
अ डॉल्स हाउस : (१८७९). जागतिक नाट्यपरंपरेत वास्तववादी नाटकाचा प्रारंभ करणारी नाट्यकृती. हेन्रिक इब्सेन (१८२८-१९०६) या नॉर्वेच्या नाटककाराचे १८७९ मध्ये लिहिलेले आणि त्याच वर्षी प्रथमतः सादर केलेले हे तीन अंकी नाटक आहे. नाटकाची मध्यवर्ती कथा एका सामान्य कुटुंबाभोवती फिरते—बँकेत काम करणारा टॉर्वाल्ड हेल्मर, त्याची पत्नी नोरा आणि त्यांची तीन लहान मुले. या नाटकात टॉर्वाल्ड स्वतःला कुटुंबातील नैतिकतेचा आदर्श मानणारा पुरुष, तर त्याला खुश ठेवण्यासाठी त्याची हसरी, खेळकर आणि कुटुंबवत्सल पत्नी, नोरा हेल्मर पतीसाठी आणि त्यांच्या मुलांसाठी सदैव उपलब्ध असलेली गृहिणी म्हणून दाखवली आहे. तिच्या भूतकाळातील एका कृतीमुळे संपूर्ण नाटकात नैतिक आणि भावनिक संघर्ष उभा राहतो. पतीला आजारातून वाचवण्यासाठी नोराने घेतलेले कर्ज आणि त्यासाठी केलेली बनावट सही उघड होताच नोरा आणि टॉर्वाल्ड यांच्यातील नात्यात संघर्ष सुरू होतो. टॉर्वाल्डचे प्रेम हे नोरासाठी माणूस म्हणून नव्हे तर पत्नी एक आज्ञाधारक बाहुली म्हणून असते; स्वतःची प्रतिष्ठा, सामाजिक प्रतिमा आणि पितृसत्ताक अधिकार त्याला अधिक प्रिय असतात. संघर्षाच्या क्षणी जेव्हा टॉर्वाल्ड नोराचा बचाव करण्याऐवजी स्वतःच्या प्रतिष्ठेचे रक्षण करण्यासाठी धडपडतो, तेव्हा नोराला विवाह व्यवस्थेतील दडपशाहीचे आणि तिच्या असण्यावरची बंधने प्रकर्षाने जाणवतात. नाटकाच्या अखेरीस, कुटुंबाची बंधने नाकारत नोरा घर सोडून निघून जाते.
‘अ डॉल्स हाउस’ हे नाटक एकोणिसाव्या शतकातील पितृसत्ताक समाजव्यवस्थेविरुद्ध प्रश्न उपस्थित करणारे ठरले आणि या नाटकाने वास्तववादी नाटकाला नवी दिशा दिली. या नाटकात विवाह, नातेसंबंध, स्त्रीची ओळख, नैतिकता आणि व्यक्तिस्वातंत्र्य अशा सामाजिक प्रश्नांच्या नाट्यपूर्ण मांडणीला प्राधान्य दिले आहे. इब्सेनने या नाटकात केवळ कौटुंबिक नाटक नव्हे, तर सामाजिक क्रांतीची एक नवी नाट्यदृष्टी साकारली आहे. समाजाने स्त्रीची घरगुती, आज्ञाधारक आणि त्यागी अशी पारंपरिक प्रतिमा रेखाटली आहे. इब्सेनने या रूढ प्रतिमेला छेद देत स्त्री ही “मानसिक, बौद्धिक आणि भावनिक स्वातंत्र्य” असलेली व्यक्ती असते हा विचार पुढे आणला. नाटकाचे केंद्र नोरा हेल्मरच्या आत्मशोधाभोवती फिरते. अखेरीस घरातून बाहेर पडण्याच्या तिच्या क्रांतिकारी निर्णयाकडे आधुनिक काळातील स्त्री स्वातंत्र्याचे प्रतीकस्वरूप म्हणून पाहिले जाते.
नाटकातील पात्रांच्या संवादातून समाजातील ढोंगाचे चित्रण केले आहे. त्याचबरोबर, आधुनिक यूरोपमधील नैतिकतेची दृष्टी आणि वर्ग, लिंग आणि सत्ताकारण यांचे वास्तववादी चित्रण या नाटकात आहे. स्त्रीला पत्नी आणि आई या दोनच चौकटीत घट्ट अडकवणारी व्यवस्था आहे, याचा प्रत्यय नोरा ह्या पात्राकडे पाहून वाचकाला येतो. स्त्री ही पत्नी असण्याबरोबर किंबहुना त्याआधी एक माणूस आहे, आणि व्यक्ती म्हणून तिला स्वतःचे विचार, मूल्ये, शिक्षण आणि स्वायत्तता निर्माण करण्याची गरज नोराच्या अंतर्मनात प्रखर बनते हे नाटकात आपल्याला दिसते. मुलांवर प्रेम असूनही, त्यांची ‘चांगली’ आई होण्याबरोबर स्वतःची ओळख शोधण्याचा नोराचा प्रयत्न आपल्याला दिसून येतो. त्यामुळे, नाटकाच्या शेवटी ‘घर’ सोडून निघून जाण्याचा तिचा निर्णय वैयक्तिक बंड न राहता तो बौद्धिक आणि नैतिक जागृतीचे प्रतीक ठरतो. नाटकाच्या अखेरीस ‘दार’ बंद होण्याचा आवाज हा आधुनिक नाट्यसृष्टीतील तीव्र आणि लक्षवेधी प्रतीकस्वरूप कृती मानली जाते – स्त्री स्वातंत्र्याचा उद्घोष, तसेच कुटुंबव्यवस्थेतील खोलवरची दांभिकता उघड करणारी ही क्रांतीच होय.
