आधुनिक काळातील एक अमेरिकन काव्यपरंपरा. Confession (कन्फेशन) या इंग्रजी शब्दाचा मराठीमध्ये ‘कबुलीजबाब’, असा अर्थ होतो. अमेरिकेमधील विसाव्या शतकाच्या मध्यातील (१९५०-१९६० च्या दशकातील) एक महत्त्वपूर्ण काव्यपरंपरा/चळवळ म्हणून ‘कन्फेशनल काव्या’कडे पाहिले जाते. ही आत्मनिवेदन करणारी, स्वत:चा कबुलीजबाब देणारी अत्यंत वैयक्तिक पातळीवरील भावनाविष्कार व्यक्त करणारी कविता आहे. या कवितेला लैंगिकतेसह कोणताही विषय वर्ज्य नाही.
एम. एल. रोजेन्थाल (१९१७ -१९९६) (M L Rosenthal) या समीक्षकाने रॉबर्ट लोवेल (१९१७-१९७७) (Robert Lowell) या प्रसिद्ध कवीच्या ‘लाइफ स्टडीज’ (Life Studies) या काव्यसंग्रहाचे समीक्षण करत असताना दुसऱ्या महायुद्धानंतरच्या तीन दशकांमध्ये मुख्यतः अमेरिकेन कवींनी लिहिलेल्या कवितांना उद्देशून ‘कन्फेशनल काव्य’ या शब्दप्रयोगाचा प्रथम वापर केला. सामान्यपणे रॉबर्ट लोवेल, जॉन बेरिमन (१९१४-१९७२), थियोडोर रोथके (१९०८-१९६३), ऍलन गिन्सबर्ग (१९२६-१९९७), विल्यम डी. विट. स्नॉडग्रास (१९२६-२००९), अॅन सेक्स्टन (१९२८-१९७४), सिल्व्हिया प्लॅथ (१९३२-१९६३) आणि या काव्यप्रकाराचे जनक डेलमोर श्वार्ट्झ (१९१३-१९६६) यांचा समावेश या प्रकारच्या कविता लिहिणाऱ्या कवींमध्ये होतो.
एम. एच. अब्राम्स (१९१२-२०१५) यांच्या मते रॉबर्ट लोवेलच्या ‘लाइफ स्टडीज’ (१९५९) या काव्यसंग्रहातून प्रेरणा घेऊन, कवीच्या स्वतःच्या जीवनातील तथ्ये आणि मानसिक, शारीरिक अनुभव कथात्मक अथवा गीतात्मक पद्यांचा माध्यमातून व्यक्त करणारी कविता म्हणजे कन्फेशनल कविता होय. ही कविता एका बाजूला टी. एस. एलिएट (१९८८-१९६५) आणि न्यू क्रीटिक्स यांच्या व्यक्तीनिरपेक्ष काव्याच्या तत्त्वाविरोधात बंड करते. तसेच, रोमॅटिक काळातील वर्डस्वर्थ (१७७०-१८५०) आणि कोलरिज (१७७२-१८३४) या कवींच्या काव्यापासून देखील फारकत घेते. कन्फेशनल काव्यामध्ये कवी पारंपरिक सामूहिकता किंवा समष्टीच्या अनुभव-अभिव्यक्तींपासून दूर जाऊन स्वतःबद्दलच्या खाजगी आणि आरोग्यविषयक बाबी देखील उघड करतो. ज्यामध्ये लैंगिक अनुभव, मानसिक वेदना, आजार, ड्रग्जचे प्रयोग आणि आत्महत्येच्या आवेगांचा व अनुभवांचा समावेश होतो.
डेव्हिड मिकिक्स (१९६१-) यांच्या मते, कन्फेशनल कविता लेखकाच्या जीवनातील खाजगी बाबी उघड करण्याचा आभास निर्माण करते. बहुतेकदा कवीच्या वेदनादायक, जिव्हाळ्याच्या किंवा क्लेशकारक अनुभवांबाबत गोपनीयतेचे उल्लंघन करते आणि लज्जास्पद सत्य उघड करते. उदाहरणार्थ सिल्व्हिया प्लॅथ (१९३२-१९६३) लिहिते,
‘Dying
Is an art, like everything else
I do it exceptionally well. ’
‘मरणे,
एक कला, सामान्यत: जशा इतर
मी हे करते, अपवादात्मक उत्तम’
कन्फेशनल कवितेतील अशा प्रकारच्या वैयक्तिक खुलाशांचे स्पष्ट, टोकाचे स्वरूप तिला आत्मचरित्रात्मक कवितेपासून वेगळे करत वस्तुनिष्ठ आत्मपरीक्षणात्मक बनवते.
