ख्रिस्ती लोकांचे उपासनामंदिर ‘चर्च’ म्हणून ओळखले जाते. चर्च हे ख्रिस्ती ऐक्याचे प्रतिक आहे. चर्चच्या समोरील भागाला ‘Facade’ असे म्हणतात. १) चर्चचा दर्शनी भाग (Facade) : त्यात मुख्य प्रवेशद्वार असते. प्रत्येक चर्च हे येशू, मरिया माता (व तिला प्रदान करण्यात आलेल्या अनेक अलौकिक उपाधी) तसेच ख्रिस्ती परंपरेत घोषित करण्यात आलेले संत ह्यांना समर्पिली जातात व त्यांच्या इमाज आणि नावे ह्या दर्शनी भागात आढळतात. सर्वसाधारण त्या भागात उंच मनोरे, तेही अर्धगोलाकार, घुमटरूपी असतात. येशू ख्रिस्ताच्या विजयाची खूण म्हणून पवित्र क्रूसवरच्या टोकावर सर्वांत उंच उभारला जातो. येशूचे एखादे अर्थपूर्ण उद्गारही अशा दर्शनी भागात कोरतात अथवा रंगवतात. दर्शनी भागाला तीन दरवाजे असतात. एक मुख्य प्रवेशद्वार व दोन्ही बाजूला दोन दरवाजे पिता, पुत्र व पवित्र आत्मा या त्रैक्याचे स्मरणच जणू आतमध्ये प्रवेश करणाऱ्याला करून देतात.

२) घंटाघर : या त्याच्या नावातच त्याचा अर्थ दडलेला आहे. चर्चवर एकतर कळस असतो किंवा समोर घंटेचा मनोरा असतो. तेथे पंचधातूंपासून बनवलेली एक मजबूत व अवजड अशी घंटा टांगून ठेवलेली असते. घंटेच्या लोलकाला दुरून ओढण्यासाठी लांब असा एक मजबूत दोर बांधून ठेवलेला असतो. प्रवेशद्वाराजवळील चर्चच्या या भागाला घंटाघर असे म्हणतात. प्राचीन काळापासून ह्या घंटेचा उपयोग भाविकांना उपासनेसाठी आमंत्रण देण्यासाठी करण्यात येत आहे. मध्ययुगात जे भाविक मोठ्या तांत्रिक अडचणींमुळे मिस्सा बलीदानाच्या उपासनेस हजर राहू शकत नव्हते त्यांनी घरूनच ह्या बलिदानात सहभागी होऊन इतर भाविकांबरोबर आपले भावनिक ऐक्य साधावे म्हणून ह्या घंटेद्वारे त्यांना स्मरण करून दिले जाई. ही घंटा उपासनेचे एक प्रतीकच आहे. ह्या घंटेचा आवाज धर्मग्रामात सर्वत्र पोहोचेल, अशी व्यवस्था असते.

चर्चची ही घंटा दिवसातून तीन वेळा वाजवली जाते. भाविकांनी खासगी रीत्या प्रार्थना करावी म्हणून त्यांना आठवण करून दिली जाते. रोज पहाटे ५ वाजता, दुपारी १२.३० वाजता व सायंकाळी ७ वाजता अशी दररोज तीनदा ही घंटा वाजवली जाते. पवित्र मिस्सा सुरू होण्याच्या ३० मिनिटे आधी ही घंटा वाजवली जाते व त्यानंतर १५ मिनिटांनी दुसऱ्यांदा वाजवली जाते. ह्या घंटेद्वारे भाविकांना उपासनेसाठी आमंत्रण दिले जाते व भाविकांना तयारी करण्यासाठी पुरेसा अवधी दिला जातो. तसेच एखाद्या भाविकाचा मृत्यू होतो त्या दिवशी त्याचा अंत्यविधी होण्याच्या अगोदर त्याच्या मृत्यूची माहिती सर्वांना मिळावी ह्या हेतूने दोन वेळेस घंटानाद केला जातो व त्याद्वारे दु:ख व्यक्त केले जाते.