‘अ डॉल्स हाउस’ हे नाटक म्हणजे व्यक्ती-स्वातंत्र्याची, नैतिक जबाबदारीची आणि जीवनाच्या शोधाची कथा आहे. या नाटकातून इब्सेनचा हेतू ‘स्त्री विरुद्ध पुरुष’ असे द्वंद्व उभे करणे हा नसून; समाजाने निर्माण केलेल्या लिंगभेदावर आधारित भूमिकांवर प्रश्न उपस्थित करणे हा आहे. नाटकातील वास्तववादी शैली, सूक्ष्म संवाद, प्रतीकात्मक चित्रण —विशेषतः, कुटुंबव्यवस्थेत स्त्रीचे बाहुलीसारखे वावरणे आणि अखेरीस अशा जीवनाला नाकारणारी तिची बंडखोरी यामुळे इब्सेनचे हे नाटक रुढ संकल्पनांना हादरा देणारे ठरले. या नाटकाने आधुनिक नाटकाची दिशा बदलली आणि जगभरातील सामाजिक, साहित्यिक आणि नाट्यविचारांना झळाळी दिली.
‘अ डॉल्स हाउस’ हे स्त्रीच्या मानसिक आणि सामाजिक अस्तित्वाचे आत्मभान उलगडणारे नाटक आहे. नाटकातील नोरा या व्यक्तिरेखेचा स्वतःच्या स्वातंत्र्यासाठी घराबाहेर पडण्याचा निर्णय हा केवळ कुटुंबव्यवस्थेच्या चौकटीतून बाहेर पडण्याचा नाही, तर मानवी अस्मितेच्या लढ्याचा टप्पा आहे. म्हणूनच हे नाटक आजही समाजातील नातेसंबंध, विवाहसंस्था आणि वैयक्तिक स्वातंत्र्याबाबत पुनर्विचार करण्यास भाग पाडते.
‘अ डॉल्स हाउस’ हे आधुनिक वास्तववादी नाटकाला जन्म देणारे एक क्रांतिकारी नाटक ठरले. इब्सेनच्या लेखनात दिसणारे दैनंदिन जीवनातील संघर्ष, सामाजिक ढोंग, कौटुंबिक नात्यांमधील सत्तासमीकरण आणि मानवी मनोवृत्तीतील गुंतागुंत या घटकांमुळे या नाटकाला कृत्रिम नाट्यमयतेपेक्षा सत्याधारित वास्तवदर्शनाचे प्रभावी रूप दिले. ज्या काळात हे नाटक लिहिले गेले त्या काळातील नाटकांमध्ये ऐतिहासिक, पौराणिक वा अभिजन जीवनाचे उदात्तीकरण असे; इब्सेनने मात्र सामान्य कुटुंबातील स्त्री-पुरुषसंबंधांचा संघर्ष नाट्यकेंद्रस्थानी आणला. नाट्यदर्शनातील कृत्रिमता झुगारून सामाजिक वास्तव तीन अंकी बांधीव रचनेत रंगमंचावर आणले. म्हणूनच ‘अ डॉल्स हाउस’ हे नाटक जागतिक नाट्यपरंपरेत वास्तववादी नाट्यदर्शन-परंपरेचा पाया मानले जाते. हे नाटक वास्तववादाच्या संदर्भात केवळ एक साहित्यकृती नसून सामाजिक आणि नाट्य-सिद्धान्तातील परिवर्तनाचा वळणबिंदू म्हणून अभ्यासले जाते. ‘कला हा जीवनाचा आरसा असावा’ या विचाराला खऱ्या अर्थाने या नाटकाने आकार दिला.
या नाटकाचा जगभरातील नाट्यपरंपरांवर प्रभाव पडलेला आपल्याला दिसून येतो. मराठीत मामा वरेरकर, आचार्य अत्रे तसेच अनंत काणेकर अशा नाटककारांवर या नाटकाचा प्रभाव असल्याचे आपल्याला दिसून येते. ‘घराबाहेर’ हे नाटक म्हणजे अनंत काणेकर यांनी केलेला ‘अ डॉल्स हाउस’ चा मराठी अनुवाद होय.
संदर्भ :
- Clurman, Harold, Ibsen, Macmillan, 1977.
- Egan, Michael, Henrik Ibsen: The Critical Heritage, Routledge, 1972.
- Haugen, Einar, Ibsen’s Drama: Author to Audience, University of Minnesota Press, 1979.
- Ibsen, Henrik, A Doll’s House and Other Plays, Trans, Deborah Dawkin and Erik Skuggevik. Penguin.
- McFarlane, James, Ed., The Cambridge Companion to Ibsen, Cambridge UP, 2004.
- Moi, Toril, Henrik Ibsen and the Birth of Modernism, Oxford UP, 2006.
समीक्षक : आशुतोष पोतदार
Discover more from मराठी विश्वकोश
Subscribe to get the latest posts sent to your email.