दारव्हेकर, पुरुषोत्तम : (१ जून १९२६ — २१ सप्टेंबर १९९९). व्यावसायिक मराठी नाटके व मराठी बालरंगभूमीवरील नाटककार, यशस्वी दिग्दर्शक, नट, वैशिष्ट्यपूर्ण मांडणी करणारे प्रयोगशील नेपथ्यकार. नागपूर जवळचे ‘दारव्हा’ हे पुरुषोत्तम दारव्हेकर यांचे जन्मगाव. नीलसिटी हायस्कूल, नागपूर येथे त्यांचे शालेय शिक्षण झाले. बी.एस्सी.बी.टी. या शिक्षणानंतर त्यांनी एम.ए.एल.एल.बी.ला सुवर्णपदक मिळवले. पुरुषोत्तम दारव्हेकर यांचे मराठी रंगभूमीवर पदार्पण झाले ते बालकलाकार म्हणून. १९३६ मध्ये ‘साष्टांग नमस्कार’ या अत्र्यांच्या नाटकात चंदूच्या भूमिकेतून ते रंगभूमीवर आले. १९४५—४८ मध्ये नागपूरमधील महाल या भागात ते राहात होते; तेव्हा त्यांनी त्यांचे पहिले ‘संगीत संपाचा वार’ हे बालनाट्य लिहिले. हे नाटक गणेशोत्सवासाठी लिहिलेले होते आणि ते लोकांना खूप आवडल्यामुळे त्याचे अनेक प्रयोग त्या दिवसांत झाले. त्यानंतर त्यांनी ‘स्वर्गाचा काळा बाजार’ हे संगीत बालनाट्य लिहिले. संगीत बालनाट्यासाठी लेखन व दिग्दर्शक म्हणून रस घेण्याच्या या कालावधीत त्यांनी कर्वेज न्यू माॅडेल हायस्कूल, हदास हायस्कूल आणि सुळे हायस्कूल या नागपूरमधील शाळांत शिक्षक म्हणून नोकरी केली.

पुढे पुरुषोत्तम दारव्हेकर यांनी नागपूर आकाशवाणीवर बालविहार विभागात संहिता लेखक आणि निर्मिती साहाय्यक या पदावर काम सुरू केले. १९६१ ते १९६३ या कालावधीत त्यांनी दिल्ली दूरदर्शन येथे निर्मिती साहाय्यक या पदावर काम पाहिले. १९७३ सालापासून ते मुंबई आकाशवाणी केंद्रावर निर्माता या पदावर काम पाहात होते. १९७४ ते १९७७ व  १९७७ ते १९८० या कालावधीत रंगभूमी परिनिरीक्षण मंडळाचे सदस्य म्हणून त्यांनी काम पाहिले. याच काळात ते चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक महामंडळाच्या अध्यक्षपदावर काम पाहात होते. १९७७ ला पुणे येथे झालेल्या नाट्यसंमेलनाचे ते अध्यक्ष होते.

१४ ऑक्टोबर १९५० ला पुरुषोत्तम दारव्हेकर यांनी ‘रंजन कलामंदिर’ ही स्वतःची नाटक कंपनी नागपूर येथे स्थापन केली. या कंपनीचे पहिले नाटक ‘ॲटमबाॅंम व अडकित्ता’ सादर झाले. या नाट्यसंस्थेमार्फत विदर्भात तसेच पश्चिम महाराष्ट्रात त्यांनी अनेक कलाकार घडवले. बालरंगभूमीसाठी व मेळ्यांसाठी ते नाटक लिहून देत. मुले त्यांना मधुदादा म्हणत. नंतर ते मुलांचे व सर्वांचे ‘मास्तर’ झाले. ‘उपाशी राक्षस’, ’काबुलीवाला’, ’पऱ्यांचा महाल’, ’मोरूचा मामा’, ‘नारदाची शेंडी’, अब्रा का डब्रा’ ही त्यांची बालरंगभूमीवरची गाजलेली नाटके. बालरंगभूमीवरचे कलाकार वयाने मोठे झाल्यावर त्यांनी त्यांच्यासाठी युवक रंगभूमी स्थापन केली. १९७३ ला दारव्हेकर मुंबईत स्थायिक झाल्यावर त्यांनी ‘रंजन कलामंदिर’च्या कक्षा रूंदावल्या. या नाट्यसंस्थेची नाटके स्पर्धेत भाग घेऊ लागली.