वरील बाबींमुळे कन्फेशनल काव्यावर “स्वमग्न, स्वप्रचार करणारी’ कविता, अशी टीका करण्यात आली. सामान्यपणे कवीने अशा कवितांमध्ये कशाप्रकारे प्रतिकूल परिस्थितीवर मात करत मनोवैज्ञानिक समस्यांवर देखील विजय मिळविला हे व्यक्त केले जाते. तथापि, अशा पद्धतीच्या कवीचा झगडा देखील ‘स्वमग्नतेचा’ असू शकतो, हे लक्षात घेणे गरजेचे आहे.
समीक्षकांच्या मते, कन्फेशनल काव्यपरंपरा ही त्या काळच्या बदललेल्या सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक परिस्थितीमुळे निर्माण झालेली आहे. पहिल्या महायुद्धानंतरच्या काळापासून म्हणजेच १९३० च्या उत्तरार्धापासून जेव्हा श्वार्ट्झने ‘इन ड्रीम्स बिगिन रिस्पॉन्सिबिलिटीज’ (१९३८) प्रकाशित केले तेव्हापासून ते शेवटच्या प्रमुख कन्फेशनल कवी लोवेलच्या ‘नोटबुक’ (१९७०) चे प्रकाशन हा काळ या काव्यपरंपरेचा काळ मानला जातो. हा काळ सार्वजनिक मूल्यांमधील कमतरता, फ्रेंच क्रांतीच्या हिंसक वळणासह पहिल्या महायुद्धानंतरच्या अस्वस्थतेमुळे व्यक्तिमत्त्वाची मूळ संकल्पनाच मोडकळीस निघाली, हे दर्शवते. त्यामुळे श्वार्ट्झ आपल्या ‘आयासोलेशन ऑफ मॉडर्न पोएट्री’ या निबंधामध्ये पुढीलप्रमाणे मांडणी केली आहे.
‘कवीला इतर लोकांच्या जीवनाबद्दल लिहिणे अधिकाधिक अशक्य होत गेले; कारण तो केवळ त्यांच्या जीवनातून काढून टाकला गेला नाही, तर ज्या संस्कृती आणि संवेदनशीलतेने कवीची निर्मिती केली ती संस्कृती आणि संवेदनशीलता सामान्य व्यक्तीला ओळख देण्यास असमर्थ ठरते. त्यामुळे सांस्कृतिक माणूस म्हणून कवीला उपलब्ध असलेले एकमेव जीवन म्हणजे त्याच्या स्वतःच्या संवेदनशीलतेची जोपासना, जर आपण असे गृहीत धरले की, कवी फक्त अशाच विषयांबद्दल लिहू शकतो, ज्यांचा त्याला प्रत्येक प्रकारे गहन अनुभव आहे.’ या बाबींमुळेच कन्फेशनल काव्यामध्ये कवीच्या स्वमग्नतेचे, खाजगी विषय हाताळण्याचे प्रमाण अधिक असल्याचे लक्षात येते.
कन्फेशनल काव्य या शब्दसमूहाच्या माध्यमातून कवितेतील आत्मचरित्रात्मक विषयवस्तू आणि त्याचे ऑगस्टिन, वर्डस्वर्थ, व्हिटमन इत्यांदी कवींच्या काव्याशी संबंध प्रस्थापित करण्याचा प्रयत्न अधोरेखित होतो. समीक्षकांना संयुक्तिक न वाटल्यामुळे या शब्दप्रयोगावर अनेक प्रकारे टीका करण्यात आली आहे. या मध्ये टी. एस. इलियट सारख्या समीक्षकांनी मांडलेल्या ‘कवीची तटस्थता’ (Dissociation of Sensibility) या संकल्पनेचा समावेश होतो.
