बऱ्हाणपूर. मध्य प्रदेशातील एक मध्ययुगीन ऐतिहासिक शहर. ‘बाब-ए-दख्खन’ (दक्षिणेचे प्रवेशद्वार) या नावानेही प्रसिद्ध. या स्थळाच्या नावाबद्दल मतमतांतरे आहेत. ‘स्कंदपुराणा’तील तापी माहात्म्यानुसार या शहराचे नाव ब्रघ्नपूर होते. भृगुऋषींनी येथे तप केल्यामुळे याला भृग्नपूर असेही नाव पडले. तसेच बरसानपूर, बरसानखेड असेही या शहराच्या नावाचे उल्लेख आढळतात. पंधराव्या शतकाच्या सुरुवातीला फारुकी राजवंशातील राजा नासीर खान याने नवीन स्थापलेल्या या राजधानीचे नाव त्याचे गुरू जैनुद्दीन यांच्या सांगण्यावरून खुलताबादचे सुफी संत बुऱ्हानुद्दीन यांच्या नावे बुऱ्हाणपूर असे ठेवले. तापी नदीचे हे खोरे गुजरातची एक शाखा असलेल्या खानदेशच्या फारुकी वंशाच्या राजांच्या स्वतंत्र राजवटीखाली होते.
सातवाहन, गुप्त, राष्ट्रकूट, कलचुरी, यादव व चौहान राजवटीखाली हे क्षेत्र राहिले. त्यानंतर मुहम्मद बिन तुघलकाने काही काळ हा प्रदेश आपल्या ताब्यात घेतला. पण त्याच्या अनागोंदीचा फायदा घेऊन मलिक अहमद याने फारुकी राज्याची स्थापना केली. त्यानंतर फारुकी राज्याने बुऱ्हाणपूरचा प्रदेश आसिरगडचा राजा आसा असीर याकडून जिंकला. नासिर खानने इ. स. १४०० मध्ये बुऱ्हाणपूरचा पाया रचला. सु. २०० वर्षे तापीचा हा प्रदेश फारुकी राजवटीखाली अध्यात्म, व्यापार, शेती यांत उत्कर्षास आला होता. विशेषतः कापड बाजारपेठ म्हणून हे शहर प्रसिद्ध झाले. मोगल बादशाह अकबराने केलेल्या आक्रमणानंतर हा परिसर मोगलांच्या ताब्यात गेला (१६०१). जहांगीरच्या काळात बुऱ्हाणपूर एक मोक्याचे लष्करी ठाणे झाले. अकबरापासून ते औरंगजेबाच्या काळात मोगलकालीन बागा, रस्ते, हमामखाने, मशिदी यांची निर्मिती झाली. मोगल काळात सुरत बंदराच्या विकासासोबत बुऱ्हाणपूरचे कापड इराण, सौदी अरेबिया, तुर्की, पोलंड, कैरो (ईजिप्त) यांसारख्या जगाच्या विविध भागांत पोहोचले. या देशांत सोन्याचे भरतकाम केलेले कापड हे विशेषतः प्रसिद्ध होते. संरक्षणाच्या दृष्टीने संपूर्ण शहराला चिरेबंदी व तट बांधण्यात आले. व त्यास आठ महाद्वारे ठेवून नियंत्रित करण्यात आले. थोडक्यात बुऱ्हाणपूर हे दक्षिण भारताचे प्रवेशद्वार म्हणून ओळखले जाऊ लागले. सतराव्या शतकाच्या सुरुवातीला शाहजहानच्या काळात येथे राबविण्यात आलेल्या शाश्वत व अभेद्य स्वरूपाच्या जलव्यवस्थापन योजना महत्त्वाच्या मानल्या जातात. खानदेशचा तत्कालीन मोगल सुभेदार अब्दुल रहीम खान-ए-खान याने ही योजना पर्शियातील भूजल शास्त्रज्ञ तबकुतल-ए-अर्ज याच्या मदतीने साकारली. फारुकी आणि मोगल सत्तेच्या काळात बुऱ्हाणपूर आर्थिकदृष्ट्या भरभराटीस आले होते. छत्रपती संभाजी महाराजांनी याच शहराची तब्बल तीन दिवस लूट करून मोगलांना चपराक दिली होती (१६८१). येथील प्रमुख स्मारकवास्तू खालीलप्रमाणे :

शाही किल्ला : हा किल्ला तापी नदीच्या काठावर वसलेला आहे. याचे बांधकाम मूळतः फारुकी वंशाच्या राजा आदिलखान दुसरा यांनी केले होते. नंतर मोगल काळात, विशेषतः शाहजहानच्या काळात यात अनेक सुधारणा करण्यात आल्या. शाहजहानने येथे ‘दिवाण-ए-आम’ आणि ‘दिवाण-ए-खास’ बांधले होते. मुमताज महलसाठी बनविलेले किल्ल्यातील शाही हमाम हे स्नानगृह आकर्षक असून त्याच्या छतावर सुंदर रंगकाम आणि नक्षीकाम पाहायला मिळते. या किल्ल्यात कुंडी भंडारा योजनेचे पाणी फिरवण्यात आले होते. यात अष्टकोनी खोल्या आणि त्यांच्या छतावर भित्तिचित्रे (म्युरल पेंटिंग) आहेत.

