प्रस्तावना : आरोग्यसेवेतील व्यवसायांपैकी परिचर्या (Nursing) हा एक अत्यंत ‘लिंग-विनिर्दिष्ट’ (gender specified) व्यवसाय मानला जातो. परिचर्या हा असा व्यवसाय आहे, ज्यामध्ये जगाच्या बहुतांश भागांमध्ये महिलांचे प्रमाण हे पुरुषांच्या तुलनेत  जास्त आहे.  जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) २०२० मधील ‘जागतिक परिचर्या क्षेत्राची स्थिती’ (Status of Nursing ) या अहवालानुसार, जगभरातील एकूण परिचर्या कर्मचाऱ्यांपैकी केवळ १०% कर्मचारी पुरुष आहेत. १९६० च्या दशकापासून, परिचर्या क्षेत्र हे हळूहळू पुरुष परिचारकांसाठी निवडीचा व्यवसाय   बनत गेले आहे. वैद्यकीय क्षेत्राची सध्याची रचना ही ऐतिहासिक काळात दिल्या जाणाऱ्या सेवेचे थेट प्रतिबिंब नसली, तरीही रुग्ण आणि जखमींची शुश्रूषा करण्यामध्ये पुरुषांचा सहभाग असल्याची एक दीर्घ परंपरा अस्तित्वात आहे. परिचर्या हा व्यवसाय मानवाच्या अस्तित्वाइतकाच प्राचीन आहे आणि या क्षेत्रात ‘पुरुष’ असणे म्हणजे नेमके काय, या संकल्पनेचा इतिहास अत्यंत व्यापक आणि वैविध्यपूर्ण राहिला आहे. पुरुष परिचारकांच्या सहभागाची पहिली नोंद प्राचीन भारतात आढळते. कालांतराने, पुरुष परिचारकाची प्रतिमा मागे पडून या क्षेत्रात महिलांचे वर्चस्व प्रस्थापित झाले. या क्षेत्राच्या इतिहासाचे जे लेखन झाले आहे, त्यामध्ये प्रामुख्याने नेहमीच ‘स्त्री-दृष्टिकोनावर’ (female perspective) भर दिला गेला आहे. तथापि, या इतिहासाच्या जडण-घडणी मध्ये पुरुषांनीही अत्यंत महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे.

भारतीय शुश्रूषा क्षेत्रात पुरुषांचे योगदान अत्यंत प्राचीन काळापासून राहिले आहे. भारताच्या वैद्यकीय इतिहासात पुरुषांनी परिचारक म्हणून बजावलेली भूमिका महत्त्वाची असून, काळाच्या ओघात सामाजिक आणि सांस्कृतिक बदलांमुळे या क्षेत्राचे स्वरूप बदलत गेले.

शस्त्रक्रियेत मदत करताना पुरुष परिचारक.

१. प्राचीन काळ – शुश्रूषेची सुरुवात : भारतातील परिचर्येचा इतिहास हा प्रामुख्याने आयुर्वेदाशी जोडलेला आहे. प्राचीन ग्रंथांमध्ये, विशेषतः ‘चरक संहिता’ आणि ‘सुश्रुत संहिता’ मध्ये ‘परिचारक’ (Attendant) या संकल्पनेचा उल्लेख आढळतो.

  • पात्रता : प्राचीन काळी परिचारक होण्यासाठी चार मुख्य गुण असणे आवश्यक मानले जात — शुद्धता (cleanliness), चातुर्य (skill), दयाळूपणा (kindness) आणि वैद्यकीय सूचनांचे पालन करण्याची क्षमता.
  • पुरुषांचे वर्चस्व : आश्चर्यकारक बाब म्हणजे, प्राचीन भारतात परिचारकाचे काम प्रामुख्याने पुरुषच करत असत. स्त्रियांना घरगुती शुश्रूषेपुरते मर्यादित ठेवले जात असे, तर सार्वजनिक आरोग्य किंवा युद्धाच्या काळात जखमींची सेवा पुरुष परिचारक करत अशा नोंदी सापडतात.

२. मध्ययुगीन काळ आणि लष्करी प्रभाव : मध्ययुगीन काळात, विशेषतः युद्धांच्या प्रसंगी जखमी सैनिकांची काळजी घेण्यासाठी लष्करी तळांवर पुरुषांची नियुक्ती केली जात असे. या काळात संघटित परिचर्या प्रशिक्षण नव्हते, परंतु अनुभवातून अनेक पुरुष या क्षेत्रात तज्ञ बनले होते.