स्टीव्हन के. हॉफमन (१९४५-) यांच्या मतानुसार कन्फेशनल काव्य ही एक स्वतंत्र ऐतिहासिक काव्यपरंपरा असून ती मूलतः स्वच्छंदतावादी आणि आधुनिक या दोन्ही काव्यप्रकारांचे मिश्रन आहे. या प्रकारच्या काव्यांमध्ये १९ व्या शतकातील व्यक्तिवाद आणि सजग निर्मीती या बाबींचा समावेश होतो. विसाव्या शतकातील आधुनिक काव्यांतील काही तंत्रांचा देखील वापर या काव्यामध्ये केला जातो, जसे पुराणकथा, आर्किटाइप्स यांचे नाट्यरूपांतरन (Masking Techniques) आणि भौतिकीकरण (Objectification) आणि त्या माध्यमातून सामाजिक, राजकीय आणि सांस्कृतिक घटनांवर भाष्य करण्याची पद्धती.
या प्रमाणेच चार्ल्स् मोल्सवर्थ (१९३७-२०१९) यांच्या मते, पन्नासच्या दशकातील दोन तत्कालीन सांस्कृतिक प्रवाहांमुळे कन्फेशनल काव्यांच्या निर्मिती झाली. यातील एक म्हणजे सार्वजनिक जीवनातील संभाषणासाठी भावनाविरहितपणे केलेला भाषेचा वापर हा होय. यामुळे मानवाचे परस्पर संभाषण अशक्यप्राय झाले. दुसरा सांस्कृतिक प्रवाह म्हणजे उद्देश आणि अर्थपूर्ण श्रमापासून दूर गेलेल्या अमेरिकन समाजाचे आग्रही मानसशास्त्रीकरण. या दशकात प्रथमतः सांस्कृतिक सातत्याच्या अभावाची चौकशी करण्यासाठी आणि शोक व्यक्त करण्यासाठी अमेरिकेमध्ये समाज- माध्यमांचा वापर केला गेला. यास्तव समाजमाध्यमांचे महत्त्व अधिक तर सामान्य व्यक्ती अर्थहीन ठरू लागली. त्यामुळे माणूस अधिकाधिक आत्मकेंद्री बनला. त्यामुळे आत्मकेंद्री आशय, अंमली पदार्थांचे अतोनात सेवन, मानसिक अनारोग्य इत्यादी विषय केंद्रस्थानी आले. यामुळे दोन महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या कन्फेशनल कवींनी आत्महत्या केल्याचे देखील पाहायला मिळते.
भारतीय इंग्रजी साहित्याच्या संदर्भामध्ये कमला दास (१९३४-२००९), युनिस डीसूझा (१९४०-२०१७), इम्तियाज धारकर (१९५४), गौरी देशपांडे (१९४२-२००३), ममता कालिया (१९४०), मेलानी सिलगार्डो (१९५६) या काही महत्त्वपूर्ण कन्फेशनल लेखिका आहेत. बदललेल्या सामाजिक संदर्भावर भाष्य करण्याऐवजी भारतीय संदर्भामध्ये महिलांच्या प्रश्नांची आणि त्यांच्या प्रश्नार्थक गुलामगिरीची मांडणी करणे त्यांना महत्त्वाचे वाटते. त्यात एक बिनधास्तपणा आणि मोकळीकता आहे. ‘ऍन इटंडश्नक इन लव्ह’, द फ्रेक्स (The Freaks), द सनशाइन कॅट (The Sunshine Cat) यांसारख्या कविता लैंगिकतेचा आविष्कार करत असल्याचे मत अनेक समीक्षकांनी नोंदविलेले आहे. उपरोक्त कवितेतील सुस्पष्ट प्रकट केलेले कन्फेशन भारतीय वाचकाला आश्चर्यकारक वाटण्यासारखे आहे.
संदर्भ :
- Abrams, M. H. A Glossary of Literary Terms, 7th Ed. Thomsan Learning, 1999.
- Atlas, James, Delmore Schwartz: Life of an American Poet, Farrar, Straus and Giroux, India, 2020.
- Das, Kamala, Answers to Questionnaire in Modern Poetry in English, Ed. P. Lal. Calcutta: Writers Workshop, 1971.
- Eliot, T. S., Tradition and the Individual Talent., Perspecta, 1981.
- Molesworth, Charles, With Your Own Face On: The Origins and Consequences of Confessional Poetry, Twentieth Century Literature, Vol. 22, No. 2 , May, 1976.
- Rosenthal. M. L., Poetry as Confession., Critics on Robert Lowell. Ed. Jonathan Price. London: Allen & Unwin, Ltd, 1974.
समीक्षक : अभय पाटील
Discover more from मराठी विश्वकोश
Subscribe to get the latest posts sent to your email.