जामा मशीद : शहराच्या मध्यभागी असलेली ही मशीद वास्तुकलेचा एक उत्कृष्ट नमुना आहे. याचे बांधकाम फारुकी राजा आदिल शाह याने १५८८-८९ मध्ये सुरू केले होते आणि नंतर मोगल सम्राट अकबरने ते पूर्ण केले. मशिदीच्या मुख्य भिंतीवर अरबी आणि संस्कृत अशा दुहेरी भाषेतील शिलालेख दिसून येतात.

कुंडी भंडारा : १६१५ मध्ये मोगल सुभेदार अब्दुल रहीम खान-ए-खान याने पर्शियन ‘कनात’ (Qanat) तंत्रज्ञानावर आधारित बांधलेले हे एक अद्वितीय आणि प्रभावी जलव्यवस्थापन तंत्र मानले जाते. यामध्ये तापी नदीच्या खोऱ्यातील सातपुडा डोंगररांगांमधून येणारे नैसर्गिक पाणी भूमिगत बोगद्यांद्वारे शहरापर्यंत आणले जाते. सु. ४०० वर्षांनंतरही हे तंत्र कार्यरत असून आजही बुऱ्हाणपूरच्या काही भागाला यातून पाणीपुरवठा होतो. ही प्रणाली सातपुडा पर्वताच्या पायथ्यापासून शहरापर्यंत सुमारे ५ ते ६ किमी. पर्यंत पसरलेली आहे. यातील भूमिगत बोगद्यात पाण्याचा प्रवाह सुरळीत ठेवण्यासाठी ठरावीक अंतरावर उभ्या विहिरी खोदल्या आहेत. या विहिरींमुळे बोगद्यात हवेचा दाब संतुलित राहतो. पावसाच्या पाण्याबरोबर जमिनीखालील नैसर्गिक जलस्त्रोतांना छेद देऊन त्यांचे पाणी बोगद्यात साठवले जाते. बोगद्यामध्ये ठरावीक अंतरावर असणाऱ्या खोल खड्ड्यांमुळे (सिल्ट ट्रॅप्स) पाणी वाहते राहून त्यातील जड माती आणि वाळू या खड्ड्यांमध्ये खाली बसते आणि वरचे शुद्ध पाणी पुढे वाहते. या जलव्यवस्थापन प्रणालीला युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या तात्पुरत्या यादीत स्थान मिळाले आहे.

आहुखाना : विश्रांतीचे ठिकाण. मुमताज महलचा मृत्यू झाल्यानंतर, तिचा मृतदेह आग्र्याला नेण्यापूर्वी सु. सहा महिने याच ठिकाणी दफन करण्यात आला होता. ताजमहाल बांधण्यासाठी ही जागा सुरुवातीला निवडली गेली होती, परंतु काही तांत्रिक कारणांमुळे तो आग्र्याला बांधण्यात आला.
काळा ताजमहाल : मोगल सेनापती शाहनवाजखान यांचे थडगे. हे स्मारक काळ्या दगडात बांधलेले असून त्याची रचना ताजमहालसारखी दिसते, म्हणून याला ‘काळा ताजमहाल’ म्हटले जाते.

असीरगड किल्ला : बुऱ्हाणपूरपासून साधारण २० किमी. अंतरावर असलेला हा किल्ला सामरिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा होता. भारतातील अनेक उंच किल्ल्यांपैकी हा एक किल्ला आहे. त्याची उंची समुद्रसपाटीपासून २३० फूट, तर भूभागापासून ९०० फूट असून तो सातपुडा पर्वतरांगेत आहे. किल्ला प्राचीन असला, तरी फारुकी आणि मोगल काळात याचे महत्त्व होते. अकबरने १६०१ मध्ये हा किल्ला जिंकून खानदेशवर आपले वर्चस्व प्रस्थापित केले होते.
गुरुद्वारा बडी संगत : शिखांचे दहावे गुरू गोविंदसिंग यांच्याशी संबंधित एक ऐतिहासिक शीख मंदिर.
दर्गा-ए-हकीमी : दाऊदी बोहरा समुदायाचे संत सय्यदी अब्दुलकादिर हकीमुद्दीन यांना समर्पित एक प्रार्थनास्थळ.
संदर्भ :
- Campbell, J. M., Gazetteer of the Bombay Presidency, Vol XII Khandesh, 1880, Digital Library of India Item 2015.281425.
- Harsch, Rachel Pei, Building Burhanpur, Muqarnas, Vol. 39, Brill, 2022.
- Russell, R. V., Central Provinces District Gazetteers Nimar District Vol-a, 1908, Digital library of India Item 2015.16004.
- Lane-Poole, Stanley, Medieval India under Mohammedan Rulers AD 712-1764, 2nd Edition, A Universal Publication, USA, 1971,
- मोरवंचीकर, रा. श्री., ‘मध्ययुगीन जलसंधारण – जल व जलव्यवस्थापन’, विद्या बुक पब्लिशर्स, औरंगाबाद, २०२३.
समीक्षक : राहुल मगर
Discover more from मराठी विश्वकोश
Subscribe to get the latest posts sent to your email.