३. ब्रिटिश राजवट – बदलाचा काळ : ब्रिटीश काळात भारतातील परिचर्या क्षेत्राचे चित्र पूर्णपणे पालटले. आधुनिक परिचर्येची सुरुवात १९ व्या शतकात झाली.

  • फ्लॉरेन्स नाइटिंगेल यांचा प्रभाव : ख्रिश्चन मिशनरी आणि फ्लोरेन्स नाईटिंगेल यांच्या कार्यामुळे परिचर्येकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला. या काळात परिचर्या हे प्रामुख्याने स्त्रियांसाठी ‘पवित्र कार्य’ मानले जाऊ लागले.
  • पुरुषांचे दुय्यम स्थान : १९ व्या शतकाच्या उत्तरार्धात आणि २० व्या शतकाच्या सुरुवातीला, ब्रिटिशांनी परिचर्येमध्ये स्त्रियांना प्राधान्य देण्यास सुरुवात केली. यामुळे पुरुषांचा सहभाग केवळ लष्करी रुग्णालये किंवा मनोरुग्णालयांपुरता (Mental Hospitals) मर्यादित राहिला.

४. २० वे शतक आणि स्वातंत्र्योत्तर काळ : भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आरोग्य क्षेत्रात मोठ्या सुधारणा झाल्या, परंतु पुरुष परिचारकांसाठी हा काळ संघर्षाचा होता.

  • भारतीय परिचर्या परिषदेची स्थापना : १९४७ मध्ये  भारतीय परिचर्या परिषदेची (INC) स्थापना झाली. सुरुवातीच्या काळात अनेक राज्यांमध्ये परिचर्या अभ्यासक्रमात पुरुषांच्या प्रवेशावर निर्बंध होते.
  • मानसिक आरोग्य आणि विशेष विभाग : १९ व्या शतकापासून ते २० व्या शतकाच्या मध्यापर्यंत पुरुष परिचारकांना प्रामुख्याने मनोरुग्णालयांमध्ये कठीण रुग्णांना हाताळण्यासाठी नियुक्त केले जात असे. ‘पुरुष परिचारक’ ही संकल्पना केवळ शारीरिक शक्तीशी जोडली गेली होती.

५. आधुनिक काळातील बदल आणि न्यायालयीन लढा : गेल्या काही दशकांत पुरुष परिचर्येच्या इतिहासात सर्वात मोठा बदल कायदेशीर लढाईमुळे / हस्तक्षेपामुळे  आला.

  • आरक्षणाचा मुद्दा : अनेक सरकारी रुग्णालये, संस्था यांमध्ये  परिचारिकांच्या जागांवर महिलांसाठी ८०% आरक्षण होते. या विरुद्ध पुरुष परिचारकांनी लढा दिला (उदा. AIIMS -All India Institute of Medical Sciences, Delhi).
  • समानता : आधुनिक काळात ‘परिचर्या‘ हे केवळ स्त्रीचे कार्य क्षेत्र नसून ते एक व्यावसायिक कौशल्य आहे, ही जाणीव वाढली आहे. आज अतिदक्षता विभाग (ICU), शस्त्रक्रिया विभाग (Operation Theatre) आणि आपत्कालीन विभागांमध्ये पुरुष परिचारकांची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे.

६. आव्हाने आणि सामाजिक दृष्टिकोन : महाराष्ट्रासह संपूर्ण भारतात पुरुष परिचारकांना अनेक ऐतिहासिक आणि सामाजिक आव्हानांना सामोरे जावे लागले.

  • परिचर्येला स्त्री प्रधान क्षेत्र समजण्याच्या मानसिकतेमुळे पुरुषांना या क्षेत्रात येताना संकोच वाटत असे.
  • संबोधनाचा प्रश्न : नर्सला मराठीत ‘परिचारिका’ (स्त्रीलिंगी शब्द) म्हटले जाते, ज्यामुळे पुरुषांसाठी योग्य शब्दाची कमतरता अनेकदा जाणवते. परिचारिकेला ‘सिस्टर’ आणि पुरुषांना ‘ब्रदर’ असे संबोधले जाते.
  • लिंगभेद विषयक रूढी : परिचर्येला अनेकदा ‘महिलांचे काम’ म्हणून पाहण्याची सर्वसाधारण सामाजिक धारणा.
  • काळजी आणि स्पर्श : पुरुष परिचारक सहानुभूती आणि रुग्णांशी शारीरिक संपर्क या संकल्पना कशा प्रकारे पार पाडतील याविषयी असलेली साशंकता.

