
अँब्रोझ, संत : (? ३३९—? ३९७). एक ख्रिस्ती धर्मशास्त्रवेत्ते. त्यांना मिलानचे संत अँब्रोझ या नावानेही ओळखले जाते. त्यांचा जन्म जर्मनीतील ऑगस्टा ट्रेव्हेरोरम (सध्याचे ट्रायर) या ठिकाणी झाला. त्यांचे वडील सिनेटर होते. मात्र अँब्रोझ यांच्या जन्मानंतर अल्पावधीतच त्यांच्या वडिलांचा मृत्यू झाला. त्यानंतर त्यांची आई आणि नन असलेली मोठी बहीण मार्सेलीना यांनी त्यांचे पालनपोषण केले. ‘बायबल’चे टीकाकार आणि चर्च-राज्य संबंधांच्या मध्ययुगीन संकल्पनांसाठी एक आदर्श प्रदान करणाऱ्या कल्पनांचे ते प्रवर्तक होते. एक धर्मशास्त्रज्ञ आणि राजकारणी म्हणून त्यांनी ३७४ ते ३९७ पर्यंत मिलानचे बिशप म्हणून काम केले. त्यांनी एरियनवाद आणि मूर्तिपूजाविरुद्ध ख्रिस्ती धर्माचा उत्कटतेने प्रचार करणारे एक सार्वजनिक व्यक्तिमत्त्व म्हणून प्रमुख भूमिका बजावली.
संत अँब्रोझ हे बिशप होण्यापूर्वी आणि नंतर तत्त्वज्ञानाचे एक उत्साही विद्यार्थी होते. विद्यार्थिदशेत असताना त्यांनी जे काही शिकले, त्याचा वापर त्यांनी ख्रिस्ती धर्माच्या प्रचारासाठी सर्वतोपरी केला. त्यांच्या या सेवाव्रती भूमिकेमुळे ते चर्च नेत्यांच्या प्रभावाखाली आले. मध्ययुगीन ख्रिस्ती धर्मशास्त्राच्या विकासावर आणि मध्ययुगीन ख्रिस्ती चर्चच्या प्रशासकीय धोरणांवर त्यांच्या विचारांचा खोलवर प्रभाव पडला. लॅटिन अथवा रोमन चर्चचे संत ऑगस्टीन, जेरोम, पोप ग्रेगरी द ग्रेट व संत अँब्रोझ या चार श्रेष्ठ धर्मगुरूंपैकी ते स्वत: एक महान धर्मगुरू होते. इ. स. ३८७ मध्ये त्यांनी संत ऑगस्टीन यांना ख्रिस्ती धर्माची दीक्षा दिली होती.
साहित्य आणि संगीत क्षेत्रांत त्यांचे कार्य मोलाचे आहे. तसेच त्यांचे प्रवचन, भाषणेही तितकेच प्रभावशाली आहेत. त्यांची ग्रंथसंपदा विपुल असून त्यांपैकी नीतिशास्त्रावर भाष्य केलेला ‘दे ऑफिसिस मिनिस्ट्रोरम’ (३७७–३९१) आणि विश्लेषणात्मक असलेला ‘एक्झामेन’ (३८६–३९०) हे ग्रंथ उल्लेखनीय आहेत. तसेच त्यांच्या ‘दे आयझॅक एट ॲनिमा (इं. भा. ‘ऑन आयझॅक अँड द सोल’) आणि ‘दे बोनो मॉर्टिस’ (इं. भा. ‘ऑन द गुडनेस ऑफ डेथ’) या साहित्यकृतीही लॅटिन साहित्यात अजरामर मानल्या जातात.
इटलीच्या सामान्य शासकवर्गात संत अँब्रोझ यांचे सम्राटाशी असलेले संबंध हे त्यांच्या प्रभावशाली स्थानाचा फक्त एक भाग होते. त्यांनी ख्रिस्ती धर्मीय आणि मूर्तिपूजक अशा दोन्ही प्रकारच्या नवीनतम ग्रीक शिक्षणाचा–विशेषतः फिलिस्टिया, ओरिजेन, सीझेरियाचे संत बॅसिल आणि मूर्तिपूजक नवप्लेटोमतवादी, प्लोटायनस यांच्या कृतींचा–अभ्यास अतिशय जलदगतीने आत्मसाद केला. या अभ्यासाचा त्यांनी ‘बायबल’चे स्पष्टीकरण देणाऱ्या त्यांच्या प्रवचनांमध्ये आणि विशेषतः विद्वत्तापूर्ण तात्त्विक रूपकांमध्ये ‘जुन्या करारा’च्या आध्यात्मिक अर्थाचे समर्थन करण्यासाठी केला.
संत अँब्रोझ यांनी सुशिक्षित लॅटिन लोकांना ख्रिश्चन धर्माची एक अपारंपरिक शास्त्रीय आवृत्ती दिली. धर्मगुरुंच्या नैतिक जबाबदाऱ्यांवरील त्यांचा ‘दे ऑफिसिस मिनिस्ट्रोरम’ हा ग्रंथ सिसरो याच्या ‘दे ऑफिसिस’ या ग्रंथाच्या धर्तीवर अधिक कुशलतेने रचलेला आहे. त्यांनी रोमच्या नायकांच्या जागी ‘जुन्या करारा’तील नायकांना ख्रिश्चन अभिजात वर्गासाठी आदर्श म्हणून स्थापित करण्याचा प्रयत्न केला. पत्रे, भेटी आणि नामांकनांद्वारे, त्यांनी रोमन गव्हर्नर म्हणून राज्य केलेल्या उत्तर इटालियन शहरांमध्ये या उच्चभ्रू ख्रिश्चन धर्माला बळकटी दिली.
मिलानमध्ये संत अँब्रोझ यांनी नवीन पौर्वात्य सुरांची ओळख करून, विशेषतः ‘एतेर्ने रेरम कॉन्डिटर’ (पृथ्वी आणि स्वर्गाचा निर्माता) आणि ‘ड्यूस क्रिएटर ओम्नियम’ (सर्व गोष्टींचा निर्माता, सर्वोच्च देव) ही सुंदर स्तोत्रे रचून लोकांना मोहित केले. बाप्तिस्मा घेण्यासाठी इच्छुकांना सूचना देण्यात त्यांनी कोणतीही कसर सोडली नाही. त्यांनी सामाजिक गैरप्रकारांचा निषेध केला आणि अनेकदा दोशींना क्षमा मिळवून दिली. त्यांनी अत्यंत कठोर नैतिक वर्तनाचा पुरस्कार केला. त्यामुळे प्रतिष्ठित कुटुंबे त्यांच्या विवाहयोग्य असलेल्या मुलींना संत अँब्रोझ यांच्या प्रवचनांना उपस्थित राहण्यास परवानगी देत नसत; कारण त्या प्रवचनांमध्ये संत अँब्रोझ त्यांना कौमार्य या सर्वोच्च सद्गुणाचा आग्रह करीत असत.
त्यांचे मिलान (इटली) येथे निधन झाले.
संदर्भ :
- Pasini, Cesare, Ambrose of Milan : Deeds and Thought of A Bishop, New York, 2013.
- Dunkle, S.J. Brian, Trans., Enchantment and Creed in the Hymns of Ambrose of Milan, Oxford, 2016.
- McLynn, Neil B. Ambrose of Milan: Church and Court in a Christian Capital, 1994.
समीक्षक : आनंद गेडाम
Discover more from मराठी विश्वकोश
Subscribe to get the latest posts sent to your email.