीव्र पोटदुखी, उलट्या-जुलाब, मळमळ आणि अंतर्गत रक्तस्राव ही गंभीर लक्षणे दिसतात. ही लक्षणे म्हणजे सद्रव लक्षणे (Wet symptoms) होत. पुढच्या टप्प्यात अंतर्गत रक्तस्राव तसेच डोळ्याच्या कडा, नाक, हिरड्या, स्तनाग्रे, योनी, गुदद्वारातून तसेच त्वचेखाली रक्तस्राव होऊ लागतो. अवयवांचे कार्य मंदावत जाऊन ते निकामी झाल्याने मृत्यू ओढवतो. याला इबोला रक्तस्रावी आजार  (Ebola haemorrhagic disease) असे म्हणतात. लक्षणे दिसू लागल्यानंतर एका व्यक्तीकडून इतरांना इबोलाची लागण होऊ शकते. जसजशी लक्षणे वाढत जातात तसतसे ऊती, रक्त, घाम, लाळ, मूत्र, विष्ठा, उलटी, गर्भजलामध्ये आणि अंगावरचे दूध तसेच वीर्यामध्येही विषाणू मोठ्या प्रमाणात आढळतात. यांपैकी कोणतेही शारीरिक द्रव किंवा आजारी व्यक्तीने वापरलेल्या अंथरुण, कपडे, संक्रमित सुया, वैद्यकीय उपकरणे इत्यादींमधून तसेच लैंगिक संबंधातून, मातेकडून अर्भकाला अशा अनेक मार्गांनी एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीला विषाणूचा संसर्ग होतो. कीटकदंश आणि अन्नपाण्यातून इबोलाचा संसर्ग होत नाही.

इबोला संसर्गाचा सरासरी मृत्युदर ५०% आहे. परंतु विविध उद्रेकांमध्ये २५ – ९० % इतका मृत्युदर आढळतो. पूर्ण बरे होण्यासाठी दोन आठवड्यापासून काही महिन्यांचा कालावधी लागतो. अनेक रुग्णांमध्ये हातापायांना मुंग्या येणे, बधिरता, सांधेदुखी, दृष्टिदोष, प्रकाशसंवेदनशीलता, विभ्रम यांसारख्या गुंतागुंती दिसून येतात. आजारातून बाहेर पडल्यानंतर रुग्ण संसर्गजन्य राहत नाही. क्वचित विषाणू शरीराच्या मेंदू, वीर्य, डोळे अशा भागात लपून राहतो आणि त्यामुळे पूर्णपणे बरे झालेले रुग्णदेखील विषाणूचे वाहक बनतात. बचावलेल्या रुग्णांमध्ये दहा वर्षांपर्यंत प्रतिकारक्षमता टिकून राहते.

निदान व उपचारपद्धती : रुग्णाच्या थेट संपर्कात येणाऱ्या, शुश्रूषा करणाऱ्या, वैद्यकीय सेवा पुरवणाऱ्या इतकेच नव्हे तर मृत देहाच्या संपर्कात येणाऱ्या सर्वांनाच संसर्गाचा धोका असतो. प्राथमिक लक्षणे व रक्त चाचण्यांधून रोग निदान केले जाते. इबोला विरुद्ध औषधे व उपचारपद्धती अजून उपलब्ध नाहीत. लक्षणांची तीव्रता कमी करून रोगमुक्त होण्यास मदत करणे हा वैद्यकीय उपचारांचा मुख्य हेतू असतो. रक्तसंक्रामण आणि सलाइनद्वारे शरीरातील द्रवांची कमतरता भरून काढण्यासाठी उपाय केले जातात. तसेच वेदनाशामक औषधे, रक्तदाब आणि ऑक्सिजन पातळी नियंत्रण यांसारख्या उपायांनी लक्षणे थोडीफार सौम्य करता येतात.  २०२० मध्ये प्रथमच अमेरिकेतील अन्न व औषध प्रशासनाने अंसुव्हिमॅब/ एमएबी ११४  (AnsuvimabTM,  mAb114 ) आणि इंमाझेब /रेगन-ईबी३ (InmazebTM,  REGN-EB3)  या एककृतक प्रतिपिंडांना (Monoclonal antibodies)  इबोला झायरेच्या उपचारांसाठी मान्यता दिली आहे. इतर प्रकारच्या इबोला विषाणूंविरुद्ध अजून विशिष्ट एककृतक प्रतिपिंडे उपलब्ध नाहीत, परंतु त्यावरही वेगाने संशोधन चालू आहे.

विषाणूबद्दल जागरूकता वाढवणे आणि लोकसहभाग इबोलाच्या साथी आटोक्यात आणण्यासाठी अत्यावश्यक आहे. लवकरात लवकर वैद्यकीय मदत मिळवणे, रुग्णांचे विलगीकरण, रुग्णाशी अनावश्यक संपर्क टाळणे, वैद्यकीय तज्ज्ञांच्या सूचना पाळणे, हे साधे उपाय रोगाचा फैलाव रोखण्यासाठी निश्चित परिणामकारक ठरतात. २०१९ मध्ये मर्क कंपनीची एर्व्हेबो (Ervebo) आणि जॉन्सन अँड जॉन्सन कंपनीची झाब्डेनो आणि एमव्हाबे (Zabdeno and Mvabea) या दोन लसींना मान्यता मिळाली आहे.  एर्व्हेबो लस एकाच मात्रेची असून निश्चित निदान झालेल्या रुग्णांना दिली जाते.  झाबडेनो आणि एमव्हाबे एकाच लसीचे दोन डोस असून,  आठ आठवड्याच्या अंतराने दिले जातात. ही प्रतिबंधात्मक लस आहे. वारंवार साथी येणाऱ्या भागांमध्ये रोगाचा प्रसार रोखण्यासाठी आणि आरोग्य सेवा कर्मचाऱ्यांसाठी ती विशेष उपयुक्त ठरत आहे.

संदर्भ :

1. https://www.bcm.edu/departments/molecular-virology-and-microbiology/emerging-infections-and-biodefense/specific-agents/ebola-virus

2. https://www.cdc.gov/ebola/causes/index.html

3. https://www.who.int/news-room/fact-sheets/detail/ebola-disease

 4. International Classification of Disease, ICD-11, 2024 : International Classification of Diseases (ICD)

समीक्षक : मद्वाण्णा, मोहन


Discover more from मराठी विश्वकोश

Subscribe to get the latest posts sent to your email.