महासीर माशाचा समावेश ॲक्टिनोप्टेरिजी (Actinopterygii) वर्गाच्या सायप्रिनिफॉर्मिस (Cypriniformes) गणातील सायप्रिनिडी (Cyprinidae) कुलामधील टोरिनी (Torinae) या उपकुलात होतो. हा गोड्या पाण्यातील मासा असून इतर माशांच्या तुलनेत तो आकारमानाने मोठा असल्याने त्याला महासीर असे संबोधले जाते. टोरिनी उपकुलात टॉर (Tor), निओलिसोचिलस (Neolissochilus), नाझीरीटॉर (Naziritor) इत्यादी प्रजातींचा समावेश होतो. यापैकी टॉर प्रजातीतील मासे खरे महासीर म्हणून ओळखले जातात. महासीर मासा भारत, उत्तर व्हिएतनाम, दक्षिण चीन, कंबोडिया, थायलंड, मलेशिया, इंडोनेशिया, श्रीलंका, पाकिस्तान आणि अफगाणिस्तान येथे आढळतो. हा खाद्यमासा असून गळ टाकून हौशी मासेमारी (Gamefishing / Hunting) करणाऱ्यांमध्ये प्रसिद्ध आहे. महासीर मत्स्यालयामध्ये देखील ठेवतात.

महासीर मासासोनेरी महासीर (Golden mahseer) या नावाने जगभर ओळखला जातो. तसेच त्याच्या मोठ्या आकारमानामुळे त्याला ‘टायगर ऑफ द वॉटर’ असेही म्हणतात. महासीर माशाच्या एकूण ४७ जाती असून यांपैकी भारतात १६ जाती आढळतात. यापैकी हिमालय क्षेत्रात आढळणारा सोनेरी महासीर [Tor putitora (टॉर पुतिटोरा)] आणि तपकिरी महासीर [Neolissochilus hexagonolepis (निओलिसोचीलस हेक्झागोनोलेपीस)], दख्खन पठारावर आढळणारा निळा पर असलेला किंवा डेक्कन महासीर [Tor khudree (टॉर खुद्री)], मध्य भारतातील नद्यांमधील लाल पर असलेला महासीर [Tor tor (टॉर टॉर)] तसेच विशेषेकरून कावेरी नदी व तिच्या उपनद्यांमध्ये आढळणारा हम्पबॅक महासीर [Tor remadeviae (टॉर रेमादेवी)] या काही प्रसिद्ध प्रजाती आहेत.
महासीर मासे भारतात संपूर्ण हिमालयाच्या पायथ्यापासून केरळपर्यंत बारमाही नद्यांमध्ये आढळतात; उदा., झेलम, ब्रह्मपुत्रा, गंगा, कोसी, नर्मदा, कावेरी, तुंगभद्रा, ताम्रपर्णी, चिन्नार इत्यादी. याशिवाय अनेक ठिकाणी बंदिस्त जलाशयांमध्येही प्रजननासाठी हे मासे सोडण्यात आले आहेत. महाराष्ट्रात रायगड किल्ल्याच्या पायथ्याला असलेल्या काळ नदीवरील वाळणकोंडीच्या डोहांमध्ये भल्यामोठ्या आकाराचे महासीर आढळतात. स्थानिक लोक त्यांना ‘खडस’ या नावाने ओळखतात. या भागात हे मासे ‘देवाचे मासे’ म्हणून प्रसिद्ध असून त्यांची शिकार केली जात नाही. १८३९ मध्ये संशोधन करून नोंद केलेल्या टॉर खुद्री या महासीर माशाचे संशोधन पुण्यातील मुळा-मुठा नद्यांमधून झाले असून स्थानिक ‘खडशी’ या नावावरूनच त्याचे शास्त्रीय नाव ठेवण्यात आलेले आहे.