७. पुरुषांसाठीच्या परीचर्या अभ्यासक्रमाचा इतिहास : विशेषतः भारतात २० व्या शतकात पुरुषांसाठीचे औपचारिक परिचर्या शिक्षण लक्षणीय रीत्या विकसित झाले आहे. अनौपचारिक युद्धभूमी वरील प्रशिक्षणापासून ते प्रमाणित, लिंग-निरपेक्ष असा व्यावसायिक अभ्यासक्र विकसित झाला आहे.

  अ. २० व्या

शतकाची सुरुवात : अनौपचारिक आणि मिशनरी प्रशिक्षण :

  • १९२१ :प्रशिक्षित परिचर्येची वाढती गरज लक्षात घेऊन, तामिळनाडूतील राणीपेट येथील स्कडर मेमोरियल रुग्णालयामध्ये पुरुषांसाठी पहिली परिचर्या शाळा स्थापन करण्यात आली.
  • १९२४ :पुरुष विद्यार्थ्यांची पहिली तुकडी सीएमएआय बोर्ड (ख्रिश्चन मेडिकल असोसिएशन ऑफ इंडिया) परीक्षेत उत्तीर्ण झाली.
  • अभ्यासक्रमाचा भर :पुरुष परिचारकांना मिशनरी रुग्णालयांसाठी तयार करण्याकरिता, सुरुवातीच्या अभ्यासक्रमांमध्ये व्यावहारिक ​​प्रशिक्षण, शरीररचना शास्त्र आणि रुग्णाजवळ राहून केली जाणारी शुश्रूषा इत्यादी विषयांवर प्रामुख्याने लक्ष केंद्रित केले जात असे; हे विषय बहुतेकदा इंग्रजी भाषेत शिकविले जात.

आ. १९३०-१९४० चे दशक : औपचारिकीकरण आणि शासकीय मान्यता :

  • १९३८-१९३९ :मद्रास (आताचे चेन्नई) सरकारने पुरुष परिचारकांची औपचारिकपणे भरती सुरू केली आणि जुलै १९३९ मध्ये प्रशिक्षण सुरू करण्यास मंजुरी देण्यात आली.
  • अभ्यासक्रम आणि प्रशिक्षण मानके :मे १९३९ मध्ये मंजूर झालेल्या नियमांनुसार पुरुष विद्यार्थ्यांना विशिष्ट शैक्षणिक मानके (माध्यमिक शाळा सोडल्याचा दाखला—SSLC) पूर्ण करणे आणि एक संरचित अभ्यासक्रम पाळणे आवश्यक होते, जो अनेकदा भारतीय प्रशिक्षित परिचारिका संघटनेद्वारे (Trained Nurses Association of India; TNAI) स्थापित परिचर्या अभ्यासक्रमाच्या समकक्ष होता.
  • १९४७ : भारतीय परिचर्या परिषद (INC) कायदा संमत झाला, ज्यामुळे प्रशिक्षणात एकसमानता आली.
  • निर्बंध :या काळात, पुरुष परिचारकांना प्रसूती प्रशिक्षण घेण्यावर आणि महिला प्रभागामध्ये काम करण्यावर अनेकदा निर्बंध होते, कारण अभ्यासक्रम सामान्य परिचर्या आणि पुरुष प्रभागावर लक्ष केंद्रित करण्यासाठी तयार करण्यात आला होता.