३) बाप्तिस्मा कुंड : याला ‘स्नानसंस्कार जलकुंड’ असेही म्हटले जाते. प्रत्येक ख्रिस्ती बालकाचा बाप्तिस्मासंस्कार हा चर्चच्या प्रवेशद्वाराशी व बाप्तिस्मा जलकुंडापाशी साजरा केला जातो (चर्चच्या प्रवेशद्वारापाशी पवित्र पाण्याची जी छोटी जलकुंडे असतात, ती भाविकांना त्यांच्या बालपणी दिलेल्या बाप्तिस्माच्या वचनाची आठवण करून देतात). पूर्वी लहान बालकांना बाप्तिस्मासंस्कार देत असताना या जलकुंडात त्यांना सचैल स्नान घडवून आणले जाई. आता मात्र त्यांच्या डोक्यांवर प्रतिकात्मक पाणी ओतले जाते. (काही ठिकाणी छोटे जलाशय तयार करून त्यात स्नानसंस्कार देताना उमेदवारांना बुडवून काढले जाते. महाराष्ट्रात असे लघु जलाशय कमी आहेत). अनेक चर्चमध्ये स्नानसंस्कार कुंड प्रवेशद्वाराच्या उजव्या बाजूला ठेवले जाते, तिथे स्नानसंस्कार दिला जातो. वेदीजवळ पवित्र गाभाऱ्यात ही बाप्तिस्मा देण्याची प्रथा आहे. येशूने यार्देन नदीत स्वत: बाप्तिस्मा घेतला आणि त्याच्या परमपवित्र स्पर्शाने ती नदी पवित्र झाली. त्याच्या स्पर्शाने त्यातील पाणी पवित्र झाले. त्याचेच प्रतीक म्हणून ह्या पवित्र पाण्याने स्नानसंस्कार दिला जातो. पाणी हे शुद्धतेचे प्रतिक आहे. बाप्तिस्मा जलकुंडात नवजात बालकाला अभिषेक करून ते बालक अखिल ख्रिस्तसभेचा अधिकृत सभासद होते. त्याला आपले स्वत:चे नाव मिळते. ईस्टरच्या रात्री उपासनाविधीच्या वेळी पास्काची मेणबत्ती ह्याच जलकुंडात प्रथम ठेवून त्यातील पाणी आशीर्वादित केले जाते.

४) सभागार : चर्चचा सभागार हा ख्रिस्त मंदिरातील एक विशेष भाग असतो. मुख्य प्रवेशद्वारापासून ते वेदीपर्यंतचा मध्य भाग हा ‘सभागार’ या नावाने ओळखला जातो. सामुदायिक उपासना चालू असताना दोन्ही स्त्री-पुरुष भाविक या जागेवर असतात. चर्चचा हा प्रशस्त भाग असतो. धर्मगुरू वेदीवरून भाविकांसोबत मिस्सा साजरी करतात त्या वेळी सर्व भाविक ह्याच सभागारात उभे, बसलेले किंवा गुडघ्यावर असतात. पवित्र मिस्साबली सुरू असताना ह्या सभागारात शांतता असते आणि जेव्हा सर्व भाविक सामूहिक रीत्या या सभागारात मिस्सात सहभाग घेतात, त्या वेळी परमेश्वराची स्तुती होते ती त्याच वेळेला स्वर्गात केली जाते, असाच भास होतो.

५) पापनिवेदन कक्ष : पापनिवेदन कक्षाला ‘प्रायश्चित्तालय’ असे सुद्धा म्हटले जाते. प्रायश्चित्त संस्कार स्वीकारण्यासाठी चर्चमध्ये योग्य ठिकाणी जागा तयार केली जाते. तिथे भाविकांना खाजगीत पण मुक्तपणे बोलता येऊ शकते. केलेल्या पापाचे प्रायश्चित्त करून जीवन नव्याने जगण्याची उर्मी या कक्षात दिली जाते. चर्चमधील धर्मगुरूंकडे आपल्या पापाची कबूली दिली जाते. हे एक आसन असते. धर्मगुरू त्याच्यावर स्थानापन्न होतात व पापनिवेदन करणारा श्रद्धावंत त्यांच्यासमोर बसतो. परंतु त्या दोघांमध्ये एक जाळीचा पडदा लाकडी फ्रेममध्ये बसविलेला असतो. ज्या जाळीतून धर्मगुरूंशी मोकळ्या मनाने संवाद साधता येतो. येथे केवळ गुरुदीक्षा घेतलेल्या धर्मगुरूंनाच पापनिवेदन ऐकण्याचा अधिकार असतो. हे पापनिवेदन ऐकून धर्मगुरू त्या भाविकाला येशूच्या वतीने क्षमादान देतात. अशी ऐकलेली पापे गुप्त ठेवण्याचे व कोणत्याही परिस्थितीत ती इतर कोणालाही प्रकट न करण्याचे वचन धर्मगुरू आपल्या दीक्षाविधीच्या वेळेसच ख्रिस्तसभेला देतात. पापनिवेदन कक्ष आपल्याला ख्रिस्ताशी व ख्रिस्तसभेशी आपले दुरावलेले संबंध पुन्हा प्रस्थापित करण्यास मोलाचे योगदान देते.

