(काचमणी, गारगोटी, गारमणी, गोमेद). सिलिका वर्गातील अकीक (ॲगेट-चालसेडोनी) प्रकारातील एक अर्ध-मौल्यवान खनिज. गारगोटीचे सूक्ष्म किंवा अर्ध स्फटिकीय चालसेडोनीचे सुस्पष्ट, पातळ वा जाड, काळे व पांढरे सर्वसाधारण सरळ समांतर पट्टे असलेले पट्टेदार रूप म्हणजे ऑनिक्स किंवा ऑनएक्स. ग्रीक भाषेत ऑनिक्स म्हणजे नखावरील पट्ट्याप्रमाणे दिसणारे खनिज. या खनिजाबद्दल ग्रीक आख्यायिका अशी, व्हिनस देवता सिंधुनदिकिनारी आराम करत असताना प्रेमदेवता क्युपीडने तिच्या नखावर बाण मारला. तिचे नख नदीपात्रात पडले नंतर वाहत वाहत कालांतराने त्याचे रूपांतर ऑनिक्स या रत्नात झाले.

गुणधर्म : रा.सू. SiO2 +SiO2.n.H2O. षटकोनीय-त्रिकोणीय स्फटिक प्रणालीत तयार होणारे आणि सिलिकॉन चतुष्पृष्ठाची त्रिमितीय अस्पष्ट जाळीदार रचना असणारे हे अर्धस्फटिक खनिज आहे. ते रेशमी, चमकदार असून असमान अथवा शंकूकार तुटते. काठीण्य ६.५ -७. विशिष्ट गुरुत्व २.५५ -२.७०. अजिबात भंजन नसल्याने खनिजाची रेषा रंगहीन/पांढरी असते. प्रकाशिकीय दृष्ट्या हे खनिज एकाक्षीय धन(+ve) आहे.
भूवैज्ञानिक उत्पत्ती : ज्वालामुखीच्या खडकातील पोकळ्यांमध्ये खोलवरचे सिलिकायुक्त गरम पाणी हळूहळू थराथराने साचते. प्रत्येक थराचा रंग पाण्यातील मिसळणाऱ्या इतर खनिजांच्या घटकांमुळे बदलतो. अर्धवट स्फटिकीकरणाच्या प्रक्रियेतून जाताना भूवैज्ञानिक कालावधीत विविध पट्टे-पट्टे असलेला ऑनिक्स सिलिका वर्गातील इतर खनिजांसमवेत तयार होतो.
उपयोग : प्राचीन काळापासून या खनिजावर उत्कृष्ट कोरीवकाम करण्यात येते. अंगठी, पदक, माळ, ब्रेसलेट इ. विविध शोभेच्या वस्तूनी जुने राजवाडे आणि आजची संग्राहालये समृद्ध आहेत. दागदागिन्यामध्येही या खनिजाचे स्थान पहिल्या शतकापासून दिसते. पहिल्या शतकातील रोमन विचारवंत थोरला प्लिनी याने आपल्या प्रसिद्ध Historia Naturalis (इं. शी. नॅचरल हिस्टरी) या ग्रंथात या खनिजाबद्दल लिहिले आहे. प्राचीन इजिप्तमध्येही ऑनिक्सच्या शोभेच्या वस्तू व दागिने आढळतात. काळा ऑनिक्स कापायला व पॉलिश करायला सोपा म्हणून कॅमिओ (Cameo) नक्षीकामासाठी २००० वर्षांपासून वापरतात. रोमन लोकांनी हे नाव ॲलॅबॅस्टर, कॅल्सेडोनी आणि आता ऑनिक्स मार्बल म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या खनिजासह विविध प्रकारच्या शोभिवंत कामासाठी वापरले होते. बायबलमध्ये ऑनिक्सचा उल्लेख ‘जो यहोवाच्या महायाजकांच्या छातीवरील चिलखत सुशोभित करत असे’ असा केलेला आढळतो.
पांढरे व करडे पट्टे असणाऱ्या ऑनिक्सच्या प्रकाराला कॅल्सिडॉनिक्स म्हणतात. भारतात याला काळा हकीक अथवा सुलेमानी हकीक म्हणूनही ओळखतात. याचा वापर सजावटीत आणि फरसबंदीत होतो. सर्वांत प्रसिद्ध असलेला गडद काळा आणि वर पांढरा पट्टा असणाऱ्या प्रकाराला ब्लॅक ऑनिक्स म्हणतात. सार्डॉनिक्स म्हणजे तपकिरी-लालसर व पांढरे पट्टे असलेला प्रकार आणि ग्रीन ऑनिक्स म्हणजे फिकट हिरवा व पांढरे पट्टे असलेला प्रकार. ग्रीन ऑनिक्स याला शांततेचे प्रतीक मानतात. हा पाकिस्तान व भारतात सापडतो.
आढळ – महाराष्ट्रात दख्खन पठाराच्या काही भागातून तसेच जळगाव, नाशिक जिल्ह्यात अकीक-चालसेडोनी येथह ऑनिक्स भरपूर प्रमाणात सापडतात. परंतु काळे-पांढरे पट्टेदार ऑनिक्स क्वचित सापडते. गुजरातमधील राजपीपला – कच्छ, कर्नाटक व आंध्र प्रदेश या राज्यातील दख्खनच्या पठारावर तसेच द. अमेरिका, अफ्रिका, ब्राझील, अरबस्तान इ. प्रदेशांच्या काही भागातून ऑनिक्सचे चांगले नमुने आढळतात.
संदर्भ :
- Deer, Howie and Zussman, Rock-Forming Minerals, 2nd edition By M.E. Fleet, The Geological Society, London, 2003, 758 pp.
- Read, H. H., Rutley’s Elements of Mineralogy, 24th edition, Londan, 1947.
समीक्षक : वडगबाळकर, श्रीनिवास कृष्णाजी
Discover more from मराठी विश्वकोश
Subscribe to get the latest posts sent to your email.