सोनेरी महासीर या माशाचा रंग सोनेरी असून त्याचे पृष्ठपर लालसर रंगाचे असतात. त्याच्या शरीरावर मोठ्या आकाराचे खवले असून तोंड जाडजूड ओठांनी वेढलेले असते. तोंडाभोवती लांब आकाराच्या स्पृशा असतात. हा मासा १३०–३०० से. तापमान असलेल्या पाण्यात आढळतो. त्याची लांबी सु. २.७५ मी. असून वजन सु. ५०–५५ किग्रॅ. असते. २०११ मध्ये कावेरी नदीतील हम्पबॅक महासीर माशाची लांबी सु. १.५ मी. व वजन सु. ५९ किग्रॅ. नोंदविण्यात आले होते. तसेच गोदावरी नदीत आढळलेल्या हम्पबॅक महासीर माशाची लांबी सु. १.८ मी. व वजन सु. ९३ किग्रॅ. नोंदविण्यात आले आहे. हम्पबॅक महासीर माशाला जगातील गोड्या पाण्यामधील वजनाने सर्वांत मोठा मासा तसेच सर्वाधिक झुंज देणारा मासा म्हटले जाते.
महासीर मासा खडकाळ, रेतीयुक्त तसेच दगडगोट्यांचा तळ असलेल्या जलद प्रवाही स्वच्छ नद्यांच्या अधिवासात आढळतो. तो सर्वसाधारणपणे ५°–२५° से.पर्यंतच्या तापमानास सहज राहू शकतो. जुलै ते सप्टेंबर हा त्यांचा प्रजनन काळ आहे. नर-मादी दिसायला सारखेच असतात. परंतु, प्रजनन काळात नराचा रंग अधिक गडद किंवा चमकदार होतो, त्याच्या डोक्यावर लहान आकाराचे उंचवटे तयार होतात. तर मादीचे पोट अधिक फुगीर होते व गुदद्वार सुजल्यासारखे दिसते. त्यामुळे या काळात ते स्पष्टपणे ओळखता येतात. प्रजनन काळात मादी महासीर वेगवान प्रवाहाच्या विरुद्ध दिशेला पोहत जाते. ऑक्सिजन समृद्ध उथळ व संथ प्रवाहांमध्ये प्रतिकिलो वजनाच्या प्रमाणात मादी ६,०००–१०,००० अंडी घालते. ही संख्या कार्प कुलातील इतर माशांच्या तुलनेत अगदी कमी आहे. अंडी पिवळसर तपकिरी रंगाची असतात व त्यांची लांबी सु. ३ मिमी. असते. अंड्यांमध्ये असलेल्या बलकामुळे ती लगेच प्रवाहाच्या तळाशी जाऊन स्थिरावतात. साधारण ८–१० तासात त्यातून पिले जन्माला येतात व त्यांचे छोटे छोटे गट संरक्षणासाठी त्वरेने खडकाळ कपारींमध्ये आडोसा शोधून त्यात लपून राहतात. मुक्त प्रवाहात पोहण्यायोग्य पुरेशी मोठी झाल्यावरच ती या लपण्याच्या जागांमधून बाहेर येतात. पिलांची वाढ दरवर्षी १० सेंमी. या प्रमाणात होते. पिले साधारण ३० सेंमी. लांबीची झाल्यावर ती प्रजननक्षम होतात. महासीर मासा मिश्राहारी आहे. ४० सेंमी. एवढ्या आकाराचे महासीर प्रामुख्याने मत्स्याहारी असल्याचे आढळले आहे. पाणवनस्पती, खेकडे, लहान मासे, कीटक इ. त्यांचे खाद्य आहे.