६) प्रवचनपीठ : हे पिंपासारखे एक लाकडाचे अर्धगोलाकार मजबूत व्यासपीठ असते. पवित्र मिस्साबली साजरा होत असताना प्रभू शब्द घोषित करण्यासाठी व प्रवचन देण्यासाठी ह्याचा वापर केला जातो. ख्रिस्त हा ‘शब्द’ आहे, तो पित्याच्या उजव्या हाती बसला आहे, हे स्पष्ट करण्यासाठी प्रवचनपीठ सर्वसाधारणपणे वेदीच्या उजव्या बाजूस आढळते. ह्या प्रवचनपीठावरून दुसऱ्या कोणत्याही सूचना केल्या जाऊ नयेत, असा शिष्टाचार आहे. देवाचा शब्द हा पवित्र आहे व त्याचे पावित्र्य पाळणे अगत्याचे आहे, म्हणून ही दक्षता पाळली जाते.

७) वेदी : हा चर्चचा सर्वांत महत्त्वाचा व अत्यंत पवित्र मानला जाणारा भाग असतो. हे अत्यंत आदरणीय स्थळ असून धर्मगुरू तिथे ख्रिस्ताच्या आत्मसमर्पणाची प्रतिकृती साजरी करतात. येशू ख्रिस्ताने मानव जातीसाठी स्वत:चे बलिदान करून जगाचे तारण केले, तेच बलिदान मिस्साच्या रूपात प्रकट केले जाते. म्हणून वेदी ही ख्रिस्ताच्या अस्तित्वाची जागा मानली जाते. वेदी हे ठिकाण चर्चच्या प्रवेशद्वाराच्या बरोबर समोर पण केंद्रस्थानी असून सर्वांना ती दिसावी व सर्वांचे लक्ष वेदीकडे लागावे, अशा ठिकाणी उभारली जाते. सभागारापासून ही वेदी नेहमी उंचावर असते. खरे पाहता चर्चमधील वेदी हे कालवारीच्या टेकडीचे स्वरूप आहे. मुख्य वेदीवर केवळ दीक्षित धर्मगुरू, उपधर्मगुरू ह्यांनीच सार्वजनिक उपासनेच्या वेळी अधिकृत रीत्या प्रवेश करावा हा संकेत आहे. प्रभु शब्द वाचन करणारे प्रापंचिक ज्या ठिकाणी उभे राहतात, तो वेदीचा एक उपविभाग असतो. वाचन, इतर सूचना ह्या मुख्य वेदीवरून न देता ह्या उपविभागात उभे राहून वाचल्या जातात. वेदी ही अतिपवित्र जागा असते. चर्चमध्ये शक्यतो एकच वेदी असावी. प्रकाशाचे प्रतीक म्हणून व येशू ख्रिस्ताची साक्षात उपस्थिती म्हणून त्या वेदीवर रात्रंदिवस दिवा तेवत ठेवला जातो.

८) विधी वस्त्रालय : ख्रिस्त मंदिरात वापरायला लागणाऱ्या पवित्र वस्तू (पुस्तके व कपडे) ज्या ठिकाणी ठेवलेल्या असतात व ज्या ठिकाणी धर्मगुरू विधीपूर्वी पवित्र वस्त्रे परिधान करतात, त्यास ‘विधी वस्त्रालय’ असे म्हणतात. तेथे वस्त्रे व वस्तू ठेवण्यासाठी कपाटे असतात. अनेकदा वेदी सेवकांची वस्त्रेही तेथे ठेवली जातात. ही जागा पवित्र असल्यामुळे ती स्वच्छ ठेवून त्या जागेत सतत शांतता पाळली जाते.

