डिकिन्सन, एमिली : (१० डिसेंबर १८३०–१५ मे १८८६). श्रेष्ठ अमेरिकन कवयित्री. ॲव्हर्स्ट, मॅसॅचूसेट्स येथे जन्म. माउंट हॉल्योक येथील ‘फीमेल सेमिनरी’त शिक्षण. कुटुंबातील तीन मुलांपैकी दुसरे अपत्य असलेली एमिली धार्मिक वातावरणात मोठी  झाली. तिने पहिले नऊ वर्षे तिचे आजोबा सॅम्युअल फोलर डिकिन्सन यांनी बांधलेल्या वाड्यात वास्तव्य केले, त्यांनी ॲम्हर्स्ट कॉलेज स्थापण्यास मदत केली होती, परंतु तिच्या जन्माच्या काही काळापूर्वी ते संपत्तीहीन झाले. वडील एडवर्ड डिकिन्सन हे एक नामांकित वकील होते. त्यांनी महाविद्यालयाचे कोषाध्यक्ष म्हणून काम पाहिले होते. आई जवळच्या मॉन्सनमधील अग्रणी कुटुंबातील होती. आपल्या कुटुंबापलीकडील जगात ती फारशी वावरली नाही. त्यातही आयुष्याची शेवटची २५ वर्षे तिने जवळजवळ संपूर्ण एकांतवासात काढली. तिच्या संथ भावजीवनातील एक लक्षणीय वादळ म्हणजे १८५४ साली भेटलेल्या रेव्हरंड चार्ल्‌स वॉड्सवर्थ या धर्मोपदेशकावर तिने केलेले विफल प्रेम. तिने सु. अठराशे भावकविता लिहिल्या. हेतुपुरस्सर ह्या कविता तिने आपल्या जीवितकालात प्रसिद्ध केल्या नाहीत. एमिली डिकिंसनच्या जवळपास १०००० कवितांपैकी केवळ १० कविता तिच्या हयातीत प्रसिद्ध झाल्या आहेत.

तिच्या मृत्यूनंतर यांतील बहुतेक कविता पुस्तक रूपाने प्रसिद्ध झाल्या (१८९०) असंस्कृत भावनांची अर्धीकच्ची खिचडी अशी त्यावर  टीका करण्यात आली. गायक आइस्कॅक वॅट्सचा या गीतकाराचा तिच्या काव्यावर प्रभाव आहे. १९२० सालानंतर इंग्लंडमध्ये मीमांसक (मेटॅफिजीकल) काव्यपरंपरेविषयी नवी आस्था निर्माण होऊन तिचे महत्त्व नव्याने प्रस्थापित झाले. या वातावरणात डिकिन्सनच्या काव्याचेही अधिक सुजाण मूल्यमापन होऊ लागले. तिला धर्म किंवा तात्त्विक परिभाषामध्ये रस नव्हता. यात तिच्यावर राल्फ वाल्डो इमर्सनच्या ट्रान्ससेन्डेन्टलिझम आणि उदारवादी प्रोटेस्टंट प्रवृत्तीचा प्रभाव होता. या प्रभावांमुळेच तिला धार्मिक सत्य अधिक प्रभाविपणे समजून घेता आले आणि कवितेच्या रूपाने तिला आकार देण्यात मदत झाली

तिच्या काव्याचे प्रमुख विषय म्हणजे देव व धर्म, प्रेम व मरण, समाज व निसर्ग. जॉन डन या इंग्रजी मीमांसक कवीप्रमाणेच तिची या सर्वांकडे पाहण्याची दृष्टी स्वतंत्र तत्त्वमीमांसिकेची आहे. दरोडेखोर, सावकार, पिता अशी ती देवाची संभावना करते तर सखा व प्रियकर म्हणून मृत्यूशी नाते सांगते. निसर्गातील जीवनसंघर्ष टिपून घेते, प्रेमाच्या लाटेत बेहोष होऊन जाते व धर्माच्या नावाखाली चाललेल्या ढोंगावर कोरडे ओढते अंतर्मनातील भावभावनांचे बदलते रंग शब्दांकित करते. तीव्र भावना व विवेचक बुद्धी यांचा संगम तिच्या काव्यात आढळतो. मुलखावेगळे शुद्धलेखन, अर्थघन शब्दयोजना, मुद्दामच योजलेली अशास्त्रोक्त यमके आणि पृथगात्म प्रतिमासृष्टी यांमुळे तिच्या काव्यशैलीला एक वेगळाच ढंग आलेला आहे.

टी. एच्. जॉन्सन ह्याने एमिलीची समग्र कविता आणि तिची पत्रे ह्यांचे संपादन केले आहे (कविता, ३ खंड, १९५८ पत्रे, ३ खंड, १९५८). आर.डब्ल्यू. फ्रँकलीन यांनी संपादित केलेल्या कवितांची प्रमाणित आवृत्ती ही The Poems of Emily Dickinson: Variorum Edition (1998) ‘द पोएम्स  ऑफ एमिली डिकिंसनः व्हॅरिओरम एडिशन’ ही तीन खंडांची आवृत्ती आहे. थॉमस एच. जॉनसन आणि थिओडोरा वॉर्ड  यांनी तीन खंडांमध्ये संपादित केलेल्या The Letters of Emily डिकिंसून (१९८८) एमिली डिकिन्सन यांचे पत्र एकाच खंडात पुन्हा प्रसिद्ध केले गेले आणि ते अजूनही कवींच्या पत्रांचे प्रमाणित स्रोत आहे. अलीकडे अ‍ॅम्हर्स्ट कॉलेज आणि हार्वर्ड विद्यापीठ त्यांची हस्तलिखिते ऑनलाइन उपलब्ध करुन देत आहेत.

अमेरिकेची सर्वश्रेष्ठ गूढवादी कवयित्री हे तिचे वर्णन तिच्या सर्वोत्तम भावकवितांच्या आधारेच केले जाते. ॲम्हर्स्ट येथे ती निधन पावली.

संदर्भ :

  • Anderson, C. R.  Emily Dickinson’s Poetry : Stairway of Surprise, London, 1963.
  • Blake, C. R. Wells, C. F. The Recognition of  Emily Dickinson, 1964.
  • Chase, Richard, Emily Dickinson, London, 1952.
  • Johnson, T. H. Emily Dickinson : An Interpretative Biography, Cambridge (Mass.), 1955.