इ. स्वातंत्र्योत्तर काळ (१९५०-१९८०): एकीकरण आणि विशेषीकरण

  • १९५१ :भारतीय परिचर्या परिषदेने सामान्य परिचर्या आणि प्रसूतिशास्त्राचा (GNM)  एक मानक अभ्यासक्रम विहित केला.
  • १९५४ :भारतीय औपचारिक परिचर्या शिक्षण संरचनेत पुरुष परिचर्या प्रशिक्षणाचे पूर्णपणे एकीकरण करण्यासाठी, तसेच सार्वजनिक आरोग्याला मूलभूत अभ्यासक्रमात समाविष्ट करण्यासाठी एक विशेष तरतूद करण्यात आली.
  • १९६४-६५ :मानसोपचार परिचर्येचा अभ्यासक्रमात औपचारिकपणे समावेश करण्यात आला, ज्यामुळे पुरुष परिचारकांना विशेष प्रशिक्षणाच्या संधी उपलब्ध झाल्या.
  • १९८२ :GNM अभ्यासक्रमात सुधारणा करून ३ वर्षांचा एकात्मिक कार्यक्रम बनवण्यात आला आणि दोन्ही स्त्री व पुरुष परिचारिकांसाठी व्यापक, सामान्य प्रशिक्षणाच्या बाजूने, एकीकरण करताना स्वतंत्र असे आणि  अनेकदा कमी कालावधीचे, केवळ सुईणकामाचे प्रशिक्षण अधिकृतपणे टप्प्याटप्प्याने बंद करण्यात आले.

ई. २० व्या शतकापासून वर्तमानापर्यंत: लिंग समानता आणि आधुनिक अभ्यासक्रम :

  • अभ्यासक्रमाचा विकास :पुरुष-केंद्रित अभ्यासक्रमाचा दृष्टीकोन बदलून एका आधुनिक आणि क्षमताधारित  विशिष्ट चौकटीत प्रशिक्षण  रूपांतरित झाले आहे, ज्यामुळे हा अभ्यासक्रम परिचर्येला लिंग-निरपेक्ष व्यवसाय बनवण्याच्या भारतीय परिचर्या परिषदेच्या ध्येयाशी सुसंगत असा झाला  आहे.
  • सध्याचा अभ्यासक्रम :सध्या पुरुष परिचारकांसाठीचा अभ्यासक्रम महिलांसारखाच आहे (उदा., बी.एस्सी परिचर्येच्या ४-वर्षीय अभ्यासक्रमांमध्ये किंवा जीएनएममध्ये). त्यात खालील बाबींचा समावेश आहे :
    • सर्वसाधारण क्षमता :रुग्ण-केंद्रित काळजी, व्यावसायिकता, नेतृत्व आणि पुराव्यावर /प्रात्यक्षिक  प्रशिक्षण आधारित कार्यपद्धती.
    • विशेष प्रशिक्षण :अतिदक्षता विभाग, गंभीर रुग्णांची काळजी, मानसिक आरोग्य आणि आपत्कालीन  परिचर्या, ही अशी क्षेत्रे आहेत जिथे पुरुष परिचारकांचे प्रमाण जास्त आहे. त्यांना  विशिष्ट प्रशिक्षण  दिले जाते..
  • २००५ :भारतीय परिचर्या परिषदेने प्रगत शैक्षणिक प्रशिक्षणावर (बी.एस्सी/एम.एस्सी) लक्ष केंद्रित करून, सर्व परिचर्या विद्यालयांना परिचर्या महाविद्यालयांमध्ये श्रेणीसुधारित करणे अनिवार्य केले आहे.

८ . पुरुष परिचारकांसाठी उपलब्ध असलेल्या व्यावसायिक संधी : भारतात आणि जागतिक स्तरावर पुरुष परिचारकांना मोठी मागणी आहे . अहवालानुसार, परिचारक कर्मचाऱ्यांमध्ये पुरुषांचे प्रमाण अंदाजे १०% आहे, जे या क्षेत्रात पुरुष व्यावसायिकांची सातत्यपूर्ण मागणी दर्शवते.  स्त्री परिचरिकांप्रमाणेच आरोग्याच्या सर्वच क्षेत्रांत पुरुषांनाही संधी उपलब्ध आहेत.