९) गायकवृंद : गायकवृंद किंवा गायनमंडळ हे पवित्र मिस्साबलिदान सोहळ्यात अधिकृत रीत्या खूप महत्त्वाची भूमिका पार पाडतात. ख्रिस्तसभेत गायनमंडळाचे फार मोठे योगदान असते. गायनमंडळाचे कार्य हे प्रेषितीय कार्य आहे. गायन प्रमुख त्यांच्या पाचारणाचे भान राखत असतो. त्यांच्या कलेचा उपयोग ह्या भक्तीकार्यासाठी व्हावा, अशी प्रभूची इच्छा आहे. उपासनासंगीत केवळ कलेच्या प्रदर्शनासाठी नसते. ह्या गायनाद्वारे देवाशी सबंध जोडण्यास, एकमेकांशी सबंध जोडण्यास मदत करायची असते. भाविक आणि गायकवृंद ह्यांचा मेळ बसवायचा असतो, त्यासाठी गायनमंडळ योग्य गीते निवडतात. धर्मप्रांतीय अथवा प्रादेशिक उपासनासमितीने मान्य केलेली भक्तिगीतेच निवडली जातात. परमेश्वराचे स्तुतिगीत गाणे हे दोनदा प्रार्थना करण्यासारखे आहे. असे म्हणतात देवाचे स्तुतिगीत गायनाची परंपरा अनादीकाळापासून आहे. येशूचा जन्म झाला तेव्हा स्वर्गातून देवदूतांचा समुदाय येऊन त्या बाळाच्या जन्माच्या ठिकाणी स्तुतिगीत गाऊ लागतो, असा बायबलमध्ये उल्लेख आहे. नव्या करारातील प्रकटीकरण  या पुस्तकातदेखील देवदूत व वडीलजन हे परमेश्वराचे अखंड नामस्मरण करीत असल्याचे स्पष्टपणे सांगितले आहे. पवित्र मिस्साची सुरुवात प्रवेश गीताने होते व शेवट ही अंतिम गीताने होतो. या गायनमंडळात सर्वसाधारण १५ ते २५ जणांचा समूह असतो. पुरुष-स्त्रीया, मुलगे व मुली त्यांचा त्यात समावेश असतो. त्यात एक मुख्य गायक किंवा ‘मास्टर’ असतो. मराठी उपासना ही ख्रिस्ताच्या दु:ख, मरण वा पुनरुत्थान यांच्याशी संबंधित असल्याने कधी आनंदाचे, उत्साहाचे, विजयाचे; तर कधी गंभीर स्वरूपाचे वातावरण निर्माण करण्यात हा गायकवृंद यशस्वी होतो.

सार्वजनिक उपासनेत कोणत्या स्वरूपाची वाद्ये वाजवावीत हे स्पष्ट केले गेले आहे. तबला, पेटी, टाळ-मृदंग, बासरी व इतर अनेक वाद्ये गायनाला साथ देतात. त्यामुळे गायन सुरेल व सुमधुर होते. गीताच्या चाली सर्वसामान्य भाविकांनादेखील गाता येतील ह्याची खबरदारी घ्यावी लागते. कारण उपासनाविधीत गीत सुरू असताना गायनमंडळाबरोबर भाविकांनीही सहभाग घ्यावा, अशी ख्रिस्तसभेची शिकवण आहे. निवडलेली भक्तिगीते, विषय व वाचने ह्यांच्याशी संबंधित असणे गरजेचे आहे. ख्रिस्तसभा गायनमंडळे तयार करण्यास प्रोत्साहन देते. हे करताना दक्षता घेण्यास सांगते की, शक्य झाल्यास एका धर्माग्रामात अनेक गायनमंडळे असावीत. गावपातळीवर मूलगामी समूहात एकेक गायनमंडळ असल्यास सर्वात उत्तम; परंतु शक्यतो प्रमुख गायनमंडळाव्यक्तिरिक्त मुलांचेही गायनमंडळ असणे स्तुत्य.

१०) उपासनेसाठी गरजेची साहित्यसामग्री : उपासना म्हणजे देवाच्या घरात साजरा केलेला पवित्र विधी. उपासनेसाठी ज्या गोष्टी वापरल्या जातात त्यांना साहित्यसामग्री असे म्हटले जाते. उपासनेमध्ये जी गरजेची साहित्यसामग्री वापरली जाते, ती सर्व प्रतिकेच समजली जातात. ती उपासनेत विशिष्ट रहस्ये प्रकट करतात. त्यांची चार प्रकारांत विभागणी केली जाते. पवित्र स्थाने, उपासनेची पुस्तके, उपासना वस्त्रे व उपासना साहित्य.

