बंगालच्या उपसागरातील अंदमान व निकोबार या भारताच्या केंद्रशासित प्रदेशातील एक बेट. बाराटांग बेटाला रांचीवालाज बेट असेही म्हटले जाते; कारण एकोणिसाव्या शतकाच्या
अखेरीस रांची येथे राजकीय उलथापालथ झाली. ब्रिटिशांनी येथील ख्रिस्ती धर्मांतरित स्थानिक आदिवासी लोकांना अंदमान व निकोबार बेटांमधील बाराटांग बेटावर शेती करण्यासाठी मजूर म्हणून पाठविले. त्यामुळे रांचीच्या लोकांच्या वसाहतीवरून या बेटाला रांचीवालाज बेट असे म्हणतात. बंगालच्या उपसागरातील अंदमान व निकोबार बेटांपैकी सर्वांत उत्तरेकडील द्वीपसमूहाला मोठे अंदमान म्हणून ओळखले जाते. मोठ्या अंदमान बेटांपैकी उत्तरेकडील मध्य अंदमान आणि दक्षिणेकडील दक्षिण अंदमान या बेटांदरम्यान बाराटांग बेट असून त्याचा समावेश उत्तर व मध्य अंदमान जिल्ह्यात होतो. अंदमान व निकोबारची राजधानी असलेल्या पोर्ट ब्लेअर (श्री विजयपुरम) या शहरापासून उत्तरेस सुमारे १५० किमी. अंतरावर हे बेट आहे. या बेटाची लांबी २८ किमी., रुंदी १४ किमी., किनाऱ्याची लांबी ११७ किमी. आणि क्षेत्रफळ २४३ चौ. किमी. आहे.
चिखली ज्वालामुखी : भारतातील एकमेव जागृत चिखली ज्वालामुखी या बेटावर असल्यामुळे हे बेट विशेष प्रसिद्धीस आले आहे. भूशास्त्रीय दृष्ट्या बाराटांग बेटावरील ज्वालामुखी हा एक अद्वितीय ज्वालामुखी आहे; कारण कोणत्याही ज्वालामुखी उद्रेकाच्या वेळी भूगर्भातून सामान्यपणे लाव्हारस भूपृष्ठावर फेकला जातो; परंतु या ज्वालामुखीतून चिखल, पाणी व मिथेनसारखे वायू बाहेर फेकले जातात. त्यामुळे याला ‘चिखली ज्वालामुखी’ असे संबोधले जाते. स्थानिक लोक या ज्वालामुखीला ‘जल्की’ नावाने ओळखतात. तज्ज्ञांच्या मतानुसार सेंद्रिय घटक भूगर्भात खोलपर्यंत झिरपत जातात. ते सेंद्रिय घटक कुजल्यामुळे भूगर्भात वायूंची निर्मिती होते. उद्रेकाच्या वेळी अशा वायूंकडून भूगर्भातील चिखल, पाणी व वायू भूपृष्ठाकडे ढकलले जातात. त्यामुळे तेथे बुडबुडे व खड्डे तयार होतात. या उद्रेकाच्या वेळी लाव्हा बाहेर पडत नाही, तर तेथे बुद्बुद कुंड (बब्लींग पुल) व सुकलेल्या चिखलाची कुंडे तयार होतात. याचा उद्रेक १८ फेब्रुवारी २००३ रोजी झाला होता. त्यानंतर २००५ मध्ये झालेल्या उद्रेकाचा संबंध २००४ मधील हिंदी महासागरातील भूकंपाशी जोडला जातो. जवळजवळ दोन दशके हा ज्वालामुखी निद्रितावस्थेत होता. त्यानंतर २ ऑक्टोबर २०२५ रोजी दुपारी साधारण दीड वाजण्याच्या सुमारास एखाद्या स्फोटाप्रमाणे कानठळ्या बसणाऱ्या आवाजासह या ज्वालामुखीचा उद्रेक सुरू झाला. उद्रेकाद्वारे मोठ्या प्रमाणावर चिखल बाहेर फेकला गेला. या उद्रेकामुळे मातीचा ३ ते ४ मीटर उंचीचा ढिगारा तयार झाला असून एक हजार चौ. मीटरपेक्षा अधिक परिसरात चिखल, माती पसरलेली आढळली. तज्ज्ञांच्या मते, भूपट्टांच्या हालचालींमुळे २ ऑक्टोबर २०२५ रोजीच्या ज्वालामुखीचा उद्रेक झाला असावा. भूपट्ट एकमेकांवर आदळून एक भूपट्ट दुसऱ्या भूपट्टाखाली जातो. या प्रक्रियेला ‘अधोगमन’ म्हणतात. अंदमान व निकोबार बेटे ही अशा भूपट्ट्यांच्या वारंवार हालचाल होणाऱ्या अधोगमन क्षेत्रात येतात. त्यामुळे या बेटांना अनेकवेळा भूकंपाचे धक्के जाणवतात. अंदमान व निकोबार द्वीपसमूहातीलच बॅरेन बेटावरील ज्वालामुखीच्या उद्रेकामागेही हे कारण असू शकते. भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण संस्था (जीएसआय) येथील भूगर्भातील हालचालींचा, तसेच बाहेर पडलेल्या चिखलाचा अभ्यास करणार आहे.