सन १९६०-६१ च्या महाराष्ट्र राज्य नाट्य महोत्सव स्पर्धेमध्ये ‘चंद्र नभीचा ढळला’ या नाटकाला लेखन व प्रयोगाचे सादरीकरण या दोन्हीही कसोट्यांवर प्रथम क्रमांक मिळाला. संगीत, नृत्य व नाट्य यांचा मिलाफ या नाटकात आहे. भव्य नेपथ्य व त्याला पूरक अशी प्रकाशयोजना ही या नाटकाची आणखी एक महत्त्वाची बाजू होय.

पुरुषोत्तम दारव्हेकर स्वतः ‘संगीतालंकार’ होते. संगीत विषयाचे रसिक मर्मज्ञ होते. संगीत हा त्यांच्या प्रत्येक नाटकाचा अविभाज्य भाग आहे. त्यांची ओळख आजही ‘संगीत कट्यार काळजात घुसली’ या नाटकासाठी आहे. १९६९ साली प्रयोग सुरू झालेल्या या नाटकाचे २०११ ला पुनर्लेखन करण्यात आले. या नाटकाचे प्रयोग आजही होतात आणि २०१५ ला या नाटकाची संहिता घेऊन ‘कट्यार काळजात घुसली’ हा चित्रपट तयार करण्यात आला.

‘कट्यार काळजात घुसली’ या नाटकाला व्यावसायिक दृष्ट्या प्रचंड यश मिळाले. या नाटकाच्या माध्यमातून नाटककार दारव्हेकरांनी संगीत नाटकाच्या परंपरेला वेगळी दृष्टी दिली. या नाटकात संगीताचा मुक्त वापर केलेला असून संहिता व पदे एकजीव झालेली आहेत. अर्थाचा विचार करता ही पदे या संहितेपासून विलग करता येणार नाहीत.

पुरुषोत्तम दारव्हेकर यांची प्रयोगशील नेपथ्यकार म्हणून खास ओळख आहे; याचा प्रत्यय त्यांनी दिग्दर्शित केलेल्या प्रत्येक नाटकात येतो. ‘वऱ्हाडी माणसं’ या नाटकातला वाड्याचा भव्य मंच पाहाताना प्रेक्षकांना नेत्रदीपक अनुभव येत असे. ‘कट्यार काळजात घुसली’ या नाटकासाठी त्यांनी फिरता रंगमंच बनवून घेतला. संस्थानी वैभवाची छाप असलेली राजगायकाची हवेली, जुनाट मंदिराचा एक गाभारा व परिसर आणि धर्मशाळेतील एक सामान्य खोली या फिरत्या रंगमंचामुळे ‘कट्यार..’ ने नेपथ्याच्या दृष्टीने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले. नाटकातील नेपथ्य त्या कथाभागात महत्त्वाची भूमिका बजावते, हे त्यांनी भव्य व वैशिष्ट्यपूर्ण नेपथ्याच्या उपाययोजनेने दाखवून दिले.