  • पवित्र स्थाने : जी स्थाने पवित्र आहेत त्यांचे महत्त्व आणि पावित्र्य लक्षात घेणे आवश्यक असते. मंदिर, वेदी, स्नानसंस्कार कुंड, दफनभूमी इत्यादी भाग पवित्र स्थानांत मोडतात.
  • उपासनेची पुस्तके : उपासनेसाठी जी पुस्तके वापरली जातात, ती फार महत्त्वाची व गरजेची असतात. उपासनेच्या पुस्तकांच्या मदतीमुळे विधी सुरळीतपणे चालतो. भाविकांना मन एकाग्र करण्यास मदत होते. उपासनेच्या पुस्तकांमुळे एकाचवेळी सर्व मंदिरांत समान वाचने व प्रार्थना होत असल्याने सामूहिक एकात्मता शक्य होते.
  • उपासना वस्त्रे : पवित्र विधीसाठी विशेष वस्त्रे वापरली जातात. वस्त्रे ही प्रतिकेच आहेत. पवित्र विधी साजरा करताना चर्चमध्ये स्वच्छ, पवित्र व विशिष्ट भावना व्यक्त करणारे वस्त्र वापरले जाते. ही वस्त्रे अन्यत्र अन्य कारणांसाठी वापरली जात नाहीत. भक्तगणांत काही उपासनेची कामे विशिष्ट अधिकाऱ्यांना दिली जातात. त्यांची चटकन ओळख पटावी म्हणून त्यांनाही वेगळी वस्त्रे वापरण्याचे अधिकार दिले आहेत. ह्यामध्ये अंगरखा; की जे उपासनेला बाह्यस्वरूप देण्यासाठी व त्याद्वारे श्रद्धेचे विशिष्ट रहस्य प्रकट करण्यासाठी विविध रंगात वापरले जाते. सफेद, लाल, जांभळा, सोनेरी, चंदेरी रंगांची तसेच पायघोळ झगा, स्कंधपट्टा, वेदीवरील सफेद कपडा अशी वस्त्रे उपासनेत वापरली जातात.
  • उपासना वस्तू-साहित्य : ह्यामध्ये पवित्र वस्तू, पवित्र पात्रे व पवित्र प्रतिमा यांचा अंतर्भाव होतो.

पवित्र वस्तू : चर्चमध्ये उपासनेच्या वेळी ज्या सर्वसामान्य वस्तू वापरल्या जातात त्यांना विशेष आशीर्वाद देऊन त्या पवित्र केल्या जातात. मंदिरात ह्या वस्तूंचा योग्य आदर राखला जातो. उदा., उपासनेच्या मुख्य पुरोहितांची खुर्ची (महासन) वेदीवर ठेवलेली असते. ती वेदीवरून अन्य गोष्टींसाठी वापरली जात नाही. इतर महत्त्वाच्या वस्तू उपासनेत वापरण्यात येत आहेत त्या म्हणजे साक्रामेंताची पेटी, पवित्र पाणी, धूप, दीप इत्यादी.

पवित्र पात्रे : उपासनेसाठी ज्या पात्रांचा वापर केला जातो त्यांना खास आशीर्वाद देऊन ती पवित्र केली जातात व त्यांचा वापर फक्त उपासनेसाठीच केला जातो. रोमन विधीनुसार पवित्र पेला आणि तबक ह्याबरोबर भाकरी ठेवण्यासाठी वापरायचे तबकही प्रमुख पात्रे होती. पवित्र पेल्याचा संदर्भ बायबलमध्ये अनेकदा आला आहे. शेवटच्या भोजनाच्या वेळी असलेल्या एकाच पेल्यातून सर्व प्रेषित बाह्यरूपी द्राक्षारस वाटणारे पण वस्तूत: येशूचे रक्त प्राशन करत होते. तोपास्काच्या सणाचा विधी होता. तोच पेला ख्रिस्तसभेच्या ऐक्याचे प्रतिक बनले. हा पेला शक्यतो धातूचा असतो. तबकसुद्धा धातूचे असते. तसेच ज्यात ख्रिस्त शरीर ठेवले जाते ते भाकर पात्र सुद्धा धातूचे असते.

पवित्र प्रतिमा : चर्चमध्ये पुतळ्यांना, प्रतिमांना, आशीर्वाद देऊन त्या पवित्र केल्या जातात व तेथे त्या कायमच्या ठेवल्या जातात. ह्यात पवित्र क्रूस तसेच प्रभू येशू, मरिया माता अथवा संत यांच्या प्रतिमा ठेवल्या जातात. उपासनेतील पवित्र प्रतिमा ह्या प्रामुख्याने ख्रिस्ताची प्रतिके होऊ शकतात. उपासनाविधितील सर्व चिन्हे ख्रिस्ताशी संबंधित असतात, तीच गोष्ट पवित्र देवमाता व अन्य संत यांच्या प्रतिमांच्या बाबतही आहे. त्या सर्वांचा केंद्रबिंदू आहे ख्रिस्त. त्याद्वारे ख्रिस्ताचाच गौरव होत असतो.  ह्या प्रतिमांद्वारे स्वत: मनुष्यच देवाच्या प्रतिमेसारखा बनत असतो.

समीक्षक : फ्रान्सिस कोरिया