तंतुमय स्वरूप असलेल्या काही सिलिकेट खनिजांचा समूह. यामध्ये प्रामुख्याने सर्पेंटाइन गटातील क्रिसोटाइल आणि अँफिबोल गटातील क्रॉसिडोलाइट, ॲमोसाइट (ग्रुनेराइटचे व्यावसायिक नाव), ट्रेमोलाइट, ॲक्टिनोलाइट व अँथोफिलाइट यांचा समावेश होतो. क्रॉसिडोलाइट हे रिबेकाइट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या खनिजांच्या गटातील ॲस्बेस्टोस खनिज आहे. क्रॉसिडोलाइटला निळा ॲस्बेस्टॉस म्हणूनदेखील ओळखले जाते. ॲक्टिनोलाइट गडद रंगाचा असतो, तो चमकदार ते राखाडी हिरव्या रंगाचा असतो आणि त्यात सुईसारखे तंतू असतात. ट्रेमोलाइटमध्ये मॅग्नेशियमचे प्रमाण जास्त असते आणि ते पांढरे, गुलाबी किंवा फिकट जांभळे दिसते.

रासायनिक संघटन : रासायनिक संज्ञा : Mg₃Si₂O₅(OH)₄, हे जलयुक्त मॅग्नेशियम-लोह सिलिकेट आहे; ॲमोसाइट : (Fe,Mg)₇Si₈O₂₂(OH)₂; क्रॉसिडोलाइट: Na₂(Fe²⁺₃Fe³⁺₂)Si₈O₂₂(OH)₂. रासायनिक संघटनातील फरकामुळे भौतिक व सूक्ष्मदर्शकीय गुणधर्मांमध्ये बदल दिसून येतो.

ॲस्बेस्टॉसची अणुरचना सिलिकेट चतुष्फलक (SiO₄) यांवर आधारित आहे. क्रायसोटाइलमध्ये पत्रक संरचना असून ती वाकलेली असल्यामुळे नळीच्या स्वरूपात तंतू तयार होतात. अँफिबोल प्रकारात दुहेरी साखळी सिलीकेट रचना असते, ज्यामुळे सरळ व कडक तंतू तयार होतात. ही तंतुमय अणुरचना ॲस्बेस्टॉसला लवचीपणा व उच्च ताणसहन क्षमता प्रदान करते.

भौतिक गुणधर्म : स्फटिक रचना तंतुमय किंवा सुईसारखी. तंतू लांब, बारीक आणि समांतर. काही प्रकारांमध्ये तंतू वाकलेले. उदा., क्रिसोटाइल, तर काहींमध्ये सरळ व कडक. उदा., क्रॉसिडोलाइट. रंग पांढरा, करडा, हिरवट, निळसर किंवा तपकिरी (प्रकारानुसार). क्रिसोटाइल प्रामुख्याने पांढरा किंवा फिकट हिरवा, तर क्रॉसिडोलाइट निळसर असतो.

चमक रेशमी किंवा काचेसारखी, कठिनता २.५ —६ (प्रकारानुसार बदलते). क्रिसोटाइल तुलनेने मऊ. विशिष्ट गुरुत्व २.५ — ३.५. विदलन अँफिबोल प्रकारात दोन दिशांत स्पष्ट विदरण (५६° व १२४° कोनात). सर्पेंटाइन प्रकारात विदरण स्पष्टपणाचा अभाव. तंतू सहज तुटत नाहीत, त्यामुळे ताण सहन करण्याची उच्च क्षमता. क्रिसोटाइलमध्ये तंतू लवचीक व वाकवता येण्याजोगे असतात. अग्निरोधक तसेच विद्युत रोधक गुणधर्मामुळे पूर्वी विद्युत उपकरणांमध्ये वापरले जात. जळत नसल्यामुळे औद्योगिक वापरात महत्त्वाचे.

ध्रुवीकृत प्रकाशातील गुणधर्म  : रंग रंगहीन ते फिकट हिरवा/निळसर (प्रकारानुसार). स्फटिकांचे स्वरूप  तंतुमय, लांबट रचना. स्फटिकांचा उठाव मध्यम. स्फटिकांचे विदलन अनुलंब छेदात एक. वर्णबदल काही अँफिबोल प्रकारात स्पष्ट. तंतूंची समांतर मांडणी स्पष्ट दिसते. कमी ते मध्यम वर्णबदल रंग प्रामुख्याने पहिल्या श्रेणीतील.

काट निकोलखालील गुणधर्म : व्यतिकरण रंग : क्रिसोटाइल (सर्पेंटाइन प्रकार) मध्ये कमी द्विवर्तन असल्यामुळे पहिल्या श्रेणीतील करडे ते फिकट पिवळे रंग दिसतात. अँफिबोल प्रकारातील अॅस्बेस्टॉस. उदा., क्रॉसिडोलाइट व ॲमोसाइट यामध्ये पहिल्या श्रेणीतील किंचित जास्त तीव्र रंग दिसू शकतात. विलोपन सरळ किंवा तिरपी विलोपन. तंतुमय स्फटिकांमध्ये सरळ विलोपन आढळते. द्विवर्तन क्रिसोटाइलमध्ये कमी द्विवर्तन असते. अँफिबोल प्रकारात सर्पेंटाइनपेक्षा किंचित जास्त द्विवर्तन दिसते. क्रॉस्ड निकोल्समध्ये अॅस्बेस्टॉसची ओळख त्याच्या तंतुमय रचना, सरळ विलोपन आणि कमी श्रेणीतील व्यतिकरण रंगांवरून करता येते.

या गुणधर्मांमुळे ॲस्बेस्टॉसचा वापर पूर्वी इमारत बांधकाम, सिमेंट पत्रे, ब्रेक लाइनिंग, अग्निरोधक वस्त्रे इत्यादींमध्ये मोठ्या प्रमाणावर होत असे. मात्र आरोग्यास हानिकारक असल्यामुळे अनेक देशांत त्यावर बंदी आहे.

प्राप्तिस्थान : ॲस्बेस्टॉसचे साठे मुख्यतः कर्नाटक, राजस्थान, झारखंड, आंध्र प्रदेश आणि गुजरात येथे आढळतात. कर्नाटकातील शिमोगा व हासन परिसरात क्रिसोटाइल प्रकार प्रमुख आहे. रशिया, चीन, कझाकस्तान, ब्राझील आणि कॅनडा हे प्रमुख उत्पादक देश होते. रशिया हा सध्या जगातील सर्वांत मोठा उत्पादक मानला जातो. हे खनिज प्रामुख्याने अल्ट्राबेसिक खडक, सर्पेंटिनाइट आणि रूपांतरित खडकांत आढळते.

संदर्भ :

  • Deer, W.A., Howie, R.A., & Zussman, J. An Introduction to the Rock-Forming Minerals, Longman, 1992.
  • Walter Schumann,Robert Bradshaw, Handbook of Rocks, Minerals, and Gemstones, 1993.
  • Nesse, W. D., Introduction to Optical Mineralogy, Oxford University Press, 2004.
  • Read, H., Rutley’s Elements of Mineralogy, 24th edition, Londan, 1947.                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                    समीक्षक: उदय कुलकर्णी

Discover more from मराठी विश्वकोश

Subscribe to get the latest posts sent to your email.