पुरुषोत्तम दारव्हेकर यांनी स्वतःची नाटके दिग्दर्शित केली शिवाय इतर नाटककाराची नाटकेही त्यांनी दिग्दर्शित केली. ते एक यशस्वी दिग्दर्शक होते. यात नाटककार वसंत कानिटकर, अनिल बर्वे, मधुसुदन कालेलकर, वि. वा. शिरवाडकर, बाळ कोल्हटकर, वि. दा. सावरकर यांची नाटके समाविष्ट आहेत. ’काळी माती खारे पाणी’ (१९६०), ‘चंद्र नभीचा ढळला’ (१९६०), ‘चार कथा एक व्यथा’, ‘कट्यार काळजात घुसली’, ‘नयन तुझे जादुगार’ (१९६०), ‘वऱ्हाडी माणसं’ (१९६१), ‘अबोल झाली सतार’ (१९६६), ‘अश्रुंची झाली फुले’, ‘इथे ओशाळला मृत्यू’, ‘एक रूप अनेक रंग’, ‘जेव्हा गवताला भाले फुटतात’ (१९६८), ‘थँक्यू मिस्टर ग्लाड’, ‘नटसम्राट’ (१९७०), ‘सत्यम शिवम सुंदरम’, ‘सम्राटसिंह’ (१९७३), ‘वीज म्हणाली धरतीला’, ‘शिवराय कवी भूषण’ (१९७४), ‘सागरा प्राण तळमळला’, ‘ही श्रींची ईच्छा’ (१९७४), ‘बेईमान’, ‘मला काही सांगायचंय’, ‘विषवृक्षाची छाया’ (१९७५), ‘महाराणी पद्मिनी’ (१९७४), ‘अर्धांगी’, ‘वहिनीच्या बांगड्या’ (१९७४), ’हसा फुलांनो हसा’, ‘तो राजहंस एक’ (१९७५) इत्यादी नाटकांचे यशस्वी दिग्दर्शन दारव्हेकर यांनी केले.

पुरुषोत्तम दारव्हेकर यांनी एकंदर अकरा नाटके लिहिली. — १) चंद्र नभीचा ढळला,२) काळी माती खारे पाणी, ३) वऱ्हाडी मानसं, ४) चार कथा एक व्यथा, ५) पृथ्वी गोल आहे, ६) नयन तुझे जादूगार, ७) घनःश्याम नयनी आला, ८) अबोल झाली सतार, ९) मेरू मंदार धाकुटे, १०) वेदनेचा अंत झाला आणि ११) कट्यार काळजात घुसली. ही नाटके पारंपरिक धर्तीची, हलके-फुलके कथानक, बेताचा संघर्ष असलेली, भावनांना आवाहन देणारी आहेत. सुभाषितांनी युक्त असणारी भाषा, चटपटीत संवाद, श्रवणीय संगीत आणि भव्य नेपथ्य ही या नाटकांची वैशिष्ट्ये आहेत. त्यांनी काही एकांकिका लिहिल्या. ‘अबोल झाली सतार’, ’कल्पनेचा खेळ’ (पाच एकांकिका), ‘पप्पांचा महाल’ आणि ‘जावईशोध’. बालरंगभूमीसाठी त्यांनी लिलिधप्रकारचे खूप लेखन केले. उपाशी राक्षस, कपि संमेलन, दोन आंधळे, नाटक नवे गोंधळ जुनाच, नवा चष्मा, संजयमामाची चंची, चिनी बादाम, तात्पर्य, कोरा कागद, झिमझिम, सप्तपदी इत्यादी नाटके त्यांनी बालरंगभूमीसाठी लिहिली.

दारव्हेकर सेवानिवृत्त झाले तेव्हा त्यांच्या नावावर ‘हवामहल’ कार्यक्रमासाठी लिहिलेल्या सातशे संवादकथा ( Script) होत्या. ‘बालविहार’ या कार्यक्रमासाठी व दूरदर्शनसाठी लिहिलेल्या व निर्माण केलेल्या मालिका होत्या. त्यात पं. जवाहरलाल नेहरू व चायना वाॅर या अभ्यासपूर्ण मालिका अंतर्भूत आहेत. सेवानिवृत्ती नंतर ते आपल्या वऱ्हाडी संस्कृतीच्या भूमीत नागपूरमध्ये परतले. नागपूर विद्यापीठात त्यांची नियुक्ती मानद पदावर निर्माता म्हणून (Producer Emeritus) करण्यात आली होती. वयाच्या त्र्याहत्तराव्या वर्षी नागपूर येथे हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाले.

संदर्भ :

  • खोले, विलास-संपादन; बोकिल-कुलकर्णी, वंदना-सहसंपादन, आधुनिक महाराष्ट्राची जडण घडण नाट्यकोश.
  • पुंडे, दत्तात्रय; तावरे, स्नेहल, आजचे नाटककार.

समीक्षक : सुधीर पोटे


Discover more from मराठी विश्वकोश

Subscribe to get the latest posts sent to your email.