अंदमान व निकोबार बेटांना भेट देणाऱ्या पर्यटकांचे हा ज्वालामुखी म्हणजे विशेष आकर्षण असते. हे स्थळ पर्यटकांचे प्रमुख आकर्षण असले, तरी सुरक्षिततेच्या कारणास्तव उद्रेकानंतर
तेथे जाण्यास मज्जाव करण्यात आला होता. आदिवासी राखीव क्षेत्रातून तेथे जावे लागते. तसेच पोर्ट ब्लेअरपासून खाजगी जीप, बस, मोटारगाडीने तसेच समुद्र पार करण्यासाठी फेरीच्या साहाय्याने जेटीपर्यंत जावे लागते. चिखली ज्वालामुखी, कार्स्ट भूमिस्वरूपे (चुनखडकातील ऊर्ध्वमुख आणि अधोमुख लवणस्तंभांनी युक्त वैशिष्ट्यपूर्ण गुहा), बेटावरील आणि खाड्यांवरील दाट खारफुटी वनस्पती (कच्छ वनस्पती), किनाऱ्यावरील सुंदर पुळणी, विशेषत: बालुडेरा पुळण इत्यादी, या सौंदर्यस्थळांमुळे बाराटांग बेट म्हणजे अंदमान व निकोबार बेटांवरील एक नैसर्गिक आश्चर्यच ठरले आहे. कच्छ वनश्रीच्या भागातून बोटीच्या साहाय्याने छान ट्रेक करता येतो. येथील उष्ण कटिबंधीय दमट हवामानामुळे समृद्ध जैवविविधता निसर्गप्रेमी पर्यटकांना अधिक आकर्षित करते. बेटावरील सदाहरित जंगले हा विविध प्रकारच्या पशु-पक्ष्यांचा जणू स्वर्गच आहे. बेटाच्या किनाऱ्यालगतच्या भागातही मोठ्या प्रमाणावर जलचर आढळतात. विशेषत: किनाऱ्याला लागून असलेल्या प्रवाळशैलभित्ती असंख्य प्रकारच्या जलचरांचे वसतीस्थान बनल्या आहेत. स्कुबा डायव्हिंग पर्यटकांचे आकर्षण बनले आहे. येथील पॅरट आयलंड हे बेट बघता येते. बाराटांगजवळील पॅरट बेट प्रसिद्ध असून सूर्यास्ताच्या वेळेस बेटाकडे परतणाऱ्या असंख्य पोपटांच्या थव्यांचे दृश्य विशेष मनोहारी असते. बाराटांग बेटावर १२ गावे असून २०११ च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या ५,६९१ होती. जगातील प्राचीन संस्कृतींपैकी एक व मूळ रहिवासी असलेल्या जरावा जमातीचे लोक आगळ्यावेगळ्या पद्धतीने बाराटांग बेटावरील जंगलात राहतात. त्यांच्या जीवनमानात आजपर्यंत फारसा बदल झालेला नाही. या बेटावरील स्थानिक निवासी प्रामुख्याने मासेमारी व शेती करतात. येथे येणाऱ्या पर्यटकांच्या प्रति ते अधिक आतिथ्यशील असतात. बेटाचे स्थान दुर्गम असले, तरी तेथे पर्यटकांच्या दृष्टीने सर्व प्रकारच्या सुखकारक सोयी उपलब्ध आहेत. हे बेट रंगत आणि मायाबंदर या ठिकाणांना जोडणाऱ्या अंदमान ट्रंक रोडने विभागले आहे. पोर्ट ब्लेअर येथील वीर सावरकर आंतरराष्ट्रीय विमानतळ बाराटांग बेटापासून सुमारे १०४ किमी. अंतरावर आहे.
संदर्भ : Rao, Boyina Ravi Prasad, Trees of Baratang Island, Andaman Islands, India, 2017.
समीक्षक : शंकर चौधरी
Discover more from मराठी विश्वकोश
Subscribe to get the latest posts sent to your email.