आर्सेनिकचे मुख्य खनिज. याला आर्सेनिक लोह सल्फाइड असेही म्हणतात. आर्सेनिकल पायराइट या जुन्या नावाचे हे संक्षिप्त रूप. लोखंड, आर्सेनिक आणि गंधक (Fe-As-S) या मूलद्रव्यांपासून बनलेले हे मूळ नैसर्गिक खनिज असून यात चांदी, सोने, कोबाल्ट, टिन, बिस्मथ, कॉपर आणि शिस यांसारख्या इतर मूलद्रव्यांची अशुद्धी आढळते. जर्मन खनिजशास्त्रज्ञ एर्न्स्ट फ्रीड्रिख ग्लोकर याने १८४७ मध्ये याला आर्सेनोपायराइट हे नाव दिले असले, तरी हे नाव आधीपासूनच ज्ञात होते. काही जर्मन खनिजशात्रज्ञ याला ‘मिस्पिकेल’ या नावाने ओळखत.
गुणधर्म : स्फटिक एकनताक्ष, त्रिनताक्ष किंवा मिथ्यासमचतुर्भुंजी स्फटिक प्रणालीत तयार होत असून साधारणपणे रूपेरी ते पोलादी करड्या धातूरंगात सापडते. चमक धातूकीय असून हा असमान तुटतो. पाटण अथवा विभंजन सहज दिसते. कठिनता ५.५ -६ असूनही खनिज ठिसूळ. विशिष्ट गुरुत्व ६.१२. याला तोडला किंवा फोडला तर लसणासारखा उग्र गंधकीय विषारी वास येतो. हे तापवल्यावर चुंबकीय बनते. याची रेषा पावडर (खनीज चूर्ण रंग परीक्षा) ही काळपट करडी असते. हे खनिज लांबट, भाल्याच्या टोकासारखे किंवा प्रिझम आकाराचे, विविध स्फटिक रूपात एकटे अथवा जुळे (यमलज) स्फटिकही वारंवार आढळतात. संस्पर्शी – चिकटलेले, अन्योन्यवेशी- एकमेकात घुसलेले अथवा पुनरावृत्त यमलन जे सहा आऱ्यांची तारकाकृती अशा रूपातही सहज सापडते. प्रकाशिकीय दृष्ट्या हे खनीज द्विअक्षीय असून याचे चिन्ह ॠण (निगेटिव्ह) आहे.
भूवैज्ञानिक उत्पत्ती : आर्सेनोपायराइट एकटे सहसा सापडत नाही. सोने, चांदी, शिसे, जस्त, तांबे, टिन यांच्या खाणींमध्ये सोबतीला सापडते. सामान्यत: उच्च तापमानाच्या उष्णजलीय (हायड्रोथर्मल) निक्षेपांमधून हे खनिज सापडते. हे आर्सेनिकाचे सर्वांत सामान्य व निरनिराळ्या परिस्थितींत तयार होणारे खनिज असून ते उष्णवायवीय (शिलारसातील उष्ण वायूंच्या क्रियेने तयार झालेल्या) निक्षेपात टंगस्टन व कथिल यांच्या धातुपाषाणांबरोबर किंवा कोबाल्ट व निकेल यांच्या धातुपाषाणांबरोबरसुद्धा आढळते.
जेथे आर्सेनोपायराइट सापडते, तेथे सोने सापडण्याची शक्यता जास्त असते. कारण सोन्याचे कण अनेकदा याच खनिजात अडकलेले असतात. त्याला ‘रिफ्रॅक्टरी गोल्ड’ म्हणतात. हे खनिज सोन्यासाठी मुख्य वाहक म्हणून निसर्गात काम करताना आढळते. अनेक ठिकाणी आर्सेनोपायराइटच्या शुद्धीकरणातूनच सोने काढले जाते.
उपयोग : आर्सेनोपायराइट विषारी असून ते कर्करोगजन्य आहे. भाजून त्यापासून आर्सेनिक ट्रायऑक्साइड मिळवितात. आर्सेनिकचा वापर कीटकनाशक औषधे, काच, रबर, वाळवी रोधक, रंगनिर्मिती इत्यादी उद्योगातून केला जातो. वैज्ञानिक प्रक्रियांद्वारे आर्सेनिक वेगळे करून इलक्ट्रॉनिक वस्तू, अर्धसंवाहक आणि सोन्याच्या निष्कर्षणामध्ये याचा वापर केला जातो.
जल प्रदूषण समस्या : खनिजातील आर्सेनिकचे सहज ऑक्सिडीकरण होवून पाण्याच्या सान्निध्यात अर्सेनाइट – As (III) व अर्सीनेट – As (V) अशा दोन महत्त्वाच्या रासायनिक घटकांमध्ये त्यांची द्रावणी संयुगे होत असल्याने, भूजलात यांचे अस्तित्व राहून भूजल प्रदूषण घडते. ऑक्सिजन बहुल अशा उथळ खोलीपर्यंत भूजलात As (III) चे प्राबल्य आढळते; जे पाण्यातून वेगळे करून पाणी पिण्यालायक शुद्ध करता येते. परंतु खोलवरच्या भूजलात जिथे ऑक्सिजनची कमतरता असते, तेथे As (V) चे प्राबल्य आढळते; जे द्रवीभूत राहत असल्याने पाण्यातून वेगळे करता येत नाही. त्यामुळे पाणी विषारी बनून पिण्यालायक नसल्याने गंभीर समस्या निर्माण होतात. गंगा-ब्रह्मपुत्रा नदीच्या खोर्यात व त्रिभुज प्रदेशात, भूजलात तसेच गाळामधून आर्सेनिकचे जास्तीचे प्रमाण आढळते. पंजाब, हरियाणा, राजस्थान व महाराष्ट्राच्या काही भागातून, भूजलात त्याच्या खोलवरच्या खोलीप्रमाणे आर्सेनिकचे कमी जास्तीचे प्रमाण आढळते.
आढळ : कर्नाटक, राजस्थान, ओडिशा, छत्तीसगढ राज्यात साधारणपणे आर्कियन युगाच्या (२.५ ते ३.१ अब्ज वर्षे ) खडकांमध्ये हे सापडते. कर्नाटक राज्यातील कोलार व हट्टी येथील सोन्याच्या खाणीतून, झारखंड, राजस्थान, आंध्र प्रदेशातील शिश, जस्त, तांबे इ. खाणीमधून हे कमी जास्त प्रमाणात आढळते. चीन, रशिया, बोलिव्हिया, पेरू येथे या खनिजाचे मोठे साठे आहेत.
संदर्भ :
- Deer, Howie and Zussman, Rock-Forming Minerals, 2nd edition By M.E. Fleet, The Geological Society, London, 2003, 758 pp.
समीक्षक : श्रीनिवास कृष्णाजी वडगबाळकर
Discover more from मराठी विश्वकोश
Subscribe to get the latest posts sent to your email.