नोकरीच्या प्रमुख संधी आणि भूमिका :

  • विशेषीकृत क्षेत्रे : अतिदक्षता विभाग, शस्त्रक्रिया विभाग, आपत्कालीन रुग्ण  विभाग, मानसोपचार रुग्ण  विभाग इत्यादी.
  • शासकीय क्षेत्र : केंद्र व राज्य सरकारी रुग्णालये आणि सार्वजनिक क्षेत्रातील ओएनजीसी सेल (Oil & Gas Corporation), एनटीपीसी (National Thermal Power Corporation) अशा ठिकाणी कायम व स्थित स्वरूपाच्या नोकरीच्या संधी आहेत.
  • सशस्त्र दल : भारतीय लष्कर, नौदल आणि हवाई दल, तसेच बीएसएफ (Border Security Force), सीआरपीएफ (Central Reserve Police Force ) आणि आयटीबीपी (Indo Tibetan Police ) यांसारख्या निमलष्करी संघटनांमध्ये वारंवार पुरुष परिचारकांची भरती केली जाते.
  • परदेशातील संधी : अमेरिका, ओमान आणि इतर आखाती देशांमध्ये पुरुष परिचारकांना मोठी मागणी आहे.
  • शिक्षण आणि औद्योगिक : एएनएम/जीएनएम व बीएस्सी  महाविद्यालयांमधील पात्रतेनुसार परिचारिका पाठ्यनिर्देशक शिक्षक, अधिव्याख्याता, प्राध्यापक, प्राचार्य इ., तसेच औद्योगिक (Industry)  क्षेत्रात औद्योगिक परिचारक म्हणून कार्यरत राहता येते.

पुरुषांनी परिचर्या क्षेत्र का निवडावे? :

  • उच्च मागणी आणि पगार : अतिदक्षता विभाग आणि आघात रुग्ण परिचर्या विभागातील विशेष भूमिकांमध्ये अनेकदा चांगला पगार मिळतो.
  • शारीरिक ताकदीचा फायदा : अतिदक्षता विभागात किंवा आपत्कालीन परिस्थितीत रुग्णांना हलविणे इ. शारीरिक ताकद लागणाऱ्या कामांसाठी पुरुष परिचारकांना अनेकदा प्राधान्य दिले जाते.
  •  नेतृत्व भूमिका : पात्रतेच्या निकषानुसार व्यवस्थापकीय, पर्यवेक्षकीय आणि विशेष तांत्रिक पदांवर पदोन्नतीच्या संधी उपलब्ध असतात.

गोषवारा : आज भारतातील परिचर्या क्षेत्रात पुरुषांची संख्या झपाट्याने वाढत आहे. केरळ आणि राजस्थान या राज्यांप्रमाणेच महाराष्ट्रातही आता तरुण पुरुष परिचर्येकडे एक सन्मानजनक व्यावसायाची संधी म्हणून पाहत आहेत. प्राचीन काळातील ‘परिचारक’ ते आजचा ‘परिचर्या अधिकारी’ हा प्रवास भारतीय पुरुषांच्या चिकाटीचा आणि सेवावृत्तीचा इतिहास सांगतो.

महत्त्वाची नोंद : प्राचीन भारतात परिचर्या हे प्रामुख्याने पुरुषांचेच कार्य होते, हे लक्षात घेणे आजच्या पिढीसाठी प्रेरणादायी ठरू शकते. काळाच्या ओघात हरवलेले हे स्थान आजचे पुरुष परिचारक आपल्या कौशल्याने पुन्हा मिळवत आहेत.  ब्रिटिश सरकारने पुरुष परिचारकांच्या कामाचा दर्जा उंचावण्यासाठी सुधारणा घडवून आणल्यात  पुरुष परिचारकांच्या क्षेत्रातील सुधारणा आणि पुनरुज्जीवन १९३८ मध्ये सुरू झाले व १९५० मध्ये त्याला मान्यता मिळाली.

पुरुष परिचारकांची भरती १९३८ मध्ये झाली आणि १९५० पर्यंत ते प्रमुख परिचारकाच्या पदापर्यंत पोहोचले. पुरुष परिचारकांना त्यांच्या कामातील आणि व्यावसायिक प्रगतीतील अडथळ्यांवर मात करण्यासाठी एक मोठा प्रवास करावा लागला. अलीकडच्या काळात, आरोग्य सेवा पुरवण्यातील त्यांच्या असाधारण योगदानासाठी पुरुष परिचारक ओळखले जातात.

संदर्भ :

  • Historical Trajectory of Men in Nursing in India” (Journal Article/ResearchGate)
  • O’Lynn, Chad, A Man’s Guide to a Nursing Career, 2012
  • O’Lynn, Chad; Tranbarger, R. E. MEN IN NURSING : History, Challenges and Opportunities, 2006.

समीक्षक : सरोज वा. उपासनी


Discover more from मराठी विश्वकोश

Subscribe to get the latest posts sent to your email.