महासीर मासे परिसरातील बदलास अतिशय संवेदनशील असतात. नद्यांचे प्रदूषण, पाण्याचा बेसुमार उपसा, त्यांच्या प्रजनन मार्गात बांधली जाणारी धरणे, अनियंत्रित शिकार, त्यांच्या अधिवासात केली जाणारी इतर उपद्रवी परदेशी मत्स्य प्रजातींची पैदास आणि व्यापारीदृष्ट्या केली जाणारी त्यांच्या निवडक प्रजातींची पैदास यांमुळे त्यांचा अधिवास धोक्यात आला आहे. त्यामुळे या माशांच्या अनेक प्रजाती आता दुर्मिळ झाल्या आहेत. आय.यू.सी.एन. (IUCN; इंटरनॅशनल युनियन फॉर कन्झर्वेशन ऑफ नेचर) या आंतरराष्ट्रीय संस्थेने यातल्या अनेक जातींची नोंद संकटग्रस्त व अस्तित्व संवेदनशील चिंता स्थितिगटांमध्ये केली आहे.
महासीर माशांची त्यांच्या मूळ अधिवासातील अवस्था गंभीर आहे. यावर उपाय म्हणून सिक्कीम आणि पश्चिम बंगालमधून वाहणाऱ्या तिस्ता नदीमध्ये दरवर्षी लक्षावधी सोनेरी महासीर मासे सोडण्यात येतात. साधारण २०१४ सालापासून इथे गळ टाकून मासेमारी करण्याला प्रोत्साहन देण्यात येत आहे व त्यासाठी मुबलक मासे उपलब्ध असावेत असा या मागचा उद्देश आहे. महासीर वाचवण्यासाठी विश्वप्रकृतीनिधी (WWF; वर्ल्ड वाइड फंड फॉर नेचर) या संस्थेच्या भारतीय शाखेने भारतातील नद्या आणि जलाशयांमधील महासीर माशांच्या संवर्धनासाठी सर्वेक्षण संवर्धन आराखडा बनवला आहे. महाराष्ट्रात डेक्कन महासीरच्या संवर्धनासाठी टाटा पॉवर ही ऊर्जा क्षेत्रातील कंपनी अनेक वर्षांपासून कार्यरत आहे. या कंपनीच्या लोणावळा येथील वळवण जलाशयात डेक्कन महासीर माशांचे यशस्वीरित्या कृत्रिम प्रजनन केले जाते व मोठ्या झालेल्या माशांना त्यांच्या नैसर्गिक अधिवासात मुक्त केले जाते. सोनेरी महासीर व तपकिरी महासीर या माशांच्या संवर्धनासाठी २०१५ मध्ये मेघालयातील गारो टेकड्यांमधील चिबोक नदीवर मत्स्य अभयारण्य स्थापन करण्यात आले आहे.
२०१२ मध्ये युके (युनायटेड किंगडम) येथे ‘महासीर ट्रस्ट’ या संस्थेची स्थापना करण्यात आली. महासीर माशांच्या प्रजातींचे संरक्षण व संवर्धन करणे आणि नद्यांविषयी जागरुकता निर्माण करून लोकांमध्ये पर्यावरणीय संवर्धनाची जाणीव निर्माण करणे हे या संस्थेचे मुख्य उद्दिष्ट आहे. ही संस्था भारतातील मत्स्य संवर्धन संस्था, मत्स्य विद्यापीठे तसेच शास्त्रज्ञ यांच्या साहाय्याने भारतातील विशेषेकरून धोक्यात असलेल्या महासीर माशांच्या प्रजातींचे संरक्षण व संवर्धन करण्यासाठी कार्य करते.
संदर्भ :
-
- Click to access himalayan-Mahseer-Bulletin-1.pdf
- https://www.indianetzone.com/45/mahseer.htm
- Click to access mahseer.pdf
- https://vikalpsangam.org/article/fish-sanctuaries-and-community-support-forconservation-of-meghalayas-mahseer/
- https://www.wwfindia.org/about_wwf/priority_species/threatened_species/golden_mahseer/
समीक्षक : नंदिनी देशमुख
Discover more from मराठी विश्वकोश
Subscribe to get the latest posts